पंतप्रधान नरेंद्र मोदी आज थायलंडने आयोजित केलेल्या सहाव्या बिमस्टेक (बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर उपक्रम) शिखर परिषदेत सहभागी झाले होते. शिखर परिषदेचा विषय होता – “बिमस्टेक: समृद्ध, लवचिक आणि मुक्त क्षेत्र “. ही शिखर परिषद म्हणजे नेत्यांच्या प्राधान्यक्रमांचे आणि बिमस्टेक प्रदेशातील लोकांच्या आकांक्षा तसेच जागतिक अनिश्चिततेच्या काळात सामायिक विकासाची सुनिश्चिती करण्यासाठी बिमस्टेकच्या प्रयत्नांचे द्योतक होते.
म्यानमार आणि थायलंडमधील विनाशकारी भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. गटाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान शिन्नावात यांचे आभार मानले. दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियामधील एक महत्त्वाचा दुवा म्हणून बिमस्टेकवर प्रकाश टाकताना, हा गट प्रादेशिक सहकार्य, समन्वय आणि प्रगतीसाठी एक प्रभावी मंच बनला असल्याचे अधोरेखित केले. या संदर्भात, त्यांनी बिमस्टेकची कार्यसूची आणि क्षमता आणखी मजबूत करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी बिमस्टेकमध्ये संस्था आणि क्षमता बांधणीसाठी भारताच्या नेतृत्वाखालील अनेक उपक्रमांची घोषणा केली. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, शाश्वत सागरी वाहतूक, पारंपारिक औषध आणि कृषी संशोधन आणि प्रशिक्षण या विषयांवर भारतात बिमस्टेक उत्कृष्टता केंद्रे स्थापन करणे समाविष्ट आहे. त्यांनी तरुणांना कुशल बनवण्यासाठी बोधी [मनुष्यबळ पायाभूत सुविधांच्या संघटित विकासासाठी बिमस्टेक] या नवीन कार्यक्रमाची घोषणा केली ज्या अंतर्गत व्यावसायिक, विद्यार्थी, संशोधक, राजकारणी आणि इतरांना प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती प्रदान केली जाईल. त्यांनी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये प्रादेशिक गरजांचे मूल्यांकन करण्यासाठी भारताकडून एक प्रायोगिक अध्ययन आणि या प्रदेशात कर्करोग उपचारांसाठी क्षमता निर्माण कार्यक्रम आयोजनाची तयारी दर्शवली. अधिक प्रादेशिक आर्थिक एकात्मतेचे आवाहन करत, पंतप्रधानांनी बिमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्स स्थापन करण्याची आणि दरवर्षी भारतात बिमस्टेक व्यवसाय शिखर परिषद आयोजित करण्याची तयारी दर्शवली.
या प्रदेशाला एकत्र आणणाऱ्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांना अधिक दृढ करण्याच्या गरजेवर भर देत, पंतप्रधानांनी लोकांमधील परस्पर संबंध अधिक घनिष्ट करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. भारत या वर्षी बिमस्टेक अॅथलेटिक्स बैठक आणि 2027 मध्ये पहिले बिमस्टेक खेळ आयोजित करणार आहे जेव्हा हा गट आपला 30 वा वर्धापन दिन साजरा करेल. बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सवदेखील भारत आयोजित करणार आहे. या प्रदेशातील युवकांचा संपर्क वाढवण्यासाठी, पंतप्रधानांनी युवा नेत्यांची शिखर परिषद, हॅकेथॉन आणि युवा व्यावसायिक अभ्यागत कार्यक्रमाची घोषणा केली. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या उपक्रमांची संपूर्ण यादी येथे पाहता येईल.
शिखर परिषदेने खालील गोष्टी स्वीकारल्या:
i. शिखर परिषदेचे घोषणापत्र
ii. बिमस्टेक बँकॉक दृष्टिकोन 2030 दस्तावेज, जो या प्रदेशाच्या सामूहिक समृद्धीसाठी रूपरेषा मांडतो.
iii. बिमस्टेक सागरी वाहतूक करारावर स्वाक्षरी, ज्यामध्ये – जहाजे, कर्मचारी आणि मालवाहू यांना राष्ट्रीय उपचार आणि मदत; प्रमाणपत्रे/कागदपत्रांची परस्पर मान्यता; संयुक्त शिपिंग समन्वय समिती; आणि वाद निवारण यंत्रणा समाविष्ट आहे.
ⅳ. बिमस्टेकच्या भविष्यातील दिशानिर्देशांसाठी शिफारसी करण्याकरिता स्थापन केलेल्या बिमस्टेक प्रख्यात व्यक्ती गटाचा अहवाल.
***
S.Kakade/V.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com