पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रुक न्यामप शोगपा पक्षाचे अध्यक्ष डॉ. लोतेय शेरिंग यांच्याशी दुरध्वनीवर आज संवाद साधला. भूतान मधील तिस-या सर्वसाधारण निवडणुकीत पक्षाच्या आणि स्वत: च्या विधानसभा निवडणुकीत विजयाप्रसंगी डॉ. लोतेय शेरिंग यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. भूतानमध्ये लोकशाहीच्या एकत्रीकरणासाठी सर्वसाधारण निवडणुकीच्या यशस्वी अंमलबजावणीचेही पंतप्रधान मोदींनी स्वागत केले.
परस्पर हीतसबंध व मूल्ये, ठाम विश्वास, सद्भावना व परस्पर विश्वास यावर आधारित भूतानशी असणारे मैत्री आणि सहकार्याचे संबंध आणखी बळकट करण्यासाठी भारताने उच्च प्राथमिकता दिली आहे, असे याप्रसंगी पंतप्रधानांनी कळविले.
दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या सुरू असलेल्या सुवर्ण महोत्सवी उत्सवाची आठवण करून देताना पंतप्रधान मोदींनी भूतानमधील नवीन सरकारसोबत काम करतांना लोकांच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनासाठी त्यांची प्राथमिकता व हिताच्या आधारे काम करण्याची आपली दृढ वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. भारत भेटीसाठी डॉ. लोतेय शेरिंग यांना पंतप्रधानांनी आमंत्रणही दिले.
डॉ. लोतेय शेरिंग यांनी शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि शीघ्र संधीअनुरुप भारत भेटीचे निमंत्रणही स्वीकारले. भूतान व भारताच्या लोकांना लाभदायक ठरतील असे अद्वितीय आणि बहुआयामी द्विपक्षीय सहकार्य नवीन उंचीवर नेण्यास दोन्ही नेत्यांनी यावेळी सहमती दर्शविली.
****
D.Mampilly/D.Wankhede