केंद्र सरकारमधील माझे मित्र मंत्री अश्विनी वैष्णव जी , उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल जी, तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवि, कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गहलोत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे अन्य मित्र, राज्यांचे उपमुख्यमंत्री, मंत्रीगण, संसद सदस्य….. देशाच्या विविध भागातून या कार्यक्रमात जोडलेले गेलेले लोकप्रतिनिधीगण…..
बंधू आणि भगिनींनो,
आज उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, देशाच्या विकास यात्रेत एक नवा अध्याय जोडला जात आहे. आजपासून मदुराई – बेंगळुरु; चेन्नई – नागरकोविल आणि मेरठ – लखनौ या शहरांदरम्यान वंदे भारत रेल्वे सेवा सुरू होत आहे. वंदे भारत रेल्वेचा हा विस्तार, ही आधुनिकता, ही गती….. ‘विकसित भारत’ च्या निर्धारित लक्ष्याकडे आपला देश पावलागणिक अग्रेसर होत आहे. आज ज्या तीन वंदे भारत रेल्वे गाड्या सुरू झाल्या आहेत, त्यामुळे देशातील महत्त्वपूर्ण शहरे आणि ऐतिहासिक ठिकाणांसाठी संपर्क सुविधा उपलब्ध झाली आहे. मंदिराचे शहर असलेले मदुराई वंदे भारत रेल्वेच्या मार्फत आयटी शहर अशी ओळख असणाऱ्या बेंगळुरु सोबत थेट जोडले जाणार आहे. सप्ताहाच्या शेवटी तसेच सणांच्या काळात मदुराई आणि बेंगळुरु या शहरांदरम्यान प्रवास करण्यासाठी वंदे भारत रेल्वेमुळे चांगली सुविधा उपलब्ध होईल. यासोबतच, ही वंदे भारत रेल्वे तिर्थयात्रेकरुंसाठी देखील खुपच सोयीस्कर ठरेल. चेन्नई ते नागरकोविल या मार्गावर धावणारी वंदे भारत रेल्वे सर्व विद्यार्थी, शेतकरी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी खूप लाभदायक असेल. ज्या ठिकाणापर्यंत वंदे भारत एक्सप्रेसची सुविधा पोहोचत आहे, त्या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटकांच्या संख्येत वाढ म्हणजे त्या ठिकाणचे व्यापारी, दुकानदार यांच्या मिळकतीत वाढ होत आहे. आपल्या देशात रोजगाराच्या नव्या संधी देखील निर्माण होत आहेत. या रेल्वे गाड्यांसाठी मी देशवासीयांना खूप खूप शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी दक्षिणेतील राज्यांचा जलद गतीने विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. दक्षिण भारत अपार प्रतिभेचा धनी असून अपार साधन सामुग्री आणि अपार संधींची भूमी आहे. म्हणूनच तमिळनाडू आणि कर्नाटकाच्या सोबतीने संपूर्ण दक्षिण भारताच्या विकासाला आमचे सरकार प्राधान्य देत आहे. गत 10 वर्षात या राज्यांमध्ये झालेला रेल्वेचा विकास याचे योग्य उदाहरण आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात आम्ही तमिळनाडूमधील रेल्वे विकासासाठी 6 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची तरतूद केली आहे. ही तरतूद 2014 मधील अर्थसंकल्पाच्या तुलनेत, 7 पटीहून अधिक आहे. तमिळनाडूमध्ये पूर्वीपासून 6 वंदे भारत रेल्वे धावत आहेत. त्यात या आणखी 2 रेल्वेची भर पडल्याने ही संख्या आता 8 वर पोहोचली आहे. याच प्रकारे, कर्नाटकासाठी देखील यावेळी सात हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद देखील 2014 च्या तुलनेत, 9 पट अधिक आहे. आज वंदे भारत रेल्वेच्या 8 जोड्या संपूर्ण कर्नाटकाला जोडत आहेत.
मित्रांनो,
पूर्वीच्या तुलनेत कित्येक पटीने अधिक अर्थसंकल्पीय तरतुदीने तमिळनाडू, कर्नाटकासह दक्षिण भारतातील राज्यात रेल्वे वाहतुकीला आणखी मजबूत केले आहे. या राज्यांमध्ये रेल्वे मार्ग सुधारत आहेत, रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण केले जात आहे…. अनेक रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. यामुळे लोकांचे जीवन सुलभीकरण वृद्धिंगत होत आहे आणि व्यापार सुलभीकरणातही मदत होत आहे.
मित्रांनो,
आज मेरठ – लखनौ मार्गावर वंदे भारत रेल्वेच्या माध्यमातून उत्तर प्रदेश आणि खासकरून उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भाग, या भागातील लोकांनाही आनंदाची बातमी समजली आहे. मेरठ आणि उत्तर प्रदेशाची भूमी क्रांतीची भूमी आहे. आज हे क्षेत्र विकासाच्या नव्या क्रांतीचा साक्षीदार बनत आहे. मेरठ एकीकडे प्रादेशिक जलद संक्रमण प्रणाली (RRTS) च्या मार्फत राजधानी दिल्लीबरोबर जोडले जात आहे तर दुसरीकडे या वंदे भारत रेल्वेमुळे राज्याची राजधानी लखनौपासूनचे अंतर देखील कमी झाले आहे. आधुनिक रेल्वे, जलद गती महामार्गाचे जाळे, हवाई सेवेचा विस्तार…… पीएम गति शक्तीचा दृष्टिकोन कशाप्रकारे देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवेल, एनसीआर याचे उदाहरण बनत आहे.
मित्रहो,
वंदे भारत म्हणजे आधुनिकतेचा साज चढवणाऱ्या भारतीय रेल्वेचा नवा चेहरा आहे. आज प्रत्येक शहरात, प्रत्येक मार्गावर वंदे भारतसाठी मागणी आहे. अति वेगवान रेल्वे गाड्यांमुळे आपला व्यापार आणि रोजगार आणि स्वप्ने विस्तारण्याचा विश्वास लोकांच्या मनात निर्माण होतो. आज देशभरात 102 वंदे भारत रेल्वे सेवा सुरु आहेत.आतापर्यंत 3 कोटी हून जास्त लोकांनी या गाड्यांमधून प्रवास केला आहे. ही संख्या वंदे भारत गाड्यांच्या यशाचे प्रतिक तर आहेतच त्याचबरोबर आकांक्षी भारताच्या आकांक्षा आणि स्वप्नांचेही प्रतिक आहे.
मित्रहो,
आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधा हा विकसित भारत घडवण्यासाठीचा एक भक्कम स्तंभ आहे. रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम असो, रेल्वे मार्ग विद्युतीकरण असो,नव्या गाड्या चालवणे असो,नव्या मार्गांची निर्मिती असो या सर्व आघाड्यांवर झपाट्याने काम होत आहे. यंदाच्या अर्थ संकल्पात रेल्वेसाठी अडीच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट देण्यात आले आहे. भारतीय रेल्वेची जुनी छबी बदलून रेल्वेमध्ये आधुनिक उच्च तंत्रज्ञान आम्ही आणत आहोत.आज वंदे भारत बरोबरच अमृत भारत रेल्वे गाड्यांचाही विस्तार होत आहे. लवकरच स्लीपर वंदे भारत गाड्याही येणार आहेत.महानगरांमधून लोकांच्या सोयीसाठी नमो भारत रेल्वे गाड्या चालवण्यात येत आहेत. शहरांमधून वाहतुकीच्या समस्येपासून सुटका व्हावी यासाठी लवकरच वंदे मेट्रोही सुरु होणार आहे.
मित्रहो,
आपल्या शहरांची ओळख त्यांच्या रेल्वे स्थानकांमुळे होते. अमृत भारत स्थानक योजनेमुळे स्थानके सुशोभित होत आहेत, शहरांना नवी ओळखही मिळत आहे. आज देशातल्या 1300 हून जास्त रेल्वे स्थानकांचे नुतनीकरण करण्यात येत आहे. आज देशात जागो-जागी विमानतळाप्रमाणेच रेल्वे स्थानकेही निर्माण केली जात आहेत.छोटी-छोटी रेल्वे स्थानकेही अत्याधुनिक सुविधांनी सज्ज केली जात आहेत. यातून प्रवास सुखकर होऊ लागला आहे.
मित्रहो,
जेव्हा रेल्वे,रस्ते,जलमार्ग यासारख्या कनेक्टीविटीच्या पायाभूत सुविधा बळकट होऊ लागतात तेव्हा देश बलवान होतो. यातून सर्वसामान्य जनतेचा लाभ होतो, देशाच्या गरीब आणि मध्यम वर्गाचा लाभ होतो. भारतात जस- जश्या आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत, गरीब आणि मध्यम वर्ग सबल होत आहे हे देश पहातच आहे . त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे गावांमध्येही नव्या संधी पोहोचू लागल्या आहेत. स्वस्त डेटा आणि डिजिटल पायाभूत सुविधांमुळेही गावांमध्ये नव्या संधी निर्माण होत आहेत. जेव्हा रुग्णालये,शौचालये आणि विक्रमी संख्येने पक्क्या घरांची उभारणी होते तेव्हा सर्वात गरिबालाही देशाच्या विकासाचा लाभ मिळतो. जेव्हा महाविद्यालये,विद्यापीठे आणि उद्योग यासारख्या पायाभूत सुविधा वाढतात तेव्हा त्यातून युवकांच्या प्रगतीसाठीच्या संधीही वाढतात. अशाच अनेक प्रयत्नांमुळे गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर येऊ शकले.
मित्रहो,
मागच्या काही वर्षांत रेल्वेने आपल्या मेहनतीने, दशकांपासूनच्या समस्यांचे निराकरण होण्याची उमेद निर्माण केली आहे. मात्र आपल्याला या दिशेने बराच मोठा पल्ला अद्याप गाठायचा आहे. भारतीय रेल्वे, गरीब, मध्यम वर्ग, सर्वांसाठी सुखकर प्रवासाची हमी ठरत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. देशात सुरु असलेला पायाभूत सुविधांचा विकास, गरीबीचे उच्चाटन करण्यात मोठी भूमिका बजावेल याचा मला विश्वास आहे. तीन नव्या वंदे भारत बद्दल मी तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशच्या लोकांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो.
आपणा सर्वाना खूप- खुप शुभेच्छा, खूप-खूप आभार.
***
S.Tupe/S.Mukhedkar/N.Chitale/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
In a significant boost to rail travel, three new Vande Bharat trains are being flagged off. These will improve connectivity across various cities of Uttar Pradesh, Karnataka and Tamil Nadu.https://t.co/td9b8ZcAHC
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2024
वंदे भारत ट्रेनों का ये विस्तार, ये आधुनिकता, ये रफ्तार…
— PMO India (@PMOIndia) August 31, 2024
हमारा देश ‘विकसित भारत’ के लक्ष्य की ओर कदम दर कदम बढ़ रहा है: PM @narendramodi pic.twitter.com/evdFH01bFc
विकसित भारत के लक्ष्य को पूरा करने के लिए दक्षिण के राज्यों का तेज विकास बहुत जरूरी है: PM @narendramodi pic.twitter.com/AtWgtqvKbT
— PMO India (@PMOIndia) August 31, 2024
वंदे भारत आधुनिक होती भारतीय रेलवे का नया चेहरा है। pic.twitter.com/1rF73yX3Ou
— PMO India (@PMOIndia) August 31, 2024