Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डिजिटल इंडिया उपक्रमाच्या देशभरातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गत, सुरू असलेल्या विविध योजनांच्या देशभरातील लाभार्थ्यांशी व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून संवाद साधला. या व्हिडिओ ब्रीजमुळे देशभरातल्या 50 लाख लाभार्थ्यांना एकत्र जोडता आले. यात सामायिक सेवा केंद्रे, एनआयसी केंद्र, राष्ट्रीय ज्ञान केंद्रे, डिपीओ, मोबाईल उत्पादन प्रकल्प आणि ‘मायगोव्ह’ या ॲपवरील स्वयंसेवक या सर्वांशी मोदींनी एकत्र संवाद साधला. सरकारी योजनांच्या विविध लाभार्थ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सीच्या माध्यमातून चर्चा करण्याच्या उपक्रमाचा हा सहावा अंक आहे.

समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातले लोक, विशेषत: ग्रामीण भागातल्या जनतेला डिजिटलदृष्ट्या सक्षम करण्यासाठी डिजिटल इंडिया हे अभियान सुरू करण्यात आले, असे पंतप्रधान म्हणाले. डिजिटल इंडिया उपक्रम यशस्वी करण्यासाठी सरकारने सर्वसमावेशक धोरण आखले असून त्यात गावांना फायबर ऑप्टीकने जोडणे, नागरिकांना डिजिटल शिक्षण देणे, मोबाईलच्या माध्यमातून सेवा देणे आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे, असे या धोरणाचे स्वरुप आहे, असे ते पुढे म्हणाले.

तंत्रज्ञानाविषयी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की,  तंत्रज्ञानामुळे जनतेचे जीवनमान सोपं झालं असून तंत्रज्ञानाचे फायदे सर्व स्तरातल्या लोकांपर्यंत पोहचवण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी भीम ॲप ही ऑनलाईन बिलिंग व्यवस्था, रेल्वेचे ऑनलाईन आरक्षण आणि तिकिट विक्री, शिष्यवृत्ती, निवृत्तीवेतन थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे यामुळे जनतेचे श्रम आणि वेळ यांची बचत होत आहे.

सामायिक सेवा केंद्रांचे महत्वही यावेळी पंतप्रधानांनी सांगितले. देशभर उभारण्यात आलेली सामायिक सेवा केंद्रे ग्रामीण भारतात डिजिटल सेवा पुरवत आहेत. या केंद्रांनी ग्रामीण स्तरावर उद्यमशीलतेला विकसित केले असून ग्रामीण भागात 10 लाख लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भारतात आज 2.92 लाख सामायिक सेवा केंद्रे कार्यरत असून ती 2.15 लाख ग्रामपंचायतींना विविध सेवा पुरवत आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

डिजिटल पेमेंट व्यवस्था एक चळवळ म्हणून देशभरात राबवली जात आहे. त्यामुळे व्यवस्थांमध्ये असलेले मध्यस्थ हद्दपार झाले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या 4 वर्षात भारतात डिजिटल पेमेंटमध्ये लक्षणीय वाढ झाली असून त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था डिजिटल आणि पारदर्शक झाली आहे.

प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाविषयी पंतप्रधानांनी माहिती दिली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.25 कोटी लोकांना डिजिटल कौशल्य आणि प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. यापैकी 70 टक्के युवक, अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय समुदायाचे आहेत. या योजनेअंतर्गत देशातल्या 6 कोटी लोकांना डिजिटल कौशल्य आणि प्राथमिक संगणक प्रशिक्षण देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.

डिजिटल इंडिया कार्यक्रमांमुळे बीपीओ क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला आहे. बीपीओ केवळ मोठ्या शहरांपुरतेच मर्यादित होते. मात्र, डिजिटल तंत्रज्ञानाच्या सोईंमुळे छोट्या शहरात आणि गावात बीपीओ केंद्र सुरू झाले आहेत. विशेषत: ईशान्य भारत आणि ग्रामीण भागात या बीपीओ केंद्रामुळे मोठी रोजगार निर्मिती झाली आहे, असे ते म्हणाले.

आता देशातल्या युवकांना त्यांच्या घराजवळ रोजगार उपलब्ध आहे.

विविध इलेक्ट्रॉनिक उत्पादन कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांशीही मोदींनी संवाद साधला. इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर उत्पादन क्षेत्रात गेल्या 4 वर्षात देशानं मोठी प्रगती केली आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्लस्टर योजना सुरू केली. याअंतर्गत 15 राज्यांमध्ये 23 क्लस्टर्स तयार करण्यात आले. या योजनेमुळे सुमारे 6 लाख लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. 2014 मध्ये देशात केवळ 2 मोबाईल उत्पादन उद्योग होते, आज त्यांची संख्या 120 पर्यंत पोहोचली आहे. या उद्योगांमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळून साडेचार लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.

राष्ट्रीय ज्ञान केंद्रांविषयी पंतप्रधान यावेळी बोलले, या केंद्रांमुळे देशातल्या 1700 महत्त्वाच्या संशोधन आणि शिक्षण संस्था परस्परांशी जोडल्या गेल्या आहेत. यामुळे 5 कोटी विद्यार्थी, संशोधन, अभ्यासक आणि सरकारी अधिकाऱ्यांना शिक्षण-संशोधनासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे ते म्हणाले.

मायगोव्ह ॲपच्या स्वयंसेवकांशी त्यांनी संवाद साधला. सरकार स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत हे ॲप सुरू करून सरकारमध्ये थेट जनतेचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले. आज या ॲपशी 60 लाख स्वयंसेवक जोडलेले आहेत. देशाच्या विविध प्रश्नांवर ते आपले उपाय, सूचना देतात तसेच नव भारताच्या उभारणीसाठी विविध कल्पना देऊन मोठे योगदान देत आहेत, असे मोदी म्हणाले. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून शिक्षण, रोजगार, उद्यमशीलता आणि सक्षमता ही चार उद्दिष्टे साध्य केली, असे पंतप्रधान म्हणाले.

यावेळी पंतप्रधानांनी डिजिटल इंडिया योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या आयुष्यात या योजनांमुळे आलेले परिवर्तन जाणून घेतले. सामायिक सेवा केंद्रांमुळे झालेल्या विविध लाभांची माहिती नागरिकांना यावेळी पंतप्रधानांना दिली.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Kor