Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


 

केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी नितीन गडकरी जी, नरेंद्र सिंह तोमर जी, प्रकाश जावडेकर जी, पीयूष गोयल जी, धमेंद्र प्रधान जी, गुजरातमधल्या खेडा इथले खासदार देवुसिंग जेसिंगभाई चैहान जी, उत्तर प्रदेशमधल्या हरदोईचे खासदार जयप्रकाश रावत जी, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ जी, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर भगिनी उषा जी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

ज्यावेळी मी आपल्या शेतकरी सहकारी बांधवांबरोबर बोलत होतो, त्यावेळी समजले की, जैव-इंधनाशी जोडलेली गेलेली व्यवस्था कशा प्रकारे ती मंडळी सहजपणाने स्वीकारत आहेत, याविषयी किती उत्तमतेने हे लोक आपले म्हणणे मांडत होते. त्यांच्यामध्ये आलेला विश्वासही यावेळी दृष्टीस पडत होता. स्वच्छ ऊर्जा- हरित ऊर्जा देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर अभियान सुरू आहे. त्याचा खूप मोठा लाभ देशाच्या कृषी क्षेत्राला मिळणे स्वाभाविक आहे. आज विश्व पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारताने आणखी एक मोठे, महत्वाचे पाऊल उचलले आहे. इथेनॉल क्षेत्राच्या विकासासाठी एक विस्तृत पथदर्शी कार्यक्रम जारी करण्याची सुसंधी आज मला मिळाली आहे. देशभरामध्ये इथेनॉलचे उत्पादन आणि त्याचे  वितरण यांच्याशी संबंधित महत्वाकांक्षी ई -100या पथदर्शी प्रकल्पाचा प्रारंभ आज पुण्यात केला आहे. याबद्दल मी पुणेकरांचे अभिनंदन करतो. पुण्याच्या महापौरांना शुभेच्छा देतो. निर्धारित केलेले लक्ष्य आपण गाठावे, यासाठी मी खूप-खूप शुभेच्छा देतो.

 

मित्रांनो,

तुम्ही जर थोड बारकाईने पाहिले, तर लक्षात येईल, याआधी 7-8 वर्षांपूर्वी, देशामध्ये इथेनॉलची चर्चा अतिशय कमी आणि फार क्वचित केली जात होती. कोणी याविषयाचा फारसा उल्लेखही करीत नव्हते. आणि जर का कोणी याविषयाचा उल्लेख केलाच तर अगदी नेहमीप्रमाणे, किरकोळ स्वरूपाची बोलणी केली जात होती. परंतु आता इथेनॉल, 21 व्या शतकामध्ये भारताच्या दृष्टीने प्रमुख विषय म्हणून जोडला गेला आहे. इथेनॉलवर लक्ष केंद्रीत केले तर पर्यावरणाबरोबरच एक चांगला प्रभाव शेतकरी बांधवांच्या जीवनावरही पडत आहे. आज आम्ही पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंगचे लक्ष्य 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. आधी ज्यावेळी हे लक्ष्य निश्चित करण्याविषयी विचार केला होता, त्यावेळी वाटले होते की, हे लक्ष्य 2030 पर्यंत आम्ही पूर्ण करू शकू. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ज्याप्रकारे या क्षेत्रात यश मिळाले आहे, जनसामान्यांकडून ज्याप्रकारे सहकार्य मिळाले आहे, लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे, आणि प्रत्येकाला याचे महत्व आता समजले आहे. आणि यामुळेच आता आम्ही 2030 पर्यंत जे काही काम पूर्ण करू शकणार होतो, ते त्याआधीच पाच वर्ष म्हणजे 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वर्ष आधीच काम पूर्ण होणार आहे.

 

मित्रांनो,

इतका मोठा  निर्णय घेण्याचे आलेले धाडस, हे गेल्या सात वर्षांमध्ये देशाने जे लक्ष्य प्राप्त केले आहे, देशाने जे प्रयत्न केले आहेत, आणि त्यामध्ये देशाला जे यश मिळाले आहे, त्यामुळे आले आहे. गेल्या सात वर्षात केलेल्या कामांमुळे ही हिम्मत आली आहे. 2014 पर्यंत भारतामध्ये सरासरी फक्त एक-दीड टक्के इथेनॉलमिश्रीत पेट्रोल उपलब्ध होत असे. आज हे प्रमाण जवळ-जवळ साडेआठ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. वर्ष 2013-14 मध्ये  देशात 38 कोटी लीटर इथेनॉलची खरेदी होत होती. आता यामध्ये वाढ झाली असून जवळपास 320 कोटी लीटर इथेनॉलची खरेदी केली जात  आहे. याचा अर्थ जवळ-जवळ आठपट जास्त इथेनॉल खरेदी केले गेले आहे. गेल्या वर्षातच तेल विपणन कंपन्यांनी जवळपास 21 हजार कोटी रूपयांचे इथेनॉल खरेदी केले आहे. याचा एक खूप मोठा हिस्सा म्हणजे जे 21,000 कोटी रूपये खर्च केले होते, ते आपल्या देशातल्या शेतकरी बांधवांच्या खिशात गेले आहेत. विशेषतः आपल्याकडच्या ऊस उत्पादक शेतकरी बांधवाना त्यामुळे खूप मोठा लाभ झाला आहे. वर्ष 2025 पर्यंत ज्यावेळी पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉलचे मिसळण्यात येईल, त्यावेळी शेतकरी बांधवांना किती मोठ्या प्रमाणावर तेल कंपन्यांकडून थेट पैसे मिळतील, याचा आपल्याला अंदाज लावता येईल. यामुळे साखर उत्पादनाशी संबंधित असलेली आव्हाने पेलणे शक्य होणार आहे. कारण कधी-कधी जास्त ऊस उत्पादित केला जातो आणि त्यामुळे साखर उत्पादनही जास्त करावे लागते, अशावेळी जगामध्येही खरेदीदार मिळत नाहीत. देशात साखरेचे भाव खूप उतरतात आणि साखर उत्पादकांपुढे खूप मोठे आव्हान निर्माण होते. कारखान्यामध्ये तयार झालेले प्रचंड साखर साठवून कुठे ठेवायची ही सुद्धा एक समस्या बनते, ते मोठे संकट बनते. अशा प्रकारच्या सर्व आव्हानांना कमी करण्यासाठी आणि याचा थेट लाभ ऊस उत्पादकांच्या सुरक्षेसोबत जोडला जात आहे. यामुळे खूप मोठा फायदा होणार आहे.

 

मित्रांनो,

21 व्या शतकामध्ये भारताला, 21ची शतकातला आधुनिक विचार, आधुनिक धोरणे यांच्यामुळेच शक्ती मिळणार आहे. या विचारातूनच आमचे सरकार प्रत्येक क्षेत्रामध्ये निरंतर धोरणात्मक निर्णय घेत आहे. देशामध्ये आज इथेनॉलचे उत्पादन आणि खरेदी यांच्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचे निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. आत्तापर्यंत इथेनॉल तयार करणा-या जास्त कंपन्या ज्या राज्यामध्ये साखर उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते त्या 4-5 राज्यांमध्येच आहेत. आता या क्षेत्राचा विस्तार संपूर्ण देशात करण्यात येणार आहे.  इथेनॉलच्या निर्मितीसाठी सडलेले, कुजलेले अन्नधान्य, निरूपयोगी म्हणून टाकून दिलेले धान्य याचा उपयोग केला जाणार आहे. यासाठी अन्नधान्यावर आधारित डिस्टिलरीजची स्थापना करण्यात येत आहे. कृषी कच-यापासून इथेनॉल बनविण्यासाठीही देशात आधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

 

मित्रांनो,

हवामान बदलाच्या संकटापासून संरक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये भारत हा एक आशेचा किरण म्हणून उदय झाला आहे. एक आश्वस्त मानवजातीच्या कल्याणासाठी एक विश्वस्त सहकारीच्या रूपाने आज भारताने स्वतःचा नव्याने परिचय करून दिला आहे. जे जग कधीकाळी भारत म्हणजे एक आव्हान आहे, असे मानत होते, हवामान बदलाच्या संकटाविषयी भारताची इतकी मोठी लोकसंख्या म्हणजे, लोकांना वाटायचे की, संकट इथूनच येईल. मात्र आज स्थिती बदलून गेली आहे. आज आपला देशा हवामान न्यायाचे समर्थन करणारा देश म्हणून सामोरा येत आहे. एका महाभयंकर संकटाच्या विरोधात आपला देश मोठी शक्ती, ताकद बनत आहे. एक सूर्य, एक विश्व आणि एक ऊर्जा, अशी व्यवस्था निर्माण करण्याचे व्हिजनसाकार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची निर्मिती असो, अथवा आपत्ती निवारक पायाभूत सुविधांसाठी युती करण्यासाठी घेतलेला पुढाकार असो, भारत एक सर्वव्यापी वैश्विक व्हिजननिश्चित करून पुढची वाटचाल करीत आहे. हवामान बदल कामगिरी निर्देशांकामध्ये भारताने जगातल्या अव्वल 10 प्रमुख देशांमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

 

मित्रांनो,

हवामान परिवर्तनामुळे जी आव्हाने समोर येत आहेत, त्याविषयी भारत जागरूकही आहे आणि त्यावर सक्रियतेने कार्यही करीत आहे. आम्ही एकीकडे वैश्विक दक्षिणी भागात ऊर्जा क्षेत्राला न्याय मिळण्यासंबंधी संवेदनशील आहोत आणि वैश्विक उत्तरेचा विचार केला तर जबाबदारी घेण्यासाठी सिद्ध आहोत. त्याचबरोबर दुसरीकडे आम्ही आपली भूमिका योग्य रितीने , गांभीर्याने पार पाडत आहोत. भारताने ऊर्जा क्षेत्रात एक असा मार्ग स्वीकारला आहे की, त्यामुळे आमच्या धोरणांमध्ये आणि निर्णयांमध्ये सर्व प्रकारच्या घटकांना समान महत्व मिळाले आहे. जर  अवघड, कठिण घटकांविषयी बोलायचे झाले तर भारताने निश्चित केलेली मोठ-मोठी लक्ष्य आहेत. ती गाठण्यासाठी आम्ही अति वेगाने कार्य करीत आहोत, हे संपूर्ण जग पहात आहे. 6-7 वर्षांमध्ये नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातली आमची क्षमता 250 टक्क्यांपेक्षाही जास्त वाढली आहे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या बाबतीत भारत आज जगामध्ये अव्वल पाच देशांमध्ये आहे. यामध्येही सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता गेल्या सहा वर्षांमध्ये जवळ जवळ 15 पट वाढली आहे. आज भारतात, गुजरातमधल्या कच्छच्या वाळवंटामध्ये जगातला सर्वात मोठा सौर आणि पवन असा संकरित-एकत्रित ऊर्जा पार्क बनतोय. तसेच भारताने 14 गिगावॅट क्षमतेचे जुने कोळशावर चालणारे प्रकल्पही बंद केले आहेत. देशाने सौम्य धोरण निश्चित करून ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आज देशातला सामान्य माणूस पर्यावरण समर्थनाच्या मोहिमेशी जोडला गेला आहे. या मोहिमेचे नेतृत्वच जनसामान्य करीत आहेत.

आपण पहातो आहोत की, एकदाच वापरल्या जाणा-या प्लास्टिक बंदीसंदर्भात किती चांगली जागरूकता निर्माण झाली आहे. लोक आपल्या पद्धतीने थोडा-थोडा प्रयत्नही करीत आहेत. आता आणखीही काही करण्याची आवश्यकता आहे. एक मात्र नक्की की लोकांपर्यंत पर्यावरण संवर्धनाचे महत्व पोहोचले आहे. त्यांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. आमच्या सागरी किना-यांची झालेली स्वच्छता पहा, यासाठी नवयुवक पुढाकार घेवून कार्य करीत आहेत. तसेच मग स्वच्छ भारत यासारखे अभियान असो, अशा मोहिमांची जबाबदारी देशातल्या सामान्य नागरिकांनी आपल्या खांद्यावर घेतल्यामुळे चांगल्या पार पाडल्या जात आहेत. माझे देशवासियांनी हे काम पुढे नेले आहे. देशाने 37 कोटींपेक्षा जास्त एलईडी बल्ब आणि 23 लाखांपेक्षा जास्त ऊर्जा बचत करणारे पंखे वापरल्यामुळे पर्यावरण रक्षणाचे जे काम झाले आहे, त्याची चर्चा करण्याची लोकांची सवय कदाचित आता गेली आहे.

मात्र हा खूप मोठा चर्चेचा विषय व्हायला हवा. त्याचप्रमाणे उज्वला योजनेअंतर्गत कोट्यवधी कुटुंबांना मोफत गॅस जोडणी मिळाल्यामुळे, सौभाग्य योजनेअंतर्गत वीज जोडणी मिळाल्यामुळे , जसे पूर्वी चुलीत लाकडे जाळून धुरात जगावे लागत होते, त्यांचे लाकडे जाळण्यावरचे अवलंबत्व बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. यामुळे  प्रदूषण कमी होण्याबरोबरच आरोग्य आणि त्यातही आपल्या मातांचे , मुलांचे आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने मोठी मदत झाली आहे. मात्र याची देखील खूप चर्चा होत नाही. भारताने आपल्या या प्रयत्नांद्वारे कोट्यवधी टन कार्बन डायऑक्साइडचे  उत्सर्जन रोखले आहे आणि हवामान बदल कमी करण्याच्या दिशेने भारताला आज अग्रेसर बनवले आहे. अशाच प्रकारे  3 लाखांहून अधिक ऊर्जा कार्यक्षम पंपांच्या माध्यमातूनही आज देश  लाखो टन कार्बन डाय-ऑक्साइड हवेत मिसळण्यापासून रोखत आहे.

 

मित्रांनो,

आज भारत,जगासमोर  एक उदाहरण सादर करत आहे की जेव्हा  पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा येतो तेव्हा विकासकामे  थांबवणे आवश्यक नाही. अर्थव्यवस्था आणि पर्यावरण व्यवस्था दोन्ही एकत्र सुरु राहू शकतात, पुढे जाऊ शकतात, आणि भारताने हाच मार्ग तर निवडला आहे. अर्थव्यवस्थेला बळकट करण्याबरोबरच गेल्या काही वर्षात आपले जंगल देखील , आपले वनक्षेत्र  15 हजार चौरस  किलोमीटर वाढले आहे. गेल्या काही वर्षात आपल्या देशात वाघांची संख्या,दुप्पट झाली आहे. बिबट्यांच्या संख्येत देखील सुमारे  60 टक्के वाढ झाली आहे. या सगळ्यामध्ये  पेंच राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीव स्नेही कॉरिडॉर देखील  संवेदनशीलतेचे उदाहरण म्हणून आज चर्चेचा विषय झाला आहे.

 

मित्रांनो,

स्वच्छ आणि कार्यक्षम ऊर्जा प्रणाली, लवचिक शहरी पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध पर्यावरण सुधारणा  आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक अतिशय महत्वाचा भाग आहेत .मग ते हरित क्षेत्र असलेले महामार्ग-एक्सप्रेसवे असतील, सौर उर्जेवर चालणारी मेट्रो असेलइलेक्ट्रिक वाहनांवर दिला जाणारा भर असेल, किंवा मग  हाइड्रोजनवर चालणाऱ्या वाहनसंबंधी संशोधनाला प्रोत्साहन असेल, या सर्व बाबींवर एका  विस्तृत रणनीतिसह  काम सुरु आहे. पर्यावरणाशी निगडित या सर्व प्रयत्नांमुळे देशात गुंतवणुकीच्या नवीन संधी तर निर्माण होत आहेतच लाखो युवकांना रोजगार देखील मिळत आहे .

 

मित्रांनो,

साधारणपणे असा समज आहे की वायू प्रदूषण केवळ उद्योगांमुळे पसरते. मात्र वास्तव हे आहे की वायू प्रदूषणात वाहतूक, अस्वच्छ इंधन , डीझेल  जनरेटर्स सारखे अनेक घटक आपले काही ना काही  योगदान देतच असतात. आणि म्हणूनच  भारत आपल्या राष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा आराखड्यांतर्गत या सर्व दिशेने सर्वांगीण दृष्टिकोनासह  काम करत आहे. जलमार्ग आणि मल्टीमॉडल कनेक्टिविटी संबंधी जे काम आज होत आहे ते हरित वाहतूक अभियानाला सशक्त बनवेलच त्याचबरोबर देशाची वाहतूक कार्यक्षमता देखील सुधारेल. देशातील शेकडो जिल्ह्यांमध्ये  सीएनजी आधारित पायाभूत सुविधांची निर्मिती असेल, फास्टैग सारखी आधुनिक व्यवस्था असेल, यामुळे प्रदूषण कमी करण्यात मोलाची मदत होत आहे. आज देशात  मेट्रो रेल्वेसेवा 5 शहरांवरून  18 शहरांपर्यंत वाढली आहे . उपनगरीय रेल्वेच्या बाबतीत देखील जे काम झाले आहे त्यामुळे वैयक्तिक वाहनांचा वापर कमी झाला आहे.

 

मित्रांनो,

आज देशात रेलवे नेटवर्क द्वारे मोठ्या प्रमाणात विद्युतीकरण झाले आहे. देशातील विमानतळ देखील वेगाने सौर उर्जेवर  आधारित बनवले जात आहेत. 2014 पूर्वी केवळ 7 विमानतळांवर सौर ऊर्जेची सुविधा होती, तर आज ही  संख्या 50 पेक्षा अधिक झाली आहे. ऊर्जा कार्यक्षमतेसाठी  80 हून अधिक विमानतळांवर एलईडी दिवे लावण्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. भविष्यातील सज्जतेशी संबंधित आणखी  एक उदाहरण  तुम्हाला सांगायला आवडेल.

स्टैच्यू ऑफ यूनिटी, गुजरात मध्ये  सरदार वल्लभभाई यांचे जगातील सर्वात उंच  स्मारक उभारण्यात आले आहे. स्टैच्यू ऑफ यूनिटी ज्या जागेवर आहे, त्या सुंदर  केवड़िया शहराला इलेक्ट्रिक वेहिकल  सिटी म्हणून  विकसित करण्यावर देखील  काम सुरु आहे. भविष्यात केवडीया येथे बैटरीवर चालणारी  बस, दुचाकी -चारचाकी वाहने चालताना दिसतील. यासाठी तिथे आवश्यक पायाभूत सुविधा देखील  उपलब्ध केल्या जातील.

 

मित्रांनो,

हवामान बदलाशी जलचक्राचा देखील थेट संबंध दिसून येत आहे.. जलचक्राचे  संतुलन बिघडले तर त्याचा थेट प्रभाव जल सुरक्षेवर पडतो. आज देशात जल सुरक्षेसंबंधी जेवढे काम होत आहे तेवढे यापूर्वी कधीही झाले नाही. देशात  जलस्रोतांची निर्मिती आणि संरक्षण तसेच वापर याबाबत सर्वांगीण दृष्टिकोनासह काम केले जात आहे. जल जीवन मिशन देखील याचे एक खूप मोठे माध्यम आहे. आणि मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे  कि जल जीवन मिशन अंतर्गत यावेळी  एक कार्यक्रम राबवला जात आहे. ज्यामध्ये मला देशातील नागरिकांची मदत हवी आहे , ती म्हणजे पावसाचे पाणी वाचवणे, catch the rain water, आपण पावसाचे पाणी अडवूया, वाचवूया.

 

बंधू-भगिनींनो

सुमारे  7 दशकात देशातील अंदाजे 3 कोटी ग्रामीण कुटुंबांपर्यंत  पाईपद्वारे पाणी पोहचले, तर 2 वर्षांपेक्षाही कमी कालावधीत  4 कोटींहून अधिक कुटुंबांपर्यंत नळाद्वारे पाणी पोहचवले जात आहे. एकीकडे पाईपद्वारे प्रत्येक घराला जोडले जात आहे, तर दुसरीकडे  अटल भूजल योजना आणि Catch the Rain सारख्या अभियानांच्या माध्यमातून  भूजल पातळी वाढवण्यावर भर दिला जात आहे.

 

मित्रांनो,

विकास आणि पर्यावरण यात संतुलन, हा आपल्या प्राचीन  परंपरेचा एक महत्वपूर्ण घटक आहे, ज्याला आपण आत्मनिर्भर भारताची ताकद देखील बनवत आहोत.  जीव आणि निसर्गाच्या नात्याचे संतुलन, वयष्टि आणि  समष्टिचे  संतुलन, जीव आणि  शिव यांचे संतुलन नेहमीच आपल्या शास्त्रांनी आपल्याला शिकवले आहे. आपल्याकडे म्हटले आहे की  यत् पिंडे तत् ब्रह्मांडे। म्हणजे  जो पिंड अर्थात  जीव मध्ये आहे , तोच ब्रह्मांडात आहे. आपण जे काही आपल्यासाठी करतो, त्याचा थेट प्रभाव आपल्या  पर्यावरणावर देखील पडतो. म्हणूनच आपल्या संसाधनांच्या कार्यक्षमतेच्या बाबतीतही भारताचे प्रयत्न वाढत आहेत. आज जी वक्राकार अर्थव्यवस्थेची चर्चा सुरु आहे, त्यात अशी उत्पादने आणि अशा प्रक्रियांवर भर दिला जात आहे, ज्यात  संसाधनांवर कमीतकमी  दबाव पडेल . सरकारने देखील अशा  11 क्षेत्रांची निवड केली आहे ज्यात आपण  आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संसाधनांचे पुनर्चक्रीकरण करून  सदुपयोग करु शकतो.  Waste to Wealth, म्हणजे कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्याच्या अभियानावर गेल्या काही वर्षात खूप काम झाले आहे. आणि आता त्याला मिशन मोड द्वारे वेगाने पुढे नेले जात आहे. घरे आणि शेतातील कचरा असेल, टाकाऊ धातू असतील, लिथियम इऑन बॅटरीज असतील, अशा अनेक क्षेत्रांमध्ये रिसाइकलिंगला नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून  प्रोत्साहित केले जात आहे. याच्याशी निगडित कृती आराखडा ज्यात नियामक आणि विकास संबंधी सर्व पैलू असतील, त्याची आगामी काळात अंमलबजावणी केली जाईल.

 

मित्रांनो,

हवामान रक्षणासाठी, पर्यावरण रक्षणासाठी आपले प्रयत्न संघटित होणे खूप आवश्यक आहे. देशातील एक-एक नागरिक जेव्हा  जल, वायु आणि  जमीन यातील संतुलन साधण्यासाठी  एकजुट होऊन प्रयत्न करेल तेव्हाच आपण आपल्या भावी पिढयांना एक सुरक्षित पर्यावरण देऊ शकू. आपल्या पूर्वजांची इच्छा होती – आणि खूप  छान गोष्ट आपले पूर्वज सांगून गेले आहेत. आपल्या पूर्वजांची इच्छा काय होती . त्यांनी म्हटले आहे — पृथ्वीः पूः च उर्वी भव। म्हणजे  संपूर्ण पृथ्वी, संपूर्ण परिसंस्था आपणा  सर्वांसाठी  उत्तम असो, आपल्या स्वप्नांना योग्य संधी मिळो याच शुभेच्छांसह आज जागतिक पर्यावरण दिनी याच्याशी संबंधित सर्व मान्यवरांना अनेक अनेक शुभेच्छा देतो. तुम्ही तुमची काळजी घ्या, स्वतःला तंदुरुस्त ठेवा. आपल्या कुटुंबियांना तंदुरुस्त ठेवा. आणि कोविड प्रतिबंधक नियमात हलगर्जीपणा करू नका , याच अपेक्षेसह खूप-खूप  धन्यवाद, आभार!

***

Jaydevi PS/S.Bedekar/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com