Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गोव्यात पणजी येथे हर घर जल उत्सवात पंतप्रधानांनी ध्वनीचित्रफीतीद्वारे दिलेला संदेश

गोव्यात पणजी येथे  हर घर जल उत्सवात पंतप्रधानांनी ध्वनीचित्रफीतीद्वारे दिलेला संदेश


नमस्कार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत जी, गोवा सरकारमधील अन्य मंत्री, अन्य मान्यवर , महिला आणि पुरुषगण , आज एक अतिशय महत्वाचा आणि पवित्र दिवस आहे. देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह आहे. सर्व देशवासियांना, जगभरातील भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांना खूप-खूप शुभेच्छा. जय श्री कृष्ण.

आजचा हा कार्यक्रम गोव्यात होत आहे. मात्र आज मला सर्व देशवासियांसोबत देशाने साध्य केलेल्या तीन मोठ्या उपलब्धी सामायिक करायच्या आहेत. आणि ही गोष्ट मी संपूर्ण देशाबाबत सांगत आहे. भारताच्या या कामगिरीबाबत जेव्हा माझ्या देशबांधवांना समजेल, तेव्हा त्यांना आणि विशेषतः आपल्या माता-भगिनींना खूप अभिमान वाटेल असा मला पूर्ण विश्वास आहे. अमृतकालमध्ये भारत ज्या मोठ्या उद्दिष्टांवर काम करत आहे, त्यांच्याशी संबंधित तीन महत्त्वाचे टप्पे आज आपण पूर्ण केले आहेत. पहिला टप्पा- आज देशातील 10 कोटी ग्रामीण कुटुंबे पाईपद्वारे स्वच्छ पाण्याच्या सुविधेशी जोडली गेली आहेत. प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याच्या सरकारच्या मोहिमेचे हे मोठे यश आहे.‘सबका प्रयास’चे हे एक उत्तम उदाहरण देखील आहे . या कामगिरीसाठी मी प्रत्येक देशवासियाचे आणि विशेषतः माता-भगिनींचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

देशाने आणि विशेषतः गोव्याने आज एक मोठे यश मिळवले आहे. आज गोवा देशाचे पहिले हर घर जल प्रमाणित राज्य बनले आहे. दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव हे देखील हर घर जल प्रमाणित केंद्र शासित प्रदेश बनले आहेत. गेल्या काही वर्षात प्रत्येक मोठ्या अभियानात गोवा अग्रेसर राहिले आहे. मी गोव्याच्या जनतेचे , प्रमोद जी आणि त्यांच्या टीमचे, गोवा सरकारचे , स्थानिक स्वराज्य संस्थांचे , प्रत्येकाचे खूप-खूप अभिनंदन करतो.तुम्ही ज्याप्रकारे हर घर जल अभियानाला पुढे नेत आहात ते संपूर्ण देशाला प्रेरित करणारे आहे. मला आनंद आहे की येत्या काही महिन्यांत आणखी अनेक राज्ये या यादीत सामील होणार आहेत.

मित्रांनो,

देशाची तिसरी सफलता स्वच्छ भारत अभियानाशी संबंधित आहे. काही वर्षांपूर्वी सर्व देशवासियांच्या प्रयत्नांमुळे देश घोषित झाला होता. त्यानंतर आम्ही गावांना हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला होता. म्हणजे, सामुदायिक शौचालये, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन आणि गोबरधन प्रकल्प अशा सुविधा विकसित केल्या जातील. याबाबतीतही देशाने महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. आता देशातील विविध राज्यांमधील एक लाखांहून अधिक गावे हागणदारीमुक्त(ओडीएफ प्लस )झाली आहेत. हे तिन्ही महत्वाचे टप्पे पार करणाऱ्या सर्व राज्यांचे, सर्व गावांचे खूप-खूप अभिनंदन.

मित्रांनो,

आज जगातील मोठमोठ्या संस्था म्हणत आहेत की 21व्या शतकातील आव्हानांपैकी एक आव्हान जल सुरक्षेचे असणार आहे. पाणी टंचाई हा विकसित भारताच्या संकल्प सिद्धितला खूप मोठा अडथळा ठरू शकतो. पाण्याच्या अभावी सामान्य मानव, गरीब, मध्यम वर्गीय , शेतकरी आणि उद्योग-धंदे , सर्वांचेच खूप नुकसान होते. या सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सेवा भाव , कर्तव्य भावनेने चोवीस तास काम करण्याची गरज आहे. आमचे सरकार गेली आठ वर्षे याच भावनेतून जल सुरक्षा संबंधित कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे खरे आहे की सरकार स्थापन करण्यासाठी इतकी मेहनत घ्यावी लागत नाही जितकी, देश घडवण्यासाठी करावी लागते. आणि सर्वांच्या प्रयत्नांतून ते साध्य होते.आपण सर्वांनी राष्ट्र उभारणीचा मार्ग निवडला आहे. म्हणूनच आम्ही वर्तमान आणि भविष्यातील आव्हानांवर निरंतर तोडगा काढत आहोत. ज्यांना देशाची काळजी नसते अशांना देशाचे वर्तमान किंवा भविष्याच्या नुकसानाची पर्वा नसते. असे लोक पाण्यासाठी मोठमोठ्या गप्पा मारू शकतात, मात्र पाण्यासाठी कधीही दूरदृष्टीने काम करू शकत नाहीत.

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या अमृत काळात जल सुरक्षा, भारताच्या प्रगतीत अडथळा बनायला नको, यासाठी गेल्या 8 वर्षांपासून जल सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला आहे. कॅच द रेन (पाऊस अडवा) असो, अटल भूजल योजना असो, देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांचे बांधकाम असो, नदी जोड प्रकल्प असो, अथवा मग जल जीवन मिशन, या सर्वाचे ध्येय आहे – देशाच्या सर्वसामान्य नागरिकांची जल सुरक्षा. काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की भारतात आता रामसर स्थळ, म्हणजेच पाणथळ जागांची संख्या वाढून 75 झाली आहे. यातील 50 स्थळे गेल्या आठ वर्षांतच यात जोडली गेली आहेत. म्हणजे जल सुरक्षेसाठी भारत चौफेर प्रयत्न करत आहे आणि प्रत्येक दिशेला याचे परिणाम देखील दिसून येत आहेत.

मित्रांनो,

जल आणि पर्यावरणाविषयी हीच कटिबद्धता जल जीवन मिशनच्या 10 कोटीच्या टप्प्यात दिसून येते. अमृत काळाची याहून उत्तम सुरवात कुठली असू शकते. केवळ 3 वर्षांतच जल जीवन मिशन अंतर्गत 7 कोटी ग्रामीण कुटुंबांना पाईपलाईनद्वारे पाण्याची सुविधा देण्यात आली आहे. ही काही साधी गोष्ट नाही. स्वातंत्र्याच्या 7 दशकांत देशात केवळ 3 कोटी ग्रामीण कुटुंबांनाच नळाद्वारे पाणीपुरवठा होत होता. देशात जवळपास 16 कोटी ग्रामीण कुटुंबे अशी होती, ज्यांना पाण्यासाठी बाहेरच्या स्रोतांवर अवलंबून राहावे लागत असे. ग्रामीण भागांतल्या इतक्या मोठ्या लोकसंख्येला आपण या मुलभूत गरजेसाठी संघर्ष करावा लागण्याच्या परिस्थितीत आपण तसेच ठेवू शकत नव्हतो. म्हणून 3 वर्षांपूर्वी मी लाल किल्ल्यावरून भाषणात घोषणा केली होती की प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचवले जाईल. नवे सरकार बनल्यानंतर आम्ही जल शक्ती, हे वेगळे मंत्रालय तयार केले. या मोहिमेवर 3 लाख 60 हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. शतकातील सर्वात मोठ्या महामारीमुळे अनेक अडथळे आले, तरीही या मोहिमेचा वेग कमी झाला नाही. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच गेल्या 7 दशकांत जितकं काम झालं त्याच्या दुपटीपेक्षा जास्त काम गेल्या 3 वर्षांत करून दाखवलं आहे. हे त्याच मानव केंद्रित विकासाचं उदाहरण आहे, ज्याच्याविषयी मी या वर्षी लाल किल्ल्यावरून बोललो आहे. प्रत्येक घरात पाणी पोचते तेव्हा सर्वात जास्त फायदा आपल्या भगिनींना होतो, येणाऱ्या पिढ्यांना होतो, कुपोषणा विरुद्धची आमची लढाई अधिक मजबूत होते. पाण्याशी संबंधित प्रत्येक समस्येचा सर्वाधिक फटका आपल्या माता भगिनींना बसतो, म्हणून या मोहिमेच्या केंद्र स्थानी आपल्या भगिनी – मुली आहेत. ज्या घरांत पिण्याचे शुद्ध पाणी पोचते, तिथे आता भगिनींचा वेळ वाचतो. कुटुंबातल्या मुलांना दुषित पाण्यामुळे होणारे आजार देखील कमी होत आहेत.

मित्रांनो,

जल जीवन मिशन, हे खऱ्या लोकशाहीचे, पूज्य बापूंनी ज्या ग्राम स्वराजाचे स्वप्न बघितले होते, त्याचे देखील उत्तम उदाहरण आहे. मला आठवतं, जेव्हा मी गुजरातमध्ये होतो, तेव्हा कच्छच्या जिल्ह्यांत माता – भगिनींवर पाण्याशी संबंधित विकास कामाची जबाबदारी सोपवली होती. हा प्रयोग इतका यशस्वी झाला की याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देखील मिळाला. आज हाच प्रयोग जल जीवन मिशनची देखील महत्वाची प्रेरणा आहे. जल जीवन मोहीम केवळ एक सरकारी योजना नाही, तर ही समाजाद्वारे, समाजासाठी चालवली जाणारी योजना आहे.

मित्रांनो,

जल जीवन मिशनच्या यशाचं कारण आहे त्याचे चार मजबूत स्तंभ. पहिला – लोकसहभाग, दुसरा – भागीदारी, प्रत्येक हितसंबंधीतांची भागीदारी, तिसरा – राजकीय इच्छाशक्ती आणि चौथा – स्रोतांचा पूर्ण वापर.

बंधू आणि भगिनींनो,

जल जीवन मिशन अंतर्गत ज्या प्रमाणे पंचायतींना, ग्राम सभांना, गावातील स्थानिक लोकांना सहभागी करून घेतलं आहे, ज्या प्रमाणे त्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत, हे अतिशय अभूतपूर्व आहे. प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे जे कार्य होत आहे, त्यात खेड्यांतील लोकांचे सहकार्य घेतले जाते. गावातले लोकच आपल्या गावात जल सुरक्षेसाठी गावाचा कृती आराखडा तयार करत आहेत.

पाण्याचे जे मूल्य घेतले पाहिजे, ते सुद्धा गावातले लोकच निश्चित करीत आहेत. पाण्याच्या परीक्षण कामामध्ये गावातले लोक जोडले गेले आहेत. 10 लाखांपेक्षा जास्त महिलांना या कामाचे प्रशिक्षण दिले आहे. पाणी समितीमध्ये कमीत कमी 50 टक्के महिलांना स्थान देण्यात आले आहे. जो भाग आदिवासी क्षेत्रातला आहे, तिथे वेगाने काम व्हावे, याला प्राधान्य दिले जात आहे. जल जीवन मिशनचा दुसरा स्तंभ आहे – सहभागीता! राज्य सरकार असो, पंचायत असो, स्वयं सेवी संस्था असो, शिक्षण संस्था असो, सरकारचे वेगवेगळे विभाग आणि मंत्रालय असे सर्वजण मिळून काम करीत आहेत. याचा अगदी मूलभूत, खालच्या स्तरावर खूप मोठा लाभ मिळत आहे.

मित्रांनो,

जल जीवन मिशनच्या यशाचा तिसरा स्तंभ आहे राजकीय इच्छाशक्ती! गेल्या 70 वर्षांमध्ये जितके काही केले गेले, त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त काम सात वर्षांपेक्षाही कमी कालावधीत केले गेले आहे. लक्ष्य अतिशय अवघड आहे, मात्र जर का भारतातल्या लोकांनी एकदा का ठाम निर्धार केला तर एखादे लक्ष्य गाठले जाणार नाही, असे कोणतेही लक्ष्य नाही. केंद्र सरकार, राज्य सरकारे, ग्राम पंचायती असे सर्व जण या मोहिमेच्या पूर्ततेसाठी कार्यरत झाली आहेत. जल जीवन मिशनचा स्त्रोतांचा योग्य वापर, असलेल्या साधनांचा जास्तीत जास्त विनियोग यावरही तितकाच भर आहे. मनरेगासारख्या योजनांचे कार्य जल जीवन मिशनला गती देत आहेत. त्यांचीही मदत घेतली जात आहे. या मिशन अंतर्गत जे कार्य होत आहे, त्यामुळे गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. या मिशनचा एक लाभ असाही होणार आहे की, ज्यावेळी प्रत्येक घरामध्ये नळाव्दारे पाणी पोहोचेल, त्यावेळी सम्पृक्ततेची स्थिती ज्यावेळी येईल, त्यावेळी पक्षपात आणि भेदभाव अशी परिस्थितीच राहणार नाही.

मित्रांनो,

या मोहिमेच्या काळामध्ये जे पाण्याचे नवीन स्त्रोत बनविण्यात येत आहेत, पाण्याच्या टाक्या बनविण्यात येत आहेत, जल प्रक्रिया केंद्र- प्रकल्प उभे करण्यात येत आहेत, पंप हाऊस बनविण्यात येत आहेत. या सर्व कामांचे जिओ -टॅगिंगही केले जात आहे. पाण्याची पूर्तता आणि गुणवत्ता यांचे परीक्षण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच ‘इंटरनेट ऑफ थिंग्जच्या माध्यमातून उपयोग करण्यास प्रारंभ झाला आहे. याचा अर्थ लोकशक्ती, महिला शक्ती आणि तंत्रज्ञानाची शक्ती एकत्रित येऊन जल जीवन मिशनची शक्ती वाढवत आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की, ज्या प्रकारे संपूर्ण देश परिश्रम घेत आहे, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये नळाव्दारे पाणी पोहोचविण्याचे लक्ष्य आपण नक्कीच प्राप्त करू.

या शुभप्रसंगी एकदा गोव्याचे, गोवा सरकारचे, गोव्यातल्या नागरिकांचे, त्यांनी हे मोठे यश मिळविल्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो. आणि देशवासियांनाही विश्वास देवू इच्छितो की, तीन वर्षांपूर्वी लाल किल्ल्यावरून जे स्वप्न पाहिले होते, ग्राम पंचायतीपासून ते सर्व संस्थांच्या मदतीने ते स्वप्न आता पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. मी पुन्हा एकदा कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो ! खूप -खूप धन्यवाद!!