नमो बुद्धाय!
थायलंडमधील संवादच्या या आवृत्तीत तुम्हा सर्वांसोबत सहभागी होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. भारत, जपान आणि थायलंडमधील अनेक प्रतिष्ठित संस्था आणि मान्यवर या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो आणि सर्व सहभागींना शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
या प्रसंगी मला माझे मित्र श्री. शिंजो आबे यांची आठवण येते. 2015 मध्ये त्यांच्याशी झालेल्या माझ्या चर्चेमधूनच संवादची कल्पना उदयाला आली. तेव्हापासून, संवादने वेगवेगळ्या देशांचा प्रवास केला आहे, ज्यामुळे चर्चा, संवाद आणि सखोल आकलनाला चालना मिळाली आहे.
मित्रांनो,
संवादच्या या आवृत्तीचे थायलंडमध्ये आयोजन होत आहे याचा मला आनंद आहे. थायलंडची संस्कृती, इतिहास आणि वारसा अतिशय समृद्ध आहे. हे आशियातील सामाईक तात्विक आणि आध्यात्मिक परंपरांचे हे एक सुंदर उदाहरण आहे.
मित्रांनो,
भारत आणि थायलंडमध्ये दोन हजार वर्षांहून अधिक काळापासून सखोल सांस्कृतिक संबंध आहेत. रामायण आणि रामकियेन आपल्याला जोडतात. भगवान बुद्धांवरील आपली सामाईक भक्ती आपल्याला एकत्र आणते. गेल्या वर्षी, जेव्हा आम्ही भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष थायलंडला पाठवले होते, तेव्हा लाखो भाविकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. आपल्या देशांमध्ये अनेक क्षेत्रांमध्ये उत्साही भागीदारी आहे. भारताचे ‘ऍक्ट इस्ट‘ धोरण आणि थायलंडचे ‘ऍक्ट वेस्ट‘ धोरण परस्परांना पूरक आहेत, जे परस्पर प्रगती आणि समृद्धीला चालना देणारे आहे. ही परिषद आमच्या मैत्रीतील आणखी एक यशस्वी अध्याय आहे.
मित्रांनो,
संवादाचा विषय आशियाई शतकाबद्दल बोलत आहे. जेव्हा लोक या शब्दाचा वापरतात तेव्हा ते बहुतेकदा आशियातील आर्थिक वाढीचा संदर्भ घेतात.मात्र, आशियाई शतक केवळ आर्थिक मूल्यांबद्दल नाही तर सामाजिक मूल्यांबद्दल देखील असल्याचे ही परिषद अधोरेखित करत आहे. भगवान बुद्धांच्या शिकवणी जगाला शांततापूर्ण आणि प्रगतीशील युग निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करू शकतात. त्यांच्या ज्ञानात आपल्याला मानव-केंद्रित भविष्याकडे घेऊन जाण्याची शक्ती आहे.
मित्रांनो,
संवादाचा एक महत्त्वाचा विषय म्हणजे संघर्ष टाळणे. अनेकदा, फक्त आपलाच मार्ग योग्य आहे आणि इतर सर्व अयोग्य आहेत या समजुतीतून संघर्ष उद्भवतात. भगवान बुद्ध या विषयावर अंतर्दृष्टी प्रदान करतात:
इमेसु किर सज्जन्ति, एके समणब्राह्मणा |
विग्गय्ह नं विवदन्ति,
जना एकंगदस्सिनो ||
याचा अर्थ हा आहे की काही लोक आपल्याच मतांवर अडून राहातात आणि वाद घालतात, केवळ एकाच पक्षाला योग्य मानतात, मात्र एकाच मुद्यावर अनेक दृष्टीकोऩ असू शकतात. यामुळेच ऋग्वेदात म्हटले आहेः
एकं सद्विप्रा बहु॒धा वदन्ति |
ज्यावेळी आपण हे मान्य करतो की सत्याला विविध दृष्टीकोनाने पाहिले जाऊ शकते, त्यावेळी आपण संघर्षापासून दूर राहू शकतो.
मित्रांनो,
संघर्षाचे आणखी एक कारण म्हणजे दुसऱ्यांना स्वतःपेक्षा सर्वस्वी वेगळे मानणे. मतभेदांमुळे अंतर वाढत जाते आणि वाढलेल्या अंतराचे रुपांतर कलहात होऊ शकते. याचा सामना करण्यासाठी धम्मपदातील एका ओळीमध्ये म्हटले आहेः
सब्बे तसन्ति दण्डस्स, सब्बे भयन्ति माचुनो |
अत्तानं उपमं कत्वा, न हनेय न घटये ||
याचा अर्थ हा आहे की प्रत्येक जण वेदना आणि मृत्युला घाबरतो. इतरांना आपल्यासारखे मानून आपण कोणत्याही प्रकारे हानी किंवा हिंसा होणार नाही हे सुनिश्चित करू शकतो. जर या शब्दांचे पालन केले गेले तर संघर्ष टाळता येऊ शकतात.
मित्रांनो,
जगातील अनेक समस्या संतुलित दृष्टिकोनाऐवजी टोकाची भूमिका घेतल्याने उद्भवतात. अतिरेकी दृष्टीकोन संघर्ष, पर्यावरणीय संकटे आणि तणावाशी संबंधित आरोग्यविषयक समस्यांना जन्म देतात. अशा आव्हानांवरील उपाययोजना भगवान बुद्धांच्या शिकवणीत आहेत. त्यांनी आपल्याला मध्यम मार्ग स्वीकारण्याचे आणि अतिरेकीपणा टाळण्याचे आवाहन केले. संयमाचा सिद्धांत आजही प्रासंगिक आहे आणि जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी मार्गदर्शन करत आहे.
मित्रांनो,
आज, संघर्ष लोक आणि देश यांच्या पलीकडे जाऊ लागला आहे. मानवतेचा निसर्गासोबतचा संघर्ष वेगाने वाढत आहे. यामुळे पर्यावरणाचे संकट निर्माण झाले आहे, जे आपल्या पृथ्वीसाठी धोकादायक बनले आहे. या आव्हानाचे उत्तर धम्माच्या सिद्धांताध्ये रुजलेल्या आशियातील सामाईक परंपरांमध्ये आहे. हिंदू, बौद्ध, शिंटो धर्म आणि इतर आशियाई परंपरा आपल्याला निसर्गाशी सुसंगत राहायला शिकवतात. आपण स्वतःला निसर्गापासून वेगळे मानत नाही तर त्याचा एक भाग मानतो. महात्मा गांधींनी मांडलेल्या विश्वस्ततेच्या संकल्पनेवर आमचा विश्वास आहे. आज प्रगतीसाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर करताना, आपण भावी पिढ्यांप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीचा देखील विचार केला पाहिजे. संसाधनांचा वापर विकासासाठी केला जातो, लोभासाठी नाही असे हा दृष्टीकोन सुनिश्चित करत आहे.
मित्रांनो,
मी वडनगरचा आहे, जे पश्चिम भारतातील एक लहानसे शहर आहे जे एकेकाळी बौद्ध धर्माच्या शिक्षणाचे एक मोठे केंद्र होते. भारतीय संसदेत मी वाराणसीचे प्रतिनिधित्व करतो, ज्यामध्ये सारनाथ देखील समाविष्ट आहे. सारनाथ हे ते पवित्र स्थान आहे जिथे भगवान बुद्धांनी आपले पहिले प्रवचन दिले. हा एक अतिशय सुंदर योगायोग आहे की भगवान बुद्धांशी संबंधित स्थळांनी माझ्या प्रवासाला आकार दिला आहे.
मित्रांनो,
भगवान बुद्धांप्रति आमची श्रद्धा आमच्या सरकारच्या धोरणातून प्रदर्शित होत असते. आम्ही बौद्ध सर्किटचा भाग म्हणून महत्त्वाच्या बौद्ध स्थळांना जोडण्यासाठी पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. या सर्किटमध्ये प्रवास सुविधाजनक करण्यासाठी ‘बुद्ध पूर्णिमा एक्सप्रेस‘ विशेष ट्रेनचा शुभारंभ करण्यात आला आहे. कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन एक ऐतिहासिक पाऊल आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बौद्ध यात्रेकरूंना लाभ होईल. अलीकडेच आम्ही बोधगयामधील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी विविध विकास उपक्रमांची घोषणा केली आहे. मी जगभरातील यात्रेकरूंना, विद्वानांना आणि भिक्षुंना भगवान बुद्धांची भूमी असलेल्या भारतात येण्यासाठी हार्दिक आमंत्रण देत आहे.
मित्रांनो,
नालंदा महाविहार इतिहासातील सर्वात महान विद्यापीठांपैकी एक होते. अनेक शतकांपूर्वी संघर्षाच्या शक्तींनी ते नष्ट केले होते. मात्र, आता आम्ही हे स्थान एक शिक्षण केंद्र म्हणून पुनरुज्जीवित करून आमची वचनबद्धता दाखवली आहे. भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने नालंदा विद्यापीठ आपला पूर्वीचा गौरव पुन्हा प्राप्त करेल असा मला विश्वास आहे. पालीला प्रोत्साहन देण्यासाठी देखील एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ज्या भाषेत भगवान बुद्धांनी आपली शिकवण दिली होती. पाली भाषेला आमच्या सरकारने अभिजात भाषा जाहीर केले आहे, ज्यामुळे या भाषेतील साहित्याचे संरक्षण सुनिश्चित होते. याशिवाय आम्ही प्राचीन हस्तलिखितांची निवड करून त्यांची यादी तयार करण्यासाठी ज्ञान भारतम मिशन सुरू केले आहे. बौद्ध धर्माच्या विद्वानांना लाभ देण्यासाठी दस्तावेज़ीकरण आणि डिजिटलीकरणाला यामुळे प्रोत्साहन मिळेल.
मित्रांनो,
गेल्या दशकात आम्ही भगवान बुद्धांच्या शिकवणींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक देशांसोबत सहकार्य केले आहे. अलीकडेच भारतात आशियाला बळकट बनवण्यामध्ये बुद्ध धम्माची भूमिका या विषयावर पहिल्या आशियायी बौद्ध शिखर परिषदेचे आयोजन केले होते. त्यापूर्वी भारताने पहिल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेचे यजमानपद भूषवले होते. मला नेपाळच्या लुंबिनीमध्ये भारत आंतरराष्ट्रीय बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राची कोनशिला बसवण्याचा सन्मान मिळाला. भारताने लुंबिनी संग्रहालयाच्या निर्मितीतही योगदान दिले आहे. याशिवाय भगवान बुद्धांचे ‘संक्षिप्त आदेश‘, 108 खंडाचे मंगोलियन कंजूर यांना भारतात पुनर्मुद्रित करण्यात आले आणि मंगोलियाच्या मठात वितरित करण्यात आले. अनेक देशांमध्ये स्मारकांच्या संरक्षणात आमचे प्रयत्न भगवान बुद्धांच्या वारशाप्रति आमची वचनबद्धता बळकट करत आहे.
मित्रांनो,
संवादाची ही आवृत्ती एका धार्मिक गोलमेज परिषदेचे यजमानपद भूषवत आहे, ज्यामध्ये विविध धार्मिक प्रमुख एकत्र येत आहेत ही बाब अतिशय उत्साहवर्धक आहे. या मंचावरून एक बहुमूल्य अंतदृष्टी समोर येईल, जी एका अधिक जास्त सामंजस्यपूर्ण जगाला आकार देईल. पुन्हा एकदा मी या परिषदेच्या यजमानपदाबद्दल थायलंडची जनता आणि सरकारविषयी आपले आभार व्यक्त करतो. या महान मिशनला पुढे नेण्यासाठी येथे एकत्र आलेल्या सर्व सहभागींना माझ्या शुभेच्छा. धम्माचा प्रकाश आपल्याला शांतता, प्रगती आणि समृद्धीच्या युगाकडे नेत राहो.
***
A.Chavan/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
Sharing my remarks during SAMVAD programme being organised in Thailand. https://t.co/ysOtGlslbI
— Narendra Modi (@narendramodi) February 14, 2025