Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुवाहाटी येथील 12व्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

गुवाहाटी येथील 12व्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

गुवाहाटी येथील 12व्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

गुवाहाटी येथील 12व्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण


सार्क देशांमधील बंधुभगिनी तसेच शेजारी देशातील खेळाडूंसोबत या ठिकाणी उपस्थित राहण्यास मिळाल्यामुळे मला स्वतःला सन्मान प्राप्त झाल्यासारखे वाटत आहे. भारतामध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. “अतिथि देवो भव” ही संस्कृती भारताची ओळख आहे. आतिथ्यशील आणि क्रीडाप्रेमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुवाहाटी या सुंदर शहरात मी तुमचे स्वागत करतो.

विशाल ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर आयोजित होणाऱ्या या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनामध्ये आनंद आणि ऊर्जा यांनी ओसंडून वाहणाऱ्या तुमच्या उपस्थितीमुळे मला आनंद झाला आहे.

प्राचीन भारतात गुवाहाटी हे शहर प्रज्ञज्योतिषपूर म्हणून ओळखले जात होते आणि त्या काळापासून या शहराने खूपच प्रगती केली आहे. आता हे आधुनिक आणि जीवनाने भरलेले शहर ईशान्य भारतातील आर्थिक घडामोडींचे केंद्र बनले आहे.

ईशान्येकडील आणि विशेषतः आसाममधील युवक एखादा सर्वोत्तम फूटबॉल सामना पाहण्याची संधी कधीही सोडत नाहीत. त्यांची ही ओळख सर्वत्र पसरली आहे आणि 2017 मध्ये पहिल्यांदाच गुवाहाटीमध्ये 17 वर्षांखालील फिफा विश्वचषक फूटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

खेळांमध्ये मला तीन टी महत्त्वाचे वाटतात. हे तीन टी आहेत; टॅलेंट, टीमवर्क आणि टुगेदरनेस. आपल्याकडे संपूर्ण दक्षिण आशियामधील सर्वोत्तम आणि अंगी गुणवत्ता असलेले युवक आहेत. तुम्ही सर्व तुमच्या संघाचे सन्माननीय सदस्य आहात. तुम्ही तुमच्या खेळांचा जो संघ आहे, त्या सोबत खेळणार आहात आणि तुमच्या देशाचे प्रतिनिधित्व देखील करणार आहात. या बरोबरच या स्पर्धेच्या माध्यमातून दक्षिण आशियायी देशांची एकजूट देखील प्रदर्शित होत आहे. आपण अफगाणिस्तानचे असू किंवा बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका यापैकी कोणत्याही देशाचे असू. पण आपले घर मात्र दक्षिण आशिया आहे.

खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक असला पाहिजे. चांगला खेळ आरोग्यवर्धक असतो आणि यामुळे ताजेतवाने होता येते. व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास खेळाशिवाय अपूर्ण आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे खेळांमुळे खिलाडू वृत्ती निर्माण होते. खेळांशिवाय खिलाडू वृत्ती येऊच शकत नाही. ही खिलाडू वृत्ती केवळ तुम्हाला मैदानातच मदत करणार नाही, तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर या वृत्तीची मदत तुम्हाला मिळत राहील. तुम्ही खेळाच्या मैदानात जे काही शिकता, ती शिकवण तुमच्या आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरते. मी नेहमीच सांगत असतो ; जो खेळतो तो विकसित होतो.

या क्रीडा स्पर्धांचे बोधचिन्ह आहे “तिखोर”, जो गेंड्याच्या चपळ आणि बुद्धिमान पिल्लाचे प्रतिनिधित्व करतो. त्याच्यामध्ये खेळाडू आणि युवा क्रीडाप्रेमींमधील खिलाडू वृत्ती प्रतिबिंबित होत आहे.

या क्रीडा स्पर्धांचे संकल्पना गीत, “ ई पृथ्वी एकोन क्रीडांगण, क्रीडा होल शांतिर प्रांगण” जगप्रसिद्ध संगीतकार दिवंगत भूपेन हजारिका यांच्या आवाजात आहे.

भूपेन हजारिका यांच्या मन मोहून घेणाऱ्या आवाजाने लोक इतर सर्व काही विसरून जातात; त्यांच्या गीतात दक्षिण आशियायी खेळांमध्ये असलेली शांतता, मैत्री आणि समृद्धीची भावना आहे.

मला श्री. सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की या क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीने आठ सार्क देशांमधील प्रत्येक देशातील पाणी आणले आणि सार्क देशांच्या एकत्रित आकांक्षा आणि सहकार्याची भावना व्यक्त करण्यासाठी हे पाणी एकत्र केले जाणार आहे.

डॉ. भूपेन हजारिका यांचे गीत, “ हम एक ही नाव मे संवार बंधु है” तुम्हाला लवकरच ऐकवले जाणार आहे, जे सार्क देशांच्या संदर्भात आहे. आपल्याला एका कुटुंबाप्रमाणे एकमेकांना साथ दिली पाहिजे. आपल्याला दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये खेळांच्या माध्यमातून मैत्रीची भावना जागृत केली पाहिजे.

दक्षिण आशियाबाबत माझी संकल्पना देखील, भारताबाबतच्या माझ्या “सबका साथ सबका विकास” या संकल्पनेसारखीच आहे. सर्व दक्षिण आशियायी देश विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या आमच्या प्रवासात भागीदार आहेत.

सार्क देशांमध्ये राहणारे आपण नागरिक जगाच्या लोकसंख्येच्या 21 टक्के आहोत आणि या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचे 9 टक्के इतके योगदान आहे.

आज आपण 12व्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ करण्यासाठी आणि पुरुष व महिला या दोन्ही खेळाडूंच्या 23 क्रीडा प्रकारांचा अनुभव घेण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत, आम्ही सर्व सार्क देशातील खेळाडूंना भारताच्या ईशान्येकडील आणि अतिशय सुंदर असलेल्या या शहरात मैत्री, विश्वास आणि सामंजस्याच्या भावनेने आमंत्रित केले आहे.

मैत्री, विश्वास आणि आपापसातील सामंजस्याची ही भावना खेळाच्याही पुढे जाऊन केवळ खेळातील संधींमध्येच नव्हे तर व्यापार आणि पर्यटनाच्या संधींमध्येही परिवर्तित होईल.

चला, या खेळांना या प्रदेशातील व्यापार, चर्चा आणि क्रीडा घडामोडींच्या माध्यमातून शांतता आणि समृद्धी निर्माण करण्याचे एक उत्साहवर्धक व्यासपीठ बनवूया. सार्क देशातील लोकांना आपल्या स्वतःच्या क्षमतेचा अंदाज घेण्याची एक संधी निर्माण करूया.

खिलाडू वृत्ती जीवनातील एक अशा प्रकारची बाजू आहे जी धैर्य, इच्छाशक्ती आणि मानसिक संतुलन यांचा समन्वय राखते. चांगली कामगिरी करून दाखवण्याचे आव्हान, प्रयत्न केल्याचा आनंद, मैत्री आणि खेळांमध्ये निष्पक्षतेची भावना हेच दाखवत असते की खेळांमधील चढाओढीच्या वेळी कशा प्रकारे संस्कृती, शिक्षण, नैतिकता, मर्यादा आणि समाज एकमेकांशी कशा प्रकारे बांधले गेले आहेत.

आपण वेगळे का आहोत याचा आपल्याला खेळाच्या मैदानावर विसर पडू शकतो आणि आपण खेळ आणि साहस या भावनांसह एकमेकांशी खऱ्या अर्थाने जोडले जाऊ शकतो,

आपण आपल्या विविधतेचा आनंद साजरा करू शकतो आणि एकाच वेळी खेळांच्या समान नियमांच्या अंतर्गत एकत्र होऊ शकतो आणि प्रामाणिकपणा आणि निष्पक्ष खेळांच्या मूल्यांना एकत्र करू शकतो.

आपण शांततेसाठी खेळूया, आपण समृद्धीसाठी खेळूया, आपण संपूर्ण उत्साह आणि जोशात खेळूया जेणेकरून या क्रीडा स्पर्धांच्या समारोपानंतरही या खेळांची आठवण मनात कायम राहिल.

या 12 दिवसांत तुम्ही जी मैत्री कराल आणि ज्या आठवणी सोबत घेऊन जाल त्या आयुष्यभर तुमच्या लक्षात राहतील.

या संबंधांची आठवण तुम्ही कायम ठेवाल आणि आपल्या देशांमधील मैत्रीचे राजदूत बनाल असा विश्वास मला वाटत आहे. खरेतर खेळाडू पदकांसाठी खेळतात आणि एकमेकांविरुद्ध अतिशय चुरशीने खेळतात. मी खेळाडू आणि येथे आलेल्या पाहण्यांना असे आवाहन करतो की त्यांनी आपल्या अतिशय व्यस्त वेळापत्रकामधून वेळात वेळ काढून जवळच्या पर्यटकांचे आकर्षण असलेल्या ठिकाणांना आणि दुर्मिळ वन्यजीव अभयारण्यांना भेट द्यावी.

पुन्हा एकदा मी सार्क देशातून आलेल्या माझ्या मित्रांचे स्वागत करतो. एकमेकांसोबत आपल्या श्रेष्ठ खिलाडूवृत्तीच्या रूपात गुवाहाटी येथे दोन आठवड्यांसाठी गुरुकुलाची भावना तीव्र करा आणि आपल्या सोबत उत्साहकारक आणि संस्मरणीय अनुभव सोबत घेऊन जा.

या स्पर्धांमध्ये चुरस आणि खऱ्या खिलाडू वृत्तीने खेळताना सर्वोत्तम खेळाडूला विजेता बनवा.

12व्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धा सुरु झाल्याचे मी जाहीर करतो.

धन्यवाद.

S.Patil / S.Tupe / M. Desai