Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जम्मू आणि काश्मीर भारताचा मुकुट मणी- पंतप्रधान


 

युवा भारताला समस्या रेंगाळत ठेवण्याची इच्छा नाही आणि फुटीरतावाद आणि दहशतवादाचा सामना करायची मनिषा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते आज दिल्लीत एनसीसी रॅलीला संबोधित करत होते.

देशाला तरुणाईची विचारसरणी आणि उमेद विकसित करण्याचे आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरची समस्या अनेक दशकांपासून प्रलंबित होती.

जम्मू आणि काश्मीरची समस्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरुच होती. ती सोडवण्यासाठी काय करण्यात आले, असा सवाल त्यांनी केला.

तीन- चार कुटुंब आणि काही राजकीय पक्षांना ही समस्या सोडवण्यात स्वारस्य नव्हते. ही समस्या अशीच सुरु ठेवायची त्यांची इच्छा होती असे ते म्हणाले.

याचा परिणाम असा झाला की, सततच्या दहशतवादामुळे काश्मीर उद्‌धस्त झाला आणि हजारो निष्पाप लोक मारले गेले.

ते म्हणाले, राज्यातील लाखो लोकांना त्यांच्या घरापासून बेदखल करण्यात आले तरीही सरकार मूक प्रेक्षकाप्रमाणे हे सर्व पाहत होते.

कलम 370 चा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, ही तात्पुरती व्यवस्था होती मात्र काही राजकीय पक्षांच्या मतांच्या राजकारणामुळे सात दशकं ती सुरुच राहीली.

काश्मीर हा भारताचा मुकुट मणी आहे आणि त्याला समस्या मुक्त करणे ही आपली जबाबदारी आहे असे ते म्हणाले.

कलम 370 रद्द करण्याचा उद्देश जम्मू आणि काश्मीरमधील दीर्घ काळापासून प्रलंबित समस्या सोडवणे हा होता असे पंतप्रधान म्हणाले.

दहशतवादाचा सामना करण्यासाठी सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक:-

आपल्या शेजारी देशाने आपल्याबरोबर तीन युद्ध लढली मात्र आपल्या सैन्याने या तिन्ही युद्धांमध्ये त्यांना हरवले. आता ते आपल्याबरोबर छुपं युद्ध खेळत असून आपले हजारो नागरिक मारले जात आहेत, असे ते म्हणाले.

या समस्येबाबत यापूर्वी विचारधारा कशी होती असा प्रश्न मांडून ते म्हणाले की, याकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहिले जात होते.

ही समस्या अशीच अधांतरी ठेवली गेली आणि सुरक्षा दलांना त्यावर कारवाई करण्याची कधीही संधी देण्यात आली नाही असे पंतप्रधान म्हणाले.

आज भारत तरुण मनाने आणि विचारसरणीने पुढे वाटचाल करत आहे आणि म्हणूनच तो सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक करु शकला आणि दहशतवाद्यांच्या तळावर थेट हल्ला करु शकला.

या कारवाईचा परिणाम असा झाला की, देशात आज सगळीकडे शांतता आहे आणि दहशतवादी कारवायांमधे लक्षणीय घट झाली आहे असे पंतप्रधान म्हणाले.

राष्ट्रीय युद्घ स्मारक:-

देशातल्या काही जणांना शहीदांचे स्मारक होऊ नये असे वाटत होते असे पंतप्रधान म्हणाले. सुरक्षा दलांचे मनोधैर्य उंचावण्याऐवजी त्यांचा अभिमान दुखावण्याचे प्रयत्न केले जात होते. असे ते म्हणाले.

युवा भारताच्या इच्छेनुसार आज दिल्लीमध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि राष्ट्रीय पोलीस स्मारक बांधण्यात आले आहे असे पंतप्रधान म्हणाले.

संरक्षण दल प्रमुख:-

जगभरात सर्वत्र सशस्त्र दलांमध्ये परिवर्तन होत आहे आणि लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या समन्वयावर अधिक भर दिला जात आहे असे पंतप्रधान म्हणाले. याच अनुषंगाने गेल्या अनेक दशकांपासून संरक्षण दलाचा एक प्रमुख असावा अशी मागणी होत होती. मात्र दुर्देवाने त्याबाबत निर्णय झाला नव्हता असे ते म्हणाले.

तरुणांच्या विचारांपासून प्रेरणा घेत सरकारने आता संरक्षण दल प्रमुखांची नियुक्ती केली आहे असे त्यांनी सांगितले.

आमच्या सरकारने संरक्षण दल प्रमुख पद निर्माण करुन नव्या संरक्षण दल प्रमुखांची नियुक्तीही केली, असे ते म्हणाले.  

राफेलचा समावेश- नवीन पिढीचे लढाऊ विमान:-

सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरण आणि तांत्रिक उन्नतीकरणाच्या मुद्यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ज्याचे आपल्या देशावर प्रेम आहे त्याला आपल्या देशाचे सुरक्षा दल आधुनिक आणि अद्ययावत असावे असे वाटेल.

तीस वर्ष उलटूनही भारतीय हवाई दलाला नव्या पिढीचे लढाऊ विमान मिळू शकले नव्हते अशी टीका त्यांनी केली. आपली विमानं जुनी आणि अपघातप्रवण झाली होती आणि त्यामुळे आपल्या लढाऊ वैमानिकांना वीर मरण पत्करावे लागत होते असे पंतप्रधान म्हणाले.

गेल्या तीन दशकांपासून प्रलंबित असलेले हे काम आम्ही पूर्ण करुन दाखवू. तीन दशकांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय हवाई दलाला नव्या पिढीचे राफेल हे लढाऊ विमान मिळाल्याचे पंतप्रधान म्हणाले.

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar