छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टी.एस. सिंहदेव जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, भगिनी रेणुका सिंह जी, खासदार महोदया, आमदार आणि छत्तीसगडचे माझे प्रिय कुटुंबीयजन!
छत्तीसगड आज विकासाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकत आहे. छत्तीसगडला आज 6400 कोटी रुपयांहून अधिक रेल्वे प्रकल्पांची भेट मिळत आहे. ऊर्जा उत्पादनात छत्तीसगडची क्षमता वाढवण्यासाठी आणि आरोग्य क्षेत्रात आणखी सुधारणा करण्यासाठी आज अनेक नवीन योजनांचा शुभारंभ झाला आहे. आज येथे सिकलसेल समुपदेशन पत्रांचेही वाटप करण्यात आले.
मित्रांनो,
आज संपूर्ण जग आधुनिक विकासाच्या वेगवान गती सोबतच गरीब कल्याणाच्या वेगाचे भारतीय प्रारुप पाहत आहे आणि त्याचे कौतुकही करत आहे. तुम्ही सर्वांनी पाहिले असेल की काही दिवसांपूर्वी जी-20 परिषदेदरम्यान मोठमोठ्या देशांचे प्रमुख दिल्लीत आले होते. भारताचा विकास आणि गरीब कल्याणकारी प्रयत्नांचा या सर्वांवर प्रभाव पडला आहे. आज जगातील मोठमोठ्या संस्था भारताच्या यशातून शिकायला हवे याविषयी बोलत आहेत. कारण आज देशाच्या प्रत्येक राज्याला आणि प्रत्येक क्षेत्राला विकासात समान प्राधान्य मिळत आहे. आणि उपमुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला मिळून देशाला पुढे न्यायचे आहे. छत्तीसगड आणि रायगडचा हा परिसरही याचा साक्षीदार आहे. या विकासकामांसाठी मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
माझ्या कुटुंबीयांनो,
छत्तीसगड हे आमच्यासाठी देशाच्या विकासाचे (उर्जास्थळ) ‘पॉवर हाऊस’ आहे. आणि देशालाही पुढे जाण्याची ऊर्जा तेव्हाच मिळेल जेव्हा देशाची ही ‘पॉवर हाऊस’ पूर्ण ताकदीने काम करतील. याच विचाराने गेल्या 9 वर्षांत आम्ही छत्तीसगडच्या बहुआयामी विकासासाठी सातत्याने काम केले आहे. त्या दूरदृष्टीचे आणि त्या धोरणांचे परिणाम आपण आज येथे पाहू शकतो. आज छत्तीसगडमध्ये केंद्र सरकारकडून प्रत्येक क्षेत्रात मोठ्या योजना पूर्ण केल्या जात आहेत, नवनवीन प्रकल्पांचा पाया रचला जात आहे. तुम्हाला आठवत असेल, नुकतेच मी जुलै महिन्यात रायपूरला विकास प्रकल्पांसाठी आलो होतो. त्यानंतर मला विशाखापट्टणम ते रायपूर आर्थिक कॉरिडॉर आणि रायपूर ते धनबाद आर्थिक कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांची पायाभरणी करण्याचे सौभाग्य लाभले. आपल्या राज्याला अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गांचीही भेट देण्यात आली होती. आणि आज, छत्तीसगडच्या रेल्वे नेटवर्कच्या विकासात एक नवीन अध्याय लिहिला जात आहे. या रेल्वे नेटवर्कमुळे बिलासपूर-मुंबई रेल्वे मार्गावरील झारसगुडा बिलासपूर विभागातील व्यस्तता कमी होईल. त्याचप्रमाणे इतर जे रेल्वे मार्ग सुरु होत आहेत, रेल्वे कॉरिडॉर बांधले जात आहेत, छत्तीसगडच्या औद्योगिक विकासाला ते नवी उंची देतील. या मार्गांचे काम पूर्ण होईल तेव्हा छत्तीसगडच्या लोकांना केवळ सुविधाच उपलब्ध होणार नाहीत, तर येथे नवीन रोजगार आणि उत्पन्नाच्या संधीही निर्माण होतील.
मित्रांनो,
केंद्र सरकारच्या आजच्या प्रयत्नांमुळे देशाचे ‘पॉवर हाऊस’ म्हणून छत्तीसगडची ताकदही अनेक पटींनी वाढत आहे. कोळसाखाणीतून वीजनिर्मिती केंद्रापर्यंत कोळसा वाहून नेण्याचा खर्च कमी होईल आणि वेळही कमी लागेल. कमी खर्चात जास्तीत जास्त वीज निर्मिती करण्यासाठी सरकार ‘पिट हेड औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प’ देखील उभारत आहे. तलाईपल्ली खाणीला जोडण्यासाठी 65 किमीच्या ‘मेरी गो राउंड प्रकल्पा’चेही उद्घाटन करण्यात आले आहे. येत्या काळात देशात अशा प्रकल्पांची संख्या वाढणार असून, छत्तीसगडसारख्या राज्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
माझ्या कुटुंबीयांनो,
अमृतकालाच्या पुढील 25 वर्षात आपल्याला आपला देश विकसित बनवायचा आहे. प्रत्येक देशवासीयांचा विकासात समान सहभाग असेल तेव्हाच हे काम पूर्ण होईल. आपल्याला देशाच्या ऊर्जेचीही गरज भागवायची आहे आणि आपल्या पर्यावरणाचीही काळजी घ्यायची आहे. याच विचारातून सूरजपूर जिल्ह्यातील बंद असलेली कोळसा खाण पर्यावरणस्नेही पर्यटन म्हणून विकसित करण्यात आली आहे. कोरवा परिसरातही असेच पर्यावरणस्नेही क्षेत्र विकसित करण्याचे काम सुरू आहे. खाणीतून निघालेल्या पाण्याद्वारे आज हजारो लोकांना सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या सर्व प्रयत्नांचा थेट फायदा या भागातील आदिवासी समाजातील लोकांना होणार आहे.
मित्रांनो,
वनसंपदेच्या माध्यमातून आपण जंगल आणि जमिनीचे रक्षणही करू आणि समृद्धीचे नवे मार्गही खुले करु, हा आमचा संकल्प आहे. आज देशातील लाखो आदिवासी युवक वनधन विकास योजनेचा लाभ घेत आहेत. या वर्षी जग भरडधान्य वर्षही साजरे करत आहे. आपण कल्पना करू शकता, येत्या काही वर्षांत आपली श्रीअन्न आणि भरडधान्ये किती मोठी बाजारपेठ निर्माण करू शकतात. म्हणजेच आज एकीकडे देशाच्या आदिवासी परंपरेला नवी ओळख मिळत आहे, तर दुसरीकडे प्रगतीचे नवे मार्गही खुले होत आहेत.
माझ्या कुटुंबीयांनो,
सिकलसेल अॅनिमियासाठी आज येथे वाटप केलेली समुपदेशन पत्रे देखील विशेषत: आदिवासी समाजासाठी एक मोठी सेवा आहे. आपल्या आदिवासी बांधवांना सिकलसेल अॅनिमियाचा सर्वाधिक फटका बसतो. आपण योग्य माहितीने एकत्रितपणे या आजारावर नियंत्रण ठेवू शकतो. ‘सबका साथ, सबका विकास’ हा संकल्प घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. मला विश्वास आहे की छत्तीसगडच्या विकासाच्या प्रवासात केन्द्र सरकारने उचललेली सर्व पावले छत्तीसगडला विकासाच्या नवीन उंचीवर नेतील. याच संकल्पासह मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. पुढील कार्यक्रमात मी काही गोष्टी विस्ताराने सांगेन. आजच्या या कार्यक्रमासाठी एवढेच. खूप खूप धन्यवाद!
***
Shilpa P/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
The railway and healthcare projects being launched in Chhattisgarh will give impetus to the state's socioeconomic development. https://t.co/EE8eIg9HQN
— Narendra Modi (@narendramodi) September 14, 2023
आधुनिक विकास की तेज रफ्तार के साथ ही गरीब कल्याण में भी तेज रफ्तार का भारतीय मॉडल आज पूरी दुनिया देख रही है, उसकी सराहना कर रही है। pic.twitter.com/oWp5T1jSJS
— PMO India (@PMOIndia) September 14, 2023
आज विकास में देश के हर राज्य को, हर इलाके को बराबर प्राथमिकता मिल रही है। pic.twitter.com/ShaA1zKOFf
— PMO India (@PMOIndia) September 14, 2023
बीते 9 वर्षों में हमने छत्तीसगढ़ के बहुमुखी विकास के लिए निरंतर काम किया है। pic.twitter.com/3VrChiUn49
— PMO India (@PMOIndia) September 14, 2023