Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण


नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025

 
नायब राज्यपाल  मनोज सिन्हा जी, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी  नितिन गडकरी जी, जितेंद्र सिंह जी, अजय टम्टा जी, उपमुख्यमंत्री सुरेंद्र कुमार चौधरी जी, विरोधी पक्षनेता सुनील शर्मा जी, सर्व खासदार, आमदार आणि जम्मू-कश्मीर च्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

सर्वात आधी तर देशाच्या उन्नतीसाठी, जम्मू काश्मीरच्या उन्नतीसाठी ज्या श्रमिक बांधवांनी अतिशय खडतर परिस्थितीत काम केले, आपला जीव धोक्यात घालून काम केले.  आपल्या सात श्रमिक सहकाऱ्यांनी आपला जीव गमावला, पण आपण संकल्पापासून मागे हटलो नाही, माझे श्रमिक सहकारी हटले नाहीत, कोणीही घरी परत जायचे आहे, असे सांगितले नाही, या माझ्या श्रमिक सहकाऱ्यांनी प्रत्येक आव्हानावर मात करत हे काम पूर्ण केले आहे. आणि ज्या सात सहकाऱ्यांना  आपण गमावले आहे, आज सर्वात आधी मी त्यांचे पुण्यस्मरण करतो.

मित्रांनो,

हा ऋतू , हा बर्फ, बर्फाच्या सफेद चादरीने झाकलेल्या या सुंदर टेकड्या, मन अगदी प्रसन्न होऊन जाते. दोन दिवसांपूर्वी, आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी समाज माध्यमांवर येथील काही छायाचित्रे सामाईक केली होती. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर , येथे तुमच्यामध्ये येण्यासाठी माझी अधीरता आणखी वाढली होती. आणि जसे आताच मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितले की माझे किती प्रदीर्घ कालखंडापासून तुम्हा सर्वांसोबत नाते राहिले आहे आणि येथे आलो तर अनेक वर्षांपूर्वीचे ते दिवस आठवू लागतात आणि जेव्हा मी भारतीय जनता पार्टी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, तेव्हा नेहमीच येथे येणे होत असायचे. या भागात देखील मी बराच काळ घालवला आहे. सोनमर्ग असो, गुलमर्ग असो, गांदरबल असो, बारामुल्ला असो. या सर्व जागी आम्ही तासन्-तास, कित्येक किलोमीटर पायी प्रवास करत असायचो. आणि तेव्हा देखील हिमवर्षाव अगदी जोरदार होत असायचा, पण जम्मू काश्मीरच्या लोकांच्या जिव्हाळ्याची उब अशी आहे की थंडीची जाणीव होत ऩसायची.

मित्रांनो,

आजचा दिवस खूपच विशेष आहे. आज देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात उत्सवाचे वातावरण आहे. आजपासूनच प्रयागराजच्या महाकुंभाचा प्रारंभ होत आहे, कोट्यवधी लोक तिथे पवित्र स्नानासाठी दाखल होत आहेत. आज पंजाबसह संपूर्ण उत्तर भारत लोहडीच्या आकांक्षांनी भरलेला आहे. हा काळ उत्तरायण, मकर संक्रांती,  पोंगल सारख्या सणांचा आहे. हा सण साजरा करणाऱ्या देश आणि जगातील सर्व लोकांचे मंगल व्हावे अशी मी कामना करतो. या खोऱ्यामध्ये वर्षातील हा काळ चिल्लई कला चा असतो. 40 दिवसाच्या या हंगामाचा तुम्ही नेटाने सामना करता. आणि याची आणखी एक बाजू आहे, हा हंगाम सोनमर्ग सारख्या पर्यटन स्थळांसाठी नव्या संधी देखील घेऊन येतो. देशभरातून पर्यटक येथे दाखल होत आहेत. काश्मीरच्या खोऱ्यात येऊन हे लोक तुमच्या आदरातिथ्याचा भरपूर आनंद घेत आहेत.

मित्रांनो,

आज मी एक मोठी भेट घेऊन तुमचा एक सेवक म्हणून तुमच्यामध्ये आलो आहे. काही दिवसांपूर्वी मला, जम्मूमध्ये आणि जसे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले 15 दिवसांपूर्वीच तुमच्या स्वतःच्या रेल्वे डिव्हीजनचे भूमीपूजन करण्याची संधी मिळाली होती. ही तुमची खूप जुनी मागणी होती. आज मला सोनमर्ग बोगदा, देशाला, तुम्हाला सोपवण्याची संधी मिळाली आहे. म्हणजे जम्मू काश्मीरची, लडाखची, आणखी एक जुनी मागणी आज पूर्ण झाली आहे. आणि तुम्ही नक्की माना, हे मोदी आहेत , आश्वासन दिले तर ते पूर्ण देखील करतात. प्रत्येक कामाची एक वेळ असते आणि योग्य वेळी योग्य कामे देखील होणार आहेत.

मित्रांनो,

आज जेव्हा मी सोनमर्ग बोगद्याविषयी बोलत होतो, यामुळे सोनमर्ग सोबतच कारगील आणि लेहच्या लोकांचे , आपल्या लेहच्या लोकांचे आयुष्य देखील खूपच सुकर होईल. आता हिमवर्षाव, हिमस्खलनाच्या वेळी किंवा मग पावसात होणाऱ्या भूस्खलनामुळे रस्ते बंद पडण्याच्या ज्या समस्या निर्माण व्हायच्या त्यामध्ये आता घट होईल. ज्यावेळी रस्ते बंद होतात, तेव्हा येथून मोठ्या रुग्णालयात ये-जा करणे अवघड होत असायचे. यामुळे येथे जीवनावश्यक सामग्री मिळणे देखील अवघड होत असायचे. आता सोनमर्ग बोगदा तयार झाल्यामुळे या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील.

मित्रांनो,

केंद्रात आमचे सरकार बनल्यानंतरच 2015 मध्ये सोनमर्ग बोगद्याच्या प्रत्यक्ष निर्मितीचे काम सुरू झाले आणि मुख्यमंत्री महोदयांनी खूपच चांगल्या शब्दात त्या कालखंडाचे वर्णन देखील केले. या बोगद्याचे काम आमच्याच सरकारच्या काळात पूर्ण झाल्याचा मला आऩंद आहे. आणि माझा तर नेहमीच एक मंत्र असतो, ज्याची सुरुवात आम्ही करू त्याचे उद्घाटन देखील आम्हीच करणार. होत आहे, चालतय, कधी होईल, काय माहीत हा काळ आता मागे पडला आहे.

मित्रांनो,

या बोगद्यामुळे या हिवाळ्यातील या हंगामात सोनमर्गची संपर्कव्यवस्था देखील टिकून राहील. यामुळे सोनमर्गसहित या संपूर्ण भागांमधील पर्यटनाला देखील नवे पंख लागणार आहेत. आगामी काळात रस्ते आणि रेल्वे संपर्क व्यवस्थेचे अनेक प्रकल्प जम्मू-काश्मीरमध्ये पूर्ण होणार आहेत. इथेच जवळच एका आणखी मोठ्या संपर्क व्यवस्था प्रकल्पावर काम सुरू आहे.  आता तर काश्मीर खोरे रेल्वे मार्गाने देखील जोडले जाणार आहे. याविषयी देखील येथे अतिशय आऩंदाचे वातावरण असल्याचे मला दिसत आहे. हे नवे रस्ते बनत आहेत, ही जी रेल्वे काश्मीरपर्यंत येणार आहे, ही रुग्णालये बनत आहेत, महाविद्यालये तयार होत आहेत, हेच तर नवे जम्मू काश्मीर आहे. मी तुम्हा सर्वांना या बोगद्यासाठी आणि विकासाच्या या नव्या पर्वासाठी मनापासून शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

आज भारत प्रगतीच्या नवीन शिखराच्या दिशेने वाटचाल करत आहे. देशातील प्रत्येक नागरिक 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यामध्ये गुंतलेला आहे. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपल्या देशाचा कोणताही भाग, कोणतेही कुटुंब प्रगती आणि विकासापासून मागे राहणार नाही. यासाठी आमचे सरकार “सबका साथ, सबका विकास” या भावनेने पूर्ण समर्पणाने दिवसरात्र काम करत आहे. गेल्या 10 वर्षांत, जम्मू आणि काश्मीरसह देशभरातील ४ कोटींहून अधिक गरीब लोकांना पक्की घरे मिळाली आहेत. आगामी काळात आणखी तीन कोटी नवीन घरे गरिबांना मिळणार आहेत. आज भारतात कोट्यवधी लोकांना मोफत उपचार मिळत आहेत. जम्मू काश्मीरच्या लोकांना देखील याचा मोठा फायदा झाला आहे. युवा वर्गाच्या शिक्षणासाठी देशभरात नवीन आयआयटी, नवीन आयआयएम, नवीन एम्स, नवीन वैद्यकीय महाविद्यालये, परिचारिका महाविद्यालये, तंत्रनिकेतन महाविद्यालये देशात सातत्याने तयार होत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 10 वर्षात एकापेक्षा एक चांगल्या शिक्षण संस्था  बनल्या आहेत. याचा खूप मोठा फायदा येथील माझ्या मुला-मुलींना, आपल्या युवा वर्गाला झाला आहे.

मित्रांनो,

आज, जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत, तुम्ही पाहात आहात की किती शानदार रस्ते, किती बोगदे, किती पूल बांधले जात आहेत, आपले जम्मू आणि काश्मीर आता बोगदे, उंच-उंच पुलांचे आणि रोपवेचे केंद्र बनत आहे. येथे जगातील सर्वात उंच बोगदे बांधले जात आहेत.जगातील सर्वात उंच रेल्वे-रस्ता पूल, केबल ब्रिज, येथे बांधला जात आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे मार्ग येथे बांधले जात आहेत. आपल्या चिनाब पुलाची अभियांत्रिकी पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे. गेल्या आठवड्यातच, या पुलावर एका प्रवासी ट्रेनची चाचणी पूर्ण झाली.

काश्मीरमधली रेल्वेसेवा विस्तारणारे केबल ब्रिज, जोजिला, चिनैनी, नाशरी आणि सोनमर्ग बोगदा हे प्रकल्प, उधमपूर – श्रीनगर – बारामुल्ला रेल्वे जोड प्रकल्प, शंकराचार्य मंदिर, शिवखोरी  तसंच बालताल – अमरनाथ रोप वे योजना आणि कटरा – दिल्ली द्रुतगती मार्ग यासारखे रस्ते प्रकल्प या सगळ्यांचं काम जम्मू काश्मीरमध्ये सुरू आहे. केवळ रस्ते प्रकल्पांचंच 42 हजार कोटी रुपयांचं काम सुरू आहे. चार राष्ट्रीय महामार्ग, दोन रिंग रोडचं कामही वेगानं सुरू आहे. सोनमर्गसारख्या 14 पेक्षा जास्त बोगद्यांचं काम केलं जात आहे. या सगळ्या प्रकल्पांमुळे जम्मू काश्मीर सर्वाधिक दळणवळण सुविधा असलेल्या राज्यांमधलं एक राज्य ठरेल.

मित्रांनो,

विकसित भारताचं उद्दीष्ट साध्य करण्याच्या प्रवासात पर्यटन क्षेत्राचं योगदान सगळ्यात मोठं आहे. दळणवळणाच्या चांगल्या सुविधांमुळे जम्मू काश्मीरच्या ज्या भागात अजूनपर्यंत पर्यटक पोहोचू शकलेले नाहीत तिथंही ते जाऊ शकतील. गेल्या दहा वर्षात जम्मू काश्मीरमध्ये शांतता आणि विकासाचं वातावरण तयार झालं आहे, त्याचा फायदा आपण पर्यटन क्षेत्रात झालेल्या वाढीतून अनुभवतो आहोतच. 2024 मध्ये २ कोटींपेक्षा जास्त पर्यटकांनी जम्मू काश्मीरला भेट दिली. इथं सोनमर्गमध्येही 10 वर्षांत पर्यटकांची संख्या 6 पटींनी वाढली आहे. याचा फायदा तुम्हा सगळ्यांना झाला आहे, जनतेला झाला आहे. हॉटेल्स, होम स्टे, ढाबा चालवणारे लोक, कापड दुकानदार, टॅक्सीचालक सगळ्यांनाच झाला आहे.

मित्रांनो,

21 व्या शतकातल्या जम्मू काश्मीर राज्यात आता विकासाचं नवं पर्व सुरू झालं आहे. आधीच्या काळातल्या संकंटांवर मात करुन आता आपलं काश्मीर धरतीवरील स्वर्ग ही आपली ओळख पुन्हा एकदा मिळवत आहे. आता लाल चौकात रात्रीच्या वेळी लोक आइस्क्रीम खायला जाऊ लागले असून रात्रीच्या वेळीही तिथं उत्साही, आनंदी वातावरण, पर्यटकांची गर्दी असते. जम्मू काश्मीरमधल्या कलाकारांनी तर पोलो व्ह्यू मार्केट हे आपलं राहण्याचं नवं ठिकाणच बनवलं आहे. इथले संगीतकार, कलाकार, गायक इथं आपली कला सादर करतात हे मी समाज माध्यमावर पाहिलं आहे. श्रीनगरमधले नागरिक आता आपल्या मुलाबाळांसह चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहतात आणि शांततेत, आनंदाच्या वातावरणात खरेदी करतात. परिस्थिती बदलवून टाकणारी इतकी सगळी कामं कुठलंही सरकार एकट्याने करू शकत नाही. जम्मू काश्मीरमधली परिस्थिती बददल्याचं सर्वात मोठं श्रेय इथल्या जनतेचं, तुमचं सगळ्यांचं आहे. तुम्ही लोकशाही सुदृढ केली आहे. तुमचं भविष्य सशक्त केलं आहे.

मित्रांनो,

जम्मू काश्मीरमधल्या तरुणांचं उज्ज्वल भविष्य मला स्पष्टपणे दिसत आहे. आता खेळाचंच उदाहरण घ्या, त्यांना कितीतरी संधी उपलब्ध झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच श्रीनगरमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेची छायाचित्रं पाहणारा प्रत्येकजण आनंदित झाला होता. मला आठवतंय त्या मॅरेथॉनमध्ये मुख्यमंत्रीदेखील सहभागी झाले होते आणि त्याची ध्वनीचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर लगेचच दिल्लीत भेटल्यावर मीसुद्धा मुख्यमंत्र्यांचं खास अभिनंदन केलं होतं. या भेटीत मला त्यांचा उत्साह, जोश पाहायला मिळाला. ते मला मॅरेथॉन स्पर्धेतल्या अगदी बारीकसारीक गोष्टींचीही माहिती देत होते.

मित्रांनो,

खरोखरंच हे नव्या जम्मू काश्मीरचं नवं पर्व सुरू झालं आहे. चाळीस वर्षांनंतर नुकतीच इथं आंतरराष्ट्रीय क्रिकेट लीग स्पर्धा झाली. त्याआधी आपण दल सरोवराच्या परिसरात कार रेसिंग स्पर्धेची सुंदर दृश्यंपण पाहिली आहेत. आपलं हे गुलमर्ग शहर तर एकप्रकारे भारताची हिवाळी क्रीडास्पर्धांची पंढरी बनतेय. गुलमर्गमध्ये खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा चार वेळा झाली.पुढच्या महिन्यात पाचवी खेलो इंडिया हिवाळी क्रीडास्पर्धा सुरू होईल. गेल्या दोन वर्षांत वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांसाठी अडीच हजार खेळाडू जम्मू काश्मीरमध्ये येऊन गेले. जम्मू काश्मीरमध्ये नव्वदपेक्षा जास्त खेलो इंडिया केंद्रं सुरू करण्यात आली असून साडेचार हजार युवा क्रीडापटू इथं प्रशिक्षण घेत आहेत.

मित्रांनो,

आज सगळ्याच क्षेत्रांमध्ये जम्मू काश्मीरमधल्या तरुणांसाठी नवनव्या संधी निर्माण होत आहेत. जम्मू आणि अवंतीपूरमध्ये एम्स रुग्णालयाचं काम वेगात सुरू आहे. म्हणजेच आता उपचारांसाठी दुसरीकडे जावं लागणार नाही. जम्मूमधल्या आयआयटी, आयआयएम आणि केंद्रिय विद्यापीठासारख्या दर्जेदार शिक्षणसंस्थांमध्ये इथली युवा पिढी शिक्षण घेत आहे. आपले विश्वकर्मा सहकारी जम्मू काश्मीरमधली हस्तकला, शिल्पकला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांना पीएम विश्वकर्मा आणि राज्य सरकारच्या अन्य योजनांची मदत मिळते आहे. इथं नवे उद्योगधंदे सुरू व्हावेत यासाठीही आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. वेगवेगळे उद्योजक इथं जवळपास 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. यामुळे हजारो तरुणांना नोकरी मिळेल. जम्मू काश्मीर बँकदेखील आता चांगल्या पद्धतीने काम करते आहे. गेल्या चार वर्षांत जम्मू काश्मीर बँकेचा व्यवसाय 1 लाख 60 हजार कोटींवरुन 2 लाख 30 हजार कोटी रुपयांवर गेला आहे. याचाच अर्थ या बँकेचा व्यवसाय वाढतो आहे, कर्ज देण्याची क्षमतापण वाढली आहे. याचा फायदा इथले तरुण, शेतकरी, बागायतदार, दुकानदार, व्यावसायिक सगळ्यांना होतो आहे.

मित्रांनो,

जम्मू काश्मीरचा भूतकाळ बदलून आता विकासाचा वर्तमानकाळ सुरू झाला आहे. भारताच्या शिरोभागावर जेव्हा विकासाचा मुकुट विराजमान असेल तेव्हाच विकसित भारताचं स्वप्न साकार होईल. काश्मीर तर भारताचा मुकुट आहे. म्हणूनच मला असं वाटतं की हा मुकुट आणखी सुंदर असावा, समृद्ध असावा. या कामात इथले तरुण, ज्येष्ठ नागरिक, मुलं-मुली या सगळ्यांचं मला कायम सहकार्य मिळत आलं आहे याचा मला एतिशय आनंद होतो. तुम्ही तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी, जम्मू काश्मीरच्या आणि भारताच्या प्रगतीसाठी मन लावून काम करत आहात. यामध्ये मोदी नेहमीच तुमच्यासोबत असतील असा भरवसा मी तुम्हाला पुन्हा एकदा देतो. तुमच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा मी दूर करेन.

मित्रांनो,

या विकास प्रकल्पांसाठी जम्मू काश्मीरमधल्या माझ्या सगळ्या कुटुंबियांना पुन्हा खूप खूप शुभेच्छा. जम्मू काश्मीरमध्ये ज्या वेगाने प्रगती होत आहे, नवीन नवीन प्रकल्प सुरू होत आहेत त्याचं सविस्तर वर्णन माझे साथीदार नितीन गडकरी, मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. म्हणूनच त्याची पुनरावृत्ती मी करणार नाही. मी आपल्याला एवढंच सांगेन की, आता हे अंतर पुसलं गेलं आहे, आता आपल्याला मिळून नवी स्वप्नं पाहायची आहेत, संकल्प करायचे आहेत आणि ते पूर्णही करायचे आहेत. माझ्याकडून तुम्हा सर्वांना अनेकानेक शुभेच्छा.

धन्यवाद.   

SK/JPS/Shailesh/Surekha/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai