Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जैनाचार्य श्री विजय वल्लभ सूरीश्वर जी महाराज यांच्या 151 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, ‘स्टॅच्यू ऑफ पीस’ च्या अनावरणप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

जैनाचार्य श्री विजय वल्लभ सूरीश्वर जी महाराज यांच्या 151 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, ‘स्टॅच्यू ऑफ पीस’ च्या अनावरणप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


नमस्कार !

या कार्यक्रमाला उपस्थित गच्छाधिपती जैनाचार्य  श्री विजय नित्यानंद सूरीश्वर जी, आचार्य श्री विजय चिदानंद सूरि जी, आचार्य श्री जयानंद सूरि जी, महोत्सवाचे मार्गदर्शक, मुनी श्री मोक्षानंद विजय जी, श्री अशोक जैन, श्रीमान् सुधीर मेहताजी, श्री राजकुमारजी, श्री घीसूलालजी आणि आचार्य श्री विजय वल्लभ सूरिजी यांचे सर्व शिष्य आणि अनुयायी,आपल्या सर्वांना युगद्रष्टे, जगात वंदनीय विभूती, कलिकाल कल्पतरु, पंजाब केसरी आचार्य श्री विजय वल्लभ सूरि जी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित या महोत्सवासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा!

हे वर्ष आध्यात्मिक प्रकाशाचे वर्ष आहे, प्रेरणा देणारे वर्ष आहे. मला या कार्यक्रमात सहभागी होण्याचा आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मिळवण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. या जयंती वर्ष महोत्सवाच्या माध्यमातून एकीकडे भगवान श्री महावीर स्वामी यांच्या अहिंसा, अनेकांत आणि अपरिग्रह अशा सिद्धांतांचा प्रसार केला जात आहे, त्याचवेळी गुरु वल्लभ यांचे संदेश देखील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवले जात आहेत. या भव्य समारंभांच्या आयोजनासाठी मी गच्छाधिपती आचार्य श्रीमद् विजय नित्यानंद सूरीश्वर महाराज यांचेही विशेष अभिनंदन करतो. आपले दर्शन, आशीर्वाद आणि सहवासाचा लाभ मला वडोदरा आणि छोटा उदयपूर येथील कवांट गावात मिळाला होता. आज पुन्हा एकदा मला आपल्या सानिध्यात येण्याची संधी मिळाली, हे मी माझे पुण्यच समजतो. संत आचार्य श्रीमद् विजय नित्यानन्द सूरीश्वर जी महाराज जी म्हणत असत- गुजरातच्या या भूमीने आपल्याला दोन वल्लभ दिले, आणि आता अलीकडेच या विषयावर पुन्हा चर्चा झाली होती. राजकीय क्षेत्रात सरदार वल्लभभाई पटेल आणि आध्यात्मिक क्षेत्रात जैनाचार्य विजय वल्लभ सूरीश्वर जी महाराज. तसे तर मला या दोन्ही महापुरुषांमध्ये एक साधर्म्य आढळते. दोघांनीही भारताची एकता आणि बंधुभावासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. माझे सद्भाग्य आहे की मला देशाने सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जगातील सर्वात मोठ्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ चे लोकार्पण करण्याची संधी मिळाली आणि आज जैनाचारी विजय वल्लभ जी यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ पीस’ चे  अनावरण करण्याचे सौभाग्यही मलाच मिळाले आहे.

संत जनहो,

भारताने कायमच संपूर्ण जगाला, मानवतेला, शांतता, अहिंसा आणि बंधुतेचा मार्ग दाखवला आहे. संपूर्ण जगालाच भारताकडून ज्या संदेशांची प्रेरणा मिळते, ते हे संदेश आहेत. आज पुन्हा एकदा याच मार्गदर्शनासाठी जग भारताकडे बघत आहे. मला विश्वास आहे की हा ‘स्टॅच्यू ऑफ पीस’ जगासाठी शांतता, अहिंसा आणि सेवा यासाठीचे प्रेरणास्त्रोत बनेल.

मित्रांनो,

आचार्य विजयवल्लभजी म्हणत असत- “धर्म म्हणजे तटबंदीनी बांधलेलं जलाशय नाही, तर तो एक निरंतर वाहणारा प्रवाह आहे, जो सर्वांना समान स्वरुपात उपलब्ध असायला हवा.” त्यांचा हा संदेश संपूर्ण जगासाठी आजही प्रासंगिक आहे. त्यांचे जीवनचरित्र आणि कार्य जशाप्रकारचे होते, त्याकडे पाहिलं तर, त्यांच्याविषयी वारंवार लोकांना सांगायला हवं. बोलायला हवं. ते एक दार्शनिक होते, समाजसुधारक देखील होते, ते द्रष्टे होते, ते जनसेवक देखील होते. तुलसीदास, आनंदघन आणि  मीराबाई, यांच्याप्रमाणे ते परमात्म भक्तकवी देखील होते आणि आधुनिक भारताचे स्वप्न बघणारे द्रष्टे पुरुष होते. अशा महापुरुषाचा संदेश, त्यांनी दिलेली शिकवण आणि त्यांचे जीवनकार्य नव्या पिढीपर्यंत पोचणे अत्यंत आवश्यक आहे.

मित्रांनो,

भारताचा इतिहास जर आपण पाहिला,तर आपल्याला जाणवेल की जेव्हा कधी भारताला आंतरिक प्रकाशाची गरज भासली, त्यावेळी संत परंपरेतून कोणी ना कोणी सूर्य उगवला. प्रत्येक कालखंडात आपल्या देशात कोणीतरी मोठे संत झाले आहेत, ज्यांनी आपल्या शिकवणीतून त्या कालखंडातल्या समाजाला दिशा दिली. आचार्य विजय वल्लभ जी देखील असेच एक संत होते. पारतंत्र्याच्या त्या काळात त्यांनी देशातली गावे-शहरे, अशा सर्व ठिकाणी पदयात्रा केल्या, देशाची अस्मिता जागी करण्याचे भगीरथ प्रयत्न केले. आज जेव्हा आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाकडे वाटचाल करतो आहोत, स्वातंत्र्यलढ्याचा एक पैलू तर जगासमोर काही ना काही स्वरुपात आपल्या कानांवरुन गेला किंवा वाचनात आला आहे. मात्र आपल्याला हे ही कायम लक्षात ठेवायला हवे की भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी संतांनी चालवलेल्या भक्ती चळवळीतून तयार झाली होती. भक्ती चळवळीच्या माध्यमातून, भारतातील कानाकोपऱ्यात असलेल्या संत-महतांनी, ऋषींनी, आचार्यांनी, भगवंतांनी, जनचेतना जागृत केली.

एक पार्श्वभूमी तयार केली आणि या पूर्वपीठीकेतूनच स्वातंत्र्यलढ्यासाठी एक व्यापक ताकद निर्माण झाली. ही पार्श्वभूमी तयार करणाऱ्या अनेक संतांपैकी, आचार्य वल्लभ गुरु एक होते. त्यांचे त्यात महत्वाचे योगदान होते. मी आज एकविसाव्या शतकातल्या आचार्यांना, संतांना, भगवंतांना, कथा-कीर्तनकारांना हा आग्रह करु इच्छितो की, ज्याप्रमाणे, स्वातंत्र्यलढ्याची पूर्वपीठिका भक्ती चळवळीतून सुरु करण्यात आली, या स्वातंत्र्यलढ्याला भक्ती चळवळीने ताकद दिली, त्याचप्रमाणे, आत्मनिर्भर अभियानाची पूर्वपीठिका त्यांनी तयार करावी. आपण जिथे जिथे जाल, जिथे प्रवचने द्याल, त्यावेळी आपल्या मुखावाटे एक संदेश सतत देशातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचत राहायला हवा. आणि तो संदेश आहे-‘व्होकल फॉर लोकल’ जितके जास्त आपले कथा-कीर्तनकार, आपले आचार्य, आपले भगवंत, संतसमुदाय याबद्दलाचे संदेश लोकांपर्यंत पोचवतील तितका त्याचा अधिकाधिक प्रसार होईल. तेव्हाच्या संतांनी जशी स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी तयार केली होती, तशीच आज आत्मनिर्भर भारताची पार्श्वभूमी आपण तयार करु शकता. म्हणूनच माझं सर्व संतमंडळींना आवाहन आहे, अगदी आग्रही आवाहना आहे, एक प्रधानसेवक या नात्याने मी हे आवाहन करतो, की चला आपण या दिशेने पुढे जाऊया. कितीतरी स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांनी या महापुरुषांकडूनच प्रेरणा घेतली होती. पंडित मदन मोहन मालवीय, मोरारजीभाई देसाई यांच्यासारखे कितीतरी लोकनेते, त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे जात. त्यांनी देश स्वतंत्र होण्याची स्वप्ने बघितली  आणि हा स्वतंत्र देश कसा असावा याचा आराखडा देखील त्यांनी तयार केला होता. स्वदेशी  आणि आत्मनिर्भर भारतासाठी ते विशेष आग्रही होते. त्यांनी आयुष्यभर खादीची वस्त्रे घातली, स्वदेशीचा स्वीकार केला आणि संकल्पही केला. संतांचे विचार आणि शिकवण कशी अजरामर आणि चिरंजीव असते, याचं आचार्य विजय वल्लभजी यांचे प्रयत्न हे जिवंत उदाहरण आहे. देशहिताचा जो विचार त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात केला होता, तोच विचार आज “आत्मनिर्भर भारत” अभियानाच्या रुपाने आज प्रत्यक्षात साकारला जातो आहे.

मित्रांनो,

संत, महापुरुषांचे विचार आज यासाठी अजरामर असतात कारण ते जे सांगतात, ते त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष आचरणात आणतात. आचार्य विजयवल्लभ जी म्हणत असत, ”साधू-महात्मांचे कर्तव्य केवळ आपल्या आत्म्याचे कल्याण करणे एवढेच संकुचित नसते,त्यांचे हे ही कर्तव्य आहे की ते अज्ञान, कलह, बेरोजगारी, विषमता, अंधश्रद्धा, आळस, व्यसनाधीनता आणि अनिष्ट प्रथा-परंपरा, ज्यांचा समाजातल्या हजारो लोकांना त्रास होत असेल, समाजाची हानी होत असेल, तर अशा सर्व अवगुण-कुप्रथांचा नाश करण्यासाठी संतमंडळींनी सदैव प्रयत्न करायला हवेत”. त्यांच्या याच विचारांपासून प्रेरणा घेत आज कितीतरी युवक, त्यांच्या परंपरेशी जोडले जात आहेत, सेवाकार्याचा  संकल्प घेत आहेत. संतजनहो, आपल्या सर्वांना हे निश्चितच माहिती असेल  की सेवा, शिक्षण आणि आत्मनिर्भरता या सर्व विषयाबाबत आचार्य श्री यांना अत्यंत आत्मीयता होती. पारतंत्र्याचा काळ आणि त्याची प्रचंड आव्हाने असतांना देखील त्यांनी जागोजागी जाऊन शिक्षणाचा प्रसार केला.

गुरुकुले, शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना केली. त्यांनी आवाहन केले होते-‘घरांघरात विद्येचा दीप प्रज्वलित होऊ द्या’ मात्र, त्यांना ही जाणीव देखील होती, की इंग्रजांनी तयार केलेली शिक्षण व्यवस्था भारताचे स्वातंत्र्य आणि प्रगतीसाठी मदतीची ठरणार नाही. आणि म्हणूनच त्यांनी ज्या शाळा, महाविद्यालयांची स्थापना केली, तिथे त्या शिक्षणाचे मर्म आणि रंग भारतीय असेल याकडे लक्ष दिले. महात्मा गांधी यांनी जसे गुजरात विद्यापीठाचे स्वप्न पहिलं होतं, तसंच स्वप्न गुरु वल्लभ यांनी देखील पहिले होते. एकाप्रकारे, आचार्य विजयवल्लभ जी यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याचे अभियानच सुरु केले होते. त्यांनी पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशासारख्या अनेक राज्यात, भारतीय संस्कार असलेल्या अनेक शिक्षणसंस्थांची पायाभरणी केली होती. आज त्यांच्या आशीर्वादाने, या अनेक शिक्षणसंस्था देशात काम करत आहेत.

मित्रांनो,

आचार्य जी यांच्या या शिक्षणसंस्था आज एखाद्या उपवनासारख्या कार्यरत आहेत. भारतीय मूल्यांची शिकवण देणाऱ्या या संस्था देशाची सेवाच करत आहेत. 100 वर्षांपेक्षा अधिक काळाच्या या शिक्षण प्रवासातून कितीतरी प्रतिभावंत युवक या संस्थेने समाजाला दिले आहेत. या संस्थांमधून शिक्षण घेतलेले कितीतरी उद्योजक, न्यायाधीश, डॉक्टर्स आणि इंजिनियर्स आजही समाजात मोठे योगदान देत आहेत.या संस्थानांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, स्त्री-शिक्षण! महिला शिक्षणाच्या क्षेत्रात या संस्थांनी जे योगदान दिलं आहे, त्यासाठी देश आज त्यांचा ऋणी आहे. जुन्या कर्मठ, कठीण काळात देखील त्यांनी स्त्री-शिक्षणाचा जागर केला. अनेक बालिकाश्रमांची स्थापना केली आणि महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले.जैन साध्वींनी सभांमधून प्रवचने देण्याची प्रथा देखील आचार्य विजय वल्लभ जी यांनीचे सुरु केली होती. त्यांच्या या प्रयत्नांचा संदेश हाच होता की महिलांना समाजात, शिक्षणात बरोबरीचे स्थान मिळावे. भेदभावाचा विचार आणि प्रथा संपाव्यात. आज जर आपण लक्ष देऊन पाहिलेत, तर आपल्या लक्षात येईल की देशात आज या दिशेने किती मोठे परिवर्तन झाले आहे. महिलांना आजपर्यंत निर्बंध असलेली क्षेत्रे देखील आज त्यांच्यासाठी उघडण्यात आली आहे. आता देशातल्या लेकींना सैन्यदलात सुद्धा शौर्य गाजवण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यासोबतच, नवे ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ आता देशभर लागू केले जाणार आहे. हे शिक्षण धोरण भारतीय संदर्भात आधुनिक करण्यासोबतच महिलांसाठी नव्या संधी देखील तयार करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

मित्रांनो,

आचार्य विजय वल्लभजी म्हणत असत- राष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्यांची उपेक्षा करु नये, तर त्याचे अनुपालन केले जावे.” आपल्या आयुष्यात देखील त्यांनी सदैव “एक भारत-श्रेष्ठ भारत” या मंत्रानुसार आचरण केले. मानवतेच्या याच सत्यमार्गाने वाटचाल करत, त्यांनी जाती-पंथ-संप्रदायांच्या सीमांच्या बाहेर जात सर्वांच्या विकासासाठी काम केले. त्यांनी समाजातल्या सक्षम वर्गाला प्रेरणा दिली की समाजोन्नतीत सर्वात शेवटच्या सोपानावर राहिलेल्या सर्वसामान्य जनतेची सेवा करावी. महात्मा गांधी जे बोलत असत, ते गुरु वल्लभ जी करुन दाखवत असत. त्यांनी गरीबातील गरीब समाजातल्या-तळागाळातल्या व्यक्तीला मूलभूत सुविधा पुरवल्या. त्यांच्या याच प्रेरणेचा प्रभाव आज आपण देशभरात बघतो आहोत. त्यांच्याच प्रेरणेतून आज अनेक शहरात गरिबांसाठी घरे बनली आहेत, रुग्णालये निर्माण झाली आहेत, त्यांनी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध केल्या आहेत. आज देशभरात आत्मवल्लभ नावाने कितीतरी संस्था गरिब मुलांच्या भविष्याची जबाबदारी उचलत आहेत. माता- भगिनी यांचे चरितार्थ चालावे, निर्धन आजारी लोकांवर उपचार करण्यासाठी ते मदत करत आहेत.

मित्रांनो,

आचार्य विजयवल्लभजी यांचे आयुष्य, प्रत्येक जीवासाठी दया, करुणा आणि प्रेम याने ओतप्रोत भरलेले होते. म्हणूनच त्यांच्या आशीर्वादाने आज जीवदयेच्या भावनेतून अनेक पक्षी रुग्णालये आणि गोशाळा देखील चालवल्या जात आहेत.  या काही सामान्य संस्था नाहीत. या भारताच्या भावनेचे अनुष्ठान आहे. भारत आणि भारतीय मूल्यांची ओळख आहे.

मित्रांनो,

आचार्य विजय वल्लभ जी यांनी ज्या मूल्यांसाठी आपले आयुष्य समर्पित केले, त्या मानवी मुल्यांना आज देश अधिक मजबूत करत आहे. कोरोना आजाराचा हा काळ आपल्यातली सेवाभावी वृत्ती, आपली एकजूट यांच्यासाठी कसोटीचा काळ होता. मात्र, मला अत्यंत समाधान आहे की देश या कसोटीतून तावून सुलाखून निघाला. देशातल्या गरीब कल्याण भावनेला केवळ जिवंतच ठेवले नाही, तर जगापुढे एक उदाहरण देखील ठेवले.

मित्रांनो,

आचार्य विजय वल्लभ सूरिजी म्हणत असत- “सर्व प्राणिमात्रांची सेवा करणे हाच प्रत्येक भारतीयाचा धर्म आहे.” त्यांचा हाच मंत्र, वचन समजून आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. आपल्या प्रयत्नांत हा विचार असला पाहिजे, की या कामामुळे देशाला काय फायदा होईल, गरिबाचे कल्याण कसे होईल? मी सुरुवातीला जसे म्हटले होते, “व्होकल फॉर लोकल” यासाठी सर्वात मोठे माध्यम आहे आणि त्याचे नेतृत्व देखील संत, महात्मे, मुनी यांनाच करावे लागणार आहे.

यावेळी दिवाळी आणि इतर सर्व सणांच्या काळात, ज्याप्रकारे देशाच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला जोरदार पाठींबा देण्यात आला, तो खरोखर उत्साहवर्धक आणि नवी ऊर्जा देणारा आहे. हा विचार, हे प्रयत्न आपल्याला पुढेही सुरु ठेवायचे आहेत. चला तर मग, आचार्य विजय वल्लभ जी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आपण सगळे मिळून संकल्प करुया की त्यांनी जी कार्ये त्यांच्या जीवनात सुरु केली होती, ती कार्ये आपण संपूर्ण शक्तीनिशी, संपूर्ण समर्पण भावनेने ही कामे पुढे घेऊन जाऊया. आपण सर्व जण मिळून भारताला आर्थिकच नाही, तर वैचारिक रूपानेही आत्मनिर्भर बनवूया. आपण सर्व निरोगी रहा, सुखी रहा. याच संकल्पासह आपल्या सर्वांना अनेक शुभेच्छा !! सर्व आचार्य, भगवतांना सर्व प्रणाम करतो. सर्व साध्वी महाराजांचे मला आज दर्शन होत आहेत. त्या सर्वाना सादर प्रणाम करतो, आणि या पवित्र प्रसंगी मला तुमच्या आनंदात सहभागी होण्याची संधी देखील मला मिळाली, हे माझे सौभाग्य आहे. मी पुन्हा एकदा संत, महात्मे,आचार्य यांना प्रमाण करत माझे भाषण संपवतो.

खूप खूप धन्यवाद !!!