Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जगद्गुरू श्री मध्वाचार्य, उडुपी यांच्या सातव्या शताब्दी महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलेले भाषण

जगद्गुरू श्री मध्वाचार्य, उडुपी यांच्या सातव्या शताब्दी महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलेले भाषण


श्री पेजावर मठाचे परम श्रद्धेय श्री विश्वेश तीर्थ स्वामी

श्री विश्व प्रसन्न तीर्थ स्वामी

श्री राघवेंद्र मठाचे श्री श्री सुभुधेन्द्र तीर्थ स्वामी

आणि

या कार्यक्रमात उपस्थित सर्व भाविकगण

भारताच्या भक्ती संप्रदायाच्या चळवळीच्या काळातील सर्वात मोठ्या दार्शनिकांपैकी एक संत श्री मध्वाचार्य यांच्या सातव्या शताब्दी महोत्सवात उपस्थित राहण्यापासून मी वंचित आहे.

कामात जास्त गुंतल्यामुळे मी उडुपीला येऊ शकलो नाही. काही वेळापूर्वीच मी अलीगडहून परतलो आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घेण्याची सुसंधी मला प्राप्त झाली आहे हे मी माझे परमभाग्य समजतो.

मानवजातीच्या नैतिक आणि आध्यात्मिक उत्थानासाठी ज्या प्रकारे संत श्री मध्वाचार्य महाराजांच्या संदेशाचा प्रचार प्रसार केला जात आहे त्यासाठी मी सर्व आचार्यांचे आणि विद्वानांचे मी अभिनंदन करतो.

कर्नाटकच्या पुण्य भूमीला देखील मी प्रणाम करतो, जिथे एका ठिकाणी मध्वाचार्यांसारखे संत निर्माण झाले त्याच ठिकाणी आचार्य शंकर आणि रामानुज यांच्या सारख्या पुण्यश्लोकांनी देखील या भूमीवर विशेष प्रेम केले.

उडुपी ही श्री मध्वाचार्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी राहिली आहे. श्री मध्वाचार्यांनी आपले प्रसिद्ध गीताभाष्य उडुपीच्या याच पवित्र भूमीवर लिहिले होते.

श्री मध्वाचार्य येथील कृष्ण मंदिराचे संस्थापक देखील होते. या मंदिरात प्रतिष्ठापना केलेल्या कृष्णाच्या मूर्तीशी माझे विशेष नाते आहे. उडुपीबाबतही मला वेगळाच जिव्हाळा आहे. मला अनेक वेळा उडुपीला येण्याची संधी प्राप्त झाली आहे. 1968 पासून चार दशकांहून अधिक काळ उडुपी महानगरपालिकेची धुरा भारतीय जनता पक्षाने आणि भारतीय जनसंघाने सांभाळली आहे. 1968 मध्ये उडुपीमध्ये पहिल्यादा अशी महानगरपालिका स्थापन झाली होती जिने मानवी मैलावहनावर बंदी घातली होती. 1984 आणि 1989 मध्ये दोन वेळा उडुपीला स्वच्छतेसाठी सन्मानित करण्यात आले होते. स्वच्छते संदर्भात, मानवी मूल्यांसंदर्भात जनशक्तीला जागृत करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे हे शहर प्रत्यक्ष उदाहरण आहे.

या कार्यक्रमामध्ये श्री विश्वेश तीर्थ स्वामी स्वतः उपस्थित आहेत याचा मला दुहेरी आनंद आहे.

आठ वर्षांच्या लहानशा वयात संन्यास घेतल्यानंतर आपल्या आयुष्यातील 80 वर्षे त्यांनी आपल्या देशाला, आपल्या समाजाला बळकट करण्यासाठी खर्च केली. देशाच्या कानाकोप-यात जाऊन अशिक्षितपणा, गोरक्षण आणि जातिवादाविरोधात चळवळ उभारली.

स्वामीजींच्या पुण्यकर्मांचाच हा प्रभाव आहे की त्यांना पाचव्या पर्यायाची संधी मिळाली आहे. अशा संतपुरुषाला मी नमन करतो.

बंधु आणि भगिनींनो,

आपल्या देशाला हजारो वर्षांचा प्राचीन इतिहास आहे. हजारो वर्षांच्या इतिहासाला सामावून घेत आपल्या देशात परिवर्तन होत राहिले आहे. व्यक्तीमधील परिवर्तन, समाजातील परिवर्तन. मात्र, काळानुरुप काही वाईट गोष्टींचा शिरकाव देखील समाजात होत असतो.

आपल्या समाजाचे हे वैशिष्ट्य आहे की जेव्हा कधीही अशा वाईट गोष्टींचा शिरकाव झाला तेव्हा सुधारणेचे काम समाजामध्ये असणा-याच कोणीतरी सुरु केले. काळ असाही आला होता जेव्हा आपल्या देशाचे नेतृत्व साधुसंतांच्या समाजाच्या हाती होते. ही भारतीय समाजाची अद्भुत क्षमता आहे की वेळोवेळी आपल्याला असे देवतुल्य महापुरुष मिळाले. ज्यांनी या वाईट गोष्टींना ओळखले आणि त्यापासून मुक्तीचा मार्ग दाखवला.

श्री मध्वाचार्य देखील असेच संत होते, समाजसुधारक होते, आपल्या काळातील अग्रदूत होते. समाजातील प्रचलित अनिष्ट चालीरीतींविरोधात त्यांनी आपले विचार मांडले, समाजाला दिशा दाखवली, अशा प्रकारची अनेक उदाहरणे आहेत. यज्ञांमध्ये पशुबळी बंद करण्याची सामाजिक सुधारणा ही श्री मध्वाचार्यजींसारख्या महान संताचीच देणगी आहे.

समाजामध्ये शेकडो वर्षांपूर्वी ज्या चुकीच्या चालीरिती सुरू होत्या त्यांना बदलण्यासाठी आपल्या संतांनी लोकचळवळ सुरू केली याचा इतिहास साक्षीदार आहे. त्यांनी या लोकचळवळीला भक्तीशी जोडले. भक्तीचे हे आंदोलन दक्षिण भारतापासून सुरू होत महाराष्ट्र आणि गुजरातमधून वाटचाल करत उत्तर भारतापर्यंत पोहोचले होते.

त्या भक्तीयुगामध्ये, त्या कालखंडामध्ये भारताचे प्रत्येक क्षेत्र, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण प्रत्येक दिशेमध्ये प्रत्येक भाषा बोलणा-यांमध्ये, मंदिरातून मठातून बाहेर पडत आपल्या संतांनी एक चेतना जागृत करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या आत्म्याला जागवण्याचा प्रयत्न केला.

भक्ती आंदोलनाची ज्योत दक्षिणेत मध्वाचार्य, मध्वाचार्य, निम्बार्काचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, पश्चिमेला मीराबाई, एकनाथ, तुकाराम, रामदास, नरसी मेहता, उत्तरेकडे रामानंद,कबीरदास, गोस्वामी तुलसीदास, सूरदास, गुरु नानकदेव, संत रैदास, पूर्वेकडे चैतन्य महाप्रभु, आणि शंकर देव यांच्यासारख्या संतांच्या विचारांनी अधिक तेजस्वी झाली. याच संतांचा, या महापुरुषांचा इतका प्रभाव देशावर होता की, त्या प्रभावामुळेच भारत त्या काळात अनेक आपत्तींना तोंड देत पुढे वाटचाल करू शकला, स्वतःचे रक्षण करू शकला.

आदि शंकराचार्यांनी देशाच्या चारही कोप-यांमध्ये जाऊन लोकांना संसाराच्या पलीकडे जाऊन ईश्वरामध्ये लीन होण्याचा मार्ग दाखवला. रामानुजाचार्यांनी विशिष्ट द्वैतवादाचा सिद्धांत मांडला. त्यांनी जातीच्या सीमांच्या पलीकडे जात ईश्वराला प्राप्त करण्याचा मार्ग दाखवला.

ते म्हणायचे कर्म, ज्ञान आणि भक्तीद्वारेच ईश्वराला प्राप्त करता येऊ शकते. त्यांनीच दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करत संत रामानंद यांनी सर्व जाती आणि धर्मांच्या लोकांना आपले अनुयायी बनवत जातीभेदावर कठोर प्रहार केला.

संत कबीर यांनीही जाती प्रथा आणि कर्मकांडापासून समाज मुक्त करण्यासाठी अथक प्रयत्न केले.

ते म्हणायचे “पानी केरा बुलबुला- अस मानस की जात…

जीवनाचे इतके मोठे सत्य त्यांनी इतक्या सहजपणे सोप्या शब्दात आपल्या समाजासमोर मांडले.

गुरु नानक देव म्हणायचे, मानव की जात सभो एक पहचानबो.

संत वल्लभाचार्यांनी स्नेह आणि प्रेमाच्या मार्गावर वाटचाल करताना मुक्तीचा मार्ग दाखवला.

चैतन्य महाप्रभू यांनी देखील अस्पृश्यते विरोधात समाजाला नवी दिशा दाखवली.

संताची अशी साखळी भारताच्या जिवंत समाजाचेच प्रतिबिंब आहे, परिणाम आहे. समाजात जी काही आव्हाने येतात, त्याची उत्तरे आध्यात्मिक रूपात प्रकट होतात. म्हणूनच संपूर्ण देशात एखादाच असा जिल्हा किंवा तालुका असेल जिथे कोणत्याच संताचा जन्म झाला नसेल. भारतीय समाजाच्या समस्यांचे उत्तर संताकडून मिळाले.

आपले जीवन, आपले उपदेश आणि साहित्य यांच्या माध्यमातून त्यांनी समाजाला सुधारण्याचे कार्य केले. भक्ती चळवळीच्या काळात धर्म, दर्शन आणि साहित्याचा असा त्रिवेणी संगम झाला जो आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देतो. याच काळात रहीम यांनी म्हटले होते

वे रहीम नर धन्य हैं,

पर उपकारी अंग,

बांटन वारे को लगे,

ज्यों मेहंदी को रंग…

याचा अर्थ ज्या प्रकारे मेंदी वाटणा-याच्या हाताला मेंदीचा रंग लागतो, त्याच प्रकारे जो परोपकारी असतो, जो दुस-याची मदत करतो, त्यांच्या कल्याणासाठी झटतो, आपोआपच त्याचे स्वतःचे देखील कल्याण होते.

भक्ती संप्रदायाच्या या कालखंडात रसखान, सूरदास, मलिक मोहम्मद जायसी, केशव दास, विद्यापती यांच्यासारखे महात्मे निर्माण झाले ज्यांनी आपल्या बोलीने, आपल्या साहित्याने केवळ समाजालाच आरसा दाखवला नाही तर त्या समाजाला सुधारण्याचेही प्रयत्न केले.

मानवाच्या या जीवनात कर्म, मनुष्याचे आचरण यांचे जे महत्त्व आहे त्याला आमच्या साधुसंतांनी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. गुजरातचे महान संत नरसी मेहता म्हणत असत,

वाच-काछ-मन निश्चलराखे, परधन नव झाले हाथ रे.

म्हणजे व्यक्ती आपल्या शब्दांना, आपल्या कार्यांना आणि आपल्या विचारांना नेहमी पवित्र राखतो. आपल्या हातांनी दुस-याच्या धनाला स्पर्श करू नका. आज देश जेव्हा काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात एवढी मोठी लढाई लढत आहे, त्या काळात हे विचार किती समर्पक झाले आहेत. जगाला अनुभव मंटप किंवा पहिल्या संसदेचा मंत्र देणारे महान समाजसुधारक वसेश्वर देखील म्हणायचे की, मनुष्याचे जीवन निष्काम कर्मयोगानेच उजळून जाईल. सामाजिक आणि वैयक्तिक आचरणामध्ये स्वार्थ आणणेच भ्रष्टाचाराचे पहिले कारण असते. निःस्वार्थ कर्मयोगाला जितके प्रोत्साहन दिले जाईल तितकेच समाजातील भ्रष्ट आचरण कमी होईल.

श्री मध्वाचार्यांनी नेहमीच या बाबींवर भर दिला की कोणतेही काम छोटे किंवा मोठे असत नाही.

अतिशय प्रामाणिकपणाने केलेले काम, संपूर्ण निष्ठेने केलेले कार्य ईश्वराची पूजा करण्याप्रमाणे असते.

ते म्हणायचे की, ज्या प्रकारे आम्ही सरकारला कर देतो तशाच प्रकारे आम्ही मानवतेची सेवा करतो, तेव्हा ही सेवा म्हणजे ईश्वराला कर दिल्यासारखीच असते.

आम्ही अभिमानाने सांगू शकतो भारताकडे अशी महान परंपरा आहे. असे महान संत मुनी होऊन गेले, ऋषीमुनी, महापुरुष निर्माण झाले ज्यांनी त्यांच्या तपश्चर्येचा, आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाचे भवितव्य बदलण्यासाठी केला, राष्ट्रनिर्माणासाठी केला आहे.

आपल्या संतांनी संपूर्ण समाजाला

जातीपासून जगाच्या दिशेने

स्वपासून समष्टीच्या दिशेने

अहम्‌पासून वयमच्या दिशेने

जीव कडून शिव च्या दिशेने

जीवात्म्याकडून परमात्म्याच्या दिशेने

जाण्यासाठी प्रेरित केले.

स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, ज्योतिबा फुले, डॉक्टर भीमराव आंबेडकर, महात्मा गांधी, पांडुरंगशास्त्री आठवले, विनोबा भावे यांच्यासारख्या अगणित संतपुरुषांनी भारताच्या आध्यात्मिक प्रवाहाला नेहमीच चेतनामय राखले. समाजात चालत आलेल्या कुप्रथांच्या विरोधात लोकचळवळ सुरू केली.

जातीपाती नष्ट करण्यापासून ते जनजागृती पर्यंत, भक्तीपासून जनशक्ती पर्यंत, सती प्रथेला आळा घालण्यापासून स्वच्छता वाढवण्यापर्यंत, सामाजिक समरसतेपासून शिक्षणापर्यंत, आरोग्यापासून साहित्यापर्यंत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे आणि जनमानसात बदल केला आहे. त्यांच्यासारख्या महान विभूतींनी देशाला एक असे सामर्थ्य दिले आहे जे अद्भुत, अतुलनीय आहे.

बंधु आणि भगिनींनो,

सामाजिक कुप्रथांना संपुष्टात आणत राहण्याच्या अशा महान संत परंपरेमुळेच आपल्याला अनेक शतकांच्या सांस्कृतिक वारशाची प्राप्ती झाली आहे. अशा या महान संत परंपरेमुळेच आपण राष्ट्रीय एकीकरण आणि राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पनेला साकार करत राहिलो आहोत.

असे संत कोणत्या एका युगापुरते मर्यादित राहिले नाहीत तर ते युगानुयुगे आपले प्रभाव पाडत राहिले आहेत. आपल्या देशातील संतांनी नेहमीच आपल्या समाजाला हीच प्रेरणा दिली की कोणत्याही धर्मापेक्षाही जर काही मोठे असेल तर तो म्हणजे मानवधर्म आहे.

आजही आपल्या देशासमोर, आपल्या समाजासमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना तोंड देण्यामध्ये संत समाज आणि मठ मोठे योगदान देत आहेत. जेव्हा संत समाज सांगतो की स्वच्छता म्हणजेच ईश्वर आहे त्या वेळी त्यांच्या उपदेशाचा परिणाम सरकारच्या कोणत्याही मोहिमेपेक्षा जास्त असतो.

आर्थिक रुपातील शुद्धतेची प्रेरणाही यातूनच मिळते. भ्रष्ट आचरण जर आजच्या समाजासमोरील आव्हान असेल तर त्यावरील उपाय देखील आधुनिक संत समाज देऊ शकतो.

पर्यावरण संरक्षणामध्ये संत समाजाची मोठी भूमिका आहे. आपल्या संस्कृतीमध्ये तर वृक्षांना सजीव मानण्यात आले आहे, जीवनयुक्त मानले गेले आहे. नंतर भारताचेच एक सुपुत्र आणि महान शास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी ही वस्तुस्थिती जगासमोर सिद्ध केली.

नाहीतर पूर्वी ही बाब जगाला मान्य नव्हती आणि यावरून आपली चेष्टा केली जायची.

आपल्यासाठी निसर्ग माता आहे, उधळपट्टी करण्यासाठी नाही, सेवा करण्यासाठी आहे. आपल्याक़डे वृक्षांसाठी आपल्या जीवाचा त्याग करण्याची परंपराही दिसून आली आहे. फांदी तोडण्यापूर्वी देखील प्रार्थना केली जाते. प्राणीमात्र आणि वनस्पती यांच्या विषयी संवेदना बाळगण्याची शिकवण तर आपल्याला बालपणापासूनच दिली जाते.

आपण रोज आरती केल्यानंतर शांती मंत्रामध्ये वनस्पतयः शांती आपः शांती म्हणत असतो. पण हे देखील खरे आहे की, काळानुरूप ही परंपरा देखील लोप पावण्याच्या मार्गावर आहे. आज संत समाजाला या दिशेने आपल्या प्रयत्नांमध्ये वाढ करावी लागेल. जे आपल्या ग्रंथांमध्ये आहे, जे आपल्या परंपरेचा भाग आहे त्याला आचरणात आणल्यानेच हवामान बदलाच्या आव्हानाला तोंड देता येऊ शकेल.

आजही तुम्ही पाहा, संपूर्ण जगातील देशांच्या जीवन जगण्याच्या मार्गात कोणतेही अडथळे येतात तेव्हा संपूर्ण जगाच्या नजरा भारताची संस्कृती आणि सभ्यतेच्या दिशेने वळतात.

एका प्रकारे जगातील सर्व समस्यांचे उत्तर भारतीय संस्कृतीमध्ये आहे. भारतामध्ये ही बाब स्वीकारार्ह आहे की एका ईश्वराच्या अनेक रूपांची पूजा करता येऊ शकते. ऋग्वेदामध्ये सांगितले आहे,

एकम सत विप्रा बहुधा वदन्ति…

एकाच परमसत्याला विविध नावांनी आळवले जाते. विविधतेचा आम्ही केवळ स्वीकारच करत नाही तर त्या विविधतेचा उत्सव साजरा करतो.

आम्ही वसुधैव कुटुंबकम्‌… म्हणजेच संपूर्ण पृथ्वीला एक कुटुंब मानणारे लोक आहोत. आम्ही म्हणतो, सहनाववतु-सह नौ भुनक्तु… सर्वांचे पोषण होऊ दे, सर्वांना शक्ती मिळू दे, कोणही कोणाचा मत्सर करू नये. कट्टरवादावर हाच तोडगा आहे. दहशतवादाचे मूळ माझेच म्हणणे खरे असे वाटणा-या कट्टरतेमध्ये आहे. भारतात केवळ सिद्धांताच्या रूपात नव्हे तर प्रत्यक्षातही अनेक प्रकारे उपासना करणारे लोक अनेक शतकांपासून राहात आहेत. आम्ही सर्वधर्म समभाव मानणारे लोक आहोत.

मला असे वाटते की आजच्या या युगात जर आपण सर्व एकत्रित राहात आहोत, समाजामध्ये पसरलेल्या अनिष्ट गोष्टींना आळा घालण्याचा प्रयत्न करत आहोत, देशाच्या विकासासाठी जर आपण प्रयत्नशील आहोत, त्याचे एक सर्वात मोठे कारण म्हणजे साधु संतांनी दाखवलेला ज्ञान, कर्म आणि भक्तीची प्रेरणा आहे.

आज पूजेच्या देवाबरोबरच राष्ट्रदेवाचीही चर्चा झाली पाहिजे ही काळाची गरज आहे. पुजेमध्ये आपल्या इष्ट देवतेबरोबरच भारतमातेचेही स्मरण झाले पाहिजे. निरक्षरपणा, अज्ञान, कुपोषण, काळा पैसा भ्रष्टाचार यांसारख्या वाईट गोष्टींनी आपल्या देशाला विळखा घातला आहे. यातून आपल्या देशाला मुक्त करण्यासाठी संत समाज देशाला मार्ग दाखवत आहे.

मी या ठिकाणी अशी इच्छा व्यक्त करतो की, तुम्ही सर्वांनी आध्यात्माद्वारे आपल्या देशातील प्राणशक्तीचा अनुभव लोकांना देत राहावा. वयम अमृतस्य पुत्राहाः या भावनेने लोकशक्तीला आणखी मजबूत करत राहाल. मी याच शब्दांनी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.

खूप खूप धन्यवाद.

B.Gokhale/S.Patil/Anagha