Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘जनौषधी दिवस’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

‘जनौषधी दिवस’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


 

या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर असलेले केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी डी.व्ही. सदानंद गौडा जी, मनसुख मांडवीय जी, अनुराग ठाकूर जी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयमराम ठाकूर जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोर्नाड के. संगमा जी, उपमुख्यमंत्री प्रेस्टोन तिन्सॉन्ग जी, गुजरातचे उपमुख्यमंत्री भाई नितीन पटेल जी, देशभरातून जोडले गेलेले जनौषधी केंद्र संचालक, लाभार्थी महोदय, चिकित्सक-जनौषधीचे वैद्य आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो!

जनौषधी चिकित्सक, जनौषधी ज्योती आणि जनौषधी सारथी, अशा तीन प्रकारांमध्ये महत्वपूर्ण पुरस्कार प्राप्त करणा-या सर्व मित्रांचे मी खूप-खूप अभिनंदन करतो.

 

मित्रांनो,

जनौषधी योजनेला देशाच्या कानाकोप-यापर्यंत नेऊन ती चालविणारे आणि त्याचे काही लाभार्थी यांच्याबरोबर मला संवाद साधण्याची संधी आज मिळाली. यावेळी जी चर्चा झाली, त्यावरून स्पष्ट दिसून येते की, ही योजना गरीब आणि विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांना खूप मदत करणारी बनत आहे. ही योजना सेवा आणि रोजगार अशा दोन्हींचे माध्यम बनत आहे. जनौषधी केंद्रांमध्ये स्वस्त औषधांबरोबरच युवावर्गाला उत्पन्नाचे साधनही मिळत आहे.

विशेषत्वाने आमच्या भगिनींना, आमच्या कन्यावर्गाला ज्यावेळी फक्त अडीच रुपयांमध्ये सॅनिटरी पॅडस उपलब्ध करून दिले जातात, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत आहे. आत्तापर्यंत 11 कोटींपेक्षा जास्त सॅनिटरी नॅपकिन्सची या केंद्राच्या माध्यमातून विक्री झाली आहे. याचप्रमाणे जनौषधी जननीया अभियानातून गर्भवतींना आवश्यक असणा-या पोषकपुरक गोष्टी आणि गोळ्यांचा पुरवठा जनौषधी केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. इतकेच नाही तर, एक हजारांपेक्षा जास्त जनौषधी केंद्रे या महिला चालवत आहेत. याचा अर्थ जनौषधी योजनेमुळे आपल्या कन्यांना  आत्मनिर्भर होण्यासाठी बळ मिळत आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

या योजनेमुळे डोंगराळ, पर्वतीय क्षेत्रांमध्ये, ईशान्येकडे, आदिवासीबहुल भागामध्ये राहणा-या देशवासियांपर्यंत स्वस्त औषधांचा पुरवठा करण्यासाठी मदत मिळत आहे. आजही ज्यावेळी 7500 केंद्रांचे लोकार्पण करण्याचा कार्यक्रम शिलाँगमध्ये झाला आहे. यावरून स्पष्ट होते की, ईशान्येमध्ये जनौषधी केंद्रांचा किती मोठ्या प्रमाणावर विस्तार होत आहे.

 

मित्रांनो,

देशामध्ये सहा वर्षांपूर्वी अशा प्रकारची 100 सुद्धा केंद्रे नव्हती, त्यामुळेच 7500 च्या टप्प्यापर्यंत पोहोचणे अतिशय महत्वाची गोष्ट ठरते. आणि आम्ही तर आता शक्य तितक्या लवकर 10 हजारांचे लक्ष्य पूर्ण करू इच्छितो. आज राज्य सरकारांना, या विभागाच्या लोकांना मी एक आग्रह करणार आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत, ही एक आपल्या दृष्टीने चांगली संधी सर्वांनी मानून एक काम करता येण्यासारखे आहे. देशातल्या कमीत कमी 75 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 75 पेक्षा जास्त जनौषधी केंद्रे असावीत आणि आगामी काही महिन्यात, काही काळामध्ये आपण हे काम करावे. यामुळे जनौषधीचा किती प्रचंड प्रमाणात विस्तार होईल, हे तुम्हालाच दिसून येईल.

त्याचप्रमाणे त्याचा लाभ घेणा-यांच्या संख्येचेही लक्ष्य निश्चित केले पाहिजे. एखाद्या जनौषधी केंद्रामध्ये सध्या जितके लोक येतात, त्यापेक्षा दुप्पट, तिप्पट लोक आले  पाहिजेत. जनौषधीच्या लाभार्थींमध्ये वाढ झाली नाही, असे एकही केंद्र असता कामा नये. या दोन गोष्टींचा विचार करून यापुढे आपल्याला काम केले पाहिजे. हे काम जितके लवकर होईल, तितका जास्त लाभ देशाच्या गरीबाला होणार आहे. या जनौषधी केंद्रांमुळे दरवर्षी गरीब आणि मध्यमवर्गीय परिवारांची जवळपास 3600 कोटी रुपयांची बचत होत आहे आणि ही रक्कम काही लहान नाही. आधी हीच रक्कम महागड्या औषधांवर खर्च होत होती. याचा अर्थ या परिवारांना 3500 कोटी रुपये आपल्या कुटुंबांसाठी चांगल्या कामांसाठी आणि अधिक उपयोगी गोष्टींसाठी उपलब्ध झाले आहेत.

 

मित्रांनो,

जनौषधी योजनेचा वेगाने प्रसार करण्यासाठी या केंद्रांना देण्यात येणा-या प्रोत्साहन भत्त्यामध्ये दुप्पट वाढ केली आहे. हा भत्ता अडीच लाखांवरून पाच लाख रुपये केला गेला आहे. याशिवाय दलित, आदिवासी, महिला आणि ईशान्येकडील लोकांना दोन लाख रुपयांचा वेगळा भत्ताही दिला जात आहे. हा पैसा, त्यांना आपले दुकान तयार करणे, दुकानासाठी आवश्यक फर्निचर तयार करणे यासाठी वापरता येतो. या संधीबरोबरच या योजनेमुळे औषधांच्या क्षेत्रामध्ये संधींचे एक नवीन व्दार उघडले गेले आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

आज मेड इन इंडियाऔषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांना प्रचंड मागणी वाढली आहे. मागणी वाढल्यामुळे त्यांच्या उत्पादनामध्येही वाढ होत आहे. यामुळेही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. आता 75 आयुष औषधे आहेत. त्यामध्ये होमिओपॅथी आहे, आयुर्वेद आहे, तीही जनौषधी केंद्रांमध्ये  उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला गेला आहे, याचा मला आनंद झाला आहे. आयुष औषधे स्वस्त दरामध्ये मिळत असल्यामुळे रूग्णाचा खूप फायदा होईल, त्याचबरोबर आयुर्वेद आणि आयुष औषधोपचार या क्षेत्रालाही खूप मोठा लाभ होईल.

 

मित्रांनो,

आरोग्य म्हणजे फक्त आजार आणि उपचार असा आणि इतकाच विचार सरकारी विचारदेशात दीर्घ काळापर्यंत करण्यात आला आहे. परंतु आरोग्याचा विषय काही फक्त आजारातून मुक्ती इतकाच आणि औषधोपचार इथपर्यंतच मर्यादित नाही. वास्तविक संपूर्ण देशाच्या आर्थिक आणि सामाजिक उभ्या-आडव्या विणीवर प्रभाव निर्माण करणारे हे क्षेत्र आहे. ज्या देशाची लोकसंख्या, ज्या देशाचे लोक- मग, स्त्री असो अथवा पुरूष, शहरातले असो अथवा गावातले असो, वयोवृद्ध असो, लहान असो, नवयुवक असो, छोटी बाळे असोत, असे सर्वजण जितके जास्त आरोग्यदायी असतात, तितकेच ते राष्ट्रही समर्थ असते. त्यांच्यामध्ये असलेले ताकद खूप उपयोगी ठरणारी असते. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी, शक्ती वाढविण्याच्या कामी येते.

म्हणूनच आम्ही औषधोपचारांची सुविधा वाढविण्याबरोबरच ज्या गोष्टी आजाराला कारणीभूत ठरतात, त्या गोष्टींकडेही जास्त भर देत आहोत. ज्यावेळी देशामध्ये स्वच्छ भारत अभियान चालविले जाते, ज्यावेळी देशामध्ये कोट्यवधी शौचालयांचे निर्माण करण्यात येते, ज्यावेळी देशामध्ये मोफत गॅस जोडणी देण्याचे अभियान सुरू केले जाते, ज्यावेळी देशामध्ये आयुष्मान भारत योजना घरा-घरामध्ये पोहोचत आहे, मिशन इंद्रधनुष सुरू आहे, पोषण अभियान सुरू केले जाते, अशा सर्व गोष्टींच्यामागे आमचा विशिष्ट विचार असतो. आम्ही आरोग्य हा विषय तुकड्या- तुकड्यांनी नाही तर त्या संदर्भातल्या समग्र गोष्टींचा संपूर्णतेने विचार करून त्यावर सर्वंकष पद्धतीने काम केले आहे.

आम्ही योग या विषयाचा संपूर्ण विश्वाला परिचय करून देण्याचा प्रयत्न केला. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला जात आहे. आणि सगळीकडे अतिशय उत्साहाने, मनापासून योग दिन साजरा केला जात आहे. आपल्याकडचे काढे, आपले मसाले, आपल्या आयुष पर्यायांविषयी सर्वत्र चर्चा होत आहे, ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आधी आपण आपल्या या परंपरागत गोष्टींविषयी, उपचार पद्धतींविषयी चर्चा करताना संकोच करीत होतो. मात्र आज आपण अभिमानाने याविषयावर एकमेकांशी बोलतो आणि आपल्या या औषधांचा पर्याय म्हणून वापर करण्याचा सल्ला देतो. अलिकडच्या काळात आपल्या देशातून हळदीची होणारी निर्यात प्रचंड वाढली आहे. कोरोनानंतर आता संपूर्ण दुनियेला वाटतेय की, भारताकडे खूप काही आहे.

आज दुनियेला भारताचे महत्व चांगले पटले आहे. आमच्या परंपरागत औषधोपचारांचे महत्व पटत आहे. आमच्या नित्याच्या भोजनामध्ये आधी ज्या गोष्टी वापरल्या जात होत्या, त्या गोष्टी खरोखरीच खूप चांगल्या, आरोग्याला उपयुक्त अशा होत्या. ज्याप्रमाणे रागी, कोर्रा, कोदा, ज्वारी, बाजरी अशा डझनभर भरड धान्यांचा खाद्यान्न म्हणून वापर करण्याची समृद्ध परंपरा आपल्या देशाची आहे. मागच्यावेळी मी कर्नाटकच्या माझ्या प्रवासामध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी- येदुयुरप्पा जींनी भरड धान्याचे एक मोठे प्रदर्शन भरवले होते. लहान-लहान शेतकरी आपल्या जमिनीमध्ये कितीतरी प्रकारच्या भरड धान्याचे पिक घेतात. त्यामध्ये असलेल्या पौष्टिकतेची माहितीही प्रदर्शनामध्ये दिली गेली होती. परंतु आपल्याला माहिती आहे की, या पौष्टिक धान्याचे पिक घेण्यासाठी, त्यांचा वापर करण्यासाठी देशामध्ये कधीच प्रोत्साहन दिले गेले नाही.  एका दृष्टीने हे अन्न गरीबांचे आहे. ज्यांच्याजवळ पैसे नाहीत, ते लोक हे धान्य खातात, अशी मानसिकता निर्माण करण्यात आली.

मात्र आज, अचानक स्थिती बदलून गेली आहे. आणि असे परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले आहेत. आज भरड धान्ये पिकविण्यासाठी फक्त शेतकरी बांधवांना प्रोत्साहन दिले जात आहे असे नाही, तर आता भारताने पुढाकार घेतल्यामुळे संयुक्त राष्ट्राने वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष घोषित केले आहे. या भरड धान्यावर लक्ष्य केंद्रीत केल्यामुळे देशाला पौष्टिक अन्नही मिळेल आणि आमच्या शेतकरी बांधवांचे उत्पन्नही वाढणार आहे. आणि आता तर फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये लोक ऑर्डर करताना आपल्याला भरड धान्याचा अमूक एक पदार्थ खायचा आहे, असे सांगतात. हळू-हळू सर्वांना आता जाणवतेय की, भरड धान्य शरीरासाठी खूप उपयोगी आहे.

आणि आता तर संयुक्त राष्ट्रानेही ते मानले आहे. संपूर्ण दुनियेने जणू मान्यता दिली आहे. 2023 हे वर्ष संपूर्ण दुनियेमध्ये भरड धान्याचे वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. आणि त्याचा सर्वात जास्त लाभ आमच्या लहान शेतकरी बांधवांना होणार आहे. कारण भरड धान्याचे उत्पादन तेच घेत आहेत. भरड धान्य पिकवण्यासाठी हे शेतकरीच परिश्रम करतात.

 

मित्रांनो,

गेल्या वर्षांमध्ये कराव्या लागणा-या औषधोपचाराविषयीचे सर्व प्रकारचे भेदभाव समाप्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. औषधोपचारासाठी आवश्यक सुविधा प्रत्येक गरीबापर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. हृदयरोगींना लागणारा स्टेंट असो की गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी लागणा-या उपकरणांची गोष्ट असो. तसेच गरजेची औषधे असोत, त्यांच्या किंमती अनेकपटींनी कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे लोकांची वर्षाला जवळपास साडेबारा हजार कोटींची बचत होत आहे.

आयुष्मान योजनेद्वारे देशातील  50 कोटींपेक्षा जास्त गरीब परिवारांचा  पाच लाख रुपयांपर्यंत मोफत औषधोपचार सुनिश्चित करण्यात आला आहे. त्याचा लाभ आत्तापर्यंत दीड कोटींपेक्षा जास्त लोकांनी घेतला आहे. यामुळेही लोकांचे जवळपास 30 हजार कोटी रुपये वाचले आहेत, असा अंदाज आहे. याचा अर्थ, जनौषधी, आयुष्मान, स्टेंट आणि अन्य उपकरणांच्या किंमती कमी केल्यामुळे होत असलेली बचत एकत्रित केली, अर्थात आत्ता केवळ आरोग्याशी संबंधित मी बोलत आहे…. तर आज मध्यमवर्गाचे, सामान्य कुटुंबाचे जवळ-जवळ 50 हजार कोटी रुपये दरवर्षी वाचत आहेत.

 

मित्रांनो,

भारत दुनियेचे औषधालय आहे, हे आता सिद्ध झाले आहे. संपूर्ण विश्वभरामध्ये आपल्या जनौषधींचा वापर केला जात आहे. परंतु आमच्याकडे त्याविषयी एकप्रकारची उदासिनता आहे. जनौषधींच्या वापराला प्रोत्साहन दिले गेले नाही. आता आम्ही त्यावर भर दिला आहे. आम्ही जनौषधींवर जितका भर देता येईल, तितका भर दिला आहे, याचे कारण म्हणजे- सर्वसामान्य लोकांचा पैसा वाचला पाहिजे आणि त्यांचा आजार, रोगही दूर झाला पाहिजे.

कोरोना काळामध्ये दुनियेनेही भारताच्या औषधांमध्ये किती ताकद आहे, याचा अनुभव घेतला आहे. अगदी अशीच स्थिती आपल्या लसनिर्मिती उद्योगाचीही होती. भारताकडे अनेक आजारांवर लस बनविण्याची क्षमता होती. मात्र या कामासाठी प्रोत्साहन देण्याची गरज होती. परंतु प्रोत्साहनाचीच कमतरता आपल्याकडे होती. आम्ही औषध उत्पादन उद्योगांना प्रोत्साहित केले आणि आज भारतामध्ये बनविण्यात आलेल्या लसी आपल्या मुलांना वाचविण्याचे काम करीत आहेत.

 

मित्रांनो,

देशाला आपल्या संशोधकांचा अभिमान वाटतो. आपल्याकडे मेड इन इंडियालस आहे. आणि हीच लस आपण दुनियेची मदत करण्यासाठी वापरू शकणार आहोत. आमच्या सरकारने इथेही देशातल्या गरीबांची, मध्यम वर्गाची विशेष काळजी घेतली आहे. आज सरकारी रूग्णालयांमध्ये कोरोनाची मोफत लस लावली जात आहे. खाजगी रूग्णालयांमध्ये दुनियेत सर्वात स्वस्त म्हणजे अवघ्या 250 रूपयांमध्ये कोरोनाची लस दिली जात आहे. प्रत्येक दिवशी लाखो मित्र भारताची स्वतःची देशीलस लावून घेत आहेत. नंबर आल्यानंतर मीही पहिला डोस लावून घेतला.

 

मित्रांनो,

देशामध्ये स्वस्त आणि प्रभावी औषधोपचार होण्याबरोबरच पुरेसा वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपलब्ध असणे तितकेच आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही गावांमधल्या रूग्णालयांपासून वैद्यकीय महाविद्यालये आणि एम्ससारख्या संस्थांपर्यंत एक सर्वंकष दृष्टिकोन निर्माण करून काम सुरू केले आहे. गावांमध्ये दीड लाख आरोग्य आणि कल्याण केंद्रांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यापैकी 50 हजारांपेक्षाही जास्त केंद्रांमध्ये सेवा देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. ही केंद्रे म्हणजे काही ताप-खोकला यांच्यावर औषधे देणारी केंद्रे नाहीत. तर तिथे गंभीर आजारांचे निदान करण्यासाठी परीक्षणाची सुविधाही देण्याचा प्रयत्न आहे. आधी ज्या लहान-लहान चाचण्या करण्यासाठी गावकरी वर्गाला शहरामध्ये जावे लागत होते, त्या चाचण्या आता या आरोग्य आणि कल्याणकारी केंद्रांमध्ये करणे शक्य होत आहेत.

 

मित्रांनो,

या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये आरोग्यसाठीच्या तरतुदींमध्ये अभूतपूर्व वाढ करण्यात आली आहे. आणि आरोग्याच्या संपूर्ण उपाय योजनांसाठी प्रधानमंत्री आत्मनिर्भर आरोग्य योजनेची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये चाचणी केंद्र, 600 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अतिदक्षता विभागांसह रूग्णालयासारख्या अनेक सुविधा करण्यात येत आहेत. आगामी काळामध्ये कोरोनासारख्या महामारींमुळे आपल्याला त्रास होऊ नये, यासाठी देशाच्या आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या अभियानाला वेग दिला जात आहे.

प्रत्येक तीन लोकसभा केंद्रांमध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय बनविण्यासाठी काम करण्यात येत आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये जवळपास 180 नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत. 2014च्या आधी देशामध्ये जवळपास 55 हजार एमबीबीएसच्या जागा होत्या. तर गेल्या सहा वर्षात यामध्ये 30 हजार जागांची भर पडली आहे. याचप्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागाही 30 हजार होत्या. त्यामध्ये आता आणखी 24 हजार जागांची नव्याने भर पडली आहे.

 

मित्रांनो,

आपल्या शास्त्रांमध्ये म्हटले आहे की, –

‘‘नात्मार्थम् नापि कामार्थम्, अतभूत दयाम् प्रति

याचा अर्थ असा आहे की, औषधांचे, चिकित्सेचे हे विज्ञान जीवमात्राविषयी करूणा दाखविण्यासाठी आहे. याच भावनेने आज सरकारचा प्रयत्न आहे की, वैद्यकीय शास्त्राचा लाभ घेण्यापासून कोणीही वंचित राहू नये. स्वस्तामध्ये औषधोपचार झाले पाहिजेत. औषधोपचार सुलभतेने मिळाले पाहिजेत. सर्वांसाठी औषधोपचाराची सुविधा असली पाहिजे. याच दृष्टिकोनातून आम्ही रणनीती, धोरण आणि कार्यक्रमांची आखणी करीत आहोत.

प्रधानमंत्री जनौषधी योजनेचे जाळे वेगाने विस्तारावे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचावे, याच कामनेने मी आपल्या सर्वांचे खूप-खूप आभार व्यक्त करतो. आणि ज्या परिवारांमध्ये आजारपण आहे, ज्यांनी जनौषधीचा लाभ घेतला आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की, आपण जास्तीत जास्त लोकांना जनौषधीचा लाभ घेण्यासाठी प्रेरित करावे. प्रत्येक दिवशी लोकांना या जनौषधीचे महत्व समजावून सांगावे. तुम्ही सर्वजण जनौषधीच्या लाभाच्या माहितीचा प्रसार करून, एक प्रकारे सेवा करावी. आणि तुम्ही आरोग्यदायी रहावे, औषधोपचाराबरोबरच जीवनामध्ये आरोग्यविषयक काही शिस्तीचे पालन करणेही आजार बरा होण्यासाठी खूप जरूरीचे आहे. त्याकडेही पूर्ण लक्ष द्यावे.

आपण सर्वांनी आरोग्यदायी रहावे, अशी कामना माझी नेहमीच असणार आहे. आपल्या देशाचा प्रत्येक नागरिक आरोग्यसंपन्न असावा, असे मला वाटते. कारण तुम्ही माझ्या परिवाराचे सदस्य आहात, तुम्हीच माझा परिवार आहात. तुम्हाला काही आजार झाला आहे याचा अर्थ माझा परिवार आजारी आहे. आणि म्हणूनच माझी इच्छा आहे की, देशातले सर्व नागरिक स्वस्थ, आरोग्यदायी असावेत. त्यांच्यासाठी जर स्वच्छता राखण्याची गरज असेल तर स्वच्छता ठेवली पाहिजे. भोजनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असेल तर त्या नियमांचेही पालन केले पाहिजे. ज्याठिकाणी योग करणे आवश्यक आहे, तिथे योग केला गेला पाहिजे. थोडाफार व्यायाम केला जावा, ज्यांना शक्य आहे, त्यांनी फिट इंडिया चळवळीमध्ये सहभागी व्हावे. काही ना काही तरी शरीराच्या तंदुरूस्तीसाठी जरूर करीत राहिले पाहिजे तरच तुमचा आजारापासून बचाव होऊ शकणार आहे आणि तरीही तुम्ही आजारी पडलाच तर जनौषधीमुळे त्या आजाराशी लढण्याची ताकद मिळू शकणार आहे.

या एकाच अपेक्षेने मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप-खूप धन्यवाद देतो. आणि सर्वांना खूप

शुभेच्छा देतो.

धन्यवाद!!

***

M.Chopade/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com