नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘व्हीनस ऑर्बिटर मिशनला (व्हीओएम)’, मंजुरी दिली. हे मिशन चंद्र आणि मंगळ ग्रहाबरोबरच शुक्र ग्रहावरील संशोधन आणि अभ्यासाच्या सरकारच्या दृष्टीकोनाच्या दिशेने एक महत्वाचे पाउल ठरेल.
शुक्र, हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह असून, पृथ्वीच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत ठरलेली परिस्थिती या ग्रहाच्या उत्पत्ती मागे देखील असल्याचे समजले जाते, तसेच ग्रहांवरील वातावरण अतिशय वेगळ्या पद्धतीने कसे विकसित होऊ शकते हे जाणून घेण्याची अनोखी संधी देतो.
अंतराळ विभागाद्वारे हाती घेण्यात येणाऱ्या ‘व्हीनस ऑर्बिटर मिशन’ मध्ये शुक्र ग्रहाच्या कक्षेत वैज्ञानिक अंतराळ यान स्थिर केले जाईल, ज्यामुळे शुक्राचा पृष्ठभाग आणि उप पृष्ठभाग, वातावरणातील प्रक्रिया आणि शुक्र ग्रहाच्या वातावरणावरील सूर्याचा प्रभाव अभ्यासता येईल.
शुक्र ग्रह, जेथे कधी काळी जीव सृष्टी अस्तित्वात होती, आणि तो पृथ्वीसारखाच होता, असे समजले जाते, त्या ग्रहाच्या परिवर्तनामागील मूळ कारणांचा अभ्यास, शुक्र आणि पृथ्वी या दोन्ही भगिनी ग्रहांची उत्क्रांती समजून घेण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल.
अंतराळयानाचा विकास आणि त्याचे प्रक्षेपण करण्याची जबाबदारी इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था पार पाडेल. इस्रो मधील प्रचलित पद्धतींद्वारे प्रकल्पाचे प्रभावीपणे व्यवस्थापन आणि परीक्षण केले जाईल. मिशनमधून प्राप्त झालेला डेटा (विदा) सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणांद्वारे वैज्ञानिक समुदायामध्ये प्रसारित केला जाईल.
मार्च 2028 मधील संधींच्या उपलब्धतेनुसार हे मिशन पूर्ण होईल असे अपेक्षित आहे. भारतीय व्हीनस मिशन मधून, विविध वैज्ञानिक परिणामांमधून उत्पन्न होणार्या काही विशिष्ट वैज्ञानिक प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे.
अंतराळयान आणि प्रक्षेपण वाहनाची आपूर्ती विविध उद्योगांद्वारे होणार असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या इतर विभागांमध्ये रोजगार आणि तंत्रज्ञानाला मोठी चालना मिळेल असा अंदाज आहे.
व्हीनस ऑर्बिटर मिशन (VOM) साठी मंजूर झालेला एकूण निधी रु. 1236 कोटी इतका असून, त्यापैकी रु. 824.00 कोटी अंतराळयानावर खर्च केले जातील. स्पेसक्राफ्टचे विशिष्ट पेलोड्स आणि तांत्रिक घटकांसह त्याचा विकास आणि प्राप्ती, नेव्हिगेशन (दिशादर्शन) आणि नेटवर्कसाठी ग्लोबल ग्राउंड स्टेशन सपोर्टचा खर्च तसेच प्रक्षेपण यानाची किंमत, या खर्चाचा यात समावेश आहे.
शुक्राच्या दिशेने प्रवास
हे अभियान मोठ्या पेलोडसह, ग्रहांच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या दृष्टीने, भारताला भविष्यातील ग्रह मोहिमांसाठी सक्षम करेल. अंतराळयान आणि प्रक्षेपण वाहनाच्या विकासामध्ये भारतीय उद्योग क्षेत्राचा महत्वाचा वाटा असेल. डिझाईन, विकास, चाचणी, चाचणी डेटा कमी करणे, कॅलिब्रेशन इत्यादींचा समावेश असलेल्या प्रक्षेपण-पूर्व टप्प्यात विविध शैक्षणिक संस्थांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजित आहे. हे मिशन आपल्या अनोख्या प्रक्रियेद्वारे भारतीय वैज्ञानिक समुदायाला नवीन आणि मोलाचा वैज्ञानिक डेटा प्रदान करेल, आणि त्याद्वारे भविष्यात नवीन संधी उपलब्ध करेल.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
Glad that the Cabinet has cleared the Venus Orbiter Mission. This will ensure more in-depth research to understand the planet and will provide more opportunities for those working in the space sector.https://t.co/nyYeQQS0zA
— Narendra Modi (@narendramodi) September 18, 2024