जम्मूमधे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट उभारायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जम्मूमधल्या जुन्या सरकारी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात तात्पूरत्या स्वरुपात 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून हे आय.आय.एम. कार्यान्वित करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या 2016-2020 या काळासाठी या परिसरात तात्पूरत्या स्वरुपातल्या या प्रकल्पासाठी 61.90 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. व्यवस्थापन क्षेत्रातल्या पदव्युत्तर-पदविका अभ्यासक्रमासाठी यावर्षी 54 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील, त्यात वाढ करत चौथ्या वर्षी 120 विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतील. कायमस्वरुपी परिसरासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असून, त्यानंतरच परिसर उभारणीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
सोसायटीज् रजिस्ट्रेशन कायदा 1860 अंतर्गत आय.आय.एम. जम्मू सोसायटीच्या स्थापनेलाही मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-कश्मीरसाठी जाहीर केलेल्या विकास पॅकेजचा हा भाग आहे.
पूर्वपिठीका:
व्यवस्थापन आणि या क्षेत्राशी संबंधित विषयांवर उत्तम दर्जाचे शिक्षण देणारी सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून आय.आय.एम. देशात ओळखली जाते. देशात सध्या 19 आय.आय.एम. आहेत.
N. Sapre/N. Chitale /D. Rane