Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला सर्वसमावेशक भारत घडवण्याची पंतप्रधानांची ग्वाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला सर्वसमावेशक भारत घडवण्याची पंतप्रधानांची ग्वाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला सर्वसमावेशक भारत घडवण्याची पंतप्रधानांची ग्वाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला सर्वसमावेशक भारत घडवण्याची पंतप्रधानांची ग्वाही


सामाजिक-आर्थिक विकास, पायाभूत सोयी-सुविधा विकास, उच्च शिक्षण, डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासह, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या स्वप्नातला सर्वसमावेशक भारत घडवण्याच्या ग्वाहीसह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरच्या एक दिवसीय दौऱ्याची सांगता केली.

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी, नागपूरमध्ये, दीक्षाभूमीला भेट देऊन पुष्पांजली अर्पण केली. या दीक्षाभूमीवर, 1956 मध्ये बाबासाहेबांनी , लाखो अनुयायांसह बौध्द धर्माची दीक्षा घेतली. आंबेडकर जयंतीदिनी नागपूरला भेट देऊन दीक्षा भूमीवर प्रार्थना करण्याची संधी मिळाल्याने आपल्याला आनंद झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.

महाजेनकोच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राची प्रत्येकी 660 मेगावॅट क्षमतेची तीन युनिट पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आली. यावेळी पंतप्रधानांनी पाहणी केली तसेच त्यांच्या समोर सादरीकरण करण्यात आले.

देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी नीती आयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी भीम आधार पे ॲपचे उद्‌घाटन केले.

भीम-आधार ॲप या भीम ॲपचा व्यापारी विभाग असून, यामुळे आधारचा वापर करुन डिजिटल पद्धतीने पैसे भरण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला व्यापाऱ्याच्या बायोमेट्रिक प्रणित उपकरणावर अंगठ्याच्या ठशासारखी बायोमेट्रिक माहिती वापरुन डिजिटल पद्धतीने पैसे देता येतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीमसाठी आज दोन नवीन प्रोत्साहनार्थ योजनांचा शुभारंभ केला. कॅशबॅक आणि रेफरल बोनस या दोन नवीन योजना 495 कोटी रुपयांच्या असून, कालावधी सहा महिने असेल. डिजिटल पेमेंटची संस्कृती तळागाळापर्यंत पाझरावी हा यामागील उद्देश आहे. रेफरल बोनस योजनेअंतर्गत सध्याच्या भीम ॲपचा वापर करणारे आणि नवीन वापरकर्ते यांच्या खात्यात कॅश बोनस थेट जमा होईल. कॅशबॅक योजनेअंतर्गत, भीमचा वापर करण्यात आलेल्या प्रत्येक व्यवहारांवर व्यापाऱ्यांना कॅशबॅकचा लाभ मिळेल.

पंतप्रधानांच्या हस्ते दोन विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशनही करण्यात आले. दीक्षा भूमीचे दर्शन घडवणारे एक तिकिट, तर भगवान गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा दुसऱ्या तिकीटावर आहेत. आयआयएम नागपूर आणि एम्स्‌, आयआयआयटी तसेच महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे भूमीपूजनही पंतप्रधानांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सर्वांना सामावून घेणारा भारत घडवू इच्छित होते असे सांगून नवभारताची नवी अर्थव्यवस्था घडवण्यासाठी भीम-आधार हा मजबूत पाया असल्याचे पंतप्रधानांनी त्यानंतरच्या जाहीर सभेत बोलताना सांगितले. मोठा कायापालट घडवणाऱ्या भीम-आधारचा देशभरातील अनेकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल. ते म्हणाले की सर्वात प्रगत देशांमध्ये ही डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारची सर्वसमावेशक प्रणाली नाही. अनेक परदेशी विद्यापीठांसाठी लवकरच हा अभ्यासाचा विषय बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत लवकरच डिजिटल अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास व्यक्त करतानाच पंतप्रधान म्हणाले की ती वेळ फार लांब नाही, जेव्हा प्रत्येक भारतीय, गरीब व्यक्ती देखील म्हणेल की ‘डिजिधन हे निजी धन’ (डिजिटल पैसे हे माझे पैसे). ते म्हणाले की कमी रोकड असणे हे समाजासाठी चांगले आहे, कारण अधिक रोकड असेल, तर अनेक समस्या निर्माण होतात.

पायाभूत विकासासंदर्भात मोदी म्हणाले की वीज उपलब्ध असेल, तरच विकास होईल. विकासाच्या दिशेने जाणे ही प्राथमिक गरज आहे. वीज हा प्रत्येक नागरिकाचा समान अधिकार आहे आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी सरकार महत्वपूर्ण प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले. 2022 सालासाठी आमचे स्वप्न आहे, गरीबातील गरीब व्यक्तीचे स्वत:चे घर असावे आणि त्या घरात वीज, पाणी आणि अन्य सुविधा असाव्यात असे मोदी म्हणाले.

आपल्या भाषणात पंतप्रधानांनी डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले की आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जाऊनही आंबेडकरांच्या मनात कटुता किंवा सूड भावना नव्हती. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान देशातील जनतेने केलेल्या त्यागाचे स्मरण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आनंदाने आपले आयुष्य वेचले. स्वतंत्र भारताचे त्यांचे स्वप्न होते आणि त्यांना हवा असलेला भारत प्रत्यक्षात साकारण्यासाठी आपण आपल्यापरीने प्रयत्न करायला हवेत.

पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल चे.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, हंसराज अहिर, रामदास आठवले त्यांच्या समवेत होते.

M.Desai/S.Tupe/S.Kane/N.Chitale/D.Rane