Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुरू नानक जयंती उत्सवानिमित्त श्री सुखबीर सिंग बादल यांच्या निवासस्थानी पंतप्रधानांचे भाषण


आपणा सर्वांना गुरु पर्वानिमित्त अनेकानेक शुभेच्छा. कदाचित गुरूनानक देवजींचा आशीर्वाद असेल किंवा महान अशा गुरु परंपरेचा आशीर्वाद असेल, ज्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला काही चांगले पवित्र कार्य करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे आणि म्हणूनच जे काही चांगले होते आहे, ते अशा गुरुजनांच्या, संतांच्या आशीर्वादामुळे होते आहे. खरे तर आपण काहीच नाही आणि म्हणूनच या सर्व सन्मानाला मी पात्र नाही. हे सर्व महापुरुष, हे सर्व गुरुजन, ज्यांनी कित्येक तपे, त्याग आणि तपस्या करत महान परंपरेचा हा देश घडवला, या देशाचे रक्षण केले, ते खऱ्या अर्थाने या सन्मानाला पात्र आहेत.

गुजरातचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि त्यापूर्वी जेव्हा गुजरातमध्ये महाभयंकर असा भूकंप आला होता, तेव्हा कच्छमध्ये लखपत येथे ज्या ठिकाणी गुरूनानक देवजी यांचे वास्तव्य होते आणि आज सुद्धा गुरूनानक देव जी यांच्या पादुका तेथे आहेत, ते ठिकाण भूकंपामुळे उध्वस्त झाले होते. जेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी गेलो, तेव्हा कच्छमधील भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन करणे, हे माझ्यासमोर पहिले काम होते. उध्वस्त झालेल्या गुरुद्वारामध्येही मी गेलो आणि त्याचवेळी कदाचित या परंपरेच्या आशीर्वादातून माझ्यासाठी असा आदेश झाला, की मला काही तरी करायचे आहे आणि मग त्या स्थानाच्या पुनर्निर्मितीचा निर्णय मी घेतला.

मात्र पूर्वी जसे होते, ज्या प्रकारच्या मातीने गुरुद्वारा बनले होते, ते पुन्हा उभारण्यासाठी योग्य लोकांना शोधावे लागणार होते , तशाच मातीतून त्यांना बोलवावे लागणार होते असते आणि तशाच प्रकारच्या स्थानाची निर्मिती करावी लागणार होती. त्या स्थानाचे पुनर्निर्माण झाले. आज त्या ठिकाणाने जागतिक वारशामध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. उडान योजना आम्ही सुरू केली. उडान योजनेच्या माध्यमातून हवाई मार्गे प्रवास स्वस्त करण्याची योजना तयार करण्यात आली, तर लगेच आदेश आला आणि मनात विचार आला की उडान योजनेची सुरुवात दोन स्थानांवरून व्हावी, त्यात नांदेडच्या गुरुद्वाराचा समावेश होता. नांदेडच्या गुरुद्वाराचाही मला सदैव आशीर्वाद लाभत राहिला, हे माझे सौभाग्य आहे. अनेक वर्षे मला पंजाबमध्येही काम करण्याची संधी मिळाली आणि त्याचमुळे जे गुजरातमध्ये राहून मला समजले नसते, कदाचित कळले नसते, ते जाणून घेण्याची संधी मिळाली. पंजाबमध्ये आपणा सर्वांच्या सोबत राहून, बादल साहेबांच्या कुटुंबांच्या जवळ राहून बरेच काही समजून घेतले आणि मला नेहमीच जाणवत राहिले की गुजरात आणि पंजाब यांच्यात एक विशेष नाते आहे, कारण पूर्वी जे पंच प्यारे होते, त्यात गुजरातमधल्या द्वारकेचा समावेश होता आणि त्याचमुळे द्वारका ज्या जिल्ह्यात आहे, त्या जामनगरमध्ये आम्ही गुरु गोविंद सिंगजी यांच्या नावे फार मोठे रुग्णालय सुरू केले आहे. त्यामागे कल्पना अशी होती की देशाच्या प्रत्येक काना-कोपऱ्यातील महापुरुषांनी आमच्या देशासाठी एकतेचा मंत्र दिला आहे आणि गुरूनानक देव जी यांच्या अनुभवांमधून आपल्या देशाच्या संपूर्ण सांस्कृतिक परंपरांचे सार आपल्याला ‘गुरुबानी’च्या माध्यमातून अनुभवायला मिळते. त्याचा आपल्याला प्रत्यय येतो.

आपुलकीची भावना अनुभवायला मिळते. प्रत्येक शब्दात आणि इतक्या सोप्या रूपात अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत, ज्या मार्गदर्शक आहेत. श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव तसेच तत्कालीन समाजात ज्या समस्या होत्या, कुप्रथा होत्या, त्यांच्या निवारणासाठी कितीतरी सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत. श्रेष्ठ-कनिष्ठ ही भावना संपून जावी, जातिवाद संपुष्टात यावा, एकतेच्या सूत्रात सर्व बांधलेले असावे, ईश्वराच्या प्रति श्रद्धा आणि आदराची भावना असावी, अशी सांगणारी ही महान गुरु परंपरा आपणा सर्वांना प्रेरणा देत राहो. देशाच्या एकतेसाठी आणि अखंडत्वासाठी ही गुरुबानी गुरूनानकजींचा आदेश, संदेश यापेक्षा वेगळे काही आपल्यासाठी महत्वाचे असू शकत नाही आणि त्याच देशाच्या एकतेसाठी आणि अखंडत्वाासाठी सर्वात मोठा सामर्थ्यवान संदेश आमच्याकडे आहे.

मला मान्य आहे की, करतारपुरचा निर्णय 1947 साली झाला. जे झाले, ते झाले. काही गोष्टी अशा असतात, ज्या कदाचित सरकार आणि सैन्य यांच्या दरम्यान होतात, होत असतात. त्यातून मार्ग कधी निघेल, हे येणारा काळच सांगेल. मात्र माणसांचे माणसांशी जोडले जाणे, संपर्क याची एक वेगळी ताकत असते. बर्लिनच्या भिंतीचा पाडाव होईल, असा विचारही कोणी केला असेल का? कदाचित गुरूनानकजींच्या आशीर्वादामुळे करतारपूरचा हा कॉरिडॉर, केवळ एक कॉरिडॉर नाही तर लोकांना लोकांशी जोडण्याचे एक फार मोठे कारण होऊ शकतो. गुरुबानीचा एकेक शब्द त्यासाठी आपल्याला शक्ती देऊ शकतो. हीच ताकत आम्ही घेऊ. आम्ही ‘वसुधैव कुटुंबकम’चा विचार करणारे आहोत, संपूर्ण विश्व हे एक कुटुंब आहे, असा आदर्श बाळगत आम्ही लहानाचे मोठे झाले आहोत. आम्ही कधीच कोणाचे वाईट चिंतीत नाही आणि आपण कल्पना करा, साडेपाचशे वर्षांपूर्वी जेव्हा कोणतीही साधने नव्हती, व्यवस्था नव्हत्या, अशावेळी गुरूनानक देव जी यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात पदयात्रा केली.

आसाम कुठे, कच्छ कुठे… पदयात्रा करूनच त्यांनी एक प्रकारे संपूर्ण भारताला आपल्या आत सामावून घेतले. अशी साधना, अशी तपस्या आणि आजचे हे गुरूपर्व, आपणा सर्वांसाठी एक नव्या प्रेरणेचे, नव्या ऊर्जेचे, नव्या उत्साहाचे कारण व्हावे, ज्यातून देशाची एकता आणि अखंडत्व अबाधित राखण्यासाठी आपल्या सर्वांना शक्ती लाभावी आणि आपण सर्व एकत्र यावे… कारण सोबतीची एक आपली अशी ताकत आहे. एक महान परंपरा, लंगर, ही केवळ खाण्यापिण्याची एक सामान्य व्यवस्था नाही, तर लंगर हा एक संस्कार आहे, लंगर हा एक वारसा आहे. यात कोणताही भेदभाव केला जात नाही, याच्या माध्यमातून कितीतरी मोठे योगदान, अत्यंत सुलभ पद्धतीने देण्यात येते आहे आणि त्याचमुळे आजच्या या पवित्र पर्वानिमित्त मी या पवित्र वातावरणात गुरु ग्रंथ साहिब यांच्या उपस्थितीत या महान परंपरेला प्रणाम करत, गुरुजनांच्या महान त्यागाला आणि तपस्येला अभिवादन करतो. आपण सर्वांनी माझा सन्मान केला आहे, तो केवळ माझा सन्मान नाही तर या महान परंपरेचा सन्मान आहे. आपण सर्व जितके करू शकू, तितके ते कमीच आहे. आम्हाला आणखी चांगले करण्यासाठी शक्ती मिळत राहावी. मी पुन्हा एकदा आपले सर्वांचे हृदयापासून अनेकानेक आभार मानतो!!!

***

B.Gokhale/ M. Pange