महामहिम,
महानुभाव,
आपणा सर्वांचे बहुमूल्य विचार आणि सूचनांसाठी मी आपले हार्दिक आभार मानतो. आपण सर्वांनी आपल्या समान चिंता आणि महत्त्वाकांक्षा समोर मांडल्या. आपणा सर्वांच्या विचारांवरून हे स्पष्ट आहे की ग्लोबल साऊथ देशांमध्ये एकजूट आहे.
आपल्या व्यापक सहभागाचे प्रतिबिंब आपल्या सूचनांमध्ये दिसून येते. आज आपल्या चर्चांमधून एकमेकांशी सामंजस्य राखत पुढे जाण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. यामुळे आपली सामायिक उद्दिष्टे प्राप्त करणे वेग घेईल याचा मला विश्वास आहे.
मित्रहो,
आपणा सर्वांची मते ऐकल्यानंतर मी आपल्यासमोर भारताकडून एका ग्लोबल डेव्हलपमेंट कॉम्पॅक्टचा (जागतिक विकास कराराचा ) प्रस्ताव ठेवू इच्छितो. भारताचा विकासाकडे झालेला प्रवास आणि विकासातील भागीदारी याबाबतचे अनुभव या कराराचा पाया असतील. या करारामागील प्रेरणा म्हणजे ग्लोबल साऊथ देशांनी स्वतः ठरवून घेतलेल्या विकासाच्या प्राथमिकता असतील.
हा करार मानवकेंद्रित असेल आणि विकासाच्या संदर्भात बहुआयामी असेल. तसेच तो बहुस्तरीय दृष्टिकोनाला चालना देणारा असेल. विकासात्मक अर्थसहाय्याच्या नावाखाली हा गरजू देशांना कर्जाच्या ओझ्याखाली गाडणार नाही, सहभागी देशांच्या संतुलित आणि सातत्यपूर्ण विकासात योगदान देईल.
मित्रहो,
या विकास कराराच्या अंतर्गत आपण विकासासाठी व्यापार, शाश्वत विकासासाठी क्षमता वृद्धी, तंत्रज्ञान सामायिक करणे, प्रकल्प विशेष अर्थसहाय्य आणि अनुदान यावर भर देऊ. व्यापार वृद्धी उपक्रमांवर भर देऊ. व्यापार वृद्धी उपक्रमांना बळ देण्यासाठी भारत 2.5 दशलक्ष डॉलर्सच्या विशेष निधीची सुरुवात करेल. क्षमता वृद्धीसाठी व्यापार धोरण आणि व्यापारी वाटाघाटींसाठी प्रशिक्षण उपलब्ध केले जाईल त्यासाठी एक दशलक्ष डॉलरचा निधी प्रदान केला जाईल.
ग्लोबल साउथ देशांमध्ये आर्थिक तणाव आणि विकास निधी, याबाबत भारत एस डी जी स्टिम्युलस लीडर्स गटात योगदान देत आहे. ग्लोबल साउथला स्वस्त आणि प्रभावी जेनेरिक औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी आम्ही काम करू. औषध नियामकांच्या प्रशिक्षणासाठीही आम्ही योगदान देऊ. कृषी क्षेत्रामध्ये नैसर्गिक शेतीचे आपले अनुभव आणि तंत्रज्ञान सामायिक करण्यात आम्हाला संतोष मिळेल.
मित्रहो,
आपण सर्वांनी ताण आणि संघर्ष यांच्याशी संबंधित चिंता व्यक्त केल्या आहेत या बाबी आपल्या सर्वांसाठीच गंभीर आहेत. या चिंतांचे उत्तर एका न्याय्य आणि सर्वसमावेशक जागतिक प्रशासनावर अवलंबून आहे. अशा संस्था ज्यांच्या प्राथमिकतेत ग्लोबल साउथ वरच्या क्रमांकावर असेल. जेथे विकसित देशसुद्धा आपले दायित्व आणि बांधिलकी पूर्ण करतील.
ग्लोबल नॉर्थ आणि ग्लोबल साउथ यांच्यामध्ये असलेली दरी कमी करण्यासाठी आपण पावलं उचलू या. पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रांमध्ये होणारी समिट ऑफ फ्युचर या सगळ्यासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड बनू शकतो.
महामहिम,
महानुभाव,
आपली उपस्थिती आणि अनमोल विचार यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांचा हार्दिक आभारी आहे. ग्लोबल साउथच्या प्रगतीसाठी आपण आपला आवाज असाच बुलंद करत राहू, तसेच आपले अनुभवसुद्धा सामायिक करत राहू असा विश्वास मला वाटतो. आज दिवसभर आपले गट सर्व विषयावर गहन चिंतन मनन करतील आणि आपल्या सहयोगाने आपण भावी काळात हा मंच असाच प्रगतीपथावर ठेवू .
आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद.
***
S.Kakade/V.Sahajrao/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
Delivering my closing remarks at the Voice of Global South Summit. https://t.co/fe3SNFlBrL
— Narendra Modi (@narendramodi) August 17, 2024