Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तामिळनाडू डॉ एम जी आर वैद्यकीय विद्यापीठाच्या 33 व्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित

तामिळनाडू डॉ एम जी आर वैद्यकीय विद्यापीठाच्या 33 व्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित


नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडू डॉ एम जी आर वैद्यकीय विद्यापीठाच्या 33 व्या दीक्षांत समारंभाला  दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. 21,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना यावेळी पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित या कार्यक्रमाला उपस्थित होते.

PM India

पदवी आणि पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांपैकी 70% पेक्षा जास्त महिला आहेत याबद्दल पंतप्रधानांनी संतोष व्यक्त केला. पदवीधारकांचे अभिनंदन करतानाच महिला पदवीधारकांची त्यांनी विशेष प्रशंसा केली. कोणत्याही क्षेत्रात महिला आघाडीची भूमिका बजावत आहेत हे निश्चितच विशेष असून हा क्षण अभिमानाचा आणि आनंदाचाही असतो असे पंतप्रधान म्हणाले.

विद्यार्थी आणि संस्था यांच्या यशाने महान एम जी आर यांना नक्कीच आनंद झाला असता अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. गरिबांबाबत एम जी आर सरकारचा दृष्टीकोन नेहमीच सहानुभूतीचा राहिला याचे स्मरण त्यांनी केले. आरोग्य सुविधा, शिक्षण आणि महिला सबलीकरण यावर त्यांच्या सरकारचा विशेष भर होता. एमजीआर यांच्या जन्मस्थळी, श्रीलंकेतल्या तमिळ बंधू भगिनींसाठी आरोग्य क्षेत्रात काम करणे हा भारताचा सन्मान असल्याचे ते म्हणाले. भारताने वित्त पुरवठा केलेल्या रुग्ण वाहिका सेवेचा श्रीलंकेतल्या तमिळ समुदायाकडून मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे.   आरोग्यक्षेत्रातले हे प्रयत्न आणि तेही तमिळ समुदायासाठी यामुळे एमजीआर यांना नक्कीच आनंद झाला असता असे पंतप्रधान म्हणाले.

भारतीय वैद्यकीय व्यावसायिक, वैज्ञानिक आणि औषधनिर्मिती व्यावसायिकाबद्दल प्रशंसा आणि आदरभावना आहे. भारत जगासाठी औषधे आणि लस उत्पादन करत आहे. कोविड-19 महामारीमध्ये भारतातला   मृत्यू दर हा सर्वात कमी दरापैकी एक राहिला त्याच वेळी  रुग्ण बरे होण्याचा दर उच्च राहिला. भारतीय आरोग्य परिसंस्थेकडे नव्या दृष्टीकोनातून, नव्या आदराने आणि अधिक विश्वासार्हतेने पाहिले जात आहे. या महामारीमधून घेतलेला बोध आपल्याला क्षयरोगा सारख्या इतर रोगांशी लढा देण्यासाठी उपयुक्त ठरेल असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकार संपूर्ण वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचा  कायापालट करत आहे. नवे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठीचे निकष, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग सुसंगत करणार असून अधिक पारदर्शकता आणण्याबरोबरच या क्षेत्रातल्या मनुष्यबळाची गुणवत्ता आणि उपलब्धता यात सुधारणा घडवेल. गेल्या सहा वर्षात एमबीबीएसच्या जागांमध्ये 30 हजाराची वाढ करण्यात आली, असून ती 2014 पासून 50% पेक्षा जास्त आहे. पदव्युत्तर जागांमध्ये 24 हजाराची वाढ करण्यात आली, 2014 पासून सुमारे 80% पेक्षा जास्त ही वाढ आहे. 2014 मध्ये देशात 6 एम्स होती मात्र गेल्या सहा वर्षात 15 आणखी एम्सना मंजुरी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

तामिळनाडूमधल्या ज्या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय नाही अशा जिल्ह्यांमध्ये 11 नवी  वैद्यकीय महाविद्यालये उभारायला परवानगी देण्यात आली आहे. या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी केंद्र सरकार 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी देईल असे पंतप्रधान म्हणाले. अर्थ संकल्पात जाहीर करण्यात आलेल्या पीएम आत्म निर्भर स्वस्थ भारत योजनेमुळे प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय स्तरावरच्या आरोग्यसेवेच्या, नव्या  रोगांवर उपचार आणि शोध या संदर्भातल्या क्षमता वृद्धिंगत होणार आहेत.

आपल्या देशात डॉक्टरी पेशाकडे अतिशय आदरभावनेने पाहिले जाते आणि महामारी नंतरच्या काळात हा आदर अधिकच दुणावला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. अनेकदा अक्षरशः एखाद्याच्या जीवन मरणाचा हा प्रश्न असतो असे सांगून या व्यवसायाचे गांभीर्य जनतेने ओळखल्यामुळे त्यातून ही आदरभावना निर्माण झाली आहे. गंभीर असणे आणि गांभीर्याने पाहणे यामध्ये फरक असतो असे सांगून विद्यार्थ्यांनी हास्यविनोद बुद्धी कायम राखण्याची सूचना त्यांनी केली. यामुळे रुग्णांना प्रफुल्लित  ठेवण्यासाठी आणि त्यांचे मनोबल उंचावण्यासाठीही याची मदत होईल. हे विद्यार्थी राष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेत असल्याने त्यांनी  विद्यार्थ्यांना स्वतःचे आरोग्य आणि तंदुरुस्तीकडे लक्ष पुरवावे अशी सूचना त्यांनी केली. विद्यार्थ्यांनी स्वार्थापलीकडे पाहावे असे आवाहन करतानाच यामुळे ते निर्भयही होतील असे पंतप्रधान म्हणाले.

 

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com