Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या उदयोन्मुख राजस्थान जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या उदयोन्मुख राजस्थान जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2024

 

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राजस्थान सरकारचे मंत्रिगण, खासदार, आमदार, उद्योग व्यवसायातील सहकारी, विविध देशंचे राजदूत, दूतावासांमधील प्रतिनिधी, इतर मान्यवर आणि सद्गृहस्थ हो!

राजस्थानच्या विकास यात्रेतील आज एक महत्वाचा दिवस आहे. देश आणि जगभरातून खूप मोठ्या संख्येने प्रतिनिधी, गुंतवणूकदार या गुलाबी नगरीमध्ये आले आहेत. इथल्या उद्योग विश्वातील अनेक सहकारीही आज इथे उपस्थित आहेत. ‘उदयोन्मुख राजस्थान शिखर परिषदेमध्ये आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. इतक्या शानदार कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी  राजस्थानच्या भाजपा सरकारला शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

आज जगातील प्रत्येक अर्थतज्ज्ञ, प्रत्येक गुंतवणूकदार यांच्यामध्ये भारताविषयी खूपच उत्साह दिसून येतो. ‘रिफॉर्म- परफॉर्म- ट्रान्सफॉर्म‘ च्या मंत्राचा जप करीत वाटचाल चालू ठेवून,  भारताने जो विकास साध्य केला आहे, त्याचे परिणाम प्रत्येक क्षेत्रामध्ये दृष्य स्वरूपात दिसून येत आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकामध्ये भारत जगातील अकरावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकली होती. गेल्या 10 वर्षांमध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे आकारमान जवळपास दुप्पट केले आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये भारताच्या निर्यातीमध्येही जवळ-जवळ दुप्पट वाढ झाली आहे. 2014च्या आधीच्या दशकाबरोबर तुलना केली तर त्या दशकामधील एफडीआय म्हणजेच परकीय थेट गुंतवणूकीमध्येही दुपटीपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. या काळामध्ये भारताने पायाभूत सुविधांवर जवळपास 2 ट्रिलियन रूपयांनी जास्त म्हणजे 11 ट्रिलियनपर्यंत खर्च केला आहे.

मित्रांनो,

डेमॉक्रसी, डेमोग्राफी, डिजिटल डेटा आणि डिलिव्हरी यांची शक्ती, ताकद काय असते, हे भारताच्या यशस्वी वाटचालीकडे पाहिले की समजते. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशामध्ये लोकशाही इतकी चांगल्या पद्धतीने रूजली आहे आणि सशक्त होत आहे, ही एक खूप मोठी कामगिरी आहे. लोकशाहीवादी असताना, मानवतेचे कल्याण करणे हा भारताच्या तत्वज्ञानाचा गाभा आहे, हेच भारताचे मूळ  चरित्र आहे,  नैसर्गिक प्रकृती आहे. आज भारताच्या जनतेने आपल्याला लोकशाहीने मिळालेल्या हक्काच्या माध्यमातून भारतामध्ये स्थिर सरकारसाठी मतदान केले आहे.

मित्रांनो,

भारताच्या या प्राचीन संस्कारांना आमची नवी युवाशक्ती पुढे नेत आहे. आगामी अनेक वर्षांपर्यंत भारत या जगातील सर्वात युवा देश असणार आहे. भारतामध्ये युवावर्गाचा सर्वात मोठा वर्ग असणार आहे, त्याचबरोबर हा वर्ग कुशलही असला पाहिजे. यासाठी सरकार एकापाठोपाठ एक अनेक निर्णय घेत आहे.

मित्रांनो,

गेल्या दशकामध्ये भारताच्या युवाशक्तीने आपल्या सामर्थ्यांवर आणखी एक नवीन गोष्ट जोडली आहे, ती म्हणजे- भारताची टेक पॉवर, भारताची डेटा पॉवर  हा  जणू एक नवीन ‘आयाम’ आहे.  तुम्हा सर्व मंडळीना माहिती आहे की, प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचे, डेटाचे किती महत्व आहे. हे युग तंत्रज्ञानावर चालते, हे युग डेटाचलित आहे. गेल्या दशकामध्ये भारतामध्ये इंटरनेटचा वापर करणा-यांची संख्या जवळपास चौपटीने वाढली आहे. डिजिटल देव-घेवीच्या व्यवहारांनी तर नवनवे विक्रम स्थापित केले जात आहेत. आणि ही तर आत्ता कुठे झालेली सुरूवात आहे. भारत, संपूर्ण जगाला लोकशाही आणि युवाशक्ती आणि डेटा म्हणजे विदा यांची खरी ताकद दाखवत आहे. भारताने दाखवून दिले आहे की, डिजिटल तंत्रज्ञानामुळे लोकशाहीकरण होवू शकते आणि  प्रत्येक क्षेत्रातील, प्रत्येक वर्गातील लोकांना फायदा मिळवून देवू शकते. भारताचे यूपीआय, भारताची थेट लाभ हस्तांतरणाची कार्यपद्धती, ‘जेम’, सरकारी ‘ई-मार्केट प्लेस, ओएनडीसी म्हणजे ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स,  असे कितीतरी मंच आहेत, ज्यामुळे डिजिटल परिसंस्थेचे सामर्थ्य दिसून येत आहे. याचा खूप मोठा लाभ आणि खूप मोठा प्रभाव आपण इथे राजस्थानामध्येही पाहू शकणार आहे. कोणत्याही राज्याचा विकास साधला तर त्याबरोबरच देशाचाही विकास होतो, यावर माझा नेहमीच विश्वास असतो. ज्यावेळी राजस्थान विकासाच्या नवीन, विक्रमी उंचीवर पोहोचेल, त्यावेळी देशालाही नवीन उंची प्राप्त होईल.

मित्रांनो,

क्षेत्रफळाचा विचार केला तर राजस्थान, भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. आणि राजस्थानातील लोकांचे हृदय- मनही तितकेच मोठे आहे. इथले लोक परिश्रम, त्यांचा प्रामाणिकपणा, सर्वात कठिण, अवघड लक्ष्य गाठण्याची त्यांची इच्छाशक्ती, राष्ट्र सर्वप्रथम मानण्याची भावना, देशासाठी  शक्य ते सर्व काही करण्याची त्यांची प्रेरणा या गोष्टी राजस्थानातील मातीच्या प्रत्येक कणामध्ये दिसून येतात.  स्वातंत्र्यानंतर आलेल्या सरकारने देशाच्या विकासाला किेंवा देशाचा वारसा जतन करण्यासाठी प्राधान्य दिले नाही. त्यामुळे खूप मोठे नुकसान राजस्थानला सहन करावे लागले. मात्र आज आमच्या सरकारने विकास आणि वारसा या मंत्राचा जप करीत पुढची वाटचाल सुरू ठेवली आहे. आणि त्याचा खूप मोठ लाभ राजस्थानला होत आहे.

मित्रांनो,

राजस्थान ‘रायजिंग’ आहे तसेच ते राजस्थान ‘रिलाएबल‘ही आहे. राजस्थान ‘रिसेप्टिव्ह’सुद्धा आहे. काळाबरोबर स्वतःला अधिक ‘रिफाईन‘ करणे राजस्थानला चांगले माहिती आहे. आव्हानांना जावून भिडणे- याचे नाव राजस्थान आहे. नवीन संधी निर्माण करणे म्हणजे राजस्थान आहे. राजस्थानच्या या ‘आर‘ घटकामध्ये आता आणखी पैलू जोडले गेले आहेत.  राजस्थानच्या लोकांनी प्रचंड बहुमताने भाजपाचे  ‘रिस्पॉन्सिव्ह‘ आणि ‘रिफॉर्मिस्ट’ सरकार बनवले  आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये भजनलाल  आणि त्यांच्या संपूर्ण टीमने शानदार काम करून दाखवले आहे. काही दिवसांतच राज्य सरकार आपल्या कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण करणार आहे. भजनलाल  ज्या कुशलतेने आणि वचनबद्धतेने एकाच वेळी अनेक आघाड्यांवर राजस्थानचा वेगाने विकास करण्यासाठी कार्यरत आहेत, ही गोष्ट  कौतुकास्पद आहे.

गरीब कल्याण असो, शेतकरी कल्याण असो, तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करणे असो, रस्ते, वीज, पाण्याची कामे असोत, राजस्थानमध्ये सर्व प्रकारचा विकास आणि संबंधित सर्व कामे वेगाने होत आहेत. गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार नियंत्रणात सरकार दाखवत असलेल्या तत्परतेमुळे नागरिक आणि गुंतवणूकदारांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे.

मित्रांनो,

राजस्थानचा उदय आणखी जास्त अनुभवण्यासाठी राजस्थानची खरी क्षमता ओळखणे अतिशय गरजेचे आहे. राजस्थानमध्ये नैसर्गिक संसाधनांचा साठा आहे. राजस्थानमध्ये आधुनिक संपर्कव्यवस्थेचे जाळे, समृद्ध वारसा, प्रचंड भूभाग आणि अतिशय सक्षम युवा शक्ती आहे. म्हणजे रस्त्यांपासून रेल्वेपर्यंत, आदरातिथ्यापासून हस्तकलेपर्यंत, शेतांपासून ते किल्ल्यांपर्यंत,  राजस्थानकडे बरेच काही आहे. राजस्थानची ही क्षमता राज्याला गुंतवणुकीसाठी अतिशय आकर्षक ठिकाण बनवते. राजस्थानचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. राजस्थानमध्ये शिकण्याचा गुण आहे, त्याची क्षमता वाढवण्याचा गुण आहे. आणि त्यामुळेच आता वालुकामय जमिनीतही झाडे फळांनी लगडलेली आहेत आणि ऑलिव्ह आणि जट्रोफाची लागवड वाढत आहे.

जयपूरची ब्लू पॉटरी, प्रतापगडची थेवा ज्वेलरी आणि भिलवाड्याची टेक्सटाइल इनोव्हेशन…यांची स्वतःची अशी वेगळीच शान आहे. मकरानाचा संगमरवर आणि कोटा डोरिया जगप्रसिद्ध आहेत. नागौरमध्ये नागौरच्या पान मेथीचा सुगंधही अनोखा आहे. आणि आजचे भाजप सरकार प्रत्येक जिल्ह्याचे सामर्थ्य लक्षात घेऊन काम करत आहे.

मित्रांनो,

तुम्हाला देखील हे माहीत आहे की भारतातील खनिज साठ्याचा खूपचमोठा भाग राजस्थानमध्ये आहे. जस्त, शिसे, तांबे, संगमरवरी, चुनखडी, ग्रॅनाइट, पोटॅश इत्यादी अनेक खनिजांचे साठे आहेत. आत्मनिर्भर भारताचा हा भक्कम पाया आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेत राजस्थानचे मोठे योगदान आहे. भारताने या दशकाच्या अखेरीला 500 गिगावॉट नवीकरणीय ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यात देखील राजस्थान मोठी भूमिका बजावत आहे. भारतातील अनेक मोठे सोलर पार्क येथे उभारले जात आहेत.

मित्रांनो,

राजस्थान, दिल्ली आणि मुंबई सारख्या अर्थव्यवस्थेच्या दोन मोठ्या केंद्रांना जोडत आहे. राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातच्या बंदरांना, उत्तर भारताशी जोडत आहे. तुम्ही बघा  दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेचा 250 किलोमीटरचा भाग राजस्थानात आहे. यामुळे राजस्थानच्या अलवर, भरतपूर, दौसा, सवाई माधोपूर, टोंक, बूंदी आणि कोटा यांसारख्या जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे. Dedicated freight corridor सारख्या आधुनिक रेल्वे जाळ्याचा 300 किलोमीटरचा भाग राजस्थानात आहे. ही मार्गिका जयपूर, अजमेर, सीकर, नागौर आणि अलवर या जिल्ह्यातून जात आहे. संपर्कव्यवस्थेच्या इतक्या मोठ्या प्रकल्पांचे केंद्र असल्याने राजस्थान गुंतवणुकीसाठी उत्तम ठिकाण आहे. विशेषतः ड्राय पोर्ट्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी तर येथे अमाप संधी आहेत. आम्ही येथे मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क विकसित करत आहोत. येथे सुमारे दोन डझन Sector Specific इंडस्ट्रियल पार्क्स बांधण्यात येत आहेत. दोन एअर कार्गो कॉम्प्लेक्सही बांधण्यात आले आहेत. त्यामुळे राजस्थानमध्ये उद्योग उभारणे सोपे होईल आणि औद्योगिक संपर्कव्यवस्था अधिक चांगली होईल.

मित्रांनो,

भारताच्या समृद्ध भविष्यात आम्हाला पर्यटनाची प्रचंड क्षमता दिसत आहे. निसर्ग, संस्कृती, साहस, परिषदा, डेस्टिनेशन वेडिंग आणि हेरिटेज टुरिझममध्ये भारतातील प्रत्येकासाठी अमर्याद संधी आहेत. राजस्थान हे भारताच्या पर्यटन नकाशाचे प्रमुख केंद्र आहे. इथे इतिहास देखील आहे, वारसा देखील आहे, विस्तीर्ण मरुभूमी आणि सुंदर तलावही आहेत. येथील गीत-संगीत आणि खाण्यापिण्याचे प्रकार यांच्याविषयी तर जितके बोलू तितके कमी आहे.Tour,Travel  आणि Hospitality Sector ला जे काही लागते ते सर्व राजस्थानात आहे. राजस्थान हे जगातील अशा काही निवडक ठिकाणांपैकी एक आहे जिथे लोकांना लग्नासारखे आयुष्यातील क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी राजस्थानमध्ये यायचे आहे. राजस्थानमध्ये वन्यजीव पर्यटनालाही भरपूर वाव आहे. रणथंबोर असो, सरिस्का, मुकुंदरा हिल्स, केवलदेव, अशी अनेक ठिकाणे आहेत जी वन्यजीवांची आवड असणाऱ्यांसाठी स्वर्ग आहेत. मला याचा अतिशय आनंद आहे की राजस्थान सरकार आपली पर्यटन स्थळे आणि हेरिटेज केंद्रांना चांगल्या संपर्कव्यवस्थेने जोडत आहे. भारत सरकारने जवळजवळ वेगवेगळ्या थीम सर्किट्सशी संबंधित योजनाही सुरू केल्या आहेत. 2004 ते 2014 या काळात 10 वर्षांत सुमारे 5 कोटी परदेशी पर्यटक भारतात आले. तर 2014 ते 2024 या काळात 7 कोटींहून अधिक परदेशी पर्यटक भारतात आले आहेत आणि तुम्ही ही गोष्ट विचारात घ्या, या 10 वर्षांत संपूर्ण जगाची तीन-चार वर्षे कोरोनाशी लढण्यात गेली होती. कोरोना काळात पर्यटन ठप्प झाले होते. असे असूनही भारतात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारताने अनेक देशांतील पर्यटकांना प्रदान केलेली ई-व्हिसा सुविधा परदेशी पाहुण्यांना खूप मदत करत आहे. आज देशांतर्गत पर्यटनही भारतात नवनवीन विक्रम करत आहे, उडान योजना असो, वंदे भारत ट्रेन असो, प्रसाद योजना असो, राजस्थानला या सर्वांचा लाभ मिळत आहे. भारताच्या वायब्रंट व्हिलेजसारख्या कार्यक्रमांचा देखील राजस्थानला फायदा होत आहे. मी देशवासियांना वेड इन इंडियाचे आवाहन केले आहे. 

राजस्थानला याचा फायदा नक्की होणार आहे. राजस्थानमध्ये वारसास्थळ पर्यटन, चित्रपट पर्यटन, पर्यावरण पर्यटन, ग्रामीण पर्यटन, सीमाभाग पर्यटन इत्यादींची वाढ होण्याच्या अपरिमित शक्यता आहेत. या क्षेत्रांमधील आपली गुंतवणूक राजस्थानच्या पर्यटन क्षेत्राला शक्ती देईल आणि आपल्या व्यवसायातसुद्धा वाढ होईल.

मित्रांनो,

आपण सर्वजण जागतिक पुरवठा आणि मूल्यसाखळीशी संबंधित जी आव्हाने आहेत त्या सर्वांशी परिचित आहात. जगाला आज अशा एका अर्थव्यवस्थेची गरज आहे जी मोठ्यातला मोठ्या संकटात सुद्धा भक्कमपणे मार्गक्रमणा करत राहील, थांबणार नाही. त्यासाठी भारताला व्यापक उत्पादकतेचा पाया असणे अत्यंत आवश्यक आहे आणि हे केवळ भारतासाठीच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेसाठीसुद्धा आवश्यक आहे. या आपल्या जबाबदारीची जाणीव असल्यामुळे भारताने आपल्या उत्पादकतेच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचा मोठा संकल्प केला आहे. भारत आपल्या मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत ‘कमी किंमतीत उत्पादन’ यावर भर देत आहे. भारतातील पेट्रोलियम उत्पादने, भारताची औषधे आणि वॅक्सिन्स भारताचे इलेक्ट्रॉनिक सामान यामध्ये भारताच्या विक्रमी उत्पादनांचा जगाला मोठा लाभ होत आहे. राजस्थानातून गेल्या वर्षी जवळपास 84 हजार कोटी रुपयाची निर्यात झाली, 84 हजार कोटी रुपये. यामध्ये इंजीनियरिंग सामान रत्ने आणि दागिने, कापड हस्तव्यवसायातून तयार केलेल्या वस्तू, कृषी खाद्य उत्पादनांचा समावेश आहे. 

मित्रांनो,

भारतात उत्पादन वाढवण्यासाठी ‘उत्पादनाधारित अनुदान योजना’ सुद्धा सातत्याने मुख्य भूमिका बजावत आहे. आज इलेक्ट्रॉनिक्स, विशिष्ट पोलाद, ऑटोमोबाईल, आणि मोटार गाड्यांसाठी लागणारे सुटे भाग, सोलार टीव्ही, औषधे या क्षेत्रांमध्ये खूप उत्साह आहे , ‘उत्पादनाधारित अनुदान योजनेमुळे जवळपास सव्वा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे . जवळपास 11 लाख कोटी रुपयांची उत्पादने तयार झाली आणि निर्यातीत चार लाख कोटी रुपयांची वाढ झाली. लाखो तरुणांना नवीन रोजगार सुद्धा मिळाला. इथे राजस्थानातसुद्धा मोटारींचा तसेच मोटारींच्या सुट्ट्या भागाच्या उद्योगांचा व्यवस्थित पाया तयार झाला आहे. इथे इलेक्ट्रिक वाहन उत्पादनासाठीच्या शक्यता भरपूर आहेत. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी ज्या पायाभूत सुविधा आवश्यक आहेत त्या सुद्धा राजस्थानात उपलब्ध आहेत. मी सर्व गुंतवणूकदारांना आग्रह करतो की राजस्थानची उत्पादन क्षमता सुद्धा जरूर विचारात घ्या. 

मित्रांनो, 

उगवत्या राजस्थानची मोठी ताकद आहे ती म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग. सूक्ष्मलगव्हाणे माध्यम उद्योगाच्या संदर्भात राजस्थान भारताच्या सर्वात अग्रेसर पाच राज्यांपैकी एक आहे. या परिषदेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर एक वेगळं चर्चासत्र सुद्धा आयोजित केलं आहे. राजस्थानातील 27 लाखांहून अधिक छोटे आणि लघु उद्योग तसेच लघु उद्योगात काम करणारी पन्नास लाखांहून जास्त माणसे यांच्यामध्ये राजस्थानचे भाग्य बदलण्याचे सामर्थ्य आहे. माझ्यासाठी आनंदाची बाब अशी की राजस्थानात नवीन सरकार तयार झाल्यानंतर थोड्याच कालावधीत नवीन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग धोरण आले . भारत सरकार आपली धोरणे तसेच निर्णय यांच्या माध्यमातून सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना सतत मजबूत करत आहे. भारतातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग फक्त भारतच नाही तर बाकी जागतिक पुरवठा तसेच मूल्य साखळी सशक्त करण्यात मोठी भूमिका बजावत आहे. आम्ही कोरोनाच्या दरम्यान बघितले की जेव्हा जगात औषधोपचारांची पुरवठा साखळी धोक्यात आली तेव्हा भारताच्या औषध क्षेत्राने जगाला सहकार्य दिले. भारताचे फार्मा क्षेत्र भक्कम असल्यामुळेच हे शक्य झाले. या धर्तीवर भारताला बाकी उत्पादनांच्या मॅन्युफॅक्चरिंगचा भक्कम पाया घालायचा आहे आणि त्यामध्ये आमच्या सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगाची मोठी भूमिका असणार आहे.

मित्रांनो,

आमच्या सरकारने सूक्ष्म लघू मध्यम उद्योगांची परिभाषा बदलली आहे जेणेकरून त्यांना वाढीला अधिक संधी मिळू शकते. केंद्र सरकारने जवळपास पाच कोटी सूक्ष्म लघू मध्यम उद्योगांना अधिकृत अर्थव्यवस्थेची जोडून घेतले आहे यामुळे त्या उद्योगांसाठी कर्ज मिळवणे सोपे झाले आहे. आम्ही एक क्रेडिट गॅरंटी लिंक योजनासुद्धा तयार केली. या अंतर्गत छोट्या उद्योगांना जवळपास सात लाख कोटी रुपयांची मदत दिली गेली. गेल्या दशकात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठीचा क्रेडिट फ्लो दुपटीपेक्षा अधिक वाढला. वर्ष 2014 मध्ये जिथे हा जवळपास दहा लाख कोटी रुपये होता आज तो 22 लाख कोटी रुपयांपेक्षा वर गेला आहे. राजस्थान सुद्धा याचा एक मोठा लाभार्थी आहे. सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांची ही वाटती ताकद राजस्थानच्या विकासाला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल.

मित्रांनो,

आम्ही आत्मनिर्भर भारताच्या नवीन प्रवासाचा मार्ग धरला आहे. आत्मनिर्भर भारताची मोहीम ही व्हिजन विश्वव्यापी आहे आणि त्याचा परिणामसुद्धा जागतिक आहे. सरकारच्या स्तरावर आपण, ‘सर्व काही सरकारी’ या धोरणाने पुढे जात आहोत. औद्योगिक विकासासाठी आपण प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक घटकाला एकत्रित प्रोत्साहन देत आहोत. सर्वांचे प्रयत्न ही भावना विकसित राजस्थान साकार करेल विकसित भारत साकार करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. 

मित्रांनो,

इथे देशातून तसेच जगातून अनेक निमंत्रित आले आहे. बऱ्याच साथीदारांची ही पहिलीच भारतयात्रा असेल. असेही असू शकेल की ते राजस्थानातही हा पहिलाच प्रवास करत असतील. शेवटी मी एवढेच म्हणेन की आपल्या देशात जाण्याआधी आपण राजस्थान, भारत व्यवस्थित जाणून घ्या. राजस्थानच्या रंगीबेरंगी बाजारात खरेदीचा अनुभव, येथील लोकांच्या स्वभावातला खुलेपणा हे सर्व आपण कधीही विसरणार नाही. पुन्हा एकदा सर्व गुंतवणूकदारांना, रायझिंग राजस्थानच्या संकल्पनेला आणि आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.

 

* * *

JPS/NM/Suvarna/Shailesh/Vijaya/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai