Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तामिळनाडूमधील दिंडीगुल येथे गांधीग्राम ग्रामीण शिक्षण संस्थेच्या 36व्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान उपस्थित राहिले

तामिळनाडूमधील दिंडीगुल येथे गांधीग्राम ग्रामीण शिक्षण संस्थेच्या 36व्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान उपस्थित राहिले


नवी दिल्‍ली, 11 नोव्‍हेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूमधील दिंडीगुल येथे गांधीग्राम ग्रामीण शिक्षण संस्थेच्या 36व्या दीक्षांत समारंभामध्ये उपस्थित होते. या दीक्षांत समारंभात वर्ष 2018-19 तसेच 2019-20 या दोन तुकड्यांतील सुमारे 2300हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विजेते तसेच मानद उमेदवारांना सुवर्णपदकांनी गौरविण्यात आले.

या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की गांधीग्राम येथे येणे हा त्यांच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी अनुभव आहे. या शिक्षण संस्थेचे उद्घाटन महात्मा गांधी यांनी केले होते याचे स्मरण देखील त्यांनी यावेळी केले. ग्रामीण विकासाबाबतचे महात्माजींचे आदर्श आणि संकल्पना यांची उर्जा आपल्याला या संस्थेत पाहायला मिळते असे त्यांनी सांगितले. वादविवादांची सोडवणूक असो किंवा हवामानविषयक समस्या असो, महात्मा गांधींचे आदर्श आजच्या काळात आणि युगात प्रत्येक बाबतीत फार मोठ्या प्रमाणात समर्पक ठरत आहेत आणि त्यांनी मांडलेल्या संकल्पनांमध्ये जगाला आज तोंड द्याव्या लागत असलेल्या अनेक आव्हानांची आणि ज्वलंत समस्यांची उत्तरे आहेत याचा त्यांनी उल्लेख केला.

गांधीजींच्या जीवनपद्धतीचा स्वीकार करणाऱ्या विद्यार्थ्यांना जगावर प्रचंड परिणाम साधण्यासाठी उत्तम संधी उपलब्ध आहेत यावर भर देऊन पंतप्रधानांनी सर्वांच्या निदर्शनास आणून दिले की गांधीजींच्या हृदयातील कल्पनांबरहुकूम कार्य करणे हीच त्यांना सर्वोत्तम श्रद्धांजली ठरेल.यासाठी त्यांनी बराच काळ दुर्लक्षित राहिलेल्या आणि विस्मरणात गेलेल्या खादीला पुनरुज्जीवित करणाऱ्या ‘खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशन’ अभियानाचे उदाहरण दिले. गेल्या आठ वर्षांत खादी क्षेत्रातील विक्रीच्या प्रमाणात 300%हून अधिक वाढ झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली. “खादी आणि ग्रामीण उद्योग आयोगाने गेल्या वर्षी 1 लाख कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल करून दाखविली,” पंतप्रधान म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले, “खादीच्या कापडाच्या पर्यावरण-स्नेही गुणधर्मांमुळे अगदी जागतिक पातळीवरील फॅशन ब्रँड असलेले उद्योजक देखील आता खादी कापडाचा वापर करू लागले आहेत.” “खादीच्या वापरात दिसत असलेली मोठी वाढ म्हणजे मोठ्या प्रमाणातील उत्पादनामुळे झालेली क्रांती नसून जनसामान्यांकडून झालेली उत्पादनाची क्रांती आहे” महात्मा गांधींनी खादीला गावांच्या आत्मनिर्भरतेचे साधन म्हणून प्रोत्साहन दिले याचे स्मरण करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, आत्मनिर्भर भारत घडविण्याचा प्रयत्न करत असताना, केंद्र सरकार महात्मा गांधींच्या कल्पनान्पाडून प्रेरणा घेत आहे. “तामिळनाडू हे एके काळी स्वदेशी चळवळीचे महत्त्वाचे केंद्र होते. आता आत्मनिर्भर भारत घडविण्यात तामिळनाडू पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका बजावेल,” ते पुढे म्हणाले.

महात्मा गांधींची ग्रामीण विकासाची संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की, ग्रामीण जीवनाची सर्व मूल्ये जतन करून गावांचा विकास व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे. महात्मा गांधींच्या आदर्शांकडून प्रेरणा घेऊन  केंद्र सरकारने ग्रामीण विकासासंदर्भातील कल्पना निश्चित केली आहे याचा त्यांनी उल्लेख केला. शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये जोपर्यंत भेदाभेद केला जात नाही तोपर्यंतच या दोन्ही भागांतील फरक स्वीकारार्ह आहेत यावर त्यांनी अधिक भर दिला. संपूर्ण ग्रामीण भागातील स्वच्छता सुविधा, देशातील 6 कोटी घरांना नळाने पाणीपुरवठा, अडीच कोटी वीज जोडण्या आणि रस्त्यांच्या उभारणीद्वारे ग्रामीण भागाशी वाढत्या प्रमाणात जोडणी यांसारख्या उपक्रमांची उदाहरणे देऊन पंतप्रधान म्हणाले की, सरकार नागरिकांच्या उंबरठ्यापर्यंत विकास घेऊन जात आहे आणि त्याद्वारे शहरी तसेच ग्रामीण भागांतील असमानता कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

महात्मा गांधींना स्वच्छता अत्यंत प्रिय होती, याची आठवण करून देत पंतप्रधानांनी स्वच्छ भारताचे उदाहरण दिले. ते पुढे म्हणाले की, सरकार मूलभूत गोष्टी पुरवण्यावर थांबत नाही, तर खेड्यांना आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा लाभ कसा होईल, याकडे लक्ष देत आहे; आणि आधुनिक तंत्रज्ञानाने गावांना जोडले जात आहे.  जवळपास 2 लाख ग्रामपंचायतींना जोडण्यासाठी 6 लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे निर्माण करण्‍यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

ग्रामीण विकासामध्ये शाश्वततेच्या गरजेवर भर देताना पंतप्रधान म्हणाले की,  अशा क्षेत्राचे नेतृत्व तरुणांकडे देण्याची गरज आहे. “ग्रामीण भागाच्या भविष्यासाठी शाश्वत शेती महत्त्वाची आहे”, असे सांगून त्यांनी नैसर्गिक शेतीविषयी प्रचंड उत्साह दाखवला जात असल्याचे नमूद केले.  “आमची सेंद्रिय शेती योजना विशेषत: ईशान्येकडील भागांमध्ये आश्चर्यजनक  परिणाम देत आहे,’’ असे पंतप्रधान  मोदी यांनी  निदर्शनास आणून दिले. सरकारने गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीशी संबंधित धोरण आणल्याची माहितीही त्यांनी दिली. एक पीक शेती पद्धतीपासून शेती वाचवण्याची गरज आहे;  आणि धान्याचे विविध प्रकार, बाजरी आणि इतर पिकांच्या देशी वाणांचे पुनरुज्जीवन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

आचार्य विनोबा भावे यांनी नोंदवलेल्या निरीक्षणांचे स्मरण करून पंतप्रधान  मोदी म्हणाले की, ग्रामस्तरीय स्‍थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये विभाजन  होते.  हे टाळण्‍यासाठी पंतप्रधानांनी गुजरातमध्ये सुरू झालेल्या समरस ग्राम योजनेचे उदाहरण दिले. त्यांनी माहिती दिली की,  ज्या गावांनी सर्वांच्या सहमतीने नेते निवडले त्या ग्रामपंचायतींना  काही विशेष  प्रोत्साहनपर  दिले गेले, यामुळे सामाजिक संघर्ष कमी झाला.

गांधीजींचे दर्शन घेण्यासाठी हजारो ग्रामस्थ रेल्वेमध्ये आले होते, त्या वेळेचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की, महात्मा गांधी अखंड आणि स्वतंत्र भारतासाठी लढले आणि गांधीग्राम ही भारताच्या एकात्मतेची कथा आहे. “तामिळनाडू हे नेहमीच राष्ट्रीय चेतनेचे माहेरघर राहिले आहे,”  असे ते म्हणाले आणि स्वामी विवेकानंदांचे पश्चिमेकडून परतल्यावर एखाद्या महान नायकाप्रमाणे स्वागत झाले, याचीही आठवण त्यांनी करून दिली. दिवंगत जनरल बिपिन रावत यांचा उल्लेख करून  पंतप्रधानांनी त्यांचे पार्थिव नेताना इथल्या जनतेने  ‘वीरा वणक्कम’  मंत्र जपला होता, ते आपण ऐकला, अशी  आठवण सांगितली.

काशीमध्ये लवकरच होणार्‍या काशी- तमिळ संगमकडे पंतप्रधानांनी सर्वांचे लक्ष वेधले आणि ते म्हणाले,  काशी आणि तामिळनाडू यांच्यातील .ऋणानुबंध  साजरे करण्‍यात येणार आहेत. ‘’ एक भारत श्रेष्ठ भारत,  ही गोष्ट कृतीमधून दाखवली जाणारी आहे. असे प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर हाच आपल्या ऐक्याचा आधार आहे,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.

राणी वेलू नचियारच्या बलिदानाचे स्मरण करून पंतप्रधानांनी सांगितले की, ब्रिटिशांच्या विरोधात  लढण्याची तयारी करत असताना त्या  इथे  राहिल्या होत्या. “आज मी अशा प्रदेशात आहे,  ज्या क्षेत्राने नारी शक्तीचे सामर्थ्य पाहिले आहे. येथे पदवीधर झालेल्या तरुणी म्हणजे, समाजात सर्वात मोठे परिवर्तन घडवून आणणारा  वर्ग आहे, असे मी मानतो. या तरूणीच ग्रामीण महिलांना यशस्वी होण्यास मदत करतील. त्यांचे यश हेच देशाचे यश आहे.” असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असो, गरीबांसाठी अन्न सुरक्षा असो किंवा जगातील अर्थवृद्धीचे  इंजिन असो, पंतप्रधान म्हणाले की,  या शतकामध्‍ये आलेल्या सर्वात भीषण आपत्तीचा सामना करावा लागला, त्यावेळी   भारताने ठाम उभे राहून त्‍याच्याशी लढा दिला. भारताची उजळ बाजू या संकटाच्या काळातच दिसून आली.  “जगाला भारताकडून मोठ्या गोष्टींची अपेक्षा आहे. कारण भारताचे भविष्य तरुणांच्या ‘कॅन डू’ पिढीच्या हातात आहे.” पंतप्रधान पुढे म्हणाले, “युवक, जे केवळ आव्हानेच स्वीकारत नाहीत तर त्यांचा आनंदही घेतात, जे केवळ प्रश्नच करत नाहीत तर उत्तरेही शोधतात, जे केवळ निर्भयच आहेत आणि त्‍यांना थकवाही येत नाही,  जे केवळ आकांक्षाच बाळगून असतात असे नाही,  तर ध्‍येय साध्यही करतात.” पंतप्रधान म्हणाले, “आज पदवीधर झालेल्या तरुणांना माझा संदेश आहे – तुम्ही नव्या भारताचे निर्माते आहात. भारताच्या अमृत काळामध्‍ये आगामी  25 वर्षे नेतृत्व करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे.

या कार्यक्रमाला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, तामिळनाडूचे राज्यपाल  आर एन रवी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ एल मुरुगन, कुलपति डॉ. के एम अन्नामलाई आणि कुलगुरू प्रा. गुरमीत सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Patil/S.Chavan/S.Bedekar/D.Rane