कार्यक्रमात उपस्थित माझे सहकारी श्री जी किशन रेड्डीजी, अर्जुन राम मेघवालजी, जगभरातल्या विविध देशांमधून आलेली पाहुणेमंडळी, कला जगतातील सर्व मान्यवर सहकारी आणि सभ्य स्त्री-पुरुष हो!
लाल किल्ल्याचे हे प्रांगण खूप ऐतिहासिक आहे. हा किल्ला म्हणजे केवळ एक वास्तू नाही तर हा एक इतिहास आहे. स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्यानंतर कितीतरी पिढ्या होऊन गेल्या. मात्र लाल किल्ला अभेद्य आहे, ठामपणे उभा आहे. जागतिक वारसास्थळ असलेल्या या लाल किल्ल्यामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन!
मित्रांनो,
प्रत्येक राष्ट्राची स्वतःची अशी प्रतिके-खुणा असतात. या खुणा जगाला त्या देशाच्या भूतकाळाची आणि त्याच्या मूल्यांची ओळख करून देतात. आणि, ही प्रतिके घडवण्याचे काम राष्ट्राच्या कला, संस्कृती आणि वास्तू करत असतात. राजधानी दिल्ली अशा अनेक प्रतिकांचे केंद्र आहे, ज्यात आपल्याला भारतीय वास्तुच्या भव्यतेचे दर्शन घडते. त्यामुळे दिल्लीत आयोजित ‘इंडिया आर्ट आर्किटेक्चर अँड डिझाईन बिएनाले’ हा भारतीय कला, वास्तूरचना शास्त्र आणि रचना महोत्सव, अनेक अर्थांनी विशेष आहे. मी इथे उभारलेली, सजवलेली दालने बघत होतो, आणि मी उशीरा आलो त्याबद्दल तुमची माफी देखील मागतो कारण मला यायला उशीर याच कारणामुळे झाला..इथे अशा अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आणि व्यवस्थित वेळ देऊन समजून घेण्यासारख्या असल्यामुळे त्यात वेळ जाऊन मला उशीर झाला. तरीही मला 2 ते 3 जागा सोडाव्या लागल्या. या दालनांमध्ये रंग आणि सर्जनशीलता आहे. त्यात संस्कृती आहे, तसेच सामाजिक प्रतिबिंब आहे. मी या यशस्वी आरंभाबद्दल, सांस्कृतिक मंत्रालय, त्याचे सर्व अधिकारी, सर्व सहभागी देश आणि तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. आपल्याकडे असे म्हटले जाते की पुस्तक म्हणजे जग पाहण्याची एक लहानशी खिडकी म्हणून सुरुवात आहे. मी असे मानतो की कला हा मानवी मनातून प्रवास करण्याचा राजमार्ग आहे.
मित्रहो,
भारत हे हजारो वर्ष जुने राष्ट्र आहे. एक काळ असा होता जेंव्हा भारताच्या आर्थिक समृद्धीचे गोडवे जगभरात गायले जात असत. आजही भारताची संस्कृती आणि आपला प्राचीन वारसा जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. आज ‘वारशाचा अभिमान’ या भावनेने, देश हाच अभिमान पुन्हा पुढे नेत आहे. आज कला आणि वास्तुकलेशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात स्वाभिमानाच्या भावनेने काम केले जात आहे. केदारनाथ आणि काशीसारख्या सांस्कृतिक केंद्रांचा विकास असो, महाकाल महालोकसारखे नूतनीकरण असो , स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळात भारत सांस्कृतिक समृद्धीचे नवे आयाम निर्माण करत आहे आणि त्यासाठी ठोस प्रयत्न करत आहे. भारतात होणारे हे महोत्सव या दिशेने आणखी एक मोठे पाऊल आहे. याआधी दिल्लीतच इंटरनॅशनल म्युझियम एक्स्पो हे आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन आयोजित केल्याचे आपण पाहिले आहे. ऑगस्टमध्ये ग्रंथालयांचा महोत्सवही आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांद्वारे भारतातील जागतिक सांस्कृतिक उपक्रमाला संस्थात्मक रूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आधुनिक व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. व्हेनिस, साओ पाउलो, सिंगापूर, सिडनी, शारजाह यांसारखे महोत्सव आणि दुबई-लंडन सारख्या कला मेळाव्यांप्रमाणे भारताचे महोत्सव जगभरात ओळखले जावेत अशी आमची इच्छा आहे. आणि आज मानवी जीवनावर तंत्रज्ञानाचा-यंत्रांचा प्रभाव खूप वाढला असल्यामुळे हे खूप आवश्यक देखील आहे. दूरदृष्टी बाळगणाऱ्या कुणालाही आपला समाज यंत्रवत व्हावा असे कधीच वाटणार नाही. आपल्याला यंत्रमानव तयार करायचे नाहीत, तर माणसे घडवायची आहेत. आणि त्यासाठी भावना हवी, आशा हवी, सद्भावना हवी, उमेद हवी, उत्साह हवा. आशा आणि निराशेच्या फेऱ्यांमधून जगण्याचा मार्ग शोधून काढणे आपल्याला आवश्यक आहे. या सर्व गोष्टी कला आणि संस्कृतीतून निर्माण होतात. जोडणी-तोडफोड यासाठी तंत्रज्ञान वेगाने काम करू शकते. आणि म्हणूनच अशा गोष्टी माणसाची आंतरिक क्षमता जाणून घेण्यास आणि त्या एकमेकांशी सांधण्यासाठी मोठा आधार देतात.
आणि मित्रांनो,
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत सेंटर फॉर डिझाईन’ या रचना केंद्राचेही आज उद्घाटन करण्यात आले आहे. हे केंद्र भारतातील वैशिष्ठ्यपूर्ण आणि दुर्मिळ अशा कलाप्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. हे केंद्र कारागीर आणि रचनाकारांना एकत्र आणेल आणि त्यांना बाजारपेठेच्या गरजेनुसार नवनवीन पर्याय उपलब्ध करून देण्यास मदत करेल. यामुळे कारागिरांना विविध रचनाकृती विकसित करण्याचे ज्ञानही मिळेल आणि ते डिजिटल विपणणातही प्रवीण होतील. आणि आपल्याला माहीत आहे की भारतीय कारागिरांकडे इतकी प्रतिभा आहे की आधुनिक ज्ञान आणि साधनसामग्रीसह ते संपूर्ण जगात आपला ठसा निर्माण करु शकतात.
मित्रहो,
भारतातील 5 शहरांमध्ये सांस्कृतिक केंद्र निर्माण व्हायला सुरुवात होणे हे देखील एक ऐतिहासिक पाऊल आहे. दिल्ली तसेच कोलकाता, मुंबई, अहमदाबाद आणि वाराणसी इथे उभारली जाणारी ही सांस्कृतिक केंद्रे, या शहरांना सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समृद्ध करतील. ही केंद्रे स्थानिक कला समृद्ध करण्यासाठी नवनवीन कल्पनाही मांडतील. तुम्ही सर्वांनी पुढील 7 दिवसांसाठी 7 महत्वाच्या संकल्पना देखील ठरवल्या आहेत. यामध्ये, ‘एतद्देशीय भारतीय रचना ’ आणि ‘समत्व’ (समानता)या संकल्पना, एक वसा म्हणून आपल्याला पुढे न्यायच्या आहेत. स्वदेशी रचना समृद्ध करण्यासाठी, आपल्या युवावर्गाला अभ्यास आणि संशोधन करायला भाग पाडले पाहिजे. समानता ही संकल्पना, वास्तुकला क्षेत्रातील महिलांचा सहभाग अधोरेखित करते, महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देते. महिलांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता, हे क्षेत्र नव्या उंचीवर नेईल, असा मला विश्वास आहे.
मित्रांनो,
भारतात कला, विविध रस आणि रंग हे जीवन जगण्याचे पर्याय-मार्ग मानले जातात. आपल्या पूर्वजांनी तर असे म्हटले आहे की – साहित्य संगीत कला विहीनः, साक्षात् पशुः पुच्छ विषाण हीनः। म्हणजेच मानव आणि इतर प्राणी यांच्यातील मुख्य फरक म्हणजे साहित्य, संगीत आणि कला. म्हणजेच झोपणे, उठणे आणि पोट भरणे या सवयी नैसर्गिक आहेत. मात्र, कला, साहित्य आणि संगीत हे मानवी जीवनाची रंगत वाढवणारे आणि त्याला खास बनवणारे आहेत. त्यामुळेच इथे जीवनाच्या वेगवेगळ्या गरजा, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, चौसष्ट कलांशी जोडल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ, गीत-संगीतासाठी वाद्ये, नृत्य आणि गायन कला आहेत. यामध्ये ‘उदक-वाद्यम्’ म्हणजेच पाण्याच्या लहरींवर आधारित जलवाद्ये अशा विशिष्ट कला देखील आहेत. अनेक प्रकारचे सुगंध किंवा अत्तरे बनवण्याची ‘गंध-युक्ती:’ ही कला आपल्याकडे आहे. मुलामा चढवणे आणि कोरीव काम करण्यासाठी ‘तक्षकर्म’ ही कला शिकवली जाते. ‘सुचिवन-कर्माणी’ ही नक्षी आणि विणकामाच्या सौंदर्याचे बारकावे शिकवणारी कला आहे.आपल्याकडे सर्व कामे किती परिपूर्णतेने केली जात असत याचा अंदाज आपण भारतात बनवणाऱ्या प्राचीन वस्त्रांवरून लावू शकता. असे म्हटले जायचे की कापडाचा संपूर्ण तुकडा, मलमल, एवढी तलम असायची की ते संपूर्ण अंगठीतून जाऊ शकायचे. म्हणजे हे सामर्थ्य तेव्हा आपल्याकडे होते. भारतात कोरीव काम आणि मुलामा चढवणे ही कामे केवळ सजावटीच्या वस्तूंपुरती मर्यादित नव्हती. किंबहुना, तलवारी, ढाल आणि भाले यांसारख्या शस्त्रांवरही अप्रतिम कलाकुसर पहायला मिळायची. एवढेच नाही तर या संकल्पनेवर कोणीतरी कधीतरी विचार करावा, काम करावे असे मला वाटते. आपल्याकडे घोडे,कुत्रे, बैल, गाय अशा प्राण्यांसाठी सुद्धा आभूषणे तयार केली जात असत, त्या आभूषणांनी त्यांना सजवले जात असे. त्याशिवाय, या दागिन्यांमध्ये जी कला होती, वैविध्य होते ती म्हणजे एक विलक्षण नवलाईच आहे. आणि त्यात इतकी परिपूर्णता होती की त्या प्राण्याला जराही शारीरिक त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन ती आभूषणे घडवण्यात येत असत. म्हणजेच या सर्व गोष्टींचा एकत्रितपणे विचार केला तर त्यात किती सामर्थ्य सामावलेले आहे, हे स्पष्ट होते.
मित्रहो
आपल्या देशात अशा अनेक कलांचा उगम झाला आहे. आणि हाच भारताचा प्राचीन इतिहास आहे आणि आजही भारताच्या कानाकोपऱ्यात आपल्याला त्याच्या खुणा दिसतात. मी ज्या शहराचा खासदार आहे ते काशी शहर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. काशी अविनाशी आहे असे म्हणतात. कारण, काशी ही गंगेबरोबरच साहित्य, संगीत आणि कला यांच्या अमर प्रवाहाची भूमी आहे. आध्यात्मिकदृष्ट्या कलांचे प्रवर्तक मानले गेलेल्या भगवान शिवशंकराला काशीने आपल्या हृदयात स्थापित केले आहे. या कला, या हस्तकला आणि संस्कृती मानवी सभ्यतेसाठी ऊर्जा प्रवाहाप्रमाणे आहेत. आणि ऊर्जा अमर आहे, चेतना अविनाशी आहे. म्हणून काशी देखील अविनाशी आहे.
मित्रहो,
भारताची ही संस्कृती पाहण्यासाठी जगभरातून येणाऱ्या लोकांसाठी आम्ही काही महिन्यांपूर्वी एक नवीन सुरुवात केली . आम्ही गंगा विलास क्रूझ सुरू केली, जी प्रवाशांना गंगा नदीतून प्रवास करत काशीहून आसामपर्यंत घेऊन जात होती. त्यात जगभरातून अनेक पर्यटक आले होते, हा सुमारे 45-50 दिवसांचा कार्यक्रम होता. या एकाच प्रवासात त्यांना गंगेच्या काठावर वसलेली अनेक शहरे, गावे आणि परिसर अनुभवायला मिळाले. आणि आपली मानवी संस्कृतीही नद्यांच्या काठावर विकसित झाली आहे. नदीच्या काठावरून केलेला प्रवास ही जगण्याची खोली जाणून घेण्याची खूप मोठी संधी आहे. आणि याच कल्पनेतून आम्ही ही गंगा क्रूझ सुरू केली.
मित्रहो,
कलेचे स्वरूप काहीही असले तरी ती निसर्गाच्या सान्निध्यात जन्माला येते. इथेही मला जे काही दिसले त्यात निसर्गाचा घटक कुठेतरी कलेशी जोडलेला असतो, त्यापलिकडचे काहीच नाही. त्यामुळे कला ही निसर्गानुरूप, निसर्गानुकूल तसेच पर्यावरणानुकूल आणि हवामानानुकूल असते. उदाहरणार्थ, जगातील देशांमध्ये नद्यांच्या किनाऱ्यांबद्दल खूप चर्चा असते की अशा अशा देशात इतक्या नद्या आहेत, वगैरे… भारताला हजारो वर्षांपासून नद्यांच्या काठावर घाट बांधण्याची परंपरा आहे. आपले अनेक सण, उत्सव या घाटांशी निगडीत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या देशात कूप, सरोवर, बावडी, पायऱ्यांच्या विहिरींची समृद्ध परंपरा होती. गुजरातमधील राणी की आहे, राजस्थानमधील अनेक ठिकाणी, अगदी दिल्लीतही, आजही तुम्हाला पायऱ्यांच्या अनेक विहिरी पाहायला मिळतील. आणि राणी की वावचे वैशिष्ट्य म्हणजे ते उलटे मंदिर आहे. म्हणजेच त्या काळातील कलानिर्मितीचा विचार करणाऱ्या लोकांनी ती कशी निर्माण केली असेल. मला म्हणायचे आहे की हे सगळे जल संग्रहाचे जे बिंदू आहेत, पाण्याशी संबंधित आहेत, त्यांची वास्तू पहा, त्यांची रचना पहा! त्याकडे बघितले तर ते एखाद्या विस्मयकारक आश्चर्यापेक्षा कमी नाही. त्याचप्रमाणे भारतातील जुन्या गड-किल्ल्यांच्या वास्तूही जगभरातील लोकांना आश्चर्यचकित करतात. प्रत्येक किल्ल्याची स्वतःची वास्तुकला आणि स्वतःचे विज्ञान असते. मी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात होतो, जिथे समुद्राच्या आत एक मोठा किल्ला बांधला आहे. तुमच्यापैकी काहींनी जैसलमेरमधील पटवा की हवेलीलाही भेट दिली असू शकेल! पाच वाड्यांचा हा समूह अशा प्रकारे बांधण्यात आला होता की ते स्थापत्य नैसर्गिक वातानुकूलनाचे कार्य करते. ही सर्व वास्तुकला केवळ दीर्घकाळ टिकणारी नव्हती तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही शाश्वत होती. म्हणजे संपूर्ण जगाला भारताच्या कला आणि संस्कृतीतून खूप काही जाणून घेण्याची आणि शिकण्याची संधी आहे.
मित्रहो,
कला, वास्तुकला आणि संस्कृती म्हणजे मानवी सभ्यतेसाठी विविधता आणि एकता या दोन्हींचे स्रोत आहेत. आपण जगातील सर्वात वैविध्यपूर्ण राष्ट्र आहोत, परंतु ही विविधता आपल्याला एकत्र बांधून ठेवणारी आहे. मी आता किल्ल्यांबद्दल बोलत होतो. 1-2 वर्षांपूर्वी मी एका कार्यक्रमासाठी बुंदेलखंडला गेलो होतो, तेव्हा झाशीच्या किल्ल्यावर एक कार्यक्रम होता, तेव्हा मी तिथल्या सरकारशी बोललो होतो की आपण बुंदेलखंडचा किल्ला पर्यटनासाठी विकसित करूया. आणि त्यानंतर त्यांनी संशोधन केले, जे पुस्तक तयार झाले आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल की एकट्या बुंदेलखंडमध्ये फक्त झाशीच नव्हे तर अनेक किल्ल्यांचा वारसा आहे आणि जवळ जवळ अशी अनेक ठिकाणे आहेत. म्हणजेच, ते खूप सामर्थ्यवान आहे. मला असे वाटते की एखाद्या दिवशी आमच्या ललित कला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तेथे जाऊन कलाकृती तयार करण्यासाठी एक मोठी स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. तरच आपल्या पूर्वजांनी काय निर्माण केले हे जगाला कळेल. भारतातील या विविधतेचा उगम काय आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? लोकशाहीची जननी म्हणून भारताची लोकशाही परंपरा हा त्याचा उगम आहे! समाजात विचारांचे स्वातंत्र्य असते आणि स्वतःच्या पद्धतीने काम करण्याचे स्वातंत्र्य असते, तेव्हाच कला, स्थापत्य आणि संस्कृती बहरते. वादविवाद आणि संवादाच्या या परंपरेने विविधता आपोआप बहरत राहते. म्हणूनच आजही जेव्हा आपले सरकार संस्कृतीबद्दल बोलत असते तेव्हा आपण प्रत्येक प्रकारच्या विविधतेचे स्वागत करतो आणि समर्थन करतो. देशातील विविध राज्ये आणि शहरांमध्ये G-20 चे आयोजन करून आम्ही ही विविधता जगासमोर प्रदर्शित केली.
मित्रहो,
भारत हा ‘अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम्’ या विचाराने जगणारा देश आहे. अर्थात आपण आप-परभाव मनात बाळगून जगणारी माणसे नाही. आपण स्वयम एवजी वयम् वर विश्वास ठेवणारे लोक आहोत. आपण स्वत: ऐवजी विश्वाबद्दल बोलतो. आज भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे, अशा वेळी संपूर्ण जगाला त्यात स्वतःचे चांगले भविष्य दिसत आहे. ज्याप्रमाणे भारताची आर्थिक प्रगती ही संपूर्ण जगाच्या प्रगतीशी निगडित आहे, त्याचप्रमाणे ‘आत्मनिर्भर भारत’ हा आपला दृष्टीकोन संपूर्ण जगासाठी नवीन संधी घेऊन येत आहे, कला आणि स्थापत्य यांसारख्या क्षेत्रात भारताचे पुनरुज्जीवन भारताच्या सांस्कृतिक विकासाला हातभार लावणारे आहे आणि अवघ्या जगाचे हित या पुनरूज्जीवनाशी निगडीत आहे. योगविद्येसारखा आपला वारसा आपण पुढे नेला, त्यामुळे आज संपूर्ण जग त्याचा लाभ घेत आहे.
आयुर्वेद हा आधुनिक वैज्ञानिक मानकांवर कसोटीला उतरावा, यासाठी आपण प्रयत्न सुरू केले तेव्हा संपूर्ण जगाला त्याचे महत्त्व समजले. आपण आमची सांस्कृतिक मूल्ये लक्षात घेऊन शाश्वत जीवनशैलीसाठी नवीन पर्याय निवडले आणि संकल्प केले. आज, मिशन लाइफ सारख्या मोहिमेद्वारे, संपूर्ण जगाला चांगल्या भविष्याची आशा मिळते आहे. कला, स्थापत्य आणि रचनेच्या क्षेत्रात भारत जितका सक्षम होईल तितका त्याचा लाभ संपूर्ण मानवतेला होईल.
मित्रहो,
परस्परसंवाद आणि सहकार्यातूनच संस्कृतीचा विकास होतो. त्यामुळे या दृष्टीने जगातील इतर सर्व देशांचा सहभाग, त्यांच्यासोबतची आपली भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे. अधिकाधिक देश एकत्र यावेत आणि हा कार्यक्रम आणखी विस्तारावा अशी माझी इच्छा आहे. मला विश्वास वाटतो की हा कार्यक्रम या दिशेने एक महत्त्वाची सुरुवात ठरेल. या भावनेसह आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार! आणि मी देशवासियांना विनंती करतो की हे आयोजन तुमच्यासाठी मार्च महिन्यापर्यंत उपलब्ध आहे, संपूर्ण दिवसभराचा वेळ काढा आणि प्रत्येक गोष्ट पहा, आपल्याकडे कोणती प्रतिभा आहे, कोणत्या प्रकारची परंपरा आहे, निसर्गाप्रती आमच्या मनात किती प्रेम आहे, या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी अनुभवता येतील. अनेकानेक आभार.
***
JPS/AS/MP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
India Art, Architecture & Design Biennale is a celebration of our country's diverse heritage and vibrant culture. https://t.co/qml1zd9cLK
— Narendra Modi (@narendramodi) December 8, 2023
India's vibrant culture and our ancient heritage attract tourists from all over the world. pic.twitter.com/5H0J5MXMws
— PMO India (@PMOIndia) December 8, 2023
आज art और architecture से जुड़े हर क्षेत्र में आत्मगौरव की भावना से काम हो रहा है। pic.twitter.com/OAr4IQYY5G
— PMO India (@PMOIndia) December 8, 2023
'Aatmanirbhar Bharat Centre for Design' will provide a platform to promote the unique and rare crafts of India. pic.twitter.com/AQrVZv6wEy
— PMO India (@PMOIndia) December 8, 2023
The cultural spaces to be built in Delhi, Kolkata, Mumbai, Ahmedabad and Varanasi will enrich these cities culturally. pic.twitter.com/NSHS4WO0eM
— PMO India (@PMOIndia) December 8, 2023
भारत में कला को, रस और रंगों को जीवन का पर्याय, synonym of life माना गया है: PM @narendramodi pic.twitter.com/gE0ID0D62S
— PMO India (@PMOIndia) December 8, 2023
We are the most diverse nation in the world, but that diversity also binds us together: PM @narendramodi pic.twitter.com/R493bkdRgS
— PMO India (@PMOIndia) December 8, 2023