Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डीफलिंपिक्समध्ये सहभागी झालेल्या चमूचे पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी केले आदरातिथ्य

डीफलिंपिक्समध्ये सहभागी झालेल्या चमूचे पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी केले आदरातिथ्य


नवी दिल्‍ली, 21 मे 2022

 

नुकत्याच पार पडलेल्या डीफलिंपिक्स मध्ये खेळून आलेल्या भारतीय चमूची  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आदरातिथ्य करत  त्यांच्याशी संवाद साधला. ब्राझीलमध्ये झालेल्या डीफलिंपिक्समध्ये या खेळाडूंनी आजवरची सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 8 सुवर्णपदकांसह 16 पदकांची कमाई केली. त्यांच्या आजच्या कौतुकसमारंभासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि निशिथ प्रामाणिक हेही उपस्थित होते.

चमूतील ज्येष्ठ खेळाडू रोहित भाकर याच्याशी संवाद साधताना पंतप्रधानांनी, आव्हाने झेलण्याची त्याची पद्धत आणि प्रतिस्पर्ध्यांना जोखण्याची त्याची पद्धत यावर चर्चा केली. रोहितने त्याची पार्श्वभूमी आणि खेळाकडे वळण्यामागील प्रेरणा तसेच उच्च स्थानावर दीर्घकाळ टिकून राहण्यामागील स्फूर्ती, याबद्दलही पंतप्रधानांना सांगितले. एक व्यक्ती म्हणून आणि एक खेळाडू म्हणून त्याचे आयुष्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे पंतप्रधानांनी या ज्येष्ठ बॅडमिंटनपटूला सांगितले. तसेच, त्याच्या चिकाटीचे आणि आयुष्यातील अडचणींसमोर शरण न जाण्याच्या वृत्तीचे पंतप्रधानांनी कौतुक केले. त्याच्यातील सातत्यपूर्ण जिद्दीची आणि वयपरत्वे चढत जाणाऱ्या त्याच्या कामगिरीची त्यांनी प्रशंसा केली. ” यशावर थांबून न राहणे आणि समाधान न मानणे, हा खेळाडूचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. खेळाडू सतत नवनवीन ध्येये डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या सिद्धीसाठी सतत परिश्रम घेतो”, असे पंतप्रधान म्हणाले.

कुस्तीपटू वीरेंदर सिंगने त्याच्या कुटुंबाच्या कुस्तीतील वारशाबद्दल सांगितले. कर्णबधिर समुदायात संधी आणि स्पर्धा मिळाल्याबद्दल त्याने समाधानही व्यक्त केले. 2005 पासून डीफलिंपिक स्पर्धेत त्याने सातत्याने उच्च कामगिरी करून पदके जिंकल्याची पंतप्रधानांनी विशेष दखल घेतली आणि उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या त्याच्या आकांक्षेचे त्यांनी कौतुक केले. एक ज्येष्ठ खेळाडू म्हणून त्याचे मानाचे स्थान आहे व त्याचवेळी तो एक चांगला विद्यार्थी म्हणूनही सतत शिकत राहतो- या त्याच्या वृत्तीचे पंतप्रधानांनी कौतुक केले. “तुझ्या इच्छाशक्तीमुळे प्रत्येकाला प्रेरणा मिळते. सातत्याचा तुझा गुण, देशातील तरुणाईला व खेळाडूंना खूप काही शिकवून जाणारा आहे. सर्वोच्च स्थानावर पोहोचणे कठीण असतेच, पण त्याहीपेक्षा कठीण असते ते तेथे टिकून राहणे आणि सतत सुधारणेसाठी प्रयत्न करत राहणे” असे उद्गार पंतप्रधानांनी काढले.

नेमबाज धनुष याने त्याच्या उत्कृष्टतेच्या सततच्या ध्यासाचे श्रेय त्याच्या कुटुंबाच्या भक्कम आधाराला दिले आहे. योग  आणि ध्यानधारणेचा त्याला कसा फायदा झाला, तेही त्याने सांगितले.तो त्याच्या आईला आदर्श मानतो, असेही त्याने अभिमानाने सांगितले. पंतप्रधानांनी त्याच्या आईप्रती आदरभाव व्यक्त केला आणि त्याला भक्कम पाठबळ दिल्याबद्दल त्याच्या कुटुंबाचे कौतुक केले. ‘खेलो इंडिया’ मोहीम, तळागाळातील खेळाडूंना लाभदायक ठरत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

नेमबाज प्रियेशा देशमुख हिने तिचा नेमबाजीतील आजवरचा प्रवास, त्यात तिला मिळालेला तिच्या कुटुंबाचा पाठींबा आणि प्रशिक्षक अंजली भागवत याविषयी सांगितले. प्रियेशा देशमुख हिच्या यशात अंजली भागवत यांनी निभावलेल्या भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. पुणेकर प्रियेशाच्या अस्खलित हिंदी भाषेचेही पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले.

टेनिसपटू जाफ्रीन शेख हिने सुद्धा वडील आणि कुटुंबाकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल सांगितले. पंतप्रधानांसह संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला. देशाची कसबी आणि सक्षम लेक असण्याबरोबरच देशातील मुलींसमोर तिने आदर्श ठेवला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या लेकींनी एकदा का ध्येय निश्चित केले की कोणताही अडथळा त्यांना रोखू शकत नाही, हे सिद्ध केले आहेस, असे पंतप्रधानांनी तिला सांगितले.

या क्रीडापटूंचे यश मोठे आहे आणि त्यांची खेळाप्रती नितांत आवड त्यांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे दर्शवते, असे पंतप्रधान म्हणाले. ही आवड आणि उत्साह असाच टिकवा. त्यातूनच आपल्या देशाच्या प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील आणि भविष्यही निश्चितच सुवर्णमयी होईल, असे पंतप्रधान म्हणाले.क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दिव्यांग यशस्वी कामगिरी करतात तेव्हा त्यांचे यश हे खेळातील त्यांच्या यशापलिकडे जाणारे अधिक मोठे यश असते. देशाची संस्कृती आणि संवेदनशीलता दर्शविणारे हे यश असते. त्यांच्या क्षमतांप्रती देशाला असलेल्या भावना आणि आदर यांचे ते प्रतिबिंब असते. म्हणूनच, देशाची प्रतिमा सकारात्मक करण्यात तुमचे योगदान हे इतर क्रीडापटूंपेक्षा कितीतरी पटीने अधिक मोलाचे ठरते, असे पंतप्रधानांनी या क्रीडापटूंना सांगितले.

“डीफलिंपिक्समध्ये अभिमानास्पद कामगिरी बजावणाऱ्या आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या या चाम्पीयन्सबरोबर झालेला संवाद माझ्या कायम स्मरणात राहील. या क्रीडापटूंनी आपले अनुभव सांगितले तेव्हा मला त्यांचा खेळाप्रती ध्यास , जिद्द जाणवत होती. माझ्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत. यंदाचे डीफलिंपिक्स त्यांच्या कामगिरीमुळे देशासाठी खास ठरले आहे!” अशा आशयाचा ट्वीट संदेश क्रीडापटूंबरोबर झालेल्या संवादानंतर पंतप्रधानांनी पाठवला.

 

 

* * *

N.Chitale/Jai/Reshma/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com