Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरातमध्ये सूरत इथे सूरत अन्न सुरक्षा संपृक्तता मोहिमेचा शुभारंभ करताना पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

गुजरातमध्ये सूरत इथे सूरत अन्न सुरक्षा संपृक्तता मोहिमेचा शुभारंभ करताना पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर


व्यासपीठावर बसलेले गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी  श्री सी. आर. पाटील जी, राज्य सरकारातील  मंत्री, इथे उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी आणि सूरतच्या माझ्या बंधूभगिनींनो!

तुम्ही सर्व कसे आहात? मजेत ना?

आज देशातील आणि गुजरातच्या जनतेने मला तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी दिली आहे हे माझे सद्भाग्य आहे.  आणि त्यानंतर, ही माझी सुरतची पहिली भेट आहे.  गुजरातने जे काही निर्माण केले, ते देशाने प्रेमाने स्वीकारले.  मी तुमचा कायम ऋणी राहीन, माझे आयुष्य घडवण्यात तुम्ही खूप मोठे योगदान दिले आहे.  आज, जेव्हा मी सुरतला आलो आहे, तेव्हा मला सुरतचा आत्मा जाणवत नाही किंवा तो मला  दिसत नाही हे कसे शक्य आहे?  काम आणि दान, या दोन गोष्टी सुरतला अधिक विशेष बनवतात.  एकमेकांच्या पाठिशी उभे राहणे, सर्वांच्या विकासाचा आनंद साजरा करणे, हे आपल्याला सुरतच्या ठायी ठायी आढळते.  आजचा हा कार्यक्रम सुरतच्या याच आत्म्याला,या भावनेला पुढे नेणार आहे.

मित्रांनो,

सुरत हे गुजरात आणि देशातील अनेक बाबतीत आघाडीवर असलेले शहर आहे.  आता सुरत देखील गरीब आणि वंचितांना अन्न आणि पोषण सुरक्षा प्रदान करण्याच्या मोहिमेत पुढे जात आहे.  सुरतमध्ये सुरू करण्यात आलेले अन्न सुरक्षा संपृक्ती अभियान देशातील इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल.  यामुळे एक संपृक्तता मोहीम सुनिश्चित होते – जेव्हा प्रत्येकाला 100 टक्के मिळते तेव्हा हे निश्चित होते.  यामुळे कोणताही भेदभाव होणार नाही, कोणीही वगळले जाणार नाही, कोणीही नाराज होणार नाही आणि कोणाचीही फसवणूक होणार नाही याची खात्री होते. यामुळे अनुनयाची भावना आणि त्या वाईट प्रथा मागे राहून समाधानाच्या पवित्र भावनेला प्रोत्साहन मिळते.  जेव्हा सरकारच स्वतः लाभार्थ्यांच्या दाराशी जाते, तेव्हा कुणी कसे वंचित राहील आणि जेव्हा कोणीही वंचित राहणार नाही, तेव्हा कोणीही नाराज होणार नाही आणि जेव्हा असा विचार होतो की आपल्याला सर्वांना लाभ द्यायचा आहे, तेव्हा फसवणूक करणारे देखील पळून जातात.

मित्रांनो,

या संपृक्ततेच्या दृष्टिकोनामुळे, येथील प्रशासनाने अडीच लाखांहून अधिक नवीन लाभार्थी शोधले आहेत.  यामध्ये आपल्या वृद्ध माता आणि भगिनी, आपले वृद्ध भाऊ आणि बहिणी, आपल्या विधवा माता आणि बहिणी, आपले दिव्यांग लोक, या सर्वांना मोठ्या संख्येने समाविष्ट केले आहे.  आता आपल्या कुटुंबातील अशा सर्व नवीन सदस्यांना मोफत शिधा आणि पौष्टिक अन्न मिळेल.  मी सर्व लाभार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो.

मित्रांनो,

आपण सर्वांनी एक म्हण ऐकली आहे…. आपल्या कानावर वारंवार पडत असे – रोटी, कपडा और मकान (अन्न, वस्त्र आणि निवारा), म्हणजेच अन्नाचे  महत्त्वकपडे आणि निवारा या दोन्हींपेक्षा जास्त आहे.  आणि जेव्हा एखादा गरीब माणूस त्याच्या अन्नाची काळजी करतो, तेव्हा त्याचे दुःख काय असते, हे मला  पुस्तकांमध्ये वाचण्याची गरज नाही, मी ते अनुभवू शकतो.  म्हणूनच, गेल्या काही वर्षांत, आमच्या सरकारने गरजूंच्या उपजीविकेची आणि त्यांच्या अन्नाची काळजी घेतली आहे.  गरिबांच्या घरात चुली जळत नाहीत, मुले अश्रू ढाळत झोपी जातात – हे आता भारताला मान्य नाही, आणि म्हणून अन्न- निवाऱ्याची व्यवस्था करणे हे आमचे प्राधान्य आहे. 

मित्रांनो,

आज मला समाधान वाटते की आपले सरकार गरिबांचे मित्र  बनले आहे आणि त्यांच्यासोबत एका सेवकासारखे उभे आहे.  कोविड काळात, जेव्हा देशवासीयांना सर्वात जास्त मदतीची आवश्यकता होती, तेव्हा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू करण्यात आली, जी मानवतेला महत्त्व देते आणि गरिबांच्या घरात चुली जळत राहतील याची खात्री करते.  ही जगातील सर्वात मोठी आणि  एक अनोखी योजना आहे, जी आजही सुरू आहे.  गुजरात सरकारनेही तिचा विस्तार केला आहे याचा मला आनंद आहे.  अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून गुजरातने उत्पन्न मर्यादा वाढवली.  आज, केंद्र सरकार गरिबांच्या घरात चूल पेटत राहण्यासाठी दरवर्षी सुमारे 2.25 लाख कोटी रुपये खर्च करत आहे.

मित्रांनो,

भारताच्या विकसित होण्याच्या प्रवासात पौष्टिक अन्नाची मोठी भूमिका आहे.  देशातील प्रत्येक कुटुंबाला पुरेसे पोषण प्रदान करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून देश कुपोषण आणि रक्तक्षयासारख्या मोठ्या समस्यांपासून मुक्त होऊ शकेल.  पंतप्रधान पोषण योजनेअंतर्गत, सुमारे 12 कोटी शालेय मुलांना पौष्टिक आहार दिला जात आहे.  सक्षम अंगणवाडी कार्यक्रमा अंतर्गत, लहान मुले, माता आणि गर्भवती महिलांच्या पोषणाची काळजी घेतली जात आहे.  पंतप्रधान मातृ वंदना योजनेअंतर्गतही गर्भवती महिलांना पौष्टिक आहारासाठी हजारो रुपये दिले जात आहेत.

मित्रांनो,

पोषण हे फक्त चांगल्या खाण्या पिण्या पुरते मर्यादित नाही, तर स्वच्छता हा देखील त्याचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे.  म्हणूनच आपले सरकार स्वच्छतेवर खूप भर देत आहे.  आणि  सुरतबद्दल बोलायचे झाले तर, स्वच्छतेच्या बाबतीत जेव्हा जेव्हा देशव्यापी स्पर्धा असते तेव्हा सूरत नेहमीच पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहते.  म्हणून, सुरतचे लोक निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत.

मित्रांनो,

आमचा प्रयत्न असा आहे की देशातील प्रत्येक शहर आणि प्रत्येक गाव घाणीपासून मुक्त ठेवण्यासाठी काम करत राहिले पाहिजे.  आज जगातील अनेक मोठ्या संस्था म्हणत आहेत की स्वच्छ भारत अभियानामुळे गावांमधील आजार कमी झाले आहेत.  सध्या, आमचे सी.आर. पाटीलजी यांच्याकडे संपूर्ण देशाच्या जलमंत्रालयाची जबाबदारी आहे.  त्यांच्या देखरेखीखाली प्रत्येक घरोघरी पाणी मोहीम (हर घर जल अभियान) सुरू आहे.  या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचणाऱ्या स्वच्छ पाण्यामुळे अनेक आजारही कमी झाले आहेत.

मित्रांनो,

आज आमच्या मोफत रेशन योजनेमुळे कोट्यवधी लोकांचे जीवन सोपे झाले आहे. आज खऱ्या दावेदाराला त्याचे पूर्ण रेशन मिळू शकते. पण १० वर्षांपूर्वीपर्यंत हे शक्य नव्हते. तुम्ही कल्पना करू शकता, आपल्या देशात ५ कोटींहून अधिक बनावट रेशनकार्डधारक होते. आपल्या गुजराती भाषेत त्याला भूतिया कार्ड म्हणतात. देशात अशी ५ कोटी नावे होती, जी कधीच जन्मली नव्हती, ज्यांचा जन्मच झाला नाही त्यांच्यासाठी रेशन कार्ड तयार करण्यात आले. गरिबांचे रेशन खाणाऱ्या चोर-लुटेरे यांची टोळी तयार होती, ही टोळी/लोक रेशनच्या नावाखाली गरिबांचे हक्क खात होते, मग मी काय केले? तुम्ही सर्वांनी शिकवले आहे, त्याप्रमाणे मी त्यांचा सफाया केला. आम्ही ही ५ कोटी बनावट नावे प्रणालीतून काढून टाकली, आम्ही संपूर्ण रेशनशी संबंधित प्रणाली आधार कार्डशी जोडली. आज तुम्ही सरकारी रेशन दुकानात जा आणि तुमच्या वाट्याचे रेशन घ्या. रेशनकार्डशी संबंधित आणखी एक मोठी समस्या देखील आम्ही सोडवली आहे.

सुरतमध्ये, इतर राज्यांतील आमचे कामगार मित्र मोठ्या संख्येने काम करतात, इथेही मला अनेक चेहरे दिसत होते, काही उडिया आहेत, काही तेलुगू आहेत, काही महाराष्ट्राचे आहेत, काही बिहारचे आहेत, काही उत्तर प्रदेशचे आहेत. एक काळ असा होता की एका ठिकाणचे रेशन कार्ड दुसऱ्या ठिकाणी वैध नव्हते. आम्ही ही समस्या सोडवली. आम्ही ‘एक राष्ट्र एक रेशन कार्ड’ लागू केले. आता, रेशनकार्ड कुठलेही  असले तरी, लाभार्थ्याला देशातील प्रत्येक शहरात त्याचे फायदे/लाभ मिळतात. येथे सुरतमधील अनेक कामगारांनाही याचा फायदा होत आहे. यावरून असे दिसून येते की जेव्हा खऱ्या हेतूने धोरणे बनवली  जातात तेव्हा गरिबांना त्याचा निश्चितच फायदा होतो.

मित्रांनो,

गेल्या दशकात, आम्ही देशभरातील गरिबांना सक्षम करण्यासाठी मिशन मोडमध्ये काम केले आहे. गरिबांभोवती एक संरक्षक कवच तयार करण्यात आले जेणेकरून त्यांना कोणासमोर हात पसरावे लागू नये. पक्के घर असो, शौचालय, गॅस कनेक्शन, नळ कनेक्शन असो, यामुळे गरिबांना नवीन आत्मविश्वास मिळाला. यानंतर आम्ही गरीब कुटुंबांना विम्याचे सुरक्षा कवच दिले.  पहिल्यांदाच, सुमारे ६० कोटी भारतीयांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची हमी देण्यात आली. पूर्वी, गरीब कुटुंब जीवन विमा आणि अपघात विम्याचा विचारही करू शकत नव्हती. आमच्या सरकारने गरीब आणि निम्न मध्यमवर्गीयांना विमा सुरक्षा कवच देखील प्रदान केले. आज देशातील ३६ कोटींहून अधिक लोक सरकारी विमा योजनांशी जोडलेले आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आतापर्यंत या गरीब कुटुंबांना दाव्याच्या रकमेच्या स्वरूपात १६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की हे पैसे कठीण काळात कुटुंबांना मदत करणारे ठरले आहेत.

मित्रांनो,

ज्याला कोणी विचारले नाही अशा व्यक्तीला मोदीने गौरवले आहे. ते दिवस आठवा, जेव्हा एखाद्या गरीब व्यक्तीला स्वतःचे काही काम सुरू करायचे असायचे, तेव्हा त्याला बँकेत प्रवेशही दिला जात नव्हता, त्याला पैसे देण्याचा तर प्रश्नच नव्हता. आणि बँकेचे लोक गरिबांकडून हमी मागायचे. आता गरिबांना हमी कुठून मिळणार आणि गरिबांना हमी कोण देणार, म्हणून या गरीब आईच्या मुलाने ठरवले की मोदी प्रत्येक गरिबाला हमी देतील. मोदीने स्वतः अशा गरीब लोकांची हमी घेतली आणि मुद्रा योजना सुरू केली. आज मुद्रा योजनेतून जवळपास ३२ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. जे लोक दररोज आपला गैर काहीतरी बोलतात, त्यांना ३२ लाख लिहिताना किती शून्य असतात हे देखील समजत नाही. झीरो सीट वाल्यांना हे समजणार देखील नाही. ३२ लाख कोटी रुपये हमीशिवाय दिले आहेत, मोदींनी ही हमी घेतली आहे.

मित्रांनो,

पूर्वी, हातगाड्या आणि पदपथांवर काम करणाऱ्या आमच्या मित्रांना मदत करण्यासाठी कोणीही नव्हते. जर तो गरीब माणूस सकाळी भाजीपाल्याची गाडी चालवत असे, तर तो एखाद्या सावकाराकडे हजार रुपये घेण्यासाठी जायचा, तो हजार लिहून ९०० द्यायचा. तो दिवसभर काम करून पैसे कमवत असे आणि संध्याकाळी पैसे द्यायला जाई तेव्हा हजार रुपये मागत असे. आता मला सांगा, तो गरीब माणूस काय कमवेल, आपल्या मुलांना काय खायला देईल? आमच्या सरकारने त्यांना स्वानिधी योजनेद्वारे बँकांकडून मदत देखील दिली. या वर्षीच्या अर्थसंकल्पात, आम्ही रस्त्यावर बसून गाड्यांवर सामान विकणाऱ्या सर्व लोकांसाठी एक विशेष क्रेडिट कार्ड जाहीर केले आहे.

आमच्या विश्वकर्मा मित्रांचा, जे प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावात आणि शहरात कोणत्या ना कोणत्या दैनंदिन कामात गुंतलेले आहेत, त्यांचाही पहिल्यांदाच विचार करण्यात आला. आज, देशभरातील हजारो आपले सहकारी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत आहेत, त्यांना आधुनिक साधने दिली जात आहेत, त्यांना नवीन डिझाइन शिकवल्या जात आहेत. आणि हे काम पुढे नेण्यासाठी त्यांना निधी देखील दिला जातो, पैसे देखील दिले जातात. ते त्यांचे पारंपारिक काम पुढे नेत आहे. आणि हेच तर सबका साथ, सबका विकासआहे. अशा प्रयत्नांमुळे, गेल्या दशकात, २५ कोटी भारतीयांसाठी ५० वर्षे गरिबी हटावच्या घोषणा ऐकून देश थकला होता; देशवासीयांचे कान थकले होते.

प्रत्येक वेळी निवडणुका आल्या की गरीबी हटाओ, गरिबी हटाओ अशा घोषणा दिल्या जायच्या, पण गरिबी हटत नसे. तुम्ही मला अशा प्रकारे घडवले की मी तिथे जाऊन अशा प्रकारचे काम केले की आज माझ्या भारतातील 25 कोटीहून अधिक लोक, गरीब कुटुंबे, 25 कोटींहून अधिक गरीब जनता गरिबीतून बाहेर पडली आहे.

मित्रांनो,

येथे सुरतमध्ये आमची मध्यमवर्गीय कुटुंबे मोठ्या संख्येने राहतात. देशाच्या विकासात मध्यमवर्गीयांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे गेल्या दशकात सरकारने मध्यमवर्गीयांच्या सक्षमीकरणासाठी अनेक पावले उचलली आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात हाच विचार पुढे नेण्यात आला आहे. प्राप्तिकरात जी सवलत मिळाली आहे त्यामुळे दुकानदारांना, उद्योजकांना, कर्मचाऱ्यांना फार मोठी मदत मिळणार आहे. आता 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर आहे. कोणी विचारही केला नव्हता, ते आम्ही करून दाखवले आहे. एवढेच नाही तर नोकरदारांना आता पावणे तेरा लाख रुपयांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही. जे कर स्लॅब आहेत त्यामध्येही सुधारणा करण्यात आली आहे. याचा फायदा प्रत्येक करदात्याला होणार आहे. आता देशातील, गुजरातमधील आणि सुरतमधील मध्यमवर्गीय कुटुंबांकडे जास्त पैसा शिल्लक राहणार आहे. हा पैसा तो त्याच्या गरजांवर खर्च करेल, तो त्याच्या मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी गुंतवेल.

मित्रांनो,

सुरत हे उद्योजकांचे शहर आहे, येथे मोठ्या प्रमाणात छोटे-मोठे उद्योग आणि एमएसएमई आहेत. सुरतमध्ये लाखो लोकांना रोजगार मिळतो. आपले सरकार सध्या स्थानिक पुरवठा साखळी मजबूत करण्यात व्यस्त आहे. यासाठी एमएसएमईंना जास्त मदत केली जात आहे. सर्वप्रथम आम्ही एमएसएमईची व्याख्या बदलली. यामुळे एमएसएमईचा विस्तार होण्याचा मार्ग मोकळा झाला. यंदाच्या अर्थसंकल्पात या व्याख्येत आणखी सुधारणा करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत, आम्ही एमएसएमईसाठी कर्ज घेण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. या अर्थसंकल्पात एमएसएमईसाठी 5 लाख रुपयांची मर्यादा असलेली विशेष क्रेडिट कार्डची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे एमएसएमईंना खूप मदत होईल. एससी/एसटी प्रवर्गातील आमचे तरुण जास्तीत जास्त संख्येने उद्योजक व्हावे आणि एमएसएमई क्षेत्रात यावे असा आमचा प्रयत्न आहे.यात मुद्रा योजनेचा मोठा वाटा आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात दलित, आदिवासी आणि महिला अशा प्रवर्गातील उद्योजकांना प्रथमच 2 कोटी रुपयांचे कर्ज जाहीर करण्यात आले आहे, 2 कोटी रुपये ,आमच्या सुरत आणि गुजरातच्या तरुणांना याचा खूप फायदा होऊ शकतो आणि मी तुम्हाला आग्रह करतो की मैदानात उतरा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे.

मित्रांनो,

भारताला विकसित करणाऱ्या अनेक क्षेत्रांमध्ये सूरतची भूमिका खूप मोठी आहे. इथल्या वस्त्रोद्योग, रसायने आणि अभियांत्रिकीशी जोडलेल्या उद्योगांचा विस्तार आम्ही सुनिश्चित करत आहोत. आम्ही सूरत हे एक असे शहर बनवू इच्छितो जिथे जागतिक उद्योजकांची पावले उमटतील. एक असे शहर जिथे उत्तम संचार व्यवस्था असेल. म्हणूनच आम्ही सूरत विमानतळाच्या नूतन एकात्मिक टर्मिनल इमारतीची उभारणी केली. सुरतसाठी वेस्टर्न डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग आणि आगामी काळात बुलेट ट्रेन हे सुरतसाठी अतिशय महत्त्वाचे प्रकल्प आहेत. सुरत मेट्रोमुळे  शहराची संचारव्यवस्था  चांगली होणार आहे. सुरत हे देशातील सर्वाधिक जोडलेले शहर बनण्याच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे. या सर्व प्रयत्नांमुळे सुरतवासियांचे जीवन सुसह्य होत असून त्यांचे जीवनमानही वाढत आहे.

मित्रांनो,

तुम्हाला माहिती असेलच, काही दिवसांपूर्वी मी देशातील महिला शक्तीला त्यांचे यश, त्यांचे कर्तृत्व, त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रवास नमो ॲपवर सामायिक करण्याची विनंती केली होती. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की अनेक बहिणी आणि मुलींनी नमो ॲपवर आपले अनुभव सामायिक केले आहेत. उद्याच महिला दिन आहे. आणि उद्याच्या महिला दिनानिमित्त मी माझी समाज माध्यम खाती अशाच काही प्रेरणादायी भगिनी आणि मुलींच्या हाती सोपवणार आहे. या महिलांनी विविध क्षेत्रात देशाच्या आणि समाजाच्या विकासात मोठा वाटा उचलला आहे. यातून देशातील इतर माता, भगिनी आणि मुलींनाही प्रेरणा मिळेल. महिला दिनाचे हे निमित्त म्हणजे स्त्री शक्तीच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याची संधी आहे. आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रात महिला शक्ती किती योगदान देत आहे हे आपल्याला  पाहायला मिळते. आणि आपला गुजरात तर त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. आणि उद्याच मी सुद्धा नवसारी येथे नारी शक्तीला समर्पित एका मोठ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. सुरतमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा सर्वात जास्त लाभ फक्त महिलांनाच होणार असून, आज मोठ्या संख्येने माता-भगिनी आशीर्वाद देण्यासाठी आल्याचे मी पाहिले आहे.

मित्रांनो,

सुरत एक मिनी भारत आणि जगातील एक अद्भुत शहर म्हणून विकसित होत राहावे यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत राहू. आणि ज्या ठिकाणी जाणकार लोक आहेत, त्यांच्यासाठी सर्व काही अद्भुत असायला हवे. पुन्हा एकदा सर्व लाभार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि माझ्या सुरतच्या बंधू आणि भगिनींचे खूप खूप आभार, पुन्हा भेटू, राम-राम.

धन्यवाद.

डिस्क्लेमर: पंतप्रधानांच्या भाषणातील काही भाग काही काही ठिकाणी गुजराती भाषेतही आहे, ज्याचे येथे भाषांतर करण्यात आले आहे.

***

JPS/A.Save/H.Kulkarni/S.Naik/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com