Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक गतिशीलता शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे ‘मूव्ह’या जागतिक गतिशीलता शिखर परिषदेचे उद्घाटन केले.

भारत विविध क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं केलं. अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, युवा कार्यक्रम आणि इतर अनेक क्षेत्रात भारत सातत्याने प्रगती करत असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सरकारने घेतलेले निर्णय यामुळे ही गतिशीलता आली आहे, आर्थिक विकास होत आहे आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत. एकूणच ‘गतिशीलता’ हा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा, कळीचा मुद्दा बनला आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

आगामी भविष्यामध्ये भारतामध्ये गतिशीलतेचा विचार करताना सात ‘सी’ घटक प्रमुख आधार असतील. असं स्पष्ट करून त्यांनी हे सात ‘सी’ कोणते असतील, याची माहिती दिली. यामध्ये समान (कॉमन), संलग्नित (कनेक्टेड), सोपे (कन्व्हीनिएंट), विना अडथळा (कंजेशन-फ्री),चार्जड, स्वच्छ (क्लिन), आणि कटिंग-एज; यावर भारत प्रामुख्याने कार्य करणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

या शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानी केलेले भाषण –

महोदय,

संपूर्ण जगभरातून आलेले सन्माननीय प्रतिनिधी, शिष्ठमंडळे,

महिला आणि सज्जन,

सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांचे या जागतिक गतिशीलता शिखर परिषदेमध्ये स्वागत करतो.

या परिषदेला दिलेले ‘मूव्ह’ असे शीर्षक भारताच्या दृष्टीने अतिशय सार्थ ठरत आहे. कारण भारत आज सर्व क्षेत्रात गतिशील असून आघाडी घेत आहे. भारत मोठ्या उत्साहाने पुढे वाटचाल करत आहे.

आमची अर्थव्यवस्था गतिमान बनली आहे. जगामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली आमची अर्थव्यवस्था आहे.

आमची शहरे आणि नगरेही विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. आम्ही देशातल्या 100 शहरांचे ‘स्मार्ट शहरांमध्ये’ रूपांतर करीत आहोत.

आमच्याकडे पायाभूत सुविधांचे जाळे वेगाने विणले जात आहे. देशामध्ये आम्ही रस्ते बांधणी, विमानतळांची उभारणी, लोहमार्ग टाकणे आणि बंदराचा विकास करणे, ही कामे मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने करीत आहोत.

आमच्या मालाची मोठी उलाढाल होत आहे. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी केल्यामुळे पुरवठा साखळी आणि गोदामांची व्यवस्था योग्य पद्धतीने कार्यरत होवू शकली आहे.

आमच्या आर्थिक सुधारणांना वेग आला आहे. व्यवसायायाठी अतिशय योग्य, सोईचा देश कसा होवू शकेल, यासाठी आम्ही विशेष योजना राबवल्या आहेत.

आमच्या जीवनालाही आता गती  प्राप्त झाली आहे. देशातल्या बेघर कुटुंबांना स्वतःचे, हक्काचे घर मिळत आहे. शौचालये, धूरमुक्त स्वयंपाकाचा गॅस, बँकेमध्ये खाते आणि बँकांकडून कर्ज लोकांना मिळत आहे.

आमच्या देशातला युवावर्गही पुढे जात आहे. जगामध्ये सर्वात वेगाने वाढणारे स्टार्ट अप केंद्र म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. नवीन ऊर्जा केंद्र म्हणून भारत विकसित होत आहे.

मित्रांनो,

मानवाच्या प्रगतीसाठी ‘मोबिलिटी’ हा कळीचा मु़द्दा बनला आहे.

‘मोबिलिटी’ म्‍हणजेच गतिशीलता ही नवी क्रांती या जगात घडत असून, त्याचा मधला टप्पा जगानं गाठला आहे, म्हणूनच गतिशीलतेचे व्यापक स्वरूप आणि महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे.

अर्थव्यवस्थेला गतिमान बनवणे आज महत्वाचं आहे. चांगली मोबिलिटी असेल तर प्रवासाचा होणारा त्रास, वाढत्या वाहतुकीचा दबाव कमी होवू शकणार आहे. त्याचबरोबर पुढच्या पिढीसाठी रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण होवू शकणार आहेत.

शहरीकरणाच्या केंद्रस्थानी ‘गतिशीलता’ हा मुद्दा आहे. वाढत्या मोटरवाहनांसाठी तितकेच मोठे रस्ते हवे असतात, त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण व्यवस्थाही गरजेची असते.

जीवनमान सुकर, सुलभ होण्यासाठी ‘मोबिलिटी’ महत्वापूर्ण घटक आहे. हा विषय प्रत्येक माणसाच्या मनामध्ये सातत्याने घोळत असतो. शाळेत किंवा कामासाठी बाहेर जाताना जर आपण वाहतूक कोंडीमध्ये अडकून बसलो तर आपली खूप चिडचिड होते. रस्त्यावरची वाहतूक कमी करण्यासाठी आपण खाजगी वाहनांचा वापर कमीत कमी करून सार्वजनिक वाहतूक सेवा वापरली तर अनेक प्रश्न कमी होवू शकणार आहेत. हवेतल्या वाढत्या प्रदुषणामुळे मुलांना श्वसनाचे आजार होत आहेत. त्यांना श्वासोच्छवासासाठी चांगली हवा मिळणे दुरापास्त झाले आहे. या गंभीर प्रश्न लक्षात घेवून आणि सुरक्षित प्रवासाचाही आपण विचार केला पाहिजे.

‘मोबिलिटी’चा प्रश्न पृथ्वीतलावर आता अधिकाधिक गंभीर बनत आहे. संपूर्ण जगाच्या कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणापैकी एक पंचमांश उत्सर्जन रस्त्यावरच्या वाहतुकीमुळे होत आहे. यामुळे शहरे गुदमरत आहेत आणि विश्वाचं तापमान कमालीचे वाढत आहे.

आजच्या घटकेला पर्यावरण प्रणालीपूरक गतिशीलता निर्माण करण्याची गरज आहे. निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करणारी ही प्रणाली असली पाहिजे. ही आजच्या काळाची गरज आहे.

हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्याला गतिशीलतेचा  महत्वाचा मुद्दा लक्षात घेवून वापर करावा लागणार आहे. चांगली गतिमानता असेल तर रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण होतील आणि राहणीमानाचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. गतिशीलतेमुळे मालाच्या किंमती कमी होण्यास मदत मिळणार आहे. तसेच आर्थिक व्यवहार विस्तारणार आहेत. पृथ्वीच्या संरक्षणासाठीही प्रदूषणमुक्त वाहतूक व्यवस्था निर्माण केली पाहिजे. अशा प्रकारे सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेता येणार आहे.

मोबिलिटीचे डिजिटायझेशन आता चांगलेच झाले आहे. गतिशीलतेमध्ये डिजिटलीकरणामुळे व्यापक परिवर्तन घडून येणार आहे. अर्थात, यामध्ये आणखी नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास बराच वाव आहे. हे बदलही वेगाने घडत आहेत.

लोक आता मोबाईल फोनवरून टॅक्सी बुक करतात. शहरांमध्ये सायकली वापरण्याचे प्रमाण वाढते आहे. तसेच स्वच्छ इंधनावर बसगाड्या धावतात, इलेक्ट्रिक कार वापरणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय.

भारतामध्ये आम्ही गतिशीलतेवर खूप भर देत आहोत. आम्ही महामार्गांच्या बांधणीचा वेग दुपटीने वाढवला आहे.

ग्रामीण भागातल्या रस्ते बांधणीच्या योजनेला बळकटी  प्रदान करून ही योजना पुन्हा एकदा जोमाने सुरू केली आहे. कमीत कमी आणि स्वच्छ इंधनावर चालणा-या वाहनांचे उत्पादन करण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देत आहोत. त्याचबरोबर ज्या भागात पुरेशा सुविधा नाहीत अशी अनेक ठिकाणी परवडणा-या दरामध्ये हवाई सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने कार्ययोजना आखली आहे. आम्ही शेकडो हवाईमार्गांवर विमानसेवा सुरूही करीत आहोत. 

रेल्वे आणि रस्ते या परंपरागत वाहतूक साधनांबरोबरच आम्ही जलमार्गांचा विकास करण्यावर भर देत आहोत.

आपल्या शहरांमध्ये असेल किंवा गावांमध्ये असेल कार्यालयात अथवा शाळा-महाविद्यालयांमध्ये  जाण्याचे अंतर कसे कमी होईल, याचा विचार करण्यात येत आहे.

यासाठी उपलब्ध सुविधांची माहिती जमा करण्यात आली असून यामध्ये असलेल्या समस्या लक्षात घेवून बुद्धिमान वाहतूक व्यवस्थापन कार्यप्रणाली तयार करण्यात येत आहे.

पर्यावरणाचा आणि भविष्याचा विचार करून आपल्याला पादचारी आणि सायकल चालकांना प्राधान्य देवून त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची गरज आहे. पादचारी आणि सायकल चालकांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.

मित्रांनो,

गतिशीलतेचा विचार केला तर भारताची अशी वेगळी बलस्थाने आहेत आणि इतर गोष्टींशी तुलना केली तर त्याचे फायदेही देशाला मिळू शकतात. या क्षेत्रात आम्ही नवखे आहोत. त्याचबरोबर गतिशीलतेची वेगळी अशी कोणती परंपरा किंवा वारसा आमच्याकडे नाही. त्यामुळे या वारशाकडे आम्ही दुर्लक्ष केलं आहे किंवा त्याची काळजी घेतली नाही, असे म्हणता येणार नाही.

इतर कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थांशी तुलना केली तर आमच्याकडे प्रति व्यक्ती वाहन संख्या कमी आहे.  त्यामुळे इतर अर्थव्यवस्थांनी गांड्याच्या मालकीवरून जो अनुभव घेतला आहे, तसाच आम्हालाही येईल, असे अजिबात नाही. या शिखर परिषदेमध्ये आम्ही अगदीच नवे आहोत. आम्हाला आता एकसंध गतिशीलता आणि संमिश्र स्वरूपाचे वाहतूक व्यवस्थेचे जाळे तयार करण्याची संधी मिळू शकणार आहे.

अभियांत्रिकी, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठ मोठ्या रकमांचे व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून करणारी सक्षमता आमच्याकडे आहे. यावरून गतिशीलतेच्याबाबतीत भविष्यात किती वेगाने प्रगती होणार आहे, हे समजू शकेल.

भारताच्या जनतेला डिजिटल युगामध्ये आणण्यासाठी आम्ही एक सर्वसमावेशक ‘आधार’ ही योजना कार्यान्वित केली आहे. यासाठी एक सर्वंकष सॉफ्टवेअर तयार करून या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकाला समाविष्ट करून घेण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये आत्तापर्यंत आमच्या 850 दशलक्ष नागरिकांना डिजिटल पद्धतीने सहभागी करून घेण्यात आले आहे. आता नवीन गतिशील व्यावसायिक पद्धतीमध्ये ‘आधार’ची आराखडा कसा जोडता येवू शकेल, याचा विचार करण्यात येत आहे.

भारत नवीकरणीय ऊर्जा वापरण्यावर भर देणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे पर्यावरणाला होणारे लाभ पूर्णतेने मिळू शकणार आहेत. आम्ही 2022 पर्यंत नवीकरणीय योग्य अशा स्त्रोतांमधून 175 गीगावॅट ऊर्जा मिळवण्याची योजना तयार केली आहे. सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त वीज उत्पादक देशांमध्ये आम्ही पाचव्या क्रमांकावर आहोत. तर नवीकरणीय ऊर्जा निर्मितीमध्ये आमच्या देशाचा सहावा क्रमांक लागतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर  सौर ऊर्जा वापरासाठी आम्ही आघडीही स्थापन केली आहे.

स्वयंचलित क्षेत्रामध्ये आम्ही वेगाने वृद्धी करीत आहोत.

आमच्याकडे मोठ्या संख्येने असलेला युवावर्ग डिजिटल दृष्ट्या साक्षर आहे. याचा लाभ भविष्यात आम्हाला होणार आहे, हे नक्की. लाखो शिक्षित मेंदू आणि कुशल हात आमच्याकडे असणार आहेत, त्यामुळे सर्वांच्या आशा, आकांक्षा, स्वप्नांची पूर्ती होवू शकणार आहे. 

भारत ‘मोबिलिटी इकॉनॉमि’ चा प्रथम प्रवर्तक असणार आहे. भारत संपूर्ण विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त करेल, याविषयी मी आश्वस्त आहे.

माझ्या कल्पनेनुसार भविष्यात गतिशीलता या क्षेत्रात कार्य करताना भारताला ‘सात सी’ आधारभूत मानावे लागणार आहेत. हे ‘सात सी’ म्हणजे- कॉमन, कनेक्टेड, कन्व्हीनिएंट, कंन्जेशन-फ्री, चार्जड, क्लिन, आणि कटिंग-एज, असणार आहेत.

1. कॉमन – सार्वजनिक परिवहन आमचा गतिशीलतेचा पहिला आधार असला पाहिजे. डिजिटलायझेशनच्या आधारे नवीन व्यवसायाचे माॅडेल तयार केले जात आहे, ते नवा आदर्श निर्माण करत आहेत. मोठमोठ्या आकडेवारीच्या मदतीने आपल्या गरजा आणि आवश्यकतांचा विचार करून स्मार्ट निर्णय घेवू शकतो.

आपले लक्ष चारचाकी गाड्याऐवजी इतर वाहनांकडे गेले पाहिजे. यामध्ये स्कूटर आणि ऑटो रिक्शा यांच्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. विकसित देशांमधला खूप मोठा गट गतिशीलतेसाठी या वाहनांचा उपयोग करतो.

2. कनेक्टेड मोबिलिटी यामध्ये भौगोलिक परिसराचा विचार करून ते भाग वेगवेगळ्या वाहन साधनांचा वापर करून जोडलेले असतात. इंटरनेटचा वापर करून अशा एकापेक्षा जास्त साधनांना आर्थिकदृष्ट्याही जोडले जात असते. नवीन युगामध्ये गतिशीलता अधिक प्रभावी ठरण्यासाठी हा पर्याय चांगला आहे.

आपण खाजगी वाहनांचा वापर जास्तीत जास्त केला जावा यासाठी ‘पूलिंग’ किंवा इतर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो, यामध्ये आणखी बरेच वेगळे प्रयोग नक्कीच करता येण्यासारखे आहेत. गावात वास्तव्य करत असलेल्या लोकांना अगदी सहजपणे आणि वेगाने, कमीतकमी वेळेत  आपले उत्पादन शहरांमध्ये पाठवण्यासाठी सक्षम व्यवस्था असली पाहिजे.

3. कन्व्हिनीएंट मोबिलिटी याचा अर्थ असा आहे की, सुरक्षित, परवडणारी आणि समाजातल्या सर्व वर्गाला सुलभतेने उपलब्ध होवू शकणारी वाहतूक व्यवस्था. यामध्ये वयोवृद्ध, महिला आणि दिव्यांग व्यक्तींचा समावेश आहे. अशा व्यक्तींना खाजगी वाहनांनी प्रवास करणे खूप खर्चिक ठरते. त्यांना सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये प्राधान्य दिले पाहिजे, त्यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्या पाहिजेत.

4. कंजेशन फ्री मोबिलिटीमध्ये अतिशय गर्दीबरोबर आर्थिक आणि पर्यावरणाचा विचार करून त्याच्या खर्चावर बंधने घालण्यात आली पाहिजेत. त्याचबरोबर नेटवर्कमध्ये असलेल्या उणिवा दूर करण्याची गरज आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होईल आणि लोकांना प्रवासाला कमी वेळ लागेल. प्रवासाला जास्त वेळ लागला तर तणावही वाढतो. तसेच वाहतुकीच्या कोंडीची समस्या संपुष्टात आली तर माल अधिक वेगाने पोचवणे शक्य होणार आहे.

5. चार्जड मोबिलिटी हा पुढे जाण्याचा एक मार्ग आहे. आता आम्ही बॅटरी तसेच स्मार्ट चार्जिंग यंत्रणा आणि इलेक्ट्रिक वाहनांची निर्माण करण्यासाठी गंुतवणूक करू इच्छित आहे. अशा वाहनांची एक मालिकाच आम्ही आणणार आहोत. भारतामधले अनेक मोठे उद्योजक बॅटरी तंत्रज्ञान विकसित करू इच्छित आहेत.

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने अवकाशामधल्या उपग्रहांचे संचालन करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या बॅटरींचा वापर सुरू केला आहे. इतर संस्थांमध्येही इलेक्ट्रिक कार निर्मितीसाठी मोठी गुंतवणूक करताना सक्षम बॅटरी प्रणाली विकसित केली जात आहे. यासाठी इस्त्रो मदत करू शकते. भारत इलेक्ट्रिक वाहनांचा ‘प्रमुख चालक’ देश बनावा, अशी आमची इच्छा आहे.

आम्ही लवकरच इलेक्ट्रिक तसेच इतर पर्यायी इंधनावर चालणा-या वाहनांविषयी स्थायी धोरण तयार करणार आहोत. हे धोरण सर्वांच्या फायद्याचे असेल आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये नव्या अमर्याद संधी उपलब्ध करून देणारे असेल.

6. क्लिन मोबिलिटीचा विचार करण्‍यामागे स्वच्छ ऊर्जा देणे ही प्रेरणा आहे. हवामान बदलाविरूद्ध आमची लढाई सर्वाधिक शक्तीशाली हत्यार हेच बनणार आहे. याचा अर्थ असा की, मुक्त स्वच्छ वातावरणामध्येच स्वच्छ हवा मिळू शकते. आमच्या चांगल्या राहणीमानासाठी स्वच्छ हवा, चांगले पर्यावरण आवश्यक आहे.

आपल्याला ‘क्लिन किलोमीटर्स’ याचा विचार स्वीकारला पाहिजे. हा जैव इंधन , इलेक्ट्रिक अथवा सौर चार्जिंग यांच्या मदतीने मिळवता येवू शकते. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी विशेष करून नवीकरणीय ऊर्जेमध्ये आम्ही जी गुंतवणूक ती ‘क्लिन किलोमीटर्स’साठी पूरक ठरू शकणार आहे.

यासाठी सर्वतोपरी कार्य करण्याची आमची तयारी आहे. कारण हे प्रकारे आपला वारसा पुढे नेणा-यांसाठी  करावयाचे कार्य आहे. त्यांच्याबद्दल आमची कटिबद्धता, वचनबद्धता आहे. भावी पिढ्यांसाठी हे आमचे वचन आहे.

7. कटिंग-एजः आपल्या प्रारंभीच्या काळामध्ये कटिंग एज इंटरनेटप्रमाणे आहे. आत्ताचा काळ हा कटिंग एज आहे. गेल्या सप्ताहामध्ये ‘मूव्ह हॅक‘ तसेच ‘पीच टू मूव्ह’ यांचे आयोजन केले होते. त्यामध्ये आपल्या सुपीक मेंदूतून कितीतरी सर्जनात्मक उपाय योजना पुढे आल्या आहेत.

उद्योजकांना गतिशीलता या क्षेत्रामध्ये नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी खूप वाव आहे. लोकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी या नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची आवश्यकता आहे.

मित्रांनो,

गतिशीलतेमध्ये येत असलेल्या क्रांतीमुळे आपला विकास आणि प्रगती होवू शकणार आहे, असा माझा विश्वास आहे. ज्यावेळी भारत गतिशीलतेमध्ये काही बदल घडवून आणतो, त्यावेळी त्याचा लाभ मानवतेच्या पाचव्या भागाला मिळतो. ही एकमेकांसाठी यशाची गाथा आहे.

चला तर मग, विश्वसाठी आपण एक आदर्श साचा तयार करूया.

यासाठी मी भारतामधल्या युवकांना आवाहन करू इच्छितो.

माझ्या युवा, सक्रिय मित्रांनो, या नवाचारातल्या नवीन युगाचे नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. हे भविष्य आहे. या क्षेत्रामध्ये डॉक्टरांपासून ते इंजीनिअरांपर्यंत तसेच तंत्रज्ञ, आणि इतरांचीही आवश्यकता लागणार आहे. आपण सर्वांनी या क्रांतीमध्ये सहभागी झाले पाहिजे. आपल्यातील क्षमता ओळखून नव्या गोष्टींचा लाभ घेतला पाहिजे. नवीन गतिशीलतेच्या धोरणाचा स्वीकार करताना या प्रणालीचा भाग बनले पाहिजे.

आज बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान एकत्र आले आहे. संपूर्ण विश्वाच्या भल्यासाठी परिवर्तनीय गतिशीलता देण्याची क्षमता आज इथं उपस्थित असलेल्यांमध्ये आहे. हा बदल ‘केअरिंग फॉर अवर वर्ल्‍ड ’ तसेच ‘शेअरिंग विथ अदर्स’ या विचारांवर आधारीत असू शकतो.

प्राचीन काळामध्ये लिहिलेल्या आपल्या ग्रंथामध्ये म्हटले आहे की,

ओम सह नाववतु

सह नौ भुनक्तु

सह वीर्यं करवावहै

तेजस्वि ना वधीतमस्तु मा विव्दिषावहै

मित्रांनो, आपण एकमेकांच्या साथीला असलो, तर आपण काहीही करू शकणार आहोत. अशी साथ राहील, अशी मी आशा करतो.

ही शिखर परिषद म्हणजे फक्त प्रारंभ आहे. चला तर मग, या, आपण सर्वांनी एकमेकांच्या साथीने पुढच्या दिशेने, विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करीत राहू, सगळेजण मिळून विकास करू.

धन्यवाद,

खपू-खूप धन्यवाद !

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor