Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवसारी येथील विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन तसेच लोकार्पण करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

नवसारी येथील विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन तसेच लोकार्पण करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण


नवी दिल्ली 22 फेब्रुवारी 2024

 

भारतमातेचा विजय असो!

भारतमातेचा विजय असो!

गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, राज्य सरकारमधील मंत्री, या भागाचे प्रतिनिधित्व करणारे संसदेतील माझे सहकारी तसेच भारतीय जनता पार्टीचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील, संसद सदस्य तसेच आमदार आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कसे आहात तुम्ही सगळे?

गुजरातमध्ये आज हा माझा तिसरा कार्यक्रम आहे. आज सकाळीच मला अहमदाबाद मध्ये संपूर्ण गुजरातमधील लाखो पशुपालक सहकारी, दुग्धविकास क्षेत्रात कार्यरत लोक यांची भेट घेण्याची संधी मिळाली, त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. त्यानंतर, मेहसाणा येथील वाडीनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहोळ्यात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले.आता नवसारी मध्ये तुम्हा सर्वांच्यासह विकास कामांच्या या उत्सवात भाग घेतो आहे.

तुम्ही एक काम करू शकता. भूपेंद्र भाईंनी सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात बहुधा प्रथमच इतक्या मोठ्या खर्चाच्या विकासकामांची एकाच वेळी सुरुवात होत आहे. तर विकासाच्या या भव्य उत्सवात तुम्ही एक काम करा, कराल का? आपापले मोबाईल फोन काढून त्याचे फ्लॅश लाईट सुरु करा आणि विकासाच्या या उत्सवात भागीदार बना. भारतमातेचा विजय असो….अशा निरुत्साही घोषणा नकोत. भारतमातेचा विजय असो.. भारतमातेचा विजय असो.. भारतमातेचा विजय असो. शाब्बास. नवसारीमध्ये जसे काही अनेक हिरे लखलखत आहेत असे वाटत आहे. काही वेळापूर्वीच बडोदा, नवसारी, भडोच, सूरत आणि इतर काही भागांतील जनतेसाठी हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची भेट मिळाली आहे. वस्त्रोद्योग, वीजनिर्मिती आणि शहरी विकासाशी संबंधित 40 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या प्रकल्पांबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.  

मित्रांनो,

आजकाल संपूर्ण देशात एका गोष्टीची फार जोरात चर्चा सुरु आहे, संसदेत देखील चर्चा सुरु आहे आणि गल्ली-बोळात देखील त्याच गोष्टीवर चर्चा होत आहे. आणि ती चर्चा आहे ‘मोदी की गॅरंटी’ची. देशातील लहान लहान मुले म्हणू लागली आहेत की मोदी जे बोलतात ते करून देखील दाखवतात. देशातील बाकीच्या लोकांसाठी कदाचित ही नवीन गोष्ट असेल ,पण गुजरातच्या जनतेला तर अनेक वर्षांपूर्वीपासून हे माहीत आहे की, मोदी की गॅरंटी, मोदींची हमी म्हणजे…. हमी पूर्ण होण्याचीच हमी. तुमच्या लक्षात असेल मी जेव्हा गुजरात सरकारमध्ये होतो तेव्हा पाच एफची चर्चा करत असे. काय होते हे पाच एफ?..त्याचा अर्थ होता फार्म टू फायबर, फायबर टू फॅक्टरी, फॅक्टरी टू फॅशन, फॅशन टू फॉरेन, अशी पाच एफ ची चर्चा मी करत असे. म्हणजे शेतकरी कापूस पिकवेल, कापूस कारखान्यात जाईल, कारखान्यात तयार झालेल्या धाग्यांपासून कपडे तयार होतील आणि हे कपडे परदेशात निर्यात होतील.

वस्त्रोद्योग क्षेत्राची एक संपूर्ण पुरवठा आणि मूल्यसाखळी आपल्याकडे असायला हवी हा माझा उद्देश होता. असायला हवी की नको, हवी ना? आज आत्मनिर्भर भारताची उभारणी करण्यासाठी आम्ही अशा प्रणालींची निर्मिती करत आहोत. हा पंतप्रधान मित्र पार्क हा उपक्रम देखील याच अभियानाचा भाग आहे. नवसारीमध्ये आज ज्या  पंतप्रधान मित्र पार्कचे काम सुरु होत आहे तो वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी निर्माण करण्यात आलेला देशातील पहिलाच अशा प्रकारचा उपक्रम आहे. यातून कापड उद्योगाला बळ मिळेल, वस्त्र निर्यातीतील भारताचा वाटा वाढेल. तुम्ही कल्पना करा… सूरतचे हिरे आणि नवसारीचे कपडे… जगातील फॅशन बाजारात गुजरातचे किती मोठे नाव होईल, सगळीकडे गुजरातचा जयजयकार होईल, हो की नाही? गुजरातचा प्रतिध्वनी ऐकू येईल, हो ना?

मित्रांनो,

आज एक प्रकारे सूरत या रेशीम शहराचा विस्तार नवसारीपर्यंत होत आहे. आज या क्षेत्रातील जगातल्या मोठमोठ्या उत्पादकांसमोर आणि निर्यातदारांसमोर भारत खांद्याला खांदा लावून उभा आहे. आणि यामध्ये गुजरातच्या वस्त्रोद्योगाचे फार मोठे योगदान आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सूरतमध्ये निर्मित कापडाला स्वतःची अशी एक चांगली ओळख मिळाली आहे. या ठिकाणी जेव्हा पंतप्रधान मित्र पार्क तयार होईल तेव्हा या संपूर्ण क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून जाईल. या पार्कच्या उभारणीसाठी 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. येथे सूत कताई, विणकाम, जिनिंग, प्रावरणे, तंत्रज्ञान संबंधी वस्त्रे आणि वस्त्रोद्योगामध्ये आवश्यक यंत्रसामग्री अशा प्रत्येक कार्यासाठी मूल्यसाखळीची परिसंस्था तयार होईल. म्हणजेच येथे हजारो कारागीर, मजूर काम करू शकतील. या पार्कमध्ये कामगारांसाठी घरे, लॉजिस्टिक्स पार्क, साठवण गोदामे, आरोग्य सेवा, प्रशिक्षण तसेच कौशल्यविकास यांच्या देखील सोयी असतील. म्हणजेच हा पार्क या परिसरातील गावांमध्ये देखील रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणार आहे.

मित्रांनो,

आज सूरतच्या जनतेसाठी आणखी एका महत्त्वाच्या प्रकल्पाचे काम सुरु होत आहे. सुमारे 800 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करून उभारण्यात येणाऱ्या तापी नदीवरील बंधाऱ्याचा आज कोनशिला समारंभ झाला आहे. तापी नदीवरील बंधाऱ्याचे बांधकाम झाल्यामुळे’सूरत मधील अनेक वर्षांची पाणीपुरवठा समस्या सुटेल. तसेच या भागात पूरसदृश परिस्थिती सारखे धोके निर्माण होण्याला देखील अटकाव होईल.

मित्रांनो,

गुजरातमधील जनतेच्या जीवनात तसेच औद्योगिक विकासात विजेचे महत्त्व सगळेच नीटपणे जाणतात. 20-25 वर्षांपूर्वी एक काळ असा होता जेव्हा गुजरातमध्ये तासनतास वीजपुरवठा खंडित होत असे. आज तुमच्यापैकी जे 20-25 वर्ष वयाचे लोक आहेत ना त्यांना तर हे समजूच शकत नाही की आम्ही त्या काळी अंधारात जीवन कसे व्यतीत करत असू. मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री झालो तेव्हा लोक माझ्याकडे येऊन कळकळीने विनंती करत असत की काही करून रात्रीच्या जेवणाच्या वेळी तरी वीज पुरवठा होऊ द्या. तुम्ही विचार करा, तेव्हा लोक म्हणत, साहेब रात्रीचे जेवण तरी दिव्यांच्या उजेडात होईल यासाठी काहीतरी करा. तर अशी परिस्थिती होती. लोकांचे हाल होत होते. वीज उत्पादनासाठी तेव्हा येथे अनेक अडचणी होत्या. कोळशाची गरज होती, तोही फार लांबून येथे आणावा लागत असे किंवा परदेशातून मागवावा लागत असे. गॅसपासून वीज निर्माण करायची म्हटली तर तोही आयात करुनच आणावा लागला असता. येथे पाण्यापासून वीजनिर्मिती होण्याची शक्यता फार कमी होती. या सर्व संकटांच्या स्थितीत गुजरातचा विकास अशक्य वाटत होता.पण, अशक्य ते शक्य करून दाखवण्यासाठीच तर मोदी आहेत.म्हणूनच, गुजरात राज्याला वीजटंचाईतून बाहेर काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली.आम्ही सौर ऊर्जा, पवन ऊर्जा अशा पर्यायांवर अधिक भर दिला. आज गुजरातमध्ये सौर उर्जा, पवन ऊर्जा यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जाते.

मित्रांनो,

एकविसाव्या शतकातील भारतात वीजनिर्मिती करण्यात आपल्या अणुभट्ट्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. आजच तापीच्या काक्रापार अणुऊर्जा केंद्रातील दोन नव्या अणुभट्ट्यांचे राष्ट्रार्पण करण्यात आले आहे. या अणुभट्ट्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आल्या आहेत. एकदा भारतमातेचा विजय असो अशी घोषणा देऊन या आत्मनिर्भरतेबद्दल अभिमानाने हात उंचावून दाखवा, भारतमातेचा विजय असो. भारत आज प्रत्येक क्षेत्रात कशा प्रकारे आत्मनिर्भर होतो आहे हेच यातून दिसून येते. या प्रकल्पामुळे गुजरातला अधिक वीजपुरवठा होईल, येथील औद्योगिक विकासाला आणखी चालना मिळेल.

मित्रांनो,

नवसारी असो की बलसाड, दक्षिण गुजरातचा हा भाग आज अभूतपूर्व वेगाने विकास करत आहे. येथील पायाभूत सुविधा सतत आधुनिक रूप घेत आहेत.आज मी जेव्हा सौर ऊर्जेची चर्चा करतो, आपल्या गुजरातबद्दल बोलायचे झाले तर गुजराती माणूस पैनपैचा हिशोब ठेवतो. बरोबर आहे ना? हिशोबात अगदी पक्के. आता मोदी तुम्हाला दुसरी हमी देत आहे, ती तुमच्यासाठी अगदी फायदेशीरच आहे.300 युनिट मोफत वीज देणारा हा उपक्रम आहे आणि त्याचे नाव आहे पंतप्रधान सूर्यघर योजना.पंतप्रधान सूर्यघर योजनेतून 300 युनिट वीज मोफत. सरासरी मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये, एसी असेल, पंखा असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, सगळ्यासाठी वीज वापरता येईल. तुमच्या घरांच्या छतांवर सोलर पॅनल लावण्यासाठी देखील सरकार पैसे देईल, बँकेकडून कर्ज मिळवून देईल. तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही 300 युनिटपेक्षा जास्त वीजनिर्मिती करत आहात आणि तुमची गरज भागवून उरलेली वीज तुम्ही विकू इच्छिता तर ही अतिरिक्त वीज देखील सरकार विकत घेईल. त्याचे पैसे देखील तुम्हाला मिळतील. सांगा फायद्याचा सौदा आहे की नाही? गुजरातमधील घराघराने या छतावरील सौर ऊर्जेतून वीजनिर्मिती, सौर वीज आणि मोफत वीज मिळवण्याचा कामात झोकून द्यावे. ही मोदींची गॅरंटी आहे. या भागातून देशातील सर्वात पहिल्या बुलेट ट्रेनचा मार्ग देखील जात आहे. या ट्रेनमुळे मुंबई आणि सूरत ही देशातील महत्त्वाची आर्थिक केंद्रे एकमेकाला जोडली जाणार आहेत.

मित्रांनो,

आता औद्योगिक विकासासाठी नवसारीची ओळख होऊ लागली आहे मात्र नवसारीसह हा संपूर्ण दक्षिण गुजरात, शेतीमध्येही अग्रेसर आहे.भाजपा सरकारने इथल्या शेतकऱ्यांना सुविधा द्यायला सुरवात केली त्यानंतर इथे फळ शेती वाढली.इथले हापूस आंबे, वलसाडी आंबे, नवसारीचे चिकू हे सर्व जगभरात इतके प्रसिद्ध आहेत की मी जिथे जातो तिथे लोक मला हे सांगतात.दुहेरी इंजिन सरकार आज पावलोपावली शेतकऱ्यांना सहाय्य करत आहे. नवसारीच्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीतूनही 350 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत प्राप्त झाली आहे.

मित्रांनो,

मोदींनी, देशातले गरीब,शेतकरी,युवा आणि महिला सर्वांना सबल करण्याची   गॅरेंटी  दिली आहे आणि ही गॅरेंटी  केवळ योजना बनवण्याची नाही तर जे   योजनेसाठी  पात्र आहेत त्यांच्या पर्यंत या योजनांचा  लाभ पूर्णपणे पोहोचवण्याचीही गॅरेंटी  आहे.मोदी यांची  यासाठी गॅरेंटी  आहे की देशातल्या  कोणत्याही कुटुंबाला  गरिबीत  जीवन कंठावे  लागू नये , अभावात जगावे लागू नये. म्हणूनच सरकार  लाभार्थ्यापर्यंत  पोहोचत आहे.लाभार्थ्यांचा शोध    घेत त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे, योजनांशी त्यांना जोडत आहे.

मित्रांनो,

काँग्रेस, दीर्घ काळ देशात आणि गुजरात मध्ये सत्तेत राहिली आहे. मात्र त्यांनी  कधी आदिवासी क्षेत्रांची,समुद्र किनाऱ्यावरच्या गावांची दखल घेतली नाही. इथे गुजरातमध्ये भाजपा सरकारने, उमरगावपासून अंबाजी पर्यंत, संपूर्ण आदिवासी पट्ट्यात प्रत्येक प्राथमिक सुविधा पोहोचवण्यासाठी अखंड काम केले आहे. मात्र देश स्तरावर असे झाले नाही.2014 पर्यंत  देशात 100 पेक्षा जास्त जिल्हे, विकासात अतिशय मागास होते,कोणी विचारणारे नव्हते. यामधे प्रामुख्याने आदिवासी बहुल जिल्हे होते.गेल्या 10 वर्षात आम्ही या जिल्ह्यांच्या वेगवान विकासासाठी त्यांना आकांक्षी केले.आज आकांक्षी जिल्हा अभियानामुळे  देशातले हे 100 जिल्हे विकासात झपाट्याने पुढे येत आहेत.

बंधू – भगिनींनो,

जिथे इतरांकडून  उमेद संपते तिथून मोदींची गॅरेंटी  सुरू होते.देशातल्या गरिबाला पहिल्यांदाच विश्वास वाटत आहे की आपल्याला पक्के घर मिळेल – कारण मोदींची गॅरेंटी  आहे.गरीबातल्या गरिबाला प्रथमच हा विश्वास निर्माण झाला आहे की त्याला उपाशीपोटी झोपावे लागणार नाही, दुःख   सोसावे लागणार नाही – कारण मोदींची गॅरेंटी  आहे. दुर्गम भागातल्या भगिनींनाही भरवसा आहे की त्यांच्या घरात वीज येईल, नळाचे पाणी येईल – कारण मोदींची गॅरेंटी  आहे.गरीब,शेतकरी,दुकानदार,मजूर,या सर्वांनी आपल्यासाठीही विमा आणि पेन्शन योजना बनतील असा विचारही कधी केला नसेल.मात्र आज हे घडले आहे – कारण मोदींची गॅरेंटी  आहे. दोन्ही हात उंचावा – कारण मोदींची गॅरेंटी  आहे.

मित्रांनो,

आदिवासी भागात सिकलसेल अ‍ॅनिमिया हे एक मोठे आव्हान राहिले आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना यासाठी अनेक पाऊले उचलण्यात आली. मात्र हा आजार दूर करण्यासाठी देश पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक होते.आता सिकलसेल अ‍ॅनिमिया पासून मुक्तीसाठी राष्ट्रीय अभियान सुरु करण्यात आले आहे.या अंतर्गत देशभरातल्या आदिवासी क्षेत्रांमध्ये सिकलसेल अ‍ॅनिमियाची तपासणी करण्यात येत आहे.विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यानही लाखो लोकांची तपासणी झाली आहे.आता इथे वैद्यकीय महाविद्यालयही उभे राहत आहे.आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये  वैद्यकीय महाविद्यालय उभे राहणे किती मोठी गोष्ट असते. आज अनेक आदिवासी जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये झाली आहेत.

मित्रांनो,

गरीब असो किंवा मध्यम वर्ग,गाव असो किंवा शहर, प्रत्येक देशवासीयाचा  जीवनस्तर अधिक उंचवावा हाच आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. आपल्या दशकांच्या शासन काळात काँग्रेस, भारताची अर्थव्यवस्था 11 क्रमांकाची करू शकली. अर्थव्यवस्था मागे राहण्याचा अर्थ म्हणजे देशाकडे पैसाही कमी राहत होता. म्हणूनच तेव्हा ना गावाचा उत्तम विकास होऊ शकला नाही  ना छोट्या शहरांचा विकास झाला. भाजपा सरकारने आपल्या 10 वर्षांच्या शासन काळात भारताची अर्थव्यवस्था 10 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर आणली. याचाच अर्थ आज देशाकडे खर्च करण्यासाठी जास्त पैसा आहे आणि म्हणूनच  आज भारत हा पैसा खर्चही करत आहे. म्हणूनच आज देशातल्या छोट्या शहरांमध्येही कनेक्टीव्हिटीच्या उत्तम पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत.छोट्या शहरांमधूनही विमानप्रवास इतका सुलभ होईल असा विचारही कोणी केला नसेल.आज देशातल्या अनेक शहरांमधले लोक विमान प्रवासाचा लाभ घेऊ शकत आहेत.काँग्रेसच्या दशकांच्या शासन काळात शहरांना झोपडपट्ट्या  दिल्या. झोपडपट्ट्याच्या जागी आम्ही गरिबांना पक्की घरे देत आहोत.गेल्या 10 वर्षात आम्ही गरिबांना 4 कोटी पेक्षा जास्त पक्की घरे उभारून दिली आहेत…4 कोटी, आपण विचार करा.

मित्रांनो,

आज जग डिजिटल इंडिया म्हणून भारताला ओळखते.हे तेच डिजिटल इंडिया अभियान आहे ज्याची काँग्रेस कधी खिल्ली उडवत असे. आज डिजिटल इंडियाने छोट्या शहरांचे परिवर्तन घडवले आहे.या छोट्या शहरांमध्ये नवे स्टार्ट अप्स उभारले जात आहेत, क्रीडा क्षेत्रात नवे युवक पुढे येत आहेत. गुजरात मधेही छोट्या शहरांचा विस्तार होताना आपण पाहत आहोत.या छोट्या शहरांमध्ये नव मध्यमवर्ग तयार होताना दिसत आहे. हाच नव मध्यमवर्ग भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवेल.

बंधू आणि भगिनींनो,

भाजपा सरकार विकासावर जितका भर देत आहे तितकेच लक्ष आपल्या वारश्याकडेही देत आहे.हे क्षेत्र तर आपल्या श्रद्धा आणि इतिहास यांचे महत्वाचे केंद्र राहिले आहे.स्वातंत्र्याची चळवळ असो किंवा राष्ट्र निर्मिती अभियान,या क्षेत्राचे योगदान सर्वाधिक आहे. मात्र घराणेशाही,तुष्टीकरण आणि भ्रष्टाचार हेच राजकारणाचे एकमेव लक्ष्य होते तेव्हा वारसा दुर्लक्षिला जातो.दुर्दैवाने काँग्रेसने अनेक दशके देशावर हा अन्याय केला आहे. आज संपूर्ण जगात भारताची समृद्ध परंपरा दुमदुमत आहे.आपण जगात कुठेही जा,लोक भारताविषयी जाणून घेऊ इच्छितात, भारतात येऊ इच्छितात हे आपल्याला जाणवेल. मात्र कॉंग्रेसने अनेक दशके जगाला भारताच्या खऱ्याखुऱ्या वारश्यापासून लांबच ठेवले.स्वातंत्र्य लढ्यात पूज्य बापूंनी मीठ आणि खादी यांना स्वातंत्र्याचे प्रतिक केले. कॉंग्रेसने खादीही उध्वस्त केली आणि मिठाच्या सत्याग्रहाच्या या भूमीचाही  त्यांना विसर पडला. मिठाच्या दांडी सत्याग्रहाच्या स्थळी दांडी स्मारक उभारण्याचे भाग्य आमच्या सरकारला लाभले.सरदार पटेल यांच्या योगदानाला समर्पित स्टॅच्यू ऑफ युनिटी आम्ही उभारला. मात्र त्यांना आदरांजली देण्यासाठी कॉंग्रेसचा एकही ज्येष्ठ नेता आतापर्यंत तिथे गेला नाही.गुजरात प्रतीची ही द्वेषपूर्ण भावना गुजराती कधी विसरू शकत नाही.

मित्रांनो,

आपण पाहिले असेल की कॉंग्रेसचे हे लोक मोदींच्या जातीलाही अपशब्द बोलतात.मात्र काँग्रेसवाले हे विसरतात की जितके अपशब्द बोलाल – 400 पार हा संकल्प तितकाच भक्कम होईल. हे जितकी चिखलफेक करतील- 370 जागांवर  कमळ तितक्याच शानदारपणे फुलेल.

बंधू आणि भगिनींनो,

काँग्रेसकडे मोदींना अपशब्द बोलण्याखेरीज, देशाच्या भविष्यासाठी कोणताही ठोस कार्यक्रम नाही. एखादा पक्ष जेव्हा घराणेशाही मध्ये अडकतो तेव्हा कुटुंबाच्या बाहेर त्याला काही दिसत नाही हे यातून दिसत आहे. घराणेशाहीची मानसिकता नव्या विचारांची शत्रू असते. घराणेशाहीच्या मानसिकतेचे नव्या प्रतिभेशी वैर असते.

घराणेशाहीची मानसिकता युवकांची शत्रू असते.आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी ते तीच जुनी स्थिती कायम ठेवू इच्छितात.कॉंग्रेसचे आज असेच झाले आहे. तर भाजपा येत्या 25 वर्षाचा एक आराखडा घेऊन देशासमोर विकासाचे लक्ष्य घेऊन निघाला आहे.या 25 वर्षात आम्ही विकसित गुजरात घडवू आणि विकसित भारत निर्माण करू.

मित्रांनो,

आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात, माता- भगिनी इतक्या मोठ्या संख्येने आल्या, आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद दिलात, यासाठी मी आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.विकास कामांसाठी आपणा सर्वाना पुन्हा एकदा खूप-खूप शुभेच्छा. माझ्यासमवेत म्हणा-   

भारत माता की जय !

दोन्ही हात उंचावून संपूर्ण ताकदीने म्हणा –  

भारत माता की – जय !

भारत माता की – जय !

भारत माता की – जय !

खूप –खूप धन्यवाद !

* * *

NM/Patil/Sanjana/Nilima/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai