पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज 7, लोककल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी, देशात सध्या असलेली उष्णतेची लाट आणि मोसमी पावसाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सज्जतेचा आढावा घेण्यासंदर्भात बैठक झाली.
राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागात उष्णतेची लाट सुरु राहण्याच्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजाविषयी पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. देशाच्या बहुतांश भागांमध्ये मान्सून सरासरीइतका आणि सरासरीपेक्षा जास्त तर द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी राहण्याच्या अंदाजाबाबत पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.
आगीच्या घटना रोखण्यासाठी आणि हाताळण्यासाठी योग्य सराव नियमितपणे केला पाहिजे असे निर्देश पंतप्रधानांनी दिले. रुग्णालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणांचे अग्नी सुरक्षा लेखापरीक्षण आणि विद्युत सुरक्षा लेखापरीक्षण नियमितपणे केले जावे,असे त्यांनी सांगितले. जंगलात वणवा पसरण्यापासून रोखण्यासाठी नियमित कवायती आणि बायोमासच्या उत्पादक वापराचे नियोजन करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.जंगलात आग पसरू नये यासाठी अग्निरेषा राखण्यावर नियमित देखरेख आणि बायोमासच्या उपयुक्त वापराचे नियोजन करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
जंगलातील आग वेळेवर ओळखण्यासाठी आणि ती शमविण्यासाठी “वन अग्नि” पोर्टलच्या उपयुक्ततेबद्दल पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.
पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, गृह सचिव, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव,एनडीआरएफचे महासंचालक आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांच्यासह पंतप्रधान कार्यालय व संबंधित मंत्रालयांचे इतर वरिष्ठ अधिकारीही या बैठकीत उपस्थित होते.
***
S.Kane/S.Kakade/S.Kane
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai