पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि यात तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री डॉ. एम. करुणानिधी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. करुणानिधी यांचे चेन्नईतील कावेरी रुग्णालयात 7 ऑगस्ट 2018 रोजी निधन झाले.
मंत्रिमंडळाने त्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळले आणि शोक प्रस्ताव पारित केला. प्रस्तावाचा मसुदा पुढीलप्रमाणे:
“मंत्रिमंडळ तमिलनाडूचे माजी मुख्यमंत्री डॉ. एम. करुणानिधि यांच्या दुःखद निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत आहे. त्यांचे 7 ऑगस्ट 2018 रोजी चेन्नईतील कावेरी रुग्णालयात निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे देशाने एक दिग्गज आणि असाधारण नेता गमावला आहे, ज्यांना प्रेमाने ‘कलइगनर’ म्हटले जायचे.
त्यांचा जन्म 3 जून, 1924 रोजी नागापट्टिनम जिल्ह्यातील थिरुक्कुवलई गावात झाला होता. त्यांनी तामिळनाडूच्या राजकारणात त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक सार्वजनिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाच्या पदांवर काम केले. त्यांनी वयाच्या 33 व्या वर्षी 1957 मधील निवडणुकीत कुलिथलई मतदारसंघातून विजय मिळवत तामिळनाडू विधानसभेत प्रवेश केला. ते 1967 मध्ये तामिळनाडू सरकारमध्ये मंत्री झाले आणि 1969 मध्ये पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवले.
राजकीय जीवनाव्यतिरिक्त ते तामिळ चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय पटकथा लेखक होते. त्यांनी द्राविडी चळवळीच्या तत्वांचा प्रसार करण्यासाठी चित्रपट माध्यमाचा वापर केला. डॉ. एम. करुणानिधि लेखन आणि वक्तृत्व कौशल्यासाठी देखील प्रसिद्ध होते. तामिळ साहित्यातील त्यांचे योगदान अभूतपूर्व आहे त्यात कविता, पटकथा, कादंबऱ्या , आत्मचरित्रे, नाटक, संवाद आणि चित्रपट गीतांचा समावेश आहे.
त्यांच्या निधनामुळे तामिळनाडूच्या जनतेने लोकप्रिय नेता गमावला आहे.
सरकार आणि संपूर्ण देशाच्या वतीने मंत्रिमंडळ त्यांचे शोकाकुल कुटुंब आणि तामिळनाडूच्या जनतेप्रती शोकभावना व्यक्त करत आहे.”
B.Gokhale/S.Kane/Dinesh