Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक सीईओ आणि आघाडीच्या अमेरिकन कंपन्यांच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर पंतप्रधानांची बैठक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्क इथे 20 क्षेत्रातल्या 42 उद्योजकांबरोबर चर्चा केली. या चर्चेत सहभागी झालेल्या कंपन्यांची एकत्रित निव्वळ मूल्य 16.4 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी असून, भारतात यापैकी 50 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके मूल्य आहे.

आयबीएमचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गिनी रोमेटी, वॉलमार्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डगलस मॅकमिलन, कोका-कोलाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स क्विन्सी, लॉकहिड मार्टीनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅरिलिन ह्युसन, जे पी मॉर्गनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डीमॉन, अमेरिकन टॉवर कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारत अमेरिका सीईओ फोरमचे सह अध्यक्ष जेम्स टायक्लेट आणि ॲपल, गुगल, मेरीअट, विसा, मास्टर कार्ड, 3एम, वॉरबर्ग पिनकस, एईसीओएम, रेथिऑन, बँक ऑफ अमेरिका, पेप्सी आदी कंपन्यांचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

डीपीआयआयटी आणि इन्व्हेस्ट इंडिया यांनी आयोजित केलेल्या या चर्चेत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

व्यापार सुलभतेत भारताने केलेली प्रगती आणि गुंतवणुकदारांसाठी पोषक वातावरण निर्माण करणाऱ्या सुधारणांची उपस्थितांनी प्रशंसा केली. व्यापार सुलभतेवर भर देणारे आणि भारताला गुंतवणूकदार स्नेही बनवणारे प्रमुख निर्णय घेतल्याबद्दल उद्योजकांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. भारताच्या विकासाप्रती आपल्या कंपनी वचनबद्ध राहतील आणि भारतातही आपला ठसा उमटवत राहतील, असे या उद्योजकांनी नमूद केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारतातील विशिष्ट योजनांबाबत माहिती दिली तसेच कौशल्य विकास, डिजिटल भारत, मेक इन इंडिया, सर्वसमावेशक विकास, हरित ऊर्जा आणि वित्तीय समावेशकता या दिशेने भारताच्या प्रयत्नांना मदत करण्यासंदर्भात सूचना केल्या.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या सूचनांना उत्तर देतांना पंतप्रधानांनी राजकीय स्थिरता, अंदाज व्यक्त करता येण्याजोगी आणि विकासाभिमुख धोरणांवर भर दिला. पर्यटन विकास, प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या उपक्रमांवर तसेच शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी अधिकाधिक संधी निर्माण करणारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग वाढवण्यावर भर दिला. पोषण आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या आव्हानात्मक मुद्यांसह अन्य विविध समस्यांवर केवळ भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी तोडगा काढण्यासाठी अन्य देशांच्या सहकार्याने स्टार्ट अप इंडिया मधे सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी कंपन्यांना केले.

*******

R.Tidke/S.Kane/D.Rane