नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर 2022
भारताच्या जी-20 परिषदेच्या अध्यक्षस्थानाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्या 8 नोव्हेंबर रोजी दुपारी साडे चार वाजता, प्रतीकचिन्ह , संकल्पना आणि संकेतस्थळाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अनावरण करणार आहेत.
पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने मार्गक्रमण करत भारताचे परराष्ट्र धोरण जागतिक स्तरावर नेतृत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी विकसित होत आहे. या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून 1 डिसेंबर, 2022 पासून भारत जी-20 परिषदेचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी सज्ज होत आहे. जी-20 परिषदेचे अध्यक्षपद, भारताला आंतरराष्ट्रीय दृष्टया महत्त्वाच्या मुद्यांवर जागतिक कार्यक्रमात योगदान देण्याची अद्वितीय संधी प्रदान करते. याचे प्रतीकचिन्ह, संकल्पना आणि संकेतस्थळामधून भारताचा संदेश आणि जगासाठी सर्वोत्कृष्ट प्राधान्याचे प्रतिबिंब अधोरेखित केले जाईल.
जी-20 हे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचे प्रमुख व्यासपीठ आहे जे जागतिक एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GDP) सुमारे 85% उत्पन्नाचे, जागतिक व्यापाराच्या 75% पेक्षा जास्त आणि जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते. जी-20 परिषदेच्या अध्यक्षतेदरम्यान भारतभर विविध ठिकाणी वेगवेगळ्या 32 क्षेत्रांच्या अंतर्गत सुमारे 200 बैठका आयोजित होणार आहेत. पुढील वर्षी होणारी जी-20 शिखर परिषद, भारताद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय संमेलनांपैकी एक असेल.
Jaydevi PS/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai