Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

झारखंड इथे भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यान आणि स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे उद्घाटन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

झारखंड इथे भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यान आणि स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे उद्घाटन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


 

नमस्कार !

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात आपल्यासोबत रांची इथून सहभागी झालेले झारखंडचे राज्यपाल श्री रमेश बैशजी, झारखंडचे मुख्यमंत्री श्री हेमंत सोरेन जी, केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री श्रीमान अर्जुन मुंडा जी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री श्रीमान बाबूलाल मरांडी जी, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, श्री किशन रेड्डी जी, अन्नपूर्णा देवी जी, रघुबर दास जी, झारखंड सरकारमधील इतर मंत्री, खासदार, आमदार, देशभरातील माझे आदिवासी बंधू आणि भगिनी, विशेषत: झारखंडमधील माझे सहकारीसगळ्यांना जोहार!!  हागा ओड़ो मिसि को, दिसुम रेआ आजादी रेन आकिलान माराग् होड़ो, महानायक भोगोमान बिरसा मुंडा जी, ताकिना जोनोम नेग रे, दिसुम रेन सोबेन होड़ो को, आदिबासी जोहार।

 

मित्रांनो,

आपल्या आयुष्यात काही दिवस अत्यंत भाग्यानेच येतात आणि जेव्हा असे दिवस येतात, त्यावेळी आपले कर्तव्य असते, की त्या दिवसांचे तेज, त्यांचा प्रकाश पुढच्या पिढीपर्यंत, अधिक भव्य स्वरूपात पोचवावा. आजचा हा दिवस आपल्या आयुष्यातील असाच, पुण्य-पवित्र प्रसंग आहे. 15 नोव्हेंबर ही तारीख! धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आहे! झारखंडचा स्थापना दिवस! आणि देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवाचा हा कालखंड! हा प्रसंग आपल्यासाठी राष्ट्रीय आस्थेचा विषय आहे. भारताच्या प्राचीन आदिवासी संस्कृतीचे गौरवगीत गाण्याचा हा दिवस आहे. आणि हा काळ या गौरवाचा, भारताची आत्मा ज्या आदिवासी समुदाया कडून ऊर्जावान होते, त्यांच्याप्रति आपल्या कर्तव्यांना नवी उंची देण्याचीही ही एक संधी आहे. आणि म्हणूनच, स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात, देशाने असा निर्णय घेतला आहे, की भारताच्या आदिवासी परंपरा, त्यांच्या शौर्यगाथा या सगळ्यांना आता एक आणखी भव्य ओळख मिळवून दिली जाईल. याचाच भाग म्हणून, हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे, की आजपासून दरवर्षी देशभरात, 15 नोव्हेंबर, हा दिवस आदिवासी गौरव दिनम्हणून साजरा केला जाणार आहे.

इन आड़ी गोरोब इन बुझाव एदा जे, आबोइज सरकार, भगवान बिरसा मुंडा हाक, जानाम महा, 15 नवंबर हिलोक, जन जाति गौरव दिवस लेकाते, घोषणा केदाय !

मी देशाचा हा निर्णय, भगवान बिरसा मुंडा आणि आमच्या कोटी कोटी आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांना, वीर वीरांगनांच्या चरणी आज श्रद्धापूर्वक अर्पण करतो आहे. या प्रसंगी मी झारखंडच्या सर्व नागरिकांचे, देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या सर्व आदिवासी बंधू-भगिनी आणि आपल्या देशबांधवांचे अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. मी माझ्या आयुष्याचा खूप मोठा काळ आपल्या आदिवासी बंधू-भगिनीं, आदिवासी मुलांसोबत व्यतीत केला आहे. त्यांची सुख-दुःखे, त्यांची दिनचर्या, त्यांच्या आयुष्यातील सगळ्या छोट्या-मोठ्या गरजांचा मी साक्षीदार आहे, मी त्यात सहभागी झालो आहे. म्हणूनच, आजचा दिवस व्यक्तिगतरीत्या देखील माझ्यासाठी अत्यंत भावनिक प्रसंग आहे. माझ्यासाठी हा भावनिक प्रसंग आहे,भावना व्यक्त करण्याचा संधी देणारा आहे.

 

मित्रांनो,

आजच्याच दिवशी, आपले श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या दृढ इच्छाशक्तीमुळे झारखंड राज्य अस्तित्वात आले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्याच सरकारने, सर्वात आधी स्वतंत्र आदिवासी मंत्रालयाची स्थापना करत, आदिवासी हितांना देशांच्या धोरणांशी जोडले होते. झारखंड स्थापना दिवसाच्या या प्रसंगी, मी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांना वंदन करत त्यांनाही आपली श्रद्धांजली अर्पण करतो.

 

मित्रांनो,

आज या महत्वाच्या प्रसंगी, देशातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचे वस्तू संग्रहालय, देशबांधवांना समर्पित होत आहे. भारताची ओळख आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा देण्यासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या आयुष्यातील अखेरचे काही दिवस, रांचीच्या याच तुरुंगात काढले होते. जिथे भगवान बिरसा मुंडा यांची पावले पडली होती, ती भूमी त्यांच्या तप-त्याग आणि शौर्याची साक्षीदार बनते, ती भूमी आपल्या सर्वांसाठी एक पवित्र तीर्थ ठरते. काही दिवसांपूर्वी, मी आदिवासी समाजाच्या इतिहासाचे आणि स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी दिलेल्या योगादानाचे जतन करण्यासाठी, देशभरातील, आदिवासी संग्रहालयांची स्थापना करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी, केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकार एकत्र काम करत आहे. मला आनंद आहे की आज आदिवासी संस्कृतीने समृद्ध झारखंड अशा राज्यात, पहिले आदिवासी संग्रहालय अस्तित्वात आले आहे. मी भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यानासह स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयासाठी संपूर्ण देशातील आदिवासी समुदाय आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाचे अभिनंदन करतो. हे संग्रहालय, स्वातंत्र्यसंग्रामात आदिवासी नायक-नायिकांचे योगदान, विविधातांनी समृद्ध अशा आमच्या आदिवासी संस्कृतीचे जिवंत अधिष्ठान ठरेल. या संग्रहालयात, सिद्धू-कान्हूपासून, ते पोटो होपर्यंत, तेलंगा खड़िया पासून, ते गया मुंडापर्यंत, जतरा टाना भगतपासून, ते दिवा-किसुन पर्यंत, इतर आदिवासी वीरांची प्रतिमा इथे आहेत. त्यांच्या जीवनगाथांविषयी इथे अत्यंत विस्तृत माहिती सांगितली आहे.

 

मित्रांनो,

त्याशिवाय, देशाच्यां विविध राज्यात देखील, अशाच नऊ आणखी संग्रहालयांचे काम वेगाने सुरु आहे. लवकरच, गुजरातच्या राजपिपला इथे, आंध्र प्रदेशच्या लांबासिंगी इथे, छत्तीसगढ़ च्या रायपुर इथे, केरळच्या कोझिकोड इथे, मध्यप्रदेशात छिंदवाडा इथे, तेलंगणाच्या हैदराबाद इथे, मणिपूरच्या तामेन्ग-लॉन्ग इथे, मिझोरामच्या केलसिह इथे, गोव्याच्या पौंडा इथे, आपण या संग्रहालयाला मूर्त स्वरूप मिळताना, आपण आपल्या डोळ्यांनी बघणार आहोत.

या संग्रहालयांमुळे देशाच्या नव्या पिढीला आदिवासी इतिहास आणि संस्कृतीची ओळख तर होईलच, त्याशिवाय, यामुळे या क्षेत्रात पर्यटनाला देखील नवी गती मिळेल. हे संग्रहालय आदिवासी समाजाचे गीत-संगीत, कला-कौशल्ये, पिढ्यानपिढ्या वारशाने सुरु असलेल्या हस्त आणि शिल्पकला, या सगळ्या वारसाचे संरक्षण आणि संवर्धन देखील करतील.

 

मित्रांनो,

भगवान बिरसा मुंडा यांनी, आपल्या अनेक आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली होती. मात्र, त्यांच्यासाठी स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा अर्थ काय होता? भारताची सत्ता, भारतासाठी निर्णय घेण्याची अधिकार शक्ती भारतातील लोकांकडे यावी, हेच स्वातंत्र्यलढयाचे एक महत्वाचे आणि मूळ उद्दिष्ट होते. मात्र, त्यासोबतच, ‘धरती आबायांची लढाई, आदिवासी समाजाची ओळख मिटवण्याच्या ब्रिटिशांच्या विचारांविरोधात देखील होती. आधुनिकतेच्या नावाखाली, भारताच्या विविधतांवर हल्ला, प्राचीन ओळख आणि निसर्गात ढवळाढवळ, हे सगळे समाजाच्या हिताचे नाही, यांची भगवान बिरसा मुंडा यांना जाणीव होती. ते आधुनिक शिक्षणाचे पुरस्कर्ते होते, ते बदलांचा पुरस्कार करत असत. त्यांनी आपल्या समाजातील कुप्रथा, उणीवांवर बोट ठेवण्याचे धैर्यदेखील दाखवले होते. निरक्षरता, भेदभाव या सगळ्याविरोधात त्यांनी अभियान देखील चालवले होते. समाजातील कित्येक युवकांना त्यांनी जागरुक केले होते.

नैतिक मूल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या सामर्थ्याने आदिवासी समाजामध्ये एक नवी ऊर्जा निर्माण केली.  जे परकीय आपल्या  आदिवासी समाजालामुंडा बंधू -भगिनींना मागास मानत होते, आपल्या सत्तेसमोर त्यांना दुर्बल समजत होते, त्या परकीय राजवटीला  भगवान बिरसा मुंडा आणि  मुंडा समाजाने गुडघे टेकायला लावले. ही लढाई जड़-जंगल-जमीनीची होती, आदिवासी समाजाची ओळख आणि भारताच्या स्वातंत्र्याची होती.. आणि ती इतकी सामर्थ्यवान होती कारण भगवान बिरसा यांनी समाजाला बाहेरच्या शत्रूंबरोबरच अंतर्गत धोक्यांविरुद्ध  लढायला  शिकवले होते.  म्हणूनच, मला वाटते  आदिवासी गौरव दिवस, समाजाला  सशक्त करणाऱ्या या महायज्ञाचे स्मरण  करण्याची देखील संधी आहे, पुन्हा पुन्हा  स्मरण करण्याची संधी आहे.

 

मित्रांनो,

भगवान बिरसा मुंडा यांचा उलगुलानविजयउलगुलान यश अपयशाच्या  तात्कालिक निर्णयांपुरता सीमित इतिहासातील सामान्य लढा नव्हता.  उलगुलान  ही आगामी शेकडो वर्षांना प्रेरणा देणारी घटना होती. भगवान बिरसा समाजासाठी जगले, आपली संस्कृती आणि आपल्या देशासाठी आपल्या प्राणांचे त्यांनी बलिदान दिले. म्हणूनच, आजही  आपल्या आस्थेत, आपल्या भावनेत ईश्वराच्या रूपात त्यांना स्थान आहे. आणि म्हणूनच आज जेव्हा आपण देशाच्या विकासात भागीदार बनत असलेला आदिवासी समाज पाहतो, जगात  पर्यावरणाच्या बाबतीत आपल्या भारताचे नेतृत्व करताना पाहतो, तेव्हा आपल्याला भगवान बिरसा मुंडा यांचा चेहरा प्रत्यक्ष दिसतो, आपल्या मस्तकावर त्यांचा आशीर्वाद असल्याचे जाणवते. आदिवासी हुदा रेया, अपना दोस्तुर, एनेम-सूंयाल को, सदय गोम्पय रका, जोतोन: कना । हेच काम आज आपला भारत संपूर्ण जगासाठी करत आहे.

 

मित्रांनो,

आपणा सर्वांसाठी  भगवान बिरसा एक व्यक्ती नाहीत तर  एक परंपरा आहेत. ते त्या  जीवन दर्शनाचे  प्रतिरूप आहे जे अनेक शतकांपासून भारताच्या आत्म्याचा भाग होते. म्हणूनच आपण त्यांना  धरती आबा म्हणतो. ज्यावेळी आपले  राष्ट्रपिता महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात मानवतेचा आवाज बनून लढत होते , साधारण त्याचवेळी  भारतात बिरसा मुंडा यांनी गुलामगिरीविरोधात एका लढ्याचा अध्याय लिहिला होता. धरती आबा खूप काळ या धरतीवर राहिले नाहीत. मात्र त्यांनी आयुष्याच्या छोट्याशा कालखंडात देशासाठी एक संपूर्ण इतिहास लिहून ठेवला, भारताच्या पिढयांना दिशा दाखवली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आज देश इतिहासातील अशाच असंख्य पानांना पुन्हा पुनर्जीवित करत आहे, जी  मागील दशकांमध्ये विस्मृतीत  गेली होती. या देशाच्या स्वातंत्र्यात अशा कित्येक सैनिकांचे त्याग आणि बलिदान समाविष्ट आहे ज्यांना ती ओळख कधीच मिळाली नाही जी मिळायला हवी होती. आपण आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या त्या काळाकडे पाहिले तर क्वचितच असा एखादा कालखंड असेल, जेव्हा देशाच्या विविध भागांमध्ये कुठली ना कुठली आदिवासी क्रांति झाली नसेल. भगवान बिरसा यांच्या नेतृत्वाखालील  मुंडा आंदोलन असेल किंवा मग  संथाल लढा आणि ख़ासी संग्राम असेलईशान्येकडील  अहोम संग्राम असो किंवा छोटा नागपुर क्षेत्रातील  कोल संग्राम आणि  भील संग्राम असो, भारताच्या आदिवासी मुलामुलींनी प्रत्येक कालखंडात ब्रिटिश राजवटीला आव्हान दिले.

 

मित्रांनो,

आपण  झारखंड आणि संपूर्ण  आदिवासी क्षेत्राचा इतिहास पाहिला तर लक्षात येईलबाबा तिलका मांझी यांनी इंग्रजांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली होती. सिद्धो-कान्हू आणि  चांद-भैरव बंधूंनी  भोगनाडीह इथून संथाल लढ्याचे रणशिंग फुंकले होते. तेलंगा खड़िया, शेख भिखारी आणि  गणपत राय यांच्यासारखे सैनिक, उमराव सिंह टिकैत, विश्वनाथ शाहदेव, नीलाम्बर-पीताम्बर यांच्यासारखे वीर, नारायण सिंह, जतरा उरांव, जादोनान्ग, रानी गाइडिन्ल्यू आणि  राजमोहिनी देवी सारख्या नायक नायिका, असे कितीतरी स्वातंत्र्य सैनिक होते ज्यांनी आपले सर्वस्व बलिदान करून स्वातंत्र्याची लढाई पुढे नेली. या महान आत्म्यांचे हे योगदान कधीही विसरले जाणार नाही. त्यांच्या गौरव-गाथा, त्यांचा इतिहास आपल्या भारताला नवा भारत बनण्याची ऊर्जा देईल. म्हणूनच देशाने आपल्या युवकांना, इतिहासकारांना या महान विभूतींशी संबंधित स्वातंत्र्याचा इतिहास पुन्हा एकदा लिहिण्याचे आवाहन केले आहे. युवकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात यासंदर्भात  लेखन अभियान हाती घेण्यात आले आहे.

मी झारखंडच्या युवकांना, विशेषतः आदिवासी युवकांनाही विनंती करेन, तुम्ही धरतीशी जोडलेले आहात. तुम्ही  या मातीचा  इतिहास केवळ वाचत नाही तर पाहिला, ऐकला  आणि तो जगतही आले आहात. म्हणूनच, देशाच्या या संकल्पाची जबाबदारी तुम्हीच तुमच्या हातात घ्या. तुम्ही स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित इतिहासाबाबत संशोधन करू शकता, पुस्तक लिहून शकता. आदिवासी कला संस्कृती देशाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धती देखील शोधू शकता. आपला प्राचीन वारसा, आपल्या इतिहासाला नवी चेतना देणे ही आता आपली जबाबदारी आहे.

 

 

मित्रांनो,

भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजासाठी अस्तित्व, अस्मिता आणि  आत्मनिर्भरतेचे स्वप्न पाहिले होते. आज देश देखील हा  संकल्प घेऊन  पुढे वाटचाल करत आहे. आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की वृक्ष कितीही विशाल असो, मात्र तो तेव्हाच ताठ उभा राहू शकतो जेव्हा तो मुळांपासून मजबूत असेल. म्हणूनच आत्मनिर्भर भारत, आपल्या मुळांशी जोडण्याचा, आपली मुळे मजबूत करण्याचा देखील संकल्प आहे. हा संकल्प आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी पूर्ण होईल. मला पूर्ण विश्वास आहेभगवान बिरसा यांच्या आशीर्वादाने आपला देश आपले  अमृत संकल्प  नक्कीच सिद्धीस नेईल आणि संपूर्ण  जगाला दिशाही दाखवेल. मी पुन्हा एकदा देशाला आदिवासी गौरव दिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांचे देखील मी खूप-खूप आभार मानतो. मी देशाच्या विदयार्थ्यांना आवाहन करतो की जेव्हा कधी संधी मिळेल, तेव्हा तुम्ही रांची इथं जा, या आदिवासींच्या महान संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या प्रदर्शनाला जरूर भेट द्या. तिथे काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करा. भारतातील प्रत्येक मुलासाठी इथे खूप काही शिकण्या-समजण्यासारखे आहे. आणि आयुष्यात संकल्प करून पुढे जायचे आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप-खूप आभार मानतो.

***

Jaydevi PS/S.Tupe/R.Aghor/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com