Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दक्षिण आफिकेतील दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन

दक्षिण आफिकेतील दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन

दक्षिण आफिकेतील दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन


दक्षिण आफ्रिकेचे सन्माननीय राष्ट्राध्यक्ष श्री जॅकॉब झुमा आणि माझ्या मित्रांनो,

या देशात आपण सर्वानी आमचे जे आदरातिथ्य केले आणि ज्या स्नेहल शब्दात आपल्या आमच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या , त्याविषयी अनेक धन्यवाद ! खरे तर माझा या देशातला हा पहिलाच दौरा आहे, मात्र मी आणि माझ्यासोबत आलेल्या भारतीय प्रतिनिधीमंडळाला येथे, या सप्तरंगी देशात अगदी घरच्यासारखे वाटते आहे. यासाठी, राष्ट्राध्यक्ष महोदय, आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. व्यक्तीशः माझ्यासाठी हा दौरा म्हणजे पृथ्वीतलावरील दोन महामानवांना दिलेली श्रद्धांजली वाहण्याची संधी आहे- ते म्हणजे महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला.

मित्रांनो,

गेल्या कित्येक शतकांपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील लोकांनी परस्परांशी दृढ संबंध प्रस्थापित केले आहेत. वसाहतवाद आणि वर्णभेदाशी आम्ही एकत्र लढा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेतच महात्मा गांधीना आपल्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव झाली . महात्मा गांधी जेवढे भारताचे आहेत, तेवढेच ते दक्षिण आफ्रीकेचेही आहेत.

मित्रांनो,

आपल्या दोन्ही देशांची समान मूल्ये, समान वेदना आणि संघर्ष यामुळे आपल्या राजनैतिक संबंधांचा पाया खूप मजबूत झाला आहे. आणि याचे दृश्य परिणाम आपल्याला आज प्रत्येक क्षेत्रातल्या भागीदारीत दिसतात. आज आमच्या चर्चेदरम्यान राष्ट्राध्यक्ष झुमा आणि मी दोन्ही देशांमधील सर्व क्षेत्रातील संबंध आणि व्यापाराविषयी चर्चा केली. गेल्या दोन दशकातील आपली मैत्री ही मजबूत संबध आणि ठोस मिळकतींची यशोगाथा आहे यावर आम्हा दोघांचे एकमत झाले. गेल्या दहा वर्षात उभय देशामधील व्यापार ३०० टक्क्यांनी वाढला. भारतीय कंपन्यांना दक्षिण आफ्रिकेत उद्योग करण्यात अतिशय रस आहे. आफ्रिका खंडातील संपूर्ण गुंतवणुकीपैकी एक चतुर्थांश गुंतवणूक एकट्या आफ्रिकेत होते. एवढंच नाही , तर अनेक क्षेत्रात ही गुंतवणूक आणि व्यापार वाढवण्यासाठी वाव आहे. त्यात प्रामुख्याने सांगायचे झाल्यास,

१ खनिज आणि खाणक्षेत्र

२ रसायने आणि औषधीशास्त्र.

३. उच्च तंत्रज्ञानाची उपकरणे

४. माहिती आणि संवाद तंत्रज्ञान

मला याची जाणीव आहे की केवळ दोन्ही देशातील उद्योगक्षेत्रांचे परस्पर संबंध आपल्या संपूर्ण समाजाला मोठा आर्थिक लाभ मिळवून देऊ शकत नाहीत. ते केवळ उभय देशातील भागीदारीला नवा आकार देऊ शकतात.नवी पातळी देऊ शकतात. आणि ह्या प्रक्रियेत, दोन्ही देशांमधील प्रादेशिक आणि वैश्विक संबंध अधिक दृढ व्हावेत म्हणून सहाय्यक ठरू शकतात. आज दुपारी मी आणि राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा दोन्ही देशातील उद्योग प्रतीनिधींशी चर्चा करणार आहोत त्यावेळी दोन्ही देशातील वित्तीय संबंध अधिक कसे विस्तारता येतील यावर प्रामुख्याने भर देऊ.

मित्रांनो,

आज विकसनशील देशांची प्रामुख्याने गरज आहे, ती आपल्याकडचे मनुष्यबळ अधिक कुशल करण्याची! आपल्या दोन्ही देशांमध्ये व्यावसायिक, तांत्रिक आणि तंत्रकुशल क्षेत्रात असलेल्या क्षमता परस्परपूरक आहे, त्यामुळे आपल्या क्षमतांचा एकमेकांना उत्तम उपयोग होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेतल्या लघु आणि मध्यम उद्योगांच्या विकासातही भारतीय तज्ञ आणि आणि क्षमतांची मदत मिळू शकेल. आर्थिक सहकार्य,व्यापार ,गुंतवणूक याच्या पलीकडे संरक्षण आणि सुरक्षितता या क्षेत्रातही आपण परस्पर सहकार्य वृद्धींगत करू शकतो. अगदी उद्योग आणि सुरक्षा दोन्हीच्या गरजा आपण एकमेकांच्या मदतीने पूर्ण करू शकतो. संरक्षण क्षेत्रातील उपकरणे तयार करण्यासाठीचा विकासही आपल्या दोन्ही देशातील कंपन्या करू शकतात. केवळ इतकेच नाही, तर दोन्ही देशांच्या आणि जागतिक मागण्या पूर्ण करण्याएवढी क्षमताही आपल्यामध्ये आहे.

मित्रांनो,

अनेक आंतरराष्ट्रीय प्रश्न आणि येणारी जागतिक आव्हाने यांच्याविषयी मी आणि झुमा यांच्यात सखोल चर्चा झाली. अणु पुरवठादार गटात भारताला स्थान मिळण्याच्या मागणीला दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या पाठींब्याविषयी मी त्यांचे आभार मानतो. दक्षिण आफ्रिकेसारख्या मित्र देशांचा सहभाग आमची मागणी पूर्ण होण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी मला खात्री आहे. हवामान बदल आणि त्याचे जगावर होणारे परिणाम हे आपल्या दोन्ही देशांसाठी चिंतेचा विषय आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी शाश्वत उर्जेवर भर देऊन त्याच्या निर्मीतीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. याचाच भाग म्हणून पॅरीस मध्ये झालेल्या ‘कॉप २१’ परिषदेत भारताने जागतिक सौरसहकार्य निर्माण करण्याचे प्रयत्न केले. सौरउर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याविषयीचे ज्ञान, तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्य मिळवण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ ठरेल असा मला विश्वास वाटतो. या उर्जासहकार्यात सहभागी झाल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांचे आभार मानतो, या प्रकल्पाला १२० देशांनी समर्थन दिले आहे.आपल्या जनतेचे आयुष्य आणि सुरक्षितता धोक्यात घालणारा दहशतवाद ही आणखी एक मोठी समस्या आहे. दहशतवाद आपल्या समाजाच्या पायावरच घाव घालतो. प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर असलेल्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दोन्ही देशांनी सजग राहून परस्परांना सहकार्य करण्याची गरज आहे, यावर मी आणि जेकब झुमा यांच्यात एकमत झाले.

मित्रांनो,

हिंदी महासागराचे पाणी हे आपल्या दोन्ही देशांसाठी सामाईक सागरी सीमा आहे. आणि हिंदी महासागर सीमा संघटना हिंदी महासागर परिसरातल्या राष्ट्रांना जोडणारे उत्तम केंद्र बनले आहे. २०१७ -१९ या कालावधीत होणाऱ्या या परिषदेचे अध्यक्षपद दक्षिण आफ्रिकेकडे आले आहे, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. इब्सा ( इंडिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका) तसेच ब्रिक्स या दोन संघटनांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राधान्यक्रमाचा अजेंडा तयार करण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका एकत्रित काम करत आहे. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात गोवा येथे होणाऱ्या परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष जॅकॉब झुमा यांना निमंत्रित करण्यास मला अतिशय आनंद होत आहे.

मित्रांनो ,

शेवटी, मी इतकेच म्हणेन,

गांधीजीच्या सत्याग्रहापासून ते मादिबांच्या क्षमाशीलतेपर्यंत,

गुजरातच्या बंदरांपासून ते डरबनच्या किनाऱ्यापर्यंत,

समान मुल्ये आणि समान संघर्षाने निर्माण झालेले बंध,

आपले महासागर आणि आर्थिक संबंध यातील अनेकानेक संधी, आणि

वसुधैव कुटुंबकम आणि उबुंटू हे सामायिक तत्वज्ञान

आपले संबंध म्हणजे निश्चय, न्याय आणि मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा यांची गोष्ट आहे. ही खरोखरच अद्वितीय अशी आहे.

धन्यवाद,

अनेक धन्यवाद.

R.Aghor/B.Gokhale