नवी दिल्ली, 6 सप्टेंबर 2024
गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सी.आर. पाटील, निमुबेन, गुजरात सरकारचे मंत्रीगण, खासदार, आमदार, देशातील सर्व जिल्ह्यांचे डीएम, जिल्हाधिकारी, इतर मान्यवर आणि माझ्या सर्व बंधू-भगिनींनो!
आज गुजरातच्या भूमीवरून जलशक्ती मंत्रालयाकडून एक महत्त्वाचे अभियान सुरू करण्यात येत आहे.त्यापूर्वी गेल्या काही दिवसांत देशाच्या कानाकोपऱ्यात पावसाने जे थैमान घातले, त्यामुळे देशाचा असा एखादाच भाग असेल ज्याला या समस्येमुळे संकटाचा सामना करावा लागला नसेल. मी अनेक वर्षे गुजरातचा मुख्यमंत्री होतो,पण एकाच वेळी इतक्या तालुक्यांमध्ये इतका मुसळधार पाऊस कधीच ऐकला किंवा पाहिला नव्हता. पण यावेळी गुजरातमध्ये मोठे संकट निर्माण झाले. निसर्गाच्या या प्रकोपासमोर आपण टिकाव धरू शकू इतकी ताकद संपूर्ण व्यवस्थेत नव्हती.पण गुजरातच्या लोकांचा स्वतःचा स्वभाव आहे, देशवासियांचा स्वतःचा स्वभाव आहे, सामर्थ्य आहे, एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहात प्रत्येक जण प्रत्येकाची मदत करत असतो.आजही देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
मित्रांनो
जलसंचय हे केवळ एक धोरण नाही, हा एक प्रयत्न आहे, आणि तसे सांगायला गेले तर ते एक पुण्य देखील आहे. यामध्ये औदार्य आहे आणि उत्तरदायित्वही आहे. भावी पिढ्या जेव्हा आपले मूल्यमापन करतील तेव्हा पाण्याबद्दलचा आपला दृष्टीकोन कदाचित त्यांचा पहिला मापदंड असेल. कारण, हा केवळ संसाधनांचा प्रश्न नाही. हा जीवनाचा प्रश्न आहे, हा मानवतेच्या भविष्याचा प्रश्न आहे. म्हणूनच शाश्वत भविष्यासाठी आम्ही जे 9 संकल्प मांडले आहेत, त्यात जलसंरक्षण हा पहिला संकल्प आहे. आज लोकसहभागातून या दिशेने आणखी एक सुयोग्य प्रयत्न सुरू होत असल्याचा मला आनंद आहे. या निमित्ताने मी भारत सरकारचे जलशक्ती मंत्रालय, गुजरात सरकार आणि या मोहिमेत सहभागी होणाऱ्या देशातील सर्व जनतेला माझ्या शुभेच्छा देतो.
मित्रांनो
आज जेव्हा पर्यावरण आणि जलसंवर्धनाचा विषय येतो तेव्हा अनेक वस्तुस्थितींचा आपण नेहमी विचार केला पाहिजे. जगातील एकूण गोड्या पाण्यापैकी फक्त 4 टक्के पाणी भारतात आहे. ते फक्त 4 टक्के आहे हे आपल्या गुजरातच्या लोकांना समजेल. भारतात कित्येक विशाल नद्या आहेत, परंतु आपल्या एका मोठ्या भूभागाला पाण्याच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्याची पातळी सातत्याने खाली जात आहे. हवामान बदलामुळे हे संकट अधिकच गंभीर होत आहे.
आणि मित्रांनो,
हे सर्व असूनही, भारतच या आव्हानांवर स्वतःसाठी तसेच संपूर्ण जगासाठी उपाय शोधू शकतो. याचे कारण आहे भारताची प्राचीन ज्ञान परंपरा. जलसंरक्षण, निसर्गाचे संरक्षण, हे आपल्यासाठी नवीन शब्द नाहीत, हे आपल्यासाठी पुस्तकी ज्ञान नाही. परिस्थितीमुळे हे कामही आपल्या वाट्याला आलेले नाही. हा भारताच्या सांस्कृतिक चेतनेचा भाग आहे. आपण त्या संस्कृतीचे लोक आहोत, जिथे पाण्याला देवाचे रूप मानले गेले आहे, नद्यांना देवी मानले गेले आहे. सरोवरांना, कुंडांना मंदिरांचा दर्जा मिळाला आहे. गंगा ही आपली माता आहे, नर्मदा आपली माता आहे. गोदावरी आणि कावेरी या आपल्या माता आहेत. हे नाते हजारो वर्षांचे आहे. हजारो वर्षांपूर्वीही आपल्या पूर्वजांना पाणी आणि जलसंधारणाचे महत्त्व माहीत होते. आपल्या शेकडो वर्षे प्राचीन धर्मग्रंथात सांगितले आहे – अद्भिः सर्वाणि भूतानि, जीवन्ति प्रभवन्ति च। तस्मात् सर्वेषु दानेषु,तयोदानं विशिष्यते॥ म्हणजेच सर्व जीव पाण्यापासून जन्माला येतात आणि पाण्यापासूनच जगतात. त्यामुळे पाणी दान, इतरांसाठी पाणी वाचवणे हे सर्वात मोठे दान आहे. रहिमदासांनीही शेकडो वर्षांपूर्वी असेच म्हटले होते. आपण सर्वांनी वाचले आहे. रहिमदास म्हणाले होते – रहिमन पानी राखिए, बिन पानी सब सून! ज्या राष्ट्राची विचारसरणी इतकी दूरदर्शी आणि सर्वसमावेशक असेल, त्या राष्ट्राला जलसंकटाच्या आपत्तीवर उपाय शोधण्यात जगात सर्वात पुढे उभे राहावेच लागेल.
आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात गुजरातच्या भूमीवर होत आहे, जिथे लोकांना पाणी मिळावे आणि पाण्याची बचत व्हावी या दिशेने अनेक यशस्वी प्रयोग झाले आहेत. अडीच दशकांपूर्वीपर्यंत सौराष्ट्राची स्थिती काय होती, हे आपल्या सर्वांच्या लक्षात आहे, उत्तर गुजरातची स्थिती काय होती हे आपल्याला माहीत आहे. जलसंचयनासाठी आवश्यक असलेली दृष्टी पूर्वीच्या सरकारांमध्येही अभावानेच होती. तेव्हाच मी संकल्प केला की जलसंकटही सोडवता येऊ शकते हे मी जगाला सांगेन. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले सरदार सरोवर धरणाचे काम पूर्ण करून घेतले. सौनी योजना गुजरातमध्ये सुरू झाली. ज्या ठिकाणी जास्त पाणी होते, तेथून पाण्याचा ताण असलेल्या भागात पाणी पोहोचवले जात होते. तेव्हाही विरोधी पक्षांनी आमची खिल्ली उडवत होते की टाकल्या जाणाऱ्या पाण्याच्या पाईपमधून हवा निघेल. पण आज गुजरातमध्ये केलेल्या प्रयत्नांचे परिणाम जगासमोर आहेत. गुजरातचे यश आणि गुजरातमधील माझे अनुभव मला आत्मविश्वास देतात की आपण देशाला जलसंकटातून मुक्त करू शकतो.
मित्रांनो
जलसंरक्षण हा केवळ धोरणांचा विषय नाही तर सामाजिक निष्ठेचाही विषय आहे. जागरूक जनमत, लोकसहभाग आणि लोकचळवळ ही या मोहिमेची सर्वात मोठी ताकद आहे. तुम्हाला आठवत असेल, पाणी आणि नद्यांच्या नावावर हजारो कोटींच्या योजना अनेक दशके येत राहिल्या. पण,त्याचे परिणाम या दहा वर्षांतच दिसून आले. आमच्या सरकारने संपूर्ण समाज आणि संपूर्ण सरकारच्या दृष्टिकोनातून काम केले आहे. तुम्ही 10 वर्षांच्या सर्व मोठ्या योजना पहा. पाण्याशी संबंधित प्रश्नांवर पहिल्यांदाच कोंडी फोडण्यात आली.
आम्ही ‘संपूर्ण सरकार’ च्या वचनबद्धतेनुसार प्रथमच एका स्वतंत्र जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती केली. जल जीवन मिशनच्या रूपात प्रथमच देशाने ‘हर घर जल’ चा संकल्प केला. पूर्वी देशात केवळ 3 कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचत होते. आज देशाच्या ग्रामीण भागातील सुमारे 15 कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचत आहे.
जल जीवन मिशन च्या माध्यमातून देशातील 75 टक्क्यांहून अधिक घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचले आहे. जल जीवन मिशनची ही जबाबदारी स्थानिक जल समित्या सांभाळत आहेत. आणि गुजरातमधील जल समित्यांमध्ये महिलांनी जी कमाल केली होती, त्याप्रमाणेच संपूर्ण देशातील जल समित्यांमध्ये आता सर्व महिला शानदार काम करत आहेत. या यशामध्ये किमान 50 टक्के भागीदारी गावातील महिलांची आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आज जलशक्ती अभियान एक राष्ट्रीय अभियान बनले आहे. पारंपरिक जलस्रोतांचे नुतनीकरण असो, नवीन संरचनांचे बांधकाम असो, भागधारकांपासून ते नागरी समाज आणि पंचायतींपर्यंत प्रत्येक जण यात सहभागी झाला आहे. जनभागीदारीच्या माध्यमातूनच आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रत्येक जिल्ह्यात अमृत सरोवर निर्माण करण्याचे काम सुरू केले होते. या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून 60 हजाराहून अधिक अमृत सरोवर तयार करण्यात आले. देशाच्या भावी पिढीसाठी हे किती महत्त्वपूर्ण काम आहे, याची तुम्ही कल्पना करू शकता. याच प्रकारे भूजल पुनर्भरणासाठी आम्ही अटल भूजल योजना सुरू केली. या उपक्रमात देखील जलस्रोतांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी गावातील समुदायांनाच देण्यात आली आहे. 2021 मध्ये आम्ही ‘कॅच द रेन’ ही मोहीम सुरू केली. आज शहरांपासून गावांपर्यंत ‘कॅच द रेन’ या मोहिमेत मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत. ‘नमामी गंगे’ योजनेचे उदाहरण देखील आपल्यासमोर आहे. ‘नमामि गंगे’ हा उपक्रम करोडो देशवासीयांचा एक भावनात्मक संकल्प बनला आहे. आपल्या नद्यांना स्वच्छ ठेवण्यासाठी लोक जुन्या रुढींचा छेद करत आहे तसेच असमयोचित रितीरिवाजही बदलत आहेत.
मित्रांनो,
पर्यावरण संवर्धनासाठी ‘एक पेड मा के नाम’ उपक्रमात वृक्षारोपण करण्याचे आवाहन मी देशवासीयांना केले आहे, हे तुम्ही सर्वजण जाणताच. जेव्हा झाडे लावली जातात तेव्हा भूजल पातळी देखील जलद गतीने वाढते. गेल्या काही आठवड्यांत ‘एक पेड मा के नाम’ उपक्रमात देशात अनेक कोटी वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. अशी कित्येक अभियाने आहेत, कित्येक संकल्प आहेत, 140 कोटी देशवासीयांच्या सहभागातून आज अशी अभियाने आणि संकल्प लोक चळवळी बनत आहेत.
मित्रांनो,
जल संचयासाठी आज आपल्याला ‘सीमित वापर, पुनर्वापर, पुनर्भरण आणि पुनर्प्रक्रियेच्या’ मंत्रानुसार मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. म्हणजेच, पाणी तेव्हाच वाचेल जेव्हा आपण पाण्याचा दुरुपयोग थांबवू ; सीमित वापर करू; जेव्हा आपण पाण्याचा पुनर्वापर करू; जेव्हा आपण जलस्रोतांचे पुनर्भरण करू आणि वापरलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते पुन्हा वापरण्यायोग्य बनवू. यासाठी आपण नवनवीन पद्धती अंगीकारल्या पाहिजेत. आपल्याला नवोन्मेषी बनले पाहिजे, तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. आपल्याला आवश्यक असलेल्या पाण्यापैकी 80 टक्के पाणी शेतीच्या कामात उपयोगी पडते, हे आपण सर्वजण जाणतो. म्हणूनच, शाश्वत कृषी पद्धतीच्या दिशेने अग्रेसर होण्यासाठी ठिबक सिंचन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याला आमचे सरकार प्रोत्साहन देत आहे. ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ म्हणजेच पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पिकाचे उत्पादन यासारख्या अभियानांमुळे पाण्याची बचत देखील होत आहे तसेच पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे. डाळी, तेल बिया आणि भरडधान्य यासारख्या कमी पाण्यावर उत्पादन घेता येण्याजोग्या पिकांच्या शेतीला सरकार प्रोत्साहन देत आहे. जल संरक्षण करण्यासाठी काही राज्ये शेतकऱ्यांना पर्यायी पिक घेण्यसाठी प्रोत्साहित करत आहेत. या प्रयत्नांना आणखी गतिशील बनवण्यासाठी सर्व राज्यांनी एकत्र आले पाहिजे आणि मिशन मोडवर काम केले पाहिजे, असा माझा आग्रह आहे. आपल्याला अनेक नव्या तंत्रज्ञानासोबतच शेतशिवारात शेततळी आणि सरोवरांची निर्मिती करणे, विहिरींचे पुनर्भरण करणे यासारख्या पारंपरिक ज्ञानाच्या वापराला देखील प्रोत्साहन दिले पाहिजे.
मित्रांनो,
स्वच्छ पाण्याची उपलब्धता, जलसंवर्धनाला मिळणारी सफलता या बाबींशी एक खूप मोठी जल अर्थव्यवस्था देखील जोडलेली आहे. उदाहरणार्थ, जल जीवन मिशन ने लाखो लोकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मोठ्या संख्येने अभियंते, प्लंबर,इलेक्ट्रिशियन आणि व्यवस्थापक यासारख्या नोकऱ्या लोकांना मिळाल्या आहेत. प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचल्यामुळे देशातील लोकांचे सुमारे साडेपाच कोटी मानवी तास वाचतील असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. हा वाचलेला वेळ, विशेषतः आमच्या मात भगिनी आणि मुली यांचा वाचलेला वेळ थेट देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ होण्यात कामी येईल. जल अर्थव्यवस्थेचा एक पैलू, महत्वपूर्ण पैलू ‘तंदुरुस्ती’ देखील आहे – आरोग्य. जल जीवन मिशन मुळे सव्वा लाखाहून अधिक बालकांचा अकाली मृत्यू टाळता येईल, असे काही अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे आपण दरवर्षी चार लाखाहून अधिक लोकांना अतिसारासारख्या आजारांपासून वाचवू शकू, म्हणजेच आजारांवर लोकांचा जो पैसा खर्च होतो, तो देखील लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
मित्रांनो,
लोकसहभागाच्या या मोहिमेत आपल्या उद्योग क्षेत्राचे देखील खूप मोठे योगदान आहे. ज्या उद्योगांनी ‘नेट झिरो लिक्विड डिस्चार्ज स्टॅंडर्ड’ आणि ‘पाण्याचा पुनर्वापर उद्दिष्ट’ पूर्ण केले, आज मी त्यांचे देखील आभार मानतो. अनेक उद्योगांनी ‘कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ – सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून जलसंधारण प्रकल्प सुरू केले आहेत. गुजरातने जलसंधारणासाठी ‘कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ चा वापर करण्यात नवा मानदंड स्थापित केला आहे. सूरत, वलसाड, डांग, तापी, नवसारी या ठिकाणी सीएसआर उपक्रमाच्या मदतीने सुमारे 10,000 कूपनलिकांचे पुनर्भरण संरचना उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. आता ‘जलसंचय – जनभागीदारी’ अभियानाच्या माध्यमातून जलशक्ती मंत्रालय आणि गुजरात सरकार यांनी एकमेकांच्या सोबतीने आता अशा आणखी 24,000 संरचना निर्माण करण्याचे अभियान सुरू केले आहे. हे अभियान असे आदर्श प्रारूप आहे की जे भविष्यात इतर राज्यांना हा उपक्रम राबवण्याची प्रेरणा देईल. आपण सर्वजण एकत्र येऊन भारताला जलसंरक्षणात संपूर्ण मानवजातीसाठी जागतिक प्रेरणास्थान बनवू, असा मला विश्वास आहे. याच विश्वासासह मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा या अभियानाच्या सफलतेसाठी अनेकानेक शुभेच्छा देतो.
खूप खूप धन्यवाद!
M.Iyengar/S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
भारत में जनभागीदारी और जनआंदोलन से जल संरक्षण और प्रकृति संरक्षण का अनूठा अभियान चल रहा है। आज गुजरात के सूरत में 'जल संचय जनभागीदारी पहल' का शुभारंभ कर अत्यंत हर्ष की अनुभूति हो रही है।https://t.co/Qg27AbPj1f
— Narendra Modi (@narendramodi) September 6, 2024
जल-संचय, ये केवल एक पॉलिसी नहीं है।
— PMO India (@PMOIndia) September 6, 2024
ये एक प्रयास भी है, और पुण्य भी है: PM @narendramodi pic.twitter.com/fhIVxklUSE
जल संरक्षण, प्रकृति संरक्षण… ये भारत की सांस्कृतिक चेतना का हिस्सा है। pic.twitter.com/Y45EHSFzU0
— PMO India (@PMOIndia) September 6, 2024
जल-संरक्षण केवल नीतियों का नहीं, बल्कि सामाजिक निष्ठा का भी विषय है: PM @narendramodi pic.twitter.com/ebCKjDemdi
— PMO India (@PMOIndia) September 6, 2024
जल संचय सिर्फ एक अभियान नहीं, बल्कि यह जनभागीदारी और उत्तरदायित्व का संकल्प भी है। pic.twitter.com/6YHSRkJzpf
— Narendra Modi (@narendramodi) September 6, 2024
हमारी संस्कृति में जल को ईश्वर का रूप कहा गया है। जिस राष्ट्र का चिंतन इतना दूरदर्शी और व्यापक हो, उसे जल संकट का हल खोजने के लिए दुनिया में सबसे आगे खड़ा होना ही होगा। pic.twitter.com/u6fhXZzF8x
— Narendra Modi (@narendramodi) September 6, 2024
गुजरात में जैसे पानी समिति में महिलाओं ने कमाल किया था, वैसे ही अब पूरे देश में पानी समिति में महिलाएं शानदार काम कर रही हैं। pic.twitter.com/bt7EWquk4e
— Narendra Modi (@narendramodi) September 6, 2024
आज 140 करोड़ देशवासियों की भागीदारी से जल संरक्षण के कई अभियान जन-आंदोलन बनते जा रहे हैं। pic.twitter.com/wkhXXd5BmT
— Narendra Modi (@narendramodi) September 6, 2024
जल-संचयन के लिए आज हमें Reduce, Reuse, Recharge और Recycle के मंत्र पर आगे बढ़ने की जरूरत है। pic.twitter.com/SjQk5vcMOA
— Narendra Modi (@narendramodi) September 6, 2024