Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गोव्यातल्या मोपा ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इलेक्ट्रॉनिक सिटीच्या पायाभरणी समारंभातले पंतप्रधानांचे भाषण

गोव्यातल्या मोपा  ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इलेक्ट्रॉनिक सिटीच्या पायाभरणी  समारंभातले पंतप्रधानांचे भाषण


 

लक्ष्मीकांतजी मला  म्हणत होते की, रात्री उशिराने मी जपानहून परतलो आणि सकाळी आपल्या सेवेसाठी हजर झालो. इथून कर्नाटकला जाईन, कर्नाटकहून महाराष्ट्रात आणि रात्री उशिराने दिल्लीत जाऊन बैठकही घेईन. पंतप्रधान झाल्यानंतर देशातल्या कोणत्या राज्यात एका रात्रीपेक्षा जास्त मुक्काम केला असेल तर तो गोव्यात. मी आज गोव्यातल्या लाखो नागरिकांचे, वैयक्तिक अभिनंदन करू इच्छितो, आभार व्यक्त करू इच्छितो, गोवा सरकारचे, अभिनंदन करू इच्छितो. मनोहरजी, लक्ष्मीकांतजी, त्यांच्या चमूचे आभार मानतो.

अनेक वर्षानंतर गोव्यात एक मोठा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, ब्रिक्स शिखर परिषद गोव्यात आयोजित करण्यात आला  होता. इतक्या शानदार पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता की, आज जगातल्या सर्व दिग्गज नेत्याच्या तोंडी एकच नाव आहे ते म्हणजे गोवा, गोवा आणि गोवा. म्हणूनच मी सर्व गोवावासियांची, गोवा सरकारची, मुख्यमंत्र्यांची, मनोहरजींची, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची प्रशंसा करतो, अभिनंदन करतो, कारण यामुळे केवळ गोव्याची नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानची प्रतिष्ठा वाढली आहे, गौरव वाढला आहे आणि आपल्यामुळे तो वाढला आहे म्हणूनच स्वाभाविकपणे आपण अभिनंदनाला पात्र आहात.

बंधू-भगिनींनो, माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे. राजकीय अस्थिरतेच्या रोगाने गोव्याचे कसे नुकसान केले. काय काय घडत होते आपल्याला माहित आहे. कधी इकडे तर कधी तिकडे.राजकीय अस्थिरतेमुळे गोव्याचे सामर्थ्य, गोव्याच्या लोकांच्या सामर्थ्याला बहरण्याची  संधी मिळाली नाही. मनोहरजींचे  मी विशेष अभिनंदन करतो, त्यांनी एक राजकीय संस्कृती आणली. त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे, चांगले चांगले मित्रही गमवावे लागले. मात्र गोव्याला नव्या उंचीवर नेण्याच्या एकमात्र इराद्याने, गोव्यात स्थैर्य, पाच वर्ष एक सरकार राहावे, नीतीच्या आधारावर राहावे, लोककल्याणार्थ चालावे, हे त्यांनी करून दाखवले आहे. 2012 पासून 2017 पर्यंत स्थैर्याचा लाभ मोठ्या प्रमाणात गोव्याला प्राप्त झाला. म्हणूनच इथे दोन पक्ष मिळून सरकार चालवत आहेत आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे राजकीय स्थैर्य दिले आहे, कारण स्थिर सरकार निवडणे जनतेच्या हातात असते आणि गोव्याच्या जनतेने स्थिर सरकारची ताकत जाणली आहे, समजली आहे म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो, वंदन करतो.

या गोष्टीचा मला अत्यानंद होत आहे. मी पंतप्रधान आहे मात्र मी कोणत्या पक्षाचा आहे सर्वानाच माहित आहे. लक्ष्मीकांतजी मुख्यमंत्री आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत सर्वानाच माहित आहे. मनोहरजी  माझे सहकारी आहेत सर्वानाच माहित आहे कोणत्या पक्षाचे आहेत. आम्ही एकमेकांची स्तुती केली तर लोकांना वाटेल ठीक आहे तुम्ही करणारच स्तुती. मात्र मला आनंद आहे की एक आठवड्यापूर्वी एका स्वतंत्र एजंसीने, मोठ्या मीडिया हाऊसने, देशातल्या छोट्या राज्यांचा आढावा घेतला. वेगवेगळ्या निकषांवर सर्वेक्षण केले आणि आज मला आनंद होत आहे की माझ्या या सहकाऱ्यांनी छोट्या राज्यांमध्ये गोव्याला चमकत्या ताऱ्याप्रमाणे चमकत ठेवले आहे. देशातल्या सर्व छोट्या राज्यात वेगाने,मग सामाजिक सुरक्षा असू दे, आरोग्य असू दे, पायाभूत क्षेत्र असू दे, गोव्याला वेगाने नव्या उंचीवर नेऊन यांनी गोव्याला पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेवले आहे. यामध्ये गोवावासियांचे योगदान तर नक्कीच आहे, त्याशिवाय हे शक्यच नाही आणि म्हणूनच या प्रसंगी मी  त्यांचे जेवढे अभिनंदन करू, जितके आभार मानू तेवढे कमीच पडतील. मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा मनोहरजी इथले मुख्यमंत्री होते. मी एक गुपित सांगतो, मनोहरजीना एखादी गोष्ट दहा वाक्यात सांगायला सांगितली तर ते  ती एका वाक्यात सांगतील. कधी कधी समजायला कठीण जाते. त्यांना वाटते की तुम्हाला समजले आहे. ते आयआयटीचे आहेत, तर मी सर्वसामान्य व्यक्ती. मी गुजरातमध्ये होतो तेव्हा त्यांच्या योजनांचा मुख्यमंत्री या नात्याने अभ्यास करत होतो,पाहत होतो की गरिबातल्या गरीब व्यक्तीच्या समस्या ते कसे समजून घेतात, त्यावर कशा उपाययोजना आखतात. त्यानंतर लक्ष्मीकांतजींनीही हाच वारसा पुढे नेला. गृह आधार योजना, वार्षिक तीन लाखापेक्षा कमी उत्त्पन्न असणाऱ्या महिलांना 1500 रुपयाची मदत .देशातल्या अनेक राज्यांना माहीतही नसेल की गोव्यात अशी योजना सुरु  झाली होती.वरिष्ठ नागरिकांसाठी दयानंद सरस्वती सुरक्षा योजना,सुमारे दीड लाख वरिष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळत आहे. 2000 रुपये दरमहा. या साऱ्या गोष्टी देशात कुठंही नाहीत, ज्या गोव्यात आहेत. बंधू-भगिनींनो, लाडली लक्ष्मी योजनेचा गोवा आणि मध्यप्रदेशने प्रारंभ केला, 18 वर्षाच्या मुलींना एक लाख रुपये.आज गोव्यात 45 हजार मुलींना याचा लाभ मिळत आहे.

गोव्याने मोठे काम केले आहे. मनोहरजी आणि लक्ष्मीकांतजीची  दूरदृष्टी पहा. आज इथे इलेक्ट्रॉनिक्स शहराचा पायाभरणी समारंभ होत आहे. मात्र या आधी हे काम तडीस नेण्यासाठी आपल्याला कशी युवा शक्ती पाहिजे, हे लक्षात घेऊन या दोघांनी सायबर विद्यार्थी योजनेद्वारे आपल्या युवा शक्तीला डिजिटल दुनियेशी जोडण्याचे अभियान चालवले. या दूरदृष्टीसाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. आजारी पडणे किती महागात पडते हे आम्ही जाणतो, आणि गरिबांसाठी आजारी पडणे हे अधिकच संकट असते. गोवा सरकारचे हे वैशिष्ट्य आहे की दीनदयाळ स्वास्थ्य सेवेद्वारे वार्षिक तीन लाख रुपयांपर्यंत सुमारे दोन लाख कुटुंबे म्हणजे जवळपास संपूर्ण  गोव्यातली कुटुंबे यात येतात त्यांना सुरक्षा कवच दिले गेले आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली आहे. शेतकरी असू दे, मच्छीमार असू दे, जनसामान्यांच्या भल्यासाठी योजना आहेत.गोवा विकासाच्या पथावर पुढे वाटचाल करत आहे, देशाच्या पंतप्रधानांनाही इथे नतमस्तक व्हायला आनंद होतो, अभिमान वाटतो.

आज इथे तीन प्रकल्पाचा प्रारंभ होत आहे. मोपा ग्रीन फील्ड विमानतळ. आता ज्यांचे वय 50 वर्षाच्या आसपास आहे, ते समजत्या वयापासून ऐकत आले आहेत की गोव्यात एक दिवस विमानतळ होईल, विमाने येतील, लोकांची ये-जा वाढेल, पर्यटन वाढेल. ऐकले आहे की नाही? सगळ्या सरकारांनी सांगितले आहे की नाही? सगळ्या राजकीय पक्षांनी सांगितले आहे की नाही? निवडणूक झाल्या, विमाने त्यांच्या जागेवर, गोवा गोव्याच्या जागेवर.असे झाले की नाही? सांगा मला.अटलबिहारी वाजपेयींनी जे वचन दिले होते ते पूर्ण करण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे.आकाशात विमाने उडतील,नवीन विमानतळावर येतील केवळ एवढेच नाही. गोव्याची लोकसंख्या आहे साधारणतः 15 लाख. ही व्यवस्था विकसित झाल्यावर तिप्पट लोक म्हणजे तुम्ही 15 लाख लोक आहात,तर सुमारे 50  लाख लोकांची ये-जा सुरु होईल. आपण कल्पना करू शकता की पर्यटन किती वाढेल. गोव्याचे पर्यटन वाढेल म्हणजे, हिंदुस्तानच्या पर्यटन क्षेत्राला ताकत देणारी ही सर्वात सामर्थ्यवान जागा आहे, हे आपण सर्व जाणतोच. गोव्याच्या सुविधा वाढतीलच वाढतील, गोवावासियांच्या सुविधा वाढतील आणि मला विश्वास आहे की या निर्मिती कार्यातइथल्या हजारो नवयुवकांना रोजगार मिळेल आणि निर्मितीनंतर इथल्या अर्थव्यवस्थेला, पर्यटनाला एक मोठी संधी मिळणार आहे हे मला स्पष्ट दिसत आहे.

बंधू-भगिनींनो आज इथे एका इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन शहराचेही भूमिपूजन झाले.इथे केवळ औद्योगिक वसाहत तयार होत आहे असे कोणी मानू नका. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन शहराची निर्मिती म्हणजे काय हे फार कमी लोक जाणतात. 21  वे शतक मी पाहतो, डिजिटली साक्षर, युवा शक्तीने प्रेरित आधुनिक गोव्याची पायाभरणी होत आहे. अशा गोव्याची पायाभरणी होत आहे जो डिजिटली साक्षर, युवा शक्तीचे सामर्थ्य असलेला, आधुनिक, तंत्रज्ञानाने सामर्थ्यशाली असेल.हा फक्त गोव्याच्या युवकांचा रोजगार नव्हे तर भारताचा चेहरामोहरा यामुळे  बदलेल.गोवा एक शक्तिशाली स्थान  बनेल असे मला दिसत आहे. संपूर्ण 21 व्या शतकावर या उपक्रमाचा प्रभाव पडणार आहे.

बंधू-भगिनींनो, आज तिसरे महत्वपूर्ण काम आम्ही पुढे नेत आहोत. सुरक्षा क्षेत्रात भारताने स्वयंपूर्ण असायला हवे असे आमचे स्पष्ट मत आहे. स्वातंत्र्याला 70 वर्ष झाली,कोणाच्या मेहेरबानीवर आम्हाला राहायचे नाही. स्वतःच्या सामर्थ्यावर       जगू आणि आपल्या लोकांसाठी बलिदान करू, आपली शान कायम राखण्यासाठी प्राण अर्पण करू. ज्या देशाकडे 1800 दशलक्ष युवा आहेत, 35 वर्षापेक्षा कमी वय असलेले 18 दशलक्ष युवक आहेत,बुद्धी, प्रतिभा, कल्पकता,तंत्रज्ञान, सर्व काही आहे मात्र सुरक्षेशी संबंधित वस्तू बाहेरून आणाव्या लागतात. आज गोव्याच्या या भूमीवर सागरी सुरक्षा क्षेत्रात मेक इन इंडिया च्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे.

बंधू-भगिनींनो, आज मी गोव्याचे विशेष आभार मानू इच्छितो.अकबर दरबारी नवरत्न होती, त्यामुळॆ त्या कार्यकाळाची चर्चा होत असे.मी भाग्यवान आहे माझ्या चमूत अनेक रत्ने आहेत आणि त्यातले एक तेजस्वी रत्न गोव्याने मला दिले आहे.त्या रत्नाचे नाव आहे मनोहर पर्रीकर. अनेक वर्षानंतर देशाला असा संरक्षण मंत्री मिळाला आहे, जो 40  वर्षांपासूनच्या या लष्कराच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र मेहेनत घेत आहे. 40 वर्ष रखडलेला ‘वन रँक वन पेन्शन’चा मुद्दा, आपल्या देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या जवानांचे अपूर्ण राहिलेले काम मनोहरजीच्या मुळे पूर्णत्वाला गेले, मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आपले आभार मानतो की आपण मला मनोहरजी दिलेत. असा सामर्थ्यवान संरक्षण मंत्री गेल्या काही काळात झाला नव्हता. ज्याच्याबाबत कोणी शंका उपस्थित केली नाही, शंकेने कोणी बोट दाखवले नाही, असा संरक्षण मंत्री लगतच्या काळात झाला नव्हता.आम्ही निर्णय जलदगतीने घेत आहोत.जगाबरोबर करार करत आहोत, देशाची सुरक्षा वाढवण्यासाठी निर्णय घेत आहोत. संरक्षण मंत्रालयाकडे कोणी शंकेचे बोट दाखवले नाही.माझे सहकारी या नात्याने, मला उत्तम सहकारी मिळाला म्हणून मी मनोहरजीचे अभिनंदन करतो त्याचबरोबर गोवावासियांचेही मी अभिनंदन करतो की तुम्ही मनोहरजीसारखी व्यक्ती देशासाठी दिली. मी आपले अभिनंदन करतो.

बंधू-भगिनींनो, हा जो नौकाखाण विचलन मोजमाप कार्यक्रम अर्थात माईन कॉउंटर मेझर व्हेसल प्रोग्रॅम (एमसीएमपी)आहे, तो देशाच्या सागरी सुरक्षेत महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. यामुळे लोकांना रोजगार तर मिळणार आहेच आणि या क्षेत्राचा विकासही होणार आहे.गोव्याच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, मी आज गोवावासियांबरोबर आणखीही काही गोष्टी करू इच्छितो..

8 तारखेला, 8 वाजता देशाचे करोडो नागरिक सुखासमाधानाने झोपी गेले तर लाखो लोक झोप येण्यासाठी गोळ्या खरेदी करायला गेले, झोपेच्या गोळ्या मिळत नाही.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, 8 तारखेला, 8 वाजता, काळ्यापैशाविरोधात, भ्रष्टाचाराच्या विरोधात,मी जो लढा पुकारला आहे, देश जी लढाई देत आहे, देशाचा इमानदार नागरिक लढा देत आहे, त्या दिशेने  मी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले मात्र काही जण आपल्याच विचारात दंग असतात. ते आपली मोजपट्टी घेऊन कोणाला मापत बसतात आणि त्यात बसले नाही की काहीतरी गडबड असल्याची ओरड करतात.

या देशाच्या अर्थ तज्ञानी, देशाच्या धोरणाचा अभ्यास करणाऱ्यांनी,जुनी सरकारे, जुने नेते यांचे मोजमापाचे तराजू मी सत्तेवर आल्यावर बदलले असते तर हा प्रश्न आला नसता.त्यांच्या लक्षात यायला हवे की देशाने असे सरकार निवडले आहे ज्याच्याकडे देशाच्या काही अपेक्षा आहेत. बंधू-भगिनींनो मला सांगा 2014 मधे तुम्ही मतदान केले, ते भ्रष्टाचाराच्या विरोधात दिले की नाही? मला सांगा तुम्ही हे काम मला करायला सांगितले होते की नाही? आपण मला सांगितल्यावर मला करायला हवे की नाही? आपण मला हे काम करायला सांगितले तेव्हा तुम्हाला माहित होते की मी हे काम केले तर थोडासा त्रास होणारच, माहित होते की नाही? असे तर नाही ना की तुम्हाला अलगद एखाद्या गोष्टीचे फळ मिळेल. सगळ्यांना माहित होते. सत्तेवर आल्यावर आम्ही लगेच निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक SIT स्थापन केले. जगभरात कुठे कुठे हा धंदा चालला  आहे, यावर हे तपास पथक काम करत आहे आणि सहा महिन्यात सर्वोच्च न्यायालयाला अहवाल देत आहे. आधीचे सरकार हे काम टाळत आले. आम्ही हे काम केले. आपल्याकडे एक म्हण आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. माझ्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत  मी हा कठोर निर्णय घेतो तेव्हा लक्षात नाही आले का की मी पुढे  कोणते  निर्णय घेणार आहे ते. मी काही लपवले होते का, मी काही लपवले नाही. प्रत्येक वेळी मी ही गोष्ट सांगितली होती आणि आज मी त्याचा तपशील देत आहे. संपूर्ण देश ऐकत आहे. मी देशाला कधीही अंधारात ठेवले नाही. मी देशाला कधी गैरसमजात ठेवले नाही, खुलेपणाने सांगितले आहे,  इमानदारीने सांगितले आहे.

बंधू-भगिनींनो, दुसरे  महत्वाचे काम होते, जगातल्या अनेक देशांबरोबर गेल्या 50 -60 वर्षात असे करार झाले ज्यामुळे आपण असे अडकलो गेलो की आपल्याला माहिती मिळत नव्हती.जगातल्या देशाबरोबर जे जुने करार आहेत त्यात बदल करणे आपल्यासाठी फार आवश्यक होते. काही देशाबरोबर करार केले. अमेरिकेसारख्या देशाला समजावण्यात मी यशस्वी झालो की तुम्ही माझ्याबरोबर करार करा की तुमच्या बँकात हिंदुस्थानी व्यक्तीच्या पैशाची आवक जावक  असेल तर आम्हाला लगेच त्याबाबत कळले पाहिजे.जगातल्या इतर देशांबरोबरही मी यासंदर्भात काम केले आहे.काही देशांबरोबर याबाबत काम सुरु आहे.भारतातला चोरीचा पैसा, काळा पैसा जगभरात कुठेही गेला तरी त्याची ताबडतोब माहिती मिळेल याचा पक्का बंदोबस्त आम्ही केला आहे. दिल्लीच्या एखाद्या बाबूचा इथे गोव्यात फ्लॅट आहे, हे आपल्याला माहित आहे हे आम्ही जाणतो.गोव्याच्या बांधकामव्यावसायिकांविरोधात माझी तक्रार नाही. सदनिका विकणे  हे त्यांचे काम आहे, मात्र ज्याच्या सात पिढयापैकी कोणी गोव्यात नाही, जो दुसऱ्या ठिकाणी जन्मला, काम करतो दिल्लीला, मोठा अधिकारी आहे, फ्लॅट घेतो गोव्यामध्ये, कोणाच्या नावावर. स्वतःच्या नावावर घेतात का? दुसऱ्याच्या नावावर खरेदी करतात की नाही? हे लोक. आम्ही कायदा केला, जी बेनामी संपत्ती आहे, दुसऱ्याच्या नावावर संपत्ती आहे, त्यावर आम्ही कायदेशीर पावले उचलणार आहोत. ही देशाची संपत्ती आहे, देशाच्या गरीबाची संपत्ती आहे, आणि माझे सरकार केवळ देशातल्या गरीबाची मदत करणे हे आपले कर्तव्य मानते, आणि मी हे कर्तव्य करत राहणार.

आम्ही पाहिले आहे की घरात लग्न असेल,काही काम असेल तर दागिने खरेदी करतात. पत्नीचा वाढदिवस असेल तर दागिने खरेदी करतात,सोने खरेदी करतात आणि सराफ पण सांगतो, घेऊन जा साहेब, पैसे घेऊन या आणि घेऊन जा दागिने.पावती नाही, हिशोब नाही, काही नाही. असे चालले होते की नाही? हे काय गरीब लोक करतात का. हे बंद व्हायला हवे की नाही. आम्ही नियम केला की दोन लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने खरेदी करत असाल तर आपल्याला पॅन क्रमांक द्यावा लागेल. या निर्णयालाही विरोध झाला. आपल्याला आश्यर्य वाटेल की निम्म्यापेक्षा जास्त खासदार माझ्याकडे आले होते की मोदीजी हा नियम लागू करू नका. काहीजणांनी तर मला चिट्ठी लिहिली. ज्या दिवशी मी हे जाहीर करेन त्या दिवसापासून ते आपल्या मतदार संघात जाऊ शकतील की नाही माहित नाही. जर तुमच्याकडे पैसा असेल, तुम्ही सोने, दागिने खरेदी करत असाल तर आम्ही इतकेच सांगतो, की प्राप्तिकर खात्याचा जो पॅन क्रमांक आहे तो द्या. कोण खरेदी करते, पैसा कुठून येतो, कुठे जातो. बंधू-भगिनींनो, 70 वर्ष जुना आजार आहे आणि मला 17 महिन्यात तो बरा करायचा आहे.

बंधू-भगिनींनो, आम्ही आणखी एक काम केले.आधीच्या सरकारांनीही हे काम केले होते.हे जे सराफ आहेत, सोन्या चांदीचा व्यवहार करणारे, त्यावर अबकारी कर लागत नसे. आधीच्या सरकारांनी  तो लावण्याचा प्रयत्न केला, खूप कमी लावला होता पण हे सराफ, त्यांची संख्या खूप कमी आहे, गावात एखाद दुसरा असेल. मोठया शहरात 50 -100 असेल. मात्र त्याची ताकत मोठी आश्यर्यचकित करणारी आहे. काही काही खासदार त्यांच्या खिशात असतात. दागिन्यांवर जेव्हा अबकारी कर लावला तेव्हा माझ्यावर दबाव आला,खासदारांचा दबाव, परीचीत, प्रतिनिधिमंडळ, साहेब, हे इन्कमटॅक्सवाले लुटतील, बरबाद करतील, असे सांगत होते. मलाही भीती वाटली, की हे केले तर माहित नाही काय होईल. मी ठरवले दोन समित्या स्थापन करू या, चर्चा करूया. सराफाचा ज्याच्यावर विश्वास होता असे लोक सरकारच्या तज्ञांच्या समितीत घेतले. आधीच्या सरकारांना असे प्रयत्न मागे घ्यायला लागले होते. मला इमानदारीने देश चालवायचा आहे, मी प्रस्ताव मागे नाही घेतला. मी सराफाना भरवसा दिला कोणी जुलूम करणार नाही, कोणी इन्कमटॅक्सवाल्याने तसा प्रयत्न केला तर मोबाईल फोनवर रेकॉर्डिंग करा, मी त्याच्याविरोधात कारवाई करेन. आम्ही हे पाऊल उचलले. हे सारे पाहून मी पुढे काय करेन समजत नसेल, आपण आपल्या जगात दंग राहिलात, इतर राजकीय पक्षाप्रमाणे, हे पण येतील आणि जातील. बंधू-भगिनींनो, मी खुर्चीसाठी इथे आलो नाही. माझ्या देशवासियांनो, मी घर, परिवार, सर्व काही देशासाठी त्यागले आहे.

आम्ही दुसऱ्या बाजूने हा पण जोर लावला. काही लोक असतात,असहाय्य  होऊन काही चुकीचे करावे लागते.सर्वजण बेइमान नसतात, सर्वजण चोर नसतात.कधी असहाय्य झाल्याने काही करावे लागले, मात्र संधी मिळताच योग्य मार्गावर यायला तयार असतात. अशा लोकांची संख्या खूप मोठी असते. आम्ही लोकांच्या समोर योजना ठेवली, की आपल्याकडे असा बेइमानीचा पैसा असेल तर तो कायद्यांअंतर्गत जमा करा, इतका दंड भरा, त्यातही मी माफी दिली नाही. मात्र व्यापारी लोक अशा गोष्टी समजण्यात फार हुशार असतात. त्यांना समजले, की हे मोदी आहेत,काही गडबड करतील. आपल्याला हे ऐकून आनंद होईल की स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात अशा योजना अनेक वेळा आल्या मात्र, 67 हजार कोटी रुपये दंडासहित जमा झाले हे ऐकून आपल्याला आश्यर्य  वाटेल. दोन वर्षात संपूर्ण पाहणी करून, छापे टाकून, जाहीर करण्यातून सव्वा लाख कोटी रुपये, जे कधी उघड झाले नव्हते,ते सरकारी खात्यात जमा झाले, बंधू-भगिनींनो. सव्वा लाख कोटींचा हिशोब आला आहे. दोन वर्षात केलेल्या कामाचा हिशोब आज गोव्याच्या संपूर्ण धरतीवर देशाला देत आहे, बंधू-भगिनींनो.

यानंतर काय करायचे आम्हाला माहित आहे. आम्ही जनधन खाती उघडली. ही योजना घेऊन मी आलो तेव्हा संसदेत माझी थट्टा उडवली गेली, कशी भाषणे झाली आपल्याला आठवत असतील. मला माहित नाही काय काय बोलले जात होते.मोदींवर शाब्दिक हल्ला  चढवला तर मोदी घाबरतील असे  त्यांना वाटले. जिवंत जाळले तरी मोदी घाबरणार नाहीत. आम्ही सुरवातीपासून हे काम केले, पंतप्रधान जन-धन योजनेअंतर्गत गरिबातल्या गरिबांचे बँकेत खाते उघडणे. त्या वेळी लोकांच्या लक्षात आले नाही की मोदी बँक खाते का उघडत आहेत, आता लोकांच्या लक्षात आले की या खात्याचा फायदा काय होणार आहे. जवळपास 20 कोटी पेक्षा जास्त लोकांनी बँक खाती उघडली. हिंदुस्तानमध्ये श्रीमंतांच्या खिशात मोठमोठ्या बँकांची डेबिट आणि क्रेडिट कार्ड असतात.गरीब मात्र विचार पण करू शकत नाही की असे कोणते कार्ड असते, या कार्डद्वारे काही मिळू शकते, त्याला हे माहित नव्हते. बंधू-भगिनींनो, पंतप्रधान जन-धन योजनेसाठी खाती उघडली असे नव्हे.

या देशातल्या 20 कोटी लोकांना आम्ही रूपे कार्ड दिले आहे, डेबिट कार्ड दिले आहे आणि हे एक वर्षांपूर्वी केले आहे. त्याच्या खात्यात पैसे असतील तर त्या डेबिट कार्डच्या मदतीने तो बाजारातून वस्तू खरेदी करू शकतो,अशी व्यवस्था त्यात उपलब्ध आहे बंधू-भगिनींनो. मात्र लोकांना वाटले जसे प्रत्येक राजकीय पक्षाचे काम असते तसेच हे पण असेल. राजकीय काम नव्हते ते, देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मी हळू -हळू  औषध देत होतो. हळू-हळू त्याची मात्रा वाढवत होतो.

बंधू -भगिनींनो, माझ्या देशातल्या गरीबाची श्रीमंती  पहा. मी सांगितले होते, शून्य रकमेनेही तुम्ही  खाते उघडू शकता, तुम्ही एकदा बँकेच्या छत्रात आला पाहिजे. आर्थिक व्यवस्थेत तुम्हीही कुठेतरी सहभागी झाले पाहिजेत. मात्र माझ्या देशातल्या गरिबीची श्रीमंती पहा, मित्रहो. हे जे श्रीमंत लोक रात्री झोपू शकत नाहीना, गरिबांची श्रीमंती पहा. शून्य रकमेनेही तुम्ही  खाते उघडू शकता असे  मी सांगितले होते, पण माझ्या देशातल्या गरिबांनी जन -धन  खात्यात 45 हजार कोटी रुपये जमा केले. या देशाच्या सामान्य जनतेची ताकत आपण ओळखा. 20 कोटी कुटुंबाना रूपे कार्ड दिली. तरीही काहीजण मनातच नाहीत. त्यांना वाटले राजनैतिक खोडा घातला तर होऊन जाईल. आम्ही एक गुप्त काम केले. मनोहरजीनी केले ते तर मी करू शकत नाही. दहा महिन्यापासून एक छोटा विश्वासातील गट बनवला, एवढ्या नोटा छापायच्या, पोहोचवायच्या, कठीण काम, हे सगळे गुप्त राखायचे, कोणाला समजले तर उपयोग काय.

8 तारखेला 8 वाजता देशाचे भविष्य उजळण्यासाठी एक नवे पाऊल उचलले गेले मित्रानो. मी त्या रात्रीही सांगितले होते या निर्णयाने त्रास होईल, असुविधा होईल, अडचणी येतील  हे मी पहिल्या दिवशीच सांगितले होते. पण बंधू-भगिनींनो, आज देशातल्या करोडो लोकांपुढे मी नतमस्तक होत आहे, सिनेमाच्या रांगेत पण भांडण होते, पण मी पाहतोय की गेले चार दिवस चहुबाजूंनी पैशासाठी लागलेल्या रांगेत उभे राहायला जागा नाही, पण प्रत्येकाच्या तोंडी एकच आहे, की ठीक आहे, त्रास होईल, पाय दुखत आहेत पण देशाचे भले होईल, चांगले होईल

मी आज सर्व  बँक कर्मचाऱ्यांचे जाहीर अभिनंदन करत आहे. एका वर्षात जितके काम करायला लागते त्यापेक्षा जास्त काम ते गेल्या आठवड्यापासून करत आहेत. मला आनंद झाला. सोशल मीडियावर मी पाहिले, बँकेचे निवृत्त कर्मचारी,70, 75 वर्षाचे ते बँकेत गेले,  त्यांनी सांगितले, साहेब निवृत्त झालो आहे, पण या पवित्र कार्यात आम्हाला हातभार  लावू देत असाल तर आम्ही सेवा द्यायला तयार आहोत. या निवृत्त बँक कर्मचाऱ्यांचेही मी आज अभिनंदन करतो, ज्यांनी आपल्या जुन्या बँक शाखेत जाऊन मदतीची तत्परता दाखवली. मी त्याचे अभिनंदन करतो.

मी त्या युवकांचेही अभिनंदन करतो जे उन्हातान्हात उभे राहून रांगेतल्या लोकांना आपल्या खर्चाने पाणी  देत आहेत. जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या द्यायला  धडपडत आहेत. चहुबाजूनी देशाची युवापिढी हे कार्य सफल करण्यासाठी कामाला लागली आहे. या कामाच्या सफलतेमागचे कारण  8 तारखेला 8 वाजता मोदींनी घेतलेला निर्णय नव्हे तर या देशाची सव्वाशे कोटी जनता, त्यातले काही लाख सोडून द्या, हा निर्णय यशस्वी होण्यासाठी झटत आहेत म्हणूनच ही योजना निश्चित सफल होणार, बंधू-भगिनींनो.

मला दुसरी गोष्ट सांगायची आहे. मला सांगा आपल्या देशातल्या मतदारयाद्या, या याद्या बनवण्यात सर्व राजकीय पक्ष काम करतात की नाही. सरकारी कर्मचारी काम करतात की नाही, सारे शिक्षक करतात की नाही. तरीही ज्या दिवशी मतदान होते त्या दिवशी तक्रारी येतात की नाही, माझे नाव नव्हते, माझ्या सोसायटीचे नाव वगळले, मला मतदान करायला देत नाहीत.अडचणी येतात की नाही.

बंधू-भगिनींनो, आपल्या देशात निवडणूका होतात, निवडणुकीच्या वेळी काय करायचे, जायचे, बटन दाबायचे, परत यायचे, एवढेच करायचे ना, तरीही देशात सुमारे तीन महिने, 90 दिवस निवडणुकीचे काम चालते, त्यात पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा बल, सरकारी कर्मचारी, राजकीय पक्षाचे करोडो कार्यकर्ते सर्वजण 90 दिवस रात्रंदिवस मेहेनत करतात तेव्हा एवढ्या मोठ्या देशाची निवडणूक संपन्न होते. 90 दिवस लागतात.बंधू-भगिनींनो, मी फक्त 50 दिवस मागितले आहेत. 30 डिसेंबरपर्यंत मला संधी द्या बंधू-भगिनींनो. 30 डिसेंबरनंतर माझी काही चूक काढली, माझ्याकडून काही त्रुटी राहिली, माझा कोणता अयोग्य इरादा समोर आला तर मला चौकात उभा करा, देश जी सजा देईल ती भोगायला मी तयार आहे.

माझ्या देशबांधवांनो, जग पुढे जात आहे, भारताला हा रोग उद्‌ध्वस्त करत आहे. 800 दशलक्ष, 65 टक्के युवा, 35 पेक्षा कमी वय असलेल्या या युवकांच्या भविष्याचा प्रश्न आहे. म्हणूनच बंधू-भगिनींनो, ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांना करू द्या, ज्यांना आरोप करायचे आहेत करू द्या, मात्र माझ्या इमानदार देशवासियांनो, माझ्याबरोबर या, फक्त 50 दिवस. 30 डिसेंबरनंतर तुम्हाला जसा भारत हवा, तसा देण्याचे आश्वासन मी देतो.

कोणाला त्रास झाला तर मलाही त्याचे दुःख होते. बंधू-भगिनींनो, मी देशवासियांचा त्रास समजू  शकतो, त्यांच्या समस्या  समजू शकतो. मात्र हे कष्ट फक्त 50 दिवसासाठी आहेत. 50 दिवसात आपण सफाईत यशस्वी झालो आणि एकदा सफाई झाली की डास पण येत नाही. मला विश्वास आहे. इमानदार लोकांच्या विश्वासावर मी ही लढाई सुरु केली आहे आणि इमानदार लोकांच्या ताकतीवर माझा विश्वास आहे. भरवसा आहे.आपण कल्पना करू शकत नाही कोणकोणत्या लोकांचा पैसा बुडत आहे. गंगा मातेलाही आश्यर्य वाटत आहे की कालपर्यंत जे  एखादे नाणे अर्पण करत नव्हते ते आज   नोटा वाहू देत आहेत. गरीब विधवा माता मोदींना आशीर्वाद देत आहेत, कालपर्यंत मुलगा आणि सून कधी बघायला आले नव्हते, काल आले आणि बँकेत अडीच लाख जमा करून गेले. या गरीब विधवा मातांचा आशीर्वाद देशाच्या सफलतेचा हा यज्ञ  पुढे नेईल. आपण पाहिले असेल कोणते कोणते लोक, 2G घोटाळा, कोळसा घोटाळा, लाखो- करोडो, माहित आहे ना, आज चार हजार रूपये बदलण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे.

सरकारे येतात आणि जातात, बंधू-भगिनींनो, हा देश आज अमर आहे, या देशाचे भविष्य उज्ज्वल आहे. या उज्वल भविष्यासाठी कष्ट झेलायचे. कधी कधी मला आश्यर्य वाटते. काल एका पत्रकार मित्राबरोबर माझी चर्चा झाली. मी सांगितले, तुम्ही मला दिवसरात्र सांगत असता की, मोदीजी, युद्ध हवे. मी म्हटले त्रास झाला तर काय कराल,वीज जाईल, वस्तुंची आवक-जावक थांबेल, रेल्वे रद्द होतील, रेल्वे सैनिकांसाठी वापरली जाईल, तुम्ही जाऊ शकणार नाही, तेव्हा काय कराल? म्हणाले असे असते तर. सांगायला सोपे असते, उपदेश करणे सोपे असते.

देशवासियांना मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो. या दिवसात भ्रष्टाचार आणि काळा पैसा यावर बोलण्याची बऱ्याच लोकांची हिंमत नाही, कारण जो बोलतो तो पकडला जातो. दाल मे कुछ काला है. मोदीजी, तुम्ही चांगले केलेत असे प्रत्येकजण हसऱ्या चेहेऱ्याने सांगत असतो. नंतर एखाद्या मित्राला फोन करतो,  काही मार्ग आहे का. तेव्हा तो सांगतो मोदीजींनी सगळे रस्ते बंद केलेत. मग अफवा पसरवतात. एक दिवस अफवा पसरली की मीठ महाग झाले आहे. आता सांगा 500 आणि 1000 ची नोट, कोण आहे जो 1000 ची नोट घेऊन मीठ आणायला जातो. हे यासाठी केले जाते की त्यांनी हे जाणले आहे की, 70 वर्ष जे जमवले आहे ते आता जाणार.महागडी कुलुपे लावली होती.आता भिकारीपण सांगतो नाही साहेब, 1000 ची नोट नाही चालणार.

बंधू-भगिनींनो, इमानदार लोकांना कोणताच त्रास नाही. काही लोक सांगतात, मला खरे काय माहित नाही, मात्र चर्चा आहे की कोणी 500 ची नोट तीनशे रुपयात देत आहे, कोणी साडेचारशेत देत आहे. मी देशवासियांना सांगेन, तुमच्या 500 रुपयाच्या नोटेतला एक नवा पैसा कमी करण्याची कोणाची ताकत नाही. आपले 500 रुपये म्हणजे चारशे नव्याणव आणि शंभर पैसे, पक्के. अशा कारभारात आपण अडकू नका. काही बेईमान लोक सांगतात, रांगेत उभे राहा. दोन-दोन हजारांचे बदली करून द्या.थोडेतरी वाचेल.

दुसरे म्हणजे, बंधू-भगिनींनो माझा आग्रह आहे. असे असू शकते की तुम्हाला माहित नाही,तुमचे काका, मामा, भाऊ, वडील जे स्वर्गवासी झाले आहेत,  काही संपत्ती ठेवून गेले आहेत.तुमचा गुन्हा काहीच नाही. तुम्ही बँकेत ही  रक्कम जमा करा,जो दंड भरावा लागेल तो दंड भरा.मुख्य प्रवाहात सामील व्हा. यात सगळ्याचे हित आहे. एक बाब आणखी सांगतो. काही जण असे म्हणत असतील की पुढे बघू, ते मला ओळखत असतील. देश स्वतंत्र झाल्यापासूनचा आतापर्यंतचा हिशोब उघड करेन. ज्यांनी बेइमानी केली आहे त्यांनी हे समजून चालावे की हा कागदाचा तुकडा आहे, जास्त प्रयत्न नका करू. नाहीतर मी त्यासाठी एक लाख नव्या युवकांना नोकरी द्यायला लागली तरी देईन आणि त्यांना हे काम देईन. मात्र देशात हा जो कारभार चालला आहे तो बंद करणारच करणार.आता लोकांनी मला जाणले आहे. इतके दिवस त्यांच्या लक्षात आले नव्हते एक जास्त डोस दिल्यावर त्यांच्या लक्षात आले. मात्र हा पूर्णविराम नाही. मी स्पष्ट सांगतो आहे की हा पूर्णविराम नाही. देशातला भ्रष्टाचार, बेइमानी बंद करण्याचा विचार माझ्या डोक्यात आहे आणि आणखीही काही प्रकल्प चालले आहेत.ते येतील. इमानदार लोकांसाठी, देशातल्या गरिबांसाठी मी हे करत आहे. मेहेनत करून गुजराण करणाऱ्यांना स्वतःचे घर मिळावे, त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण मिळावे, त्यांच्या घरातल्या बुजुर्गाना चांगले औषधपाणी मिळावे यासाठी करत आहे.

मला गोवावासियांचा आशीर्वाद हवा आहे. आपण उभे राहून टाळ्या वाजवून मला आशीर्वाद द्या. देश पाहील, इमानदार लोक, या देशात इमानदार लोकांची कमतरता नाही. या, इमानदारीच्या या कामात माझ्यासोबत या. गोव्याच्या बंधू-भगिनींनो, शाबास, मी मस्तक झुकवून आपल्याला नमन करतो. हा केवळ गोवा नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानमधल्या प्रत्येक इमानदार व्यक्तीचा हा आवाज आहे.

बंधू-भगिनींनो, मी जाणतो की मी कोणकोणत्या शक्तीशी लढाई पत्करली आहे. कोणकोणते लोक माझ्या विरोधात जातील हे मी जाणतो.. मला जगू देणार नाहीत, मला बरबाद करतील, त्यांना जे करायचे ते करु दे. बंधू-भगिनींनो, 50 दिवस मला मदत करा. देशाने 50 दिवस माझी मदत करावी. टाळ्यांच्या कडकडाटासह माझ्या या म्हणण्याचा आपण स्वीकार करा.

खूप-खूप धन्यवाद.‍ि

 

B.Gokhale/N. Chitale/P.Kor