Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दिल्ली मधील लाल किल्ला येथे पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या इंडियन आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023 चे उद्‌घाटन

दिल्ली मधील लाल किल्ला येथे पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या इंडियन आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023 चे उद्‌घाटन


नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर आयोजित  पहिल्या  इंडियन आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023 (आयएएडीबी)  अर्थात  भारतीय कला, स्थापत्य  आणि रचना द्वैवार्षिक कार्यक्रम 2023 चे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर ‘आत्मनिर्भर भारत डिझाइन सेंटर’ आणि समुन्नती या विद्यार्थी  द्वैवार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यांनी स्मृती तिकिटही प्रकाशित  केले. याप्रसंगी  आयोजित प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. भारतीय कला, स्थापत्य  आणि रचना द्वैवार्षिक कार्यक्रम  दिल्लीतील सांस्कृतिक  ठिकाणांची ओळख करून देईल.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या जागतिक वारसा स्थळी सर्वांचे स्वागत केले आणि भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर अनेक पिढ्या उलटून गेल्या तरीही या  प्रांगणांचे असलेले अमीट आणि अतूट ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले.

पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक राष्ट्राची स्वतःची प्रतीके असतात जी जगाला देशाच्या भूतकाळाची आणि त्याच्या मुळांची ओळख करून देतात. या प्रतीकांशी संबंध जोडण्यासाठी त्यांनी कला, संस्कृती आणि स्थापत्याच्या भूमिकेवर भर  दिला. भारताच्या समृद्ध स्थापत्य वारशाची झलक दाखवणाऱ्या प्रतीकांचा खजिना म्हणून राजधानी दिल्लीचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, दिल्लीतील भारतीय कला, स्थापत्य  आणि रचना द्वैवार्षिक कार्यक्रमाच्या आयोजनाने तिला अधिकच  खास बनवले आहे.  प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या  कलाकृतींचे त्यांनी कौतुक केले . ते म्हणाले की रंग, सर्जनशीलता, संस्कृती आणि समुदायातील बंध  यांचा हा मिलाफ आहे. आयएएडीबी च्या यशस्वी आयोजनाबद्दल  त्यांनी सांस्कृतिक मंत्रालय, त्यांचे अधिकारी, सहभागी राष्ट्रे आणि सर्वांचे अभिनंदन केले. “पुस्तके जगाचा झरोका  म्हणून काम करतात. तर कला हा मानवी मनाचा महान  प्रवास आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

गौरवशाली भूतकाळाचे स्मरण करत भारताच्या आर्थिक समृद्धीची जगभरात चर्चा होत असे असे सांगून  पंतप्रधान म्हणाले की, भारताची संस्कृती आणि वारसा आजही जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात .  कला आणि स्थापत्य या क्षेत्रांशी संबंधित कोणत्याही कार्यात स्वाभिमानाची  भावना प्रकर्षाने जाणवत असताना आपल्या वारशाचा अभिमान बाळगून पुढे जाण्यावर आपला विश्वास आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. मोदी यांनी केदारनाथ आणि काशीच्या सांस्कृतिक केंद्रांचा विकास आणि महाकाल लोक च्या  पुनर्विकासाची उदाहरणे देत स्वातंत्र्याच्या अमृत काळात राष्ट्रीय वारसा आणि संस्कृतीसाठी नवीन आयाम निर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर भर दिला. आयएएडीबी हे या दिशेने टाकलेले एक नवीन पाऊल आहे असे अधोरेखित करून, पंतप्रधानांनी मे 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन  आणि ऑगस्ट 2023 मधील ग्रंथालय महोत्सवाचे आयोजन यांचा उल्लेख केला ज्यांचा उद्देश  भारतातील जागतिक सांस्कृतिक उपक्रमांना आधुनिक प्रणालींसह संस्थात्मक रूप देणे हा आहे.पंतप्रधान मोदी यांनी व्हेनिस, साओ पाउलो, सिंगापूर, सिडनी आणि शारजाह येथील  द्वैवार्षिक कार्यक्रम तसेच दुबई आणि लंडन कला मेळावे यासारख्या जागतिक उपक्रमांप्रमाणे  आयएएडीबी  सारख्या भारतीय सांस्कृतिक उपक्रमांची ओळख निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली. तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या समाजाच्या चढ-उतारात कला आणि संस्कृती  जीवन जगायला शिकवते  म्हणून त्यांनी अशा आयोजनांच्या  गरजेवर भर दिला. मानवी मनाला अंतर्मनाशी जोडण्यासाठी आणि त्याची क्षमता ओळखण्यासाठी कला आणि संस्कृती आवश्यक आहेत असे पंतप्रधान म्हणाले.

आत्मनिर्भर भारत सेंटर फॉर डिझाईनच्या उद्घाटनाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, हे केंद्र भारतातील अद्वितीय आणि दुर्मिळ कलांना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल आणि कारागीर आणि डिझायनर्सना एकत्र आणून त्यांना बाजारपेठेनुसार अभिनव सुधारणा  करण्यासाठी मदत करेल. यातून कारागीरांना नव्या रचना विकसित करण्याचे ज्ञान देखील मिळेल तसेच ते डिजिटल विपणनात देखील  पारंगत होतील,असे सांगत  आधुनिक ज्ञान आणि संसाधनांसह भारतीय कारागीर संपूर्ण जगावर त्यांचा ठसा उमटवू  शकतात असा विश्वास  व्यक्त केला.

दिल्ली, कोलकाता, मुंबई, अहमदाबाद आणि वाराणसी या 5 शहरांमध्ये सांस्कृतिक स्थळांची  निर्मिती हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे  पंतप्रधानांनी अधोरेखित केले . ते म्हणाले की, यामुळे ही शहरे सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समृद्ध होतील.  ही केंद्रे स्थानिक कला समृद्ध करण्यासाठी अभिनव कल्पनाही सुचवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पुढील 7 दिवसांसाठी 7 महत्त्वाच्या संकल्पना नमूद करत पंतप्रधानांनी प्रत्येकाला ‘देशज भारत डिझाइन: स्वदेशी डिझाइन्स’ आणि ‘समत्व: शेपिंग द बिल्ट’ यासारख्या संकल्पना ध्येय म्हणून पुढे नेण्याचे आवाहन केले.  स्वदेशी रचना  अधिक समृद्ध करण्यासाठी त्यांना तरुणांसाठी अभ्यास आणि संशोधनाचा भाग बनवणे  महत्त्वाचे आहे यावर त्यांनी भर दिला. समानता संकल्पना  स्थापत्य  क्षेत्रातील महिलांचा सहभाग दर्शवते  हे लक्षात घेऊन  महिलांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता या क्षेत्राला नव्या उंचीवर नेईल असा  विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“कला, रस   आणि रंग हे भारतात जीवनाचे  समानार्थी शब्द मानले जातात” असे  पंतप्रधानांनी नमूद केले . साहित्य, संगीत आणि कला हेच मानव आणि प्राणी यांच्यातील मुख्य फरक दाखवून देतात या पूर्वजांच्या संदेशाचा त्यांनी पुनरुच्चार केला. “कला, साहित्य आणि संगीत मानवी जीवनात नवे रंग भरतात  आणि ते  खास  बनवतात” यावर त्यांनी भर दिला. चौसष्ट कला म्हणजेच 64 कलांशी जोडलेल्या जीवनाच्या  विविध गरजा आणि जबाबदाऱ्यांचा उल्लेख करून पंतप्रधानांनी उदक वाद्यमकिंवा  पाण्याच्या लहरींवर आधारित वाद्य, गीतांसाठी  नृत्य आणि गायन कला , सुगंध किंवा अत्तर बनवण्यासाठी गंध युक्ती‘, मुलामा चढवणे आणि कोरीव काम करण्यासाठी तक्षकर्मकला आणि भरतकाम आणि विणकामासाठी सुचिवन कर्माणीकला यासारख्या विशिष्ट कलांचा उल्लेख केला. त्यांनी भारतात बनवलेल्या प्राचीन कपड्यांचे हस्त कौशल्य आणि कलाकुसर याकडेही लक्ष वेधले आणि अंगठीतून जाऊ शकणार्‍या मलमल कापडाचे उदाहरण दिले. त्यांनी तलवारी, ढाल आणि भाले यांसारख्या युद्धसामग्रीवरील अप्रतिम कलाकृतींच्या व्यापकतेचाही उल्लेख केला.

पंतप्रधानांनी काशीच्या अविनाशी संस्कृतीवर प्रकाश टाकला आणि सांगितले की हे शहर साहित्य, संगीत आणि कलांच्या अमर प्रवाहाची भूमी आहे. “काशीने आपल्या कलेमध्ये भगवान शिवाची स्थापना केली आहे, ज्यांना आध्यात्मिकरित्या कलांचे प्रवर्तक मानले जाते,” असेही ते म्हणाले. “कला, हस्तकला आणि संस्कृती मानवी संस्कृतीसाठी ऊर्जेच्या ओघाप्रमाणे आहेत आणि ऊर्जा अमर आहे, चेतना अविनाशी आहे. म्हणूनच  काशी देखील अविनाशी आहे. प्रवाशांना काशी ते आसामपर्यंत आणि गंगेच्या काठावर वसलेल्या अनेक शहरांची आणि भागांची सफर घडवणाऱ्या अलीकडेच उदघाटन झालेल्या गंगा विलास क्रूझचे पंतप्रधानांनी वर्णन केले.

कलेचे स्वरूप काहीही असले तरी निसर्गाच्या सान्निध्यात तिचा आविष्कार होतो. त्यामुळे कला ही निसर्गाला , पर्यावरणाला  आणि हवामानाला पूरक असते, यावर पंतप्रधानांनी भर दिला. जगभरातील देशांमधील नदी काठच्या  संस्कृतीवर प्रकाश टाकत मोदींनी भारतातील हजारो वर्षांपासून नद्यांच्या काठावरील घाटांच्या परंपरेशी साधर्म्य साधले. ते म्हणाले की भारतातील अनेक सण आणि उत्सव या घाटांशी निगडित आहेत. त्याचप्रमाणे, पंतप्रधानांनी आपल्या देशातील विहिरी, तलाव आणि पायऱ्यांच्या विहिरीच्या समृद्ध परंपरेवर प्रकाश टाकला आणि गुजरातमधील राणी की वाव आणि राजस्थान आणि दिल्लीतील इतर अनेक ठिकाणांचे उदाहरण दिले. पंतप्रधानांनी या पायरीच्या  विहिरी आणि भारतातील किल्ल्यांची संरचना आणि स्थापत्यकलेची प्रशंसा केली. काही दिवसांपूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याला दिलेल्या भेटीच्या आठवणीही सांगितल्या. नैसर्गिक वातानुकूलित यंत्राप्रमाणे काम करण्यासाठी बांधलेल्या पाच वाड्यांचा समूह असलेल्या जैसलमेरमधील पटवा की हवेलीचा मोदींनी उल्लेख केला. जगाला भारताच्या कला आणि संस्कृतीतून खूप काही समजून घेण्यासारखे आणि शिकण्यासारखे आहे हे अधोरेखित करताना मोदी म्हणाले  ही सर्व स्थापत्यकला  केवळ दीर्घकाळ टिकणारी नव्हती तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही शाश्वत होती.

“कला, वास्तुकला आणि संस्कृती मानवी सभ्यतेसाठी विविधता आणि एकतेचे स्त्रोत आहेत”, याचा मोदींनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात वैविध्यपूर्ण देश असून ही विविधता आपल्याला एकत्र बांधते. त्यांनी विविधतेचे श्रेय भारताच्या लोकशाही परंपरेला लोकशाहीची जननी म्हणून दिले. समाजात विचारस्वातंत्र्य आणि स्वत:च्या मार्गाने काम करण्याचे स्वातंत्र्य असेल तेव्हाच कला, वास्तुकला आणि संस्कृतीचा विकास होतो, असे त्यांनी नमूद केले. हे वैविध्य जगासमोर आणण्यासाठी देशातील विविध राज्ये आणि शहरांमधील जी-20 च्या आयोजनावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले कि चर्चा आणि संवादाच्या या परंपरेने विविधता आपोआपच बहरते. आम्ही सर्व प्रकारच्या विविधतेचे स्वागत करतो आणि त्याचे समर्थन करतो.

पंतप्रधानांनी कोणताही भेदभाव नसलेल्या भारताच्या विश्वासाचा पुनरुच्चार केला कारण तेथील लोक स्वतःऐवजी विश्वाबद्दल बोलतात. आज जेव्हा भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे, तेव्हा प्रत्येकजण त्यात स्वतःचे उज्ज्वल भविष्य पाहू शकतो हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारताचा आर्थिक विकास संपूर्ण जगाच्या प्रगतीशी निगडीत आहे आणि ‘आत्मनिर्भर भारत’ चा दृष्टीकोन नवीन संधी घेऊन येतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्याचप्रमाणे, त्यांनी नमूद केले की कला आणि वास्तुकला क्षेत्रात भारताचे पुनरुज्जीवन देशाच्या सांस्कृतिक उन्नतीसाठी देखील योगदान देईल. योग आयुर्वेदाच्या वारशाचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला आणि भारताची सांस्कृतिक मूल्ये लक्षात घेऊन शाश्वत जीवनशैलीसाठी मिशन LiFE च्या नवीन उपक्रमावर प्रकाश टाकला.

भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी संस्कृतीच्या समृद्धीसाठी परस्परसंवाद आणि सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि सहभागी देशांचे त्यांच्या भागीदारीसाठी आभार मानले. अधिकाधिक देश एकत्र येतील आणि आयएएडीबी ही या दिशेने एक महत्त्वाची सुरुवात ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी, केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि मीनाक्षी लेखी आणि डायना केलॉग आर्किटेक्ट्सच्या प्रमुख वास्तुविशारद, डायना केलॉग आदी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

देशामध्ये व्हेनिस, साओ पाउलो, सिंगापूर, सिडनी आणि शारजाह येथील आंतरराष्ट्रीय बिएनाले सारख्या पथदर्शी जागतिक सांस्कृतिक उपक्रमाचा विकास करणे आणि संस्थात्मक रूप देणे हा पंतप्रधानांचा दृष्टिकोन होता. या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, संग्रहालयांचा पुनर्शोध, पुनर्नामकरण, नूतनीकरण आणि पुनर्संचयन करण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू करण्यात आली. पुढे, कोलकाता, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि वाराणसी या भारतातील पाच शहरांमध्ये सांस्कृतिक क्षेत्रांच्या विकासाची घोषणा करण्यात आली. इंडियन आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले (आयएएडीबी) हे दिल्लीतील सांस्कृतिक क्षेत्राचा परिचय म्हणून काम करेल.

आयएएडीबी चे आयोजन 9 ते 15 डिसेंबर 2023 दरम्यान नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर केले जात आहे. हे नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्स्पो (मे 2023) आणि ग्रंथालयांचा महोत्सव (ऑगस्ट 2023) यांसारख्या प्रमुख उपक्रमांनंतर  याचे आयोजन करण्यात आले आहे.  आयएएडीबी ची रचना कलाकार, वास्तुविशारद, डिझायनर, छायाचित्रकार, संग्राहक, कला व्यावसायिक आणि लोकांमध्ये समग्र संवाद सुरु करण्याकरिता सांस्कृतिक संवाद मजबूत करण्यासाठी झाली आहे. हे विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून कलाकार, वास्तुविशारद आणि संरचनकारांसोबत विस्तार आणि सहयोग करण्याचे मार्ग आणि संधी देखील प्रदान करेल.

आयएएडीबी आठवड्याच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या संकल्पनाधारित प्रदर्शनांचे प्रदर्शन करेल:

पहिला दिवस: प्रवेश- राईट ऑफ पॅसेज: भारतातील दरवाजे

दिवस 2: बाग ए बहार: गार्डन्स एज युनिव्हर्स: भारतातील बागा

दिवस 3: संप्रवाह: कॉन्फल्युएंस ऑफ कम्युनिटीज: भारतातील बारव

दिवस 4: स्थापत्य: अँटी फ्रागाईल अल्गोरिदम: भारतातील मंदिरे

दिवस 5: विस्मय: क्रिएटिव्ह क्रॉसओवर: स्वतंत्र भारतातील वास्तुरचनेतील आश्चर्य

दिवस 6: देशज भारत डिझाइन: देशी रचना

दिवस 7: समत्व: शेपिंग थे बिल्ट: वास्तुकलेमधील  महिलांच्या योगदानाचा उत्सव

आयएएडीबी मध्ये वरील संकल्पनेवर आधारित मंडप, पॅनल चर्चा, कला कार्यशाळा, कला बाजार, हेरिटेज वॉक आणि समांतर विद्यार्थी बिएनाले यांचा समावेश असेल. ललित कला अकादमीतील विद्यार्थी बिएनाले (समुन्नती) विद्यार्थ्यांना त्यांचे कार्य प्रदर्शित करण्याची, समवयस्क आणि व्यावसायिकांशी संवाद साधण्याची आणि आर्किटेक्चर समुदायामध्ये डिझाईन स्पर्धा, वारसा प्रदर्शन, स्थापना डिझाइन, कार्यशाळा इत्यादींद्वारे मौल्यवान धांडोळा घेण्याची संधी प्रदान करेल. आयएएडीबी 23 हा देशासाठी एक महत्वपूर्ण क्षण ठरणार आहे कारण तो भारताला बिएनाले पटलावर प्रवेश देणार आहे.

पंतप्रधानांच्या ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेनुसार लाल किल्ल्यावर ‘आत्मनिर्भर भारत सेंटर फॉर डिझाईन’ उभारण्यात येत आहे. हे भारतातील अद्वितीय आणि स्वदेशी कलाकुसरीचे प्रदर्शन करेल आणि कारीगर आणि डिझाइनर यांच्यात सहयोगी स्थान प्रदान करेल. शाश्वत सांस्कृतिक अर्थव्यवस्थेचा मार्ग मोकळा करून, ते कारागीर समुदायांना नवीन डिझाइन आणि नवोन्मेषासह सक्षम करेल.

 

 

N.Chitale/S.Kane/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai