Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुवाहाटी येथील ऍडव्हान्टेज आसाम 2.0 गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा शिखर परिषद 2025 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

गुवाहाटी येथील ऍडव्हान्टेज आसाम 2.0 गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा शिखर परिषद 2025 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण


 

आसामचे राज्यपाल लक्ष्मणप्रसाद आचार्य, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, उद्योग जगतातील नेते, मान्यवर, महिला आणि पुरुष,

पूर्व भारत आणि ईशान्य भारताची भूमी आज एका नव्या भविष्याची सुरुवात करत आहे. ऍडव्हान्टेज आसाम, हे संपूर्ण जगाला आसामची क्षमता आणि प्रगतीशी जोडणारे एक महा अभियान आहे.

भारताच्या या भरभराटीत यापूर्वीही पूर्व भारताची मोठी भूमिका होती, याचा इतिहास साक्षीदार आहे. आज जेव्हा भारत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे, तेव्हा पुन्हा एकदा पूर्व भारत, आपला हा ईशान्य भारत आपले सामर्थ्य प्रदर्शित करणार आहे. याच भावनेचे प्रतिबिंब म्हणून मी ‘ऍडव्हान्टेज आसाम’कडे पाहत आहे. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी आसाम सरकार आणि हिमंताजींच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. मला आठवते, 2013 मध्ये मी निवडणुकीच्या प्रचारासाठी आसामच्या दौऱ्यावर असताना एका सभेत असाच एक विचार माझ्या मनात आला, आणि मी म्हणालो होतो, की तो दिवस दूर नाही, जेव्हा लोक अल्फाबेट्स शिकताना म्हणतील, ‘ए फॉर आसाम’.

मित्रहो,

आज आपण जागतिक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि ती जाणून घेत आहोत. जागतिक अनिश्चिततेच्या काळातही जगातील सर्व तज्ञ व्यक्तींना एका गोष्टीची खात्री आहे, आणि ती म्हणजे भारताचा विकास. भारतावरील विश्वासाचे एक सबळ कारण आहे. आजचा भारत, म्हणजे 21 व्या शतकातील भारत पुढील 25 वर्षांचा दृष्टीकोन ठेवून एकापाठोपाठ पावले टाकत आहे, व्यापक स्तरावर काम करत आहे. आज जगाचा भारतातील युवा  लोकसंख्येवर विश्वास आहे, जी अतिशय वेगाने कुशल होत आहे आणि नवीन शोध लावत  आहे. गरिबीतून बाहेर पडून नव्या आकांक्षा घेऊन पुढे जाणाऱ्या भारतातील नवमध्यमवर्गावर आज जगाचा विश्वास आहे. आज जगाचा भारतातील 140 कोटी जनतेवर विश्वास आहे, जी राजकीय स्थैर्य आणि धोरणात्मक सातत्य, याचे समर्थन करत आहे. देशात सातत्याने सुधारणा करणाऱ्या भारताच्या कारभारावर आज जगाचा विश्वास आहे. भारत आज आपली स्थानिक पुरवठा साखळी मजबूत करत आहे, भारत आज जगातील विविध प्रदेशांशी मुक्त व्यापार करार करत आहे. पूर्व आशिया बरोबरची आपली कनेक्टिव्हिटी (दळणवळण) सातत्याने मजबूत होत आहे, आणि नव्याने बांधला जात असलेला भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरही अनेक नव्या शक्यता घेऊन येत आहे.

मित्रहो,

भारताबद्दलचा जागतिक विश्वास दृढ होत असताना, आज आपण सर्व जण आसाममध्ये, कामाख्या मातेच्या भूमीवर एकत्र आलो आहोत. देशाच्या विकासात आसामचे योगदान सातत्याने वाढत आहे. पहिली ऍडव्हान्टेज आसाम परिषद 2018 मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आसामची अर्थव्यवस्था पावणेतीन लाख कोटी रुपयांची होती. आज आसाम सुमारे 6 लाख कोटीची अर्थव्यवस्था असलेले राज्य बनले आहे. म्हणजेच, भाजपा सरकारच्या अवघ्या 6 वर्षांच्या कार्यकाळात आसामच्या अर्थव्यवस्थेचे मूल्य दुप्पट झाले आहे. डबल इंजिन सरकारचा हा दुहेरी परिणाम आहे. आसाममधील मोठ्या गुंतवणुकी द्वारे आपण सर्वांनी आसामला अमर्याद शक्यतांचे राज्य बनवले आहे. आसाम सरकार शिक्षण, कौशल्ये, इतर अनेक प्रकारच्या विकासावर तसेच गुंतवणुकीच्या चांगल्या वातावरणावर भर देत आहे.

गेल्या काही वर्षांत भाजपा सरकारने येथे दळणवळणाच्या पायाभूत सुविधांची बरीच कामे केली. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 2014 पूर्वी ब्रह्मपुत्रा नदीवर फक्त तीन पूल होते, म्हणजे 70 वर्षांत फक्त 3 पूल होते, परंतु गेल्या 10 वर्षांत आम्ही 4 नवीन पूल बांधले आहेत. यापैकी एका पुलाला भारतरत्न भूपेन हजारिका यांचे नाव देण्यात आले आहे. आसामला 2009 ते 2014 दरम्यान रेल्वे अर्थसंकल्पात सरासरी 2100 कोटी रुपये मिळाले होते. आमच्या सरकारने आसामच्या रेल्वे अर्थसंकल्पात 4  पटीहून अधिक वाढ करून ते 10 हजार कोटी रुपयांवर नेले आहे. आसाममधील 60 हून अधिक रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होत आहे. आज गुवाहाटी ते न्यू जलपायगुडी दरम्यान ईशान्य भारतातील पहिली सेमी हायस्पीड रेल्वे गाडी धावत आहे.

मित्रहो,

आसामची हवाई कनेक्टिव्हिटी झपाट्याने विस्तारत आहे. 2014 पर्यंत केवळ 7 मार्गांवर हवाई सेवा उपलब्ध होती, आता सुमारे 30 मार्गांवर उड्डाणे सुरू आहेत. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळाली असून येथील युवकांना रोजगार मिळाला आहे.

मित्रहो,

हे परिवर्तन केवळ पायाभूत सुविधांपुरते मर्यादित नसून, कायदा व सुव्यवस्थेतही अभूतपूर्व सुधारणा झाली आहे. गेल्या दशकभरात अनेक शांतता करार झाले आहेत. देशाच्या सीमेशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत. आज आसामचा प्रत्येक प्रदेश, प्रत्येक नागरिक, प्रत्येक तरुण या भागाच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम करत आहे.

मित्रहो,

आज भारतात अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक स्तरावर मोठ्या सुधारणा होत आहेत. व्यवसाय सुलभतेसाठी आम्ही अविरत काम केले आहे. उद्योग आणि नवोन्मेष संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक संपूर्ण परिसंस्था विकसित केली आहे. मग ती स्टार्टअप्स साठीची धोरणे असोत, उत्पादनासाठी पीएलआय योजना असो, की उत्पादक कंपन्या आणि एमएसएमईना दिलेली करसवलत असो, आम्ही सर्वांसाठी सर्वोत्तम धोरणे आखली आहेत.

देशाच्या पायाभूत सुविधांमध्येही सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. संस्थात्मक सुधारणा, उद्योग, पायाभूत सुविधा आणि नवोन्मेष, यांचा हा मिलाफ भारताच्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे. आणि म्हणूनच गुंतवणूकदारांनाही देशाची क्षमता, तसेच त्यांच्या आणि देशाच्या प्रगतीच्या शक्यतांमधील बदल दिसत आहे. आणि या प्रगतीत आसामही डबल इंजिनच्या  वेगाने पुढे जात आहे. आसामने 2030 साला पर्यंत आपली अर्थव्यवस्था दीडशे अब्जांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आसाम हे उद्दिष्ट नक्की गाठेल, असा मला विश्वास आहे.

माझ्या या  विश्वासाचे कारण आसाममधील सक्षम आणि प्रतिभावान लोक आणि येथील भाजप सरकारची वचनबद्धता आहे.  आसाम आज आग्नेय आशिया आणि भारत यांच्यातील प्रवेशद्वार म्हणून उदयास येत आहे. ही क्षमता अधिक वृद्धिंगत करण्यासाठी  सरकारने उत्तर-पूर्व  परिवर्तनकारी औद्योगिकीकरण योजना, म्हणजेच उन्नती सुरू केली आहे. या उन्नती योजनेमुळे आसामसह संपूर्ण ईशान्येकडील उद्योग, गुंतवणूक आणि पर्यटनाला चालना मिळेल. मी उद्योग क्षेत्रातील तुम्हा सर्व साथीदारांना आवाहन करतो की या योजनेचा आणि आसामच्या अमर्याद क्षमतेचा पूर्ण लाभ घ्या. आसामची नैसर्गिक संसाधने आणि धोरणात्मक स्थान यामुळे हे राज्य गुंतवणुकीसाठी एक पसंतीचे ठिकाण बनते. आसामच्या ताकदीचे एक उदाहरण म्हणजे आसाम चहा. आसाम चहा एक ब्रँड बनला असून  जगभरातील चहा प्रेमींच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आसाम चहाला 200 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा वारसा आसामला इतर क्षेत्रातही प्रगती करण्यास प्रेरित करतो.

मित्रांनो,

आज जागतिक अर्थव्यवस्थेत खूप मोठा बदल होत आहे. संपूर्ण जग एका लवचिक पुरवठा साखळीची मागणी करत आहे आणि याच कालखंडात  भारताने आपल्या निर्मिती  क्षेत्राच्या प्रगतीसाठी अभियान स्तरावर काम करण्यास सुरुवात केली आहे. आम्ही मेक इन इंडिया अंतर्गत कमी खर्चातील उत्पादननिर्मितीला  प्रोत्साहन देत आहोत. औषधनिर्माण, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, आपले उद्योग केवळ देशांतर्गत मागण्या पूर्ण करत नाहीत तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्पादन उत्कृष्टतेचे नवे आदर्शदेखील स्थापित करत आहेत. या निर्मिती क्रांतीमध्ये, आसाम मोठी भूमिका बजावत आहे.

मित्रांनो,

जागतिक व्यापारात आसामचा नेहमीच वाटा राहिला आहे. आज, भारताच्या संपूर्ण किनारी नैसर्गिक वायू उत्पादनात आसामचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या काही वर्षांत, येथील रिफायनरीजच्या क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर आणि हरित ऊर्जा यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्येही आसाम वेगाने उदयास येत आहे. सरकारच्या धोरणांमुळे, आसाम उच्च तंत्रज्ञान उद्योगांसह स्टार्टअप्सचे केंद्रदेखील  बनत आहे.

मित्रांनो,

काही दिवसांपूर्वीच अर्थसंकल्पात केंद्र सरकारने नामरूप-प्रकल्प चारला मंजुरी दिली आहे. येत्या काळात, हा युरिया उत्पादन प्रकल्प ईशान्येसह संपूर्ण देशाची युरियाची मागणी पूर्ण करेल.  आसाम पूर्व भारतातील एक मोठे निर्मिती  केंद्र बनेल, तो दिवस फार दूर नाही  आणि यासाठी  केंद्र सरकार राज्यातील भाजप सरकारला सर्वतोपरी मदत करत आहे.

मित्रांनो,

21 व्या शतकातील जगाची प्रगती डिजिटल क्रांती, नवोन्मेष आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीवर अवलंबून आहे. यासाठी आपली तयारी जितकी चांगली असेल जगात तितकी आपली शक्ती जास्त असेल. म्हणूनच आमचे सरकार 21 व्या शतकातील धोरणे आणि रणनीतींसह वेगाने वाटचाल करत आहे. गेल्या 10 वर्षांत भारताने इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल निर्मितीमध्ये केवढी मोठी झेप घेतली आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे.  भारताला आता याच यशोगाथेची सेमीकंडक्टर उत्पादनातही पुनरावृत्ती करायची आहे. आसाम सेमीकंडक्टर निर्मितीतही  भारतातील एक महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होत आहे, याचा मला अभिमान आहे.  काही महिन्यांपूर्वी आसाममधील जागीरोड येथे टाटा सेमीकंडक्टर जुळवणी आणि चाचणी सुविधा सुरू करण्यात आली. हा प्रकल्प येत्या काळात संपूर्ण ईशान्येकडील भागात तंत्रज्ञानविषयक विकासाला चालना देणार आहे.

मित्रांनो,

सेमीकंडक्टर क्षेत्रातील नवोन्मेषासाठी आम्ही आयआयटीसोबतही सहयोग केला आहे. यासाठी देशात सेमीकंडक्टर संशोधन केंद्रावरही काम सुरू आहे. या दशकाच्या अखेरीस, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचे मूल्य 500 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचणार आहे. आमचा वेग आणि व्याप्ती पाहता, भारत सेमीकंडक्टर उत्पादनात एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास येईल हे निश्चित आहे. यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळेल आणि आसामच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल.

मित्रांनो,

गेल्या 10 वर्षांत भारताने आपल्या पर्यावरणीय जबाबदाऱ्या समजून घेत धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. जग आपल्या  अक्षय ऊर्जा मोहिमेला एक आदर्श पद्धत मानून तिचे अनुसरण करत आहे.  देशाने गेल्या 10 वर्षांत सौर, पवन आणि शाश्वत ऊर्जा संसाधनांवर खूप मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे आपल्या पर्यावरणीय वचनबद्धता केवळ पूर्ण झाल्या नाहीत तर देशाच्या  अक्षय ऊर्जा उत्पादन क्षमतेतही अनेक पटींनी विस्तार झाला आहे. आपण 2030 पर्यंत देशाच्या ऊर्जा क्षमतेत 500 गीगावॅट अक्षय ऊर्जा क्षमतेची भर घालण्याचे उद्दिष्ट  ठेवले आहे. 2030 पर्यंत देशाचे वार्षिक हरित हायड्रोजन उत्पादन  5 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत पोहोचावे यासाठी सरकार याला अभियानाचे स्वरूप देऊन काम करत आहे. देशात गॅस पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाल्यामुळे मागणीही झपाट्याने वाढली आहे. गॅस आधारित अर्थव्यवस्थेचे संपूर्ण क्षेत्र वेगाने विस्तारत आहे. या प्रवासात आसामला खूप मोठा लाभ होऊ शकतो. सरकारने तुम्हा सर्वांसाठी अनेक मार्ग तयार केले आहेत. पीएलआय योजनेपासून हरित पुढाकारासाठी केलेली सर्व धोरणे तुमच्या हितासाठी आहेत. माझी अशी इच्छा आहे की, अक्षय ऊर्जा क्षेत्रात आसाम एक आघाडीचे राज्य म्हणून उदयास यावे आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही उद्योग क्षेत्रातले सर्व धुरीण इथल्या  क्षमता योग्यरित्या वृद्धिंगत करण्यासाठी पुढे याल.

मित्रांनो,

2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनवण्यात पूर्व भारत खूप मोठी भूमिका बजावणार आहे. आज, ईशान्य आणि पूर्व भारत पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स, शेती, पर्यटन आणि उद्योगात वेगाने प्रगती करत आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा जग भारताच्या विकास यात्रेत या क्षेत्राची सर्वात पुढे आगेकूच होताना बघेल.  मला खात्री आहे की तुम्ही या यात्रेत आसामचे साथीदार आणि भागीदार व्हाल. चला, आपण सर्व मिळून आसामला असे राज्य बनवूया जे भारताच्या क्षमतांना ग्लोबल साऊथमध्ये नवीन उंचीवर घेऊन जाईल. पुन्हा एकदा, आजच्या शिखर परिषदेसाठी तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि जेव्हा मी हे सांगत आहे, तेव्हा मी तुम्हाला ग्वाही देत आहे, मी तुमच्यासोबत आहे, विकसित भारताच्या यात्रेत तुमच्या योगदानाला माझा पूर्ण पाठिंबा आहे.

खूप खूप धन्यवाद.

***

S.Patil/S.Kane/R.Agashe/S.Kakade/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com