21 व्या शतकाला अनुरूप अशी पायाभूत संरचना देशात विकसित करण्यासाठी सरकार 100 लाख कोटी रुपये खर्च करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत मेट्रोच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन करताना सांगितले. 20 हजार कोटी रुपयांहून अधिकच्या कामांना आज झालेल्या प्रारंभामुळे मुंबईतल्या पायाभूत संरचनेला नवा आयाम मिळेल आणि लोकांचे जीवनमान आणखी सुधारेल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईच्या गतीशील विकासामुळे देशाच्या विकासालाही चालना मिळत असल्याचे, असे ते म्हणाले.
पाच ट्रिलिअन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरु आहे, यासाठी शहरं ही 21व्या शतकाला अनुरूप हवीत आणि त्यासाठी उत्तम वाहतूक, सुरक्षितता या बाबींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
मुंबईमध्ये सध्या असलेला 11 किलोमीटर मेट्रो मार्गाचा 2023-24 पर्यंत 325 किलोमीटरपर्यंत विस्तार होईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले. देशात पहिली मेट्रो सुमारे 30 वर्षांपूर्वी धावली आणि 2014 पर्यंत मेट्रो सेवा काही शहरांपूरतीच मर्यादित राहिली. मात्र, आज देशातल्या 27 शहरांमध्ये मेट्रो सुरु झाली आहे अथवा नजिकच्या भविष्यात सुरु होणार आहे. गेल्या 5 वर्षात देशात 400 किलोमीटर मेट्रो मार्ग सुरु झाले आहेत. त्याचबरोबर 600 किलोमीटरच्या मेट्रो मार्गांना मंजूरी देण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई आणि महाराष्ट्रात विकास कामे वेगाने पूर्णत्वाकडे नेत असल्याबद्दल पंतप्रधानांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा केली.
पायाभूत संरचनेचा रोजगाराशीही संबंध आहे, आज सुरु झालेल्या विकास कामांमुळे 10 हजार अभियंते आणि 40 हजार कुशल आणि अकुशल मनुष्यबळाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
वर्तमानात सुविधा निर्माण करताना भविष्यासाठीही तरतूद करायला हवी, भावी पिढीला समस्यांना तोंड द्यावे लागू नये, यादृष्टीने आपण प्रयत्न केले, तरच येणारी पिढी अधिक सुखी होईल, असे ते म्हणाले.
केंद्रातल्या सरकारला 100 दिवस पूर्ण होत असून, या काळात अनेक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. हे निर्णय भारतीयांना अधिक मजबूत आणि सुरक्षितता प्रदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने भाषणाची सुरुवात करत पंतप्रधानांनी गणेशोत्सवाच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या. ‘स्वराज्य हा, माझा जन्म सिद्ध हक्क आहे’ या लोकमान्य टिळकांच्या गर्जनेचा उल्लेख करत ‘सुराज्य हे देशवासियांचे कर्तव्य’ असल्याचा नवा मंत्र त्यांनी दिला. देशहितासाठी संकल्प करा, तो पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा. गणपती बाप्पाच्या विसर्जनादरम्यान जलप्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन त्यांनी केले. समुद्र तसेच मिठी नदीसह इतर जलस्रोतही प्लास्टिकमुक्त करण्यासाठी संकल्प करावा आणि त्यामुळे देश प्लास्टिकमुक्त करण्याच्या मोहिमेला मोठा हातभार लागेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
चंद्रयान-2 या मोहिमेत आता काही समस्या निर्माण झाली असली तरी चंद्रावर जाण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला. लक्ष्य साध्य करेपर्यंत शास्त्रज्ञ अथक प्रयत्न करत राहतील, लक्ष्य साध्य कसं करावे हे आपण इस्रोच्या वैज्ञानिकांकडून शिकावे, त्यांच्या मनोबलाने आपण प्रभावित झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
मुंबईच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित प्रयत्न करत असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यावेळी सांगितले.
‘वन नेशन, वन कार्ड’ असणारे मुंबई हे देशातले पहिले शहर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. मेट्रो भवन हे देशातले सर्वात मोठे नियंत्रण केंद्र ठरणार असून, यामध्ये आधुनिक सिग्नल यंत्रणेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होणार असल्याने यंत्रणेत बिघाडाची शक्यता अत्यल्प असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मेक इन इंडियाला चालना देण्याच्या दृष्टीने, मेट्रो कोच बनवण्यासाठी एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने ‘बीईएमएल’शी करार केला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे डबे आता भारतातही तयार होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला दिशा देणारे नेतृत्व मिळाले असल्याचे गौरवोद्गार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले.
पंतप्रधानांनी 10, 11 आणि 12 या तीन मेट्रो मार्गांची रिमोट कंट्रोलचे बटण दाबून पायाभरणी केली. या तीन मार्गांमुळे शहरातील मेट्रोचे जाळे 42 किलोमीटरने वाढणार आहे. यामध्ये गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) हा मेट्रो-10 वरील 9.2 किलोमीटर मार्ग, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मेट्रो-11 वरील 12.7 किलोमीटरचा मार्ग आणि कल्याण ते तळोजा हा मेट्रो-12 वरील 20.7 किलोमीटरचा मार्ग समाविष्ट आहे.
32 मजली अद्ययावत मेट्रो भवनाचे भूमीपूजनही त्यांनी केले. ही इमारत 340 किलोमीटर अंतराच्या 14 मेट्रो मार्गांचे परिचालन आणि नियंत्रण करेल. कांदिवली-पूर्व इथल्या बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटनही त्यांनी केले. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पहिल्या मेट्रो डब्याचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले त्याचबरोबरच महामुंबई मेट्रोसाठी ब्रॅण्ड व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या आधी पंतप्रधानांनी विले-पार्ले इथल्या लोकमान्य सेवा संघाला भेट देऊन श्रीगणेशाची पुजा आणि प्रार्थना केली तसेच लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
N.Sapre/N.Chitale/D.Rane
Enhancing ‘Ease of Living’ for the people of Mumbai.
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2019
Work has begun on developmental projects worth over Rs. 20,000 crore for the city. This includes better metro connectivity, boosting infrastructure in metro stations, linking BKC with Eastern Express Highway and more. pic.twitter.com/ZZ6blu1N2e
Improving comfort and connectivity for Mumbai.
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2019
Delighted to inaugurate a state-of-the-art metro coach, which is also a wonderful example of @makeinindia. pic.twitter.com/Dsqe6lmaYy