राजकोटच्या लोकांनो, कसे आहात आपण,
आनंद ही आनंद!
तुम्ही नुकताच नवरात्रीचा उत्सव जोरदार साजरा केला आहे.दोन वर्षांनी ही संधी मिळाली ना , दिवाळीची तयारी कशी सुरु आहे ? आज तर तुमची दिवाळी मला आतापासूनच दिसायला लागली आहे. आज तर राजकोटने रंगत आणली आहे.कोणी कल्पना करू शकतो का, नवरात्री नुकतीच होऊन गेली, विजयादशमी होऊन गेली, तुम्ही गरबा खेळून थकला असाल ,धनत्रयोदशीची आतुरतेने वाट पाहत असाल, दिवाळीची तयारी सुरू आहे, नवीन वर्ष येणार आहे, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना खूप काम असणार आहे आणि तरीही आज राजकोटने जो भव्य कार्यक्रम केला आहे, ज्या प्रेमाने आणि आशीर्वादाने स्वागत आणि सन्मान केला आहे , मी राजकोटला मनापासून सलाम करतो.मी राजकोटला शतशः वंदन करतो.
आपल्याकडे दिवाळी म्हणजे केलेल्या कामांचा हिशेब करणे. आणि नवीन वर्ष म्हणजे नवीन संकल्पाची सुरुवात आणि निर्धाराने पुढे जाण्याची प्रवृत्ती.यावेळी राजकोटसह संपूर्ण सौराष्ट्राच्या विकासासाठी आज पूर्ण झालेले अनेक प्रकल्प मी दिवाळीची भेट म्हणून तुमच्या चरणी ठेवत आहे.आणि ज्याची पायाभरणी झाली आहे , त्या नव्या संकल्पांचा एक प्रकारे पाया रचला गेला आहे.कनेक्टिव्हिटी, उद्योग, पाणी, लोकांसाठीच्या सुविधांशी संबंधित असे अनेक प्रकल्प, जे राजकोटला अनेक पटींनी सामर्थ्यशाली बनवतील. इथल्या नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी सहाय्य्यकारी ठरतील.
जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरून देशात सहा ठिकाणी घरे बांधण्याची नवी मोहीम सुरू करण्यात आली आहे . त्यापैकी एक राजकोटला पसंती देण्यात आली. आणि 1144 घरे, नवीन तंत्रज्ञान, नवीन पद्धत, नवीन वेग आणि कोरोना संकटाच्या काळातही हे काम उत्तम करण्यासाठी तंत्रज्ञान असो आणि त्यासोबत सुशासन, वचनबद्धता , लोकांच्या गरजांची काळजी असली तरच असे चांगले काम होते.आणि त्याबद्दल भारत सरकारचे मंत्री बंधु हरदीप सिंह पुरी आणि गुजरात सरकारचे मुख्यमंत्री आणि त्यांचा चमू, बंधु भूपेंद्र भाई, या सर्वांचे आणि राजकोटचे लाख-लाख अभिनंदन.
आज मी विशेष करून या नवीन तंत्रज्ञानाने बनवलेल्या सुंदर घरांसाठी या घरांच्या मालक झालेल्या माता-भगिनींचे विशेष अभिनंदन करतो आणि हे घर दिवाळीत बांधून पूर्ण झाले आहे तेव्हा तुमच्या घरात लक्ष्मी वास करो, अशा प्रकारे आपण सर्वांनी मिळून ईश्वराची प्रार्थना करूया.मी इथे चाव्या देत होतो तेव्हा सगळे विचारत होते, घर कसे बांधले आहे? ही घरे पाहून ते किती समाधानी आहोत हे त्यांचे चेहरे सांगत आहेत.अन्यथा सरकारी घराची कोणी मोजदादच करू नये पण आता सरकार असे आहे, ज्याची मोजदाद लोक पावला पावलांवर करतात.
गेल्या 21 वर्षात आपण एकत्र येऊन अनेक स्वप्ने पाहिली, अनेक पावले उचलली , अनेक सिद्धींचे शिखर गाठले. आणि माझ्यासाठी, राजकोट, ही माझी पहिली शाळा होती. जसे महात्मा गांधी भाग्यवान होते, की त्यांचा जन्म पोरबंदरमध्ये झाला आणि त्यांना राजकोटमध्ये शाळा मिळाली.तसेच भाग्य मला लाभले की, उत्तर गुजरातमध्ये जन्म झाला आणि राजकोटमध्ये सत्ताकारणाची आणि राजकारणाची पहिली शाळा तुमच्या चरणांपासून सुरू झाली.राजकोटच्या भूमीची ही ताकद पाहा, या भूमीने प्रथम शाळेत गांधीजींना आशीर्वाद दिला, आज गांधीजी आमच्यासाठी प्रेरणास्थान बनले आहेत.आणि तुम्ही मला आशीर्वाद दिलात, की आज दोन दशके पूर्ण झाली, जबाबदारी वाढत आहे, वाढतच आहे, ही तुमच्या राजकोटच्या आशीर्वादाची ताकद आहे.
आमच्या वजुभाईंनी त्यांची जागा सोडली आणि मला राजकोटला पाठवले आणि तुम्ही मला आपलेसे केले आणि हा प्रवास तुमच्या आशीर्वादाने सुरू झाला आणि आज हा प्रवास गुजरात आणि देशाच्या विकासाला नव्या उंचीवर नेण्याची संधी बनला आहे.राजकोटचे हे ऋण मी कधीच फेडू शकत नाही. मी तुमचा ऋणी आहे. आणि आज जेव्हा मी तुमच्यामध्ये आलो आहे, तेव्हा बंधूंनो, पूर्ण सेवाभावाने , समर्पणाच्या भावनेने , नतमस्तक होऊन मी ही विकासकामे तुमच्या चरणी अर्पण करतो , बंधुंनो.
एक विद्यार्थी म्हणून तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. बरेच काही समजले आणि राजकोटने जे शिकवले ते आज देशाला उपयोगी पडत आहे बंधुंनो. आज जेव्हा गुजरातच्या देदीप्यमान प्रभावाची चर्चा होते, गुजरातच्या नियम-कायद्यांची चर्चा होते. गुजरातमध्ये क्रीडा स्पर्धांसाठी देशभरातून खेळाडू आले होते आणि त्याचवेळी नवरात्रीचा उत्सव सुरू होता.बहुतेक खेळाडूंनी किती तरी जणांनी दूरध्वनीवरून माझ्याशी संवाद साधला. आणि अनेकांनी समाजमाध्यमांवर त्यांचा गुजरातमधील अनुभव , त्यातही रात्री-अपरात्री भगिनी -मुली सोन्याचे दागिने घालून कुठेही जात असल्या तरी , भीती नाही , काळजी नाही,याबद्दलचा अनुभव सामायिक केला. हे सर्व गुजरातमध्ये पाहून, राजकोटमध्ये पाहून, देशभरातून आलेले लोक आश्चर्यचकित झाले.
कायद्याच्या राज्याला प्राधान्य दिल्याचा हा परिणाम आहे.आमच्या इथे अशी परिस्थिती होती, आणि राजकोटमध्ये तर आपल्याला माहीत आहे, जेव्हा संपूर्ण सौराष्ट्रात जनसंघ होता, तेव्हा मी राजकारणात नव्हतो.जनसंघाच्या काळात चिमणभाई शुक्ला आणि सूर्यकांत भाई आचार्य यांच्या जोडीने गुंडांविरोधात समिती स्थापन करून गुंडगिरीविरोधात मोहीम राबवली होती. राजकोट आणि संपूर्ण सौराष्ट्र मध्ये या गुंडगिरी विरोधी मोहिमेच्या माध्यमातून जनसंघ त्या काळात लढला होता.
आज भाजपचे सरकार आल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था, सुख-शांती सहज निर्माण झाली . गुन्हेगार असो, माफिया असो, अतिरेकी असो, कब्जा करणाऱ्या टोळ्या असोत, या सर्व गुंड घटकांपासून मुक्तता समाजातील प्रत्येक वर्ग उपभोगत आहे.प्रत्येक पालकांच्या मनात शांतता, सौहार्द, एकता ही मुलांच्या उज्ज्वल भविष्याची हमी बनली आहे. आणि जेव्हा मी या सगळ्यासाठी केलेली मेहनत पाहतो तेव्हा मला खूप अभिमान वाटतो, किती आनंद होतो बंधुंनो
मला आठवतं की आपण अशा प्रकारची प्रगती सातत्त्याने करत आलो आहोत. दर वेळी नवीन प्रकल्प आणि गेल्या दशकात आपण नेहमीच हा प्रयत्न केला आहे की आपला गुजरात जास्तीत जास्त सक्षम बनावा, जास्तीत जास्त समर्थ व्हावा. त्यासाठी जे वातावरण हवं, परिस्थिती हवी, त्याला नेहमीच प्रोत्साहन देत आलो आहोत. आणि त्यामुळेच सरकारच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून आज गुजरात जलद गतीनं पुढे जात आहे.
विकसित भारतासाठी विकसित गुजरातचा हा मंत्र घेऊन आपण निघालो होतो, समृद्ध भारतासाठी समृद्ध गुजरातचं हे ध्येय्य घेऊन आपण निघालो होतो. आणि त्यासाठी आम्ही व्हायब्रंट गुजरातचं अभियान राबवलं. जगभरातल्या लोकांना भांडली गुंतवणुकीसाठी बोलावलं, आम्ही कृषी महोत्सव आयोजित केला. भर उन्हात एक-एक महिना कृषी महोत्सव चालायचा, ज्या राज्यात नावालाही शेती नव्हती, दुष्काळी दिवस होते, आज तेच राज्य पोटभर अन्नधान्य पिकवू शकतं, त्या राज्याने 9 टक्के-10 टक्के कृषी विकास साधून देशाचं लक्ष वेधलं आहे. आपल्याकडे गरीब कल्याण मेळा होतो, गावातल्या गरीबांना सक्षम करण्यासाठी आपल्याकडे काम असतं, आपण पाहिलं आहे की जेव्हा गरीब सशक्त होतो, जेव्हा मध्यम वर्गीय शक्तिमान असतो आणि जेव्हा त्यांना सक्षम केलं जातं तेव्हा संपूर्ण समाज गतिमान होतो, संपूर्ण समुदाय पुढे जातो, बंधुंनो. आणि त्यातही डोक्यावर छप्पर मिळतं, स्वतःचं घर मिळतं, तेव्हा सन्मानाने जगणं सुरु होतं. कोणीही असो, कसंही मध्यम वर्गीय कुटुंब असो, पण त्यांच्या मनात इच्छा असते की माझं स्वतःचं घर असावं.
हेच स्वतःचं घर बनवण्यासाठी आपलं हे सरकार मध्यम वर्गासाठी, गरिबांसाठी अनेक योजना घेऊन आलं आहे. एवढंच नाही, घर असं असावं की ज्यामध्ये जीवन जगण्याचा आनंद वाटेल, शौचालय असेल, वीज असेल, पाणी असेल, गॅस असेल, इंटरनेट जोडणी असेल, ऑप्टिकल फायबर नेटवर्क असेल, या सर्व गोष्टी, एकूणच आधुनिक युगातल्या जीवनाच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
सामान्य माणसाच्या जीवनात कोणतीही चिंता असो, कितीही गरीबीमधून तो माणूस पुढे आला असेल, मेहनत केली असेल, मध्यम वर्गातला असो, पण कुटुंबात एखादा आजार आला, तर पुन्हा तो गरिबीच्या चक्रात अडकतो. गरीबाच्या घरी आजार आला तर दारिद्र्य येतं, भीक मागण्याचे दिवस येतात. पण जर आपल्या समाजाला आरोग्याबाबत सुरक्षितता मिळाली, तर तो गरीब चिंतांपासून मुक्त होतो, आणि हीच भावना लक्षात घेऊन आम्ही आयुष्मान भारत योजना, पीएम जय आणि आता तर पीएम जय मां योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपये दिले जात आहेत आणि या योजनेमुळे कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळत आहे बंधुंनो.
बंधुंनो-भगिनींनो,
गरीबी हटाओचा नारा तर खूप चालला, रोटी-कपड्याचा नाराही खूप चालला. आणि एवढे गोंधळले होते, की म्हणतील, अर्धी भाकरी खाऊ, पण असं-तसं आणू. असं सगळं चाललं होतं, आम्ही म्हटलं की बंधू, हे सगळे नारे, नारे म्हणून त्यांच्या जागी आहेत, मला तर तुमचं जीवन बदलायचं आहे. अर्धी रोटी नाही खायची, पक्की रोटी खायची आहे. आणि कोणी उपाशी घरी आलं तर त्याला खायला घालायची ताकत येईल, असं जीवन मला मिळवून द्यायचं आहे. या लोकांनी राजकारणात येऊन त्यांचे महाल बनवले, पण गरीबांच्या झोपडीचा कधीच विचार केला नाही. मी गरीबांची पक्की घरं बनवण्यासाठी देशभर मोहीम राबवली.
देशात आज एक ताकत त्यावर काम करत आहे. आणि आज गुजरात आणि त्यातही आपलं राजकोट, ज्याने उद्योगांमध्ये नाव मिळवलं आहे. मला आठवतं, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हा अनेक वर्षांपूर्वी एकदा भाषण केलं होतं. मी म्हटलं होतं, मी बघत आहे, मोरबी, राजकोट, जामनगर हा संपूर्ण पट्टा मिनी जपान सारखा पुढे जाईल, असं मी अनेक वर्षांपूर्वी म्हटलं होतं. तेव्हा लोकांनी याची खिल्ली उडवली होती. तुम्ही सांगा बंधुनो, माझी भविष्यवाणी खरी झाली की नाही. आज राजकोट अभियांत्रिकी उद्योगाचं केंद्र झालं आहे की नाही झालं. मी त्या वेळी पाहू शकत होतो, मोरबी, राजकोट, जामनगर या संपूर्ण परिसराची ताकत संपूर्ण गुजरातला वर आणण्याची ताकत या भूमीत आहे.
बंधुनो-भगिनीनो,
घर देण्याची योजना असो, त्यासाठी प्रगती करण्याची गोष्ट असो, आणि गेल्या आठ वर्षांत गावांमध्ये, शहरांमध्ये तीन कोटी पेक्षा जास्त पक्की घरं बनवण्याचं काम आम्ही केलं आहे. आणि त्यामध्ये आपल्या गुजरातमध्ये दहा लाख पक्की घरं, त्यापैकी सात लाख तर सुपूर्द केली आहेत. भूपेंद्र भाई आणि त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो, कारण गुजरातला पुढे घेऊन जाण्यासाठी हे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालं आहे. त्यांची मी प्रशंसा करतो, गरीबांचीच नव्हे, तर मध्यम वर्गाची सुद्धा तेवढीच काळजी घेतली गेली आहे. रेरा कायदा बनवून मध्यम वर्गाच्या स्वप्नांना आम्ही सुरक्षित केलं आहे.
आम्ही गुजरातच्या मध्यम वर्गाला 11 हजार कोटीची मदत करून त्यांना स्वतःचं घर बनवता येईल, याची व्यवस्था केली आहे. एवढंच नाही आता तर गुजरातमध्ये बाहेरून मजूर आणावे लागतात, एवढं काम वाढलं आहे. या श्रमिकांच्या जीवनातही अडचण येऊ नये, त्यांनाही चांगलं घर मिळावं, यासाठी सुद्धा योजना घेऊन पुढे जात आहोत, बंधुंनो.
पूर्वीच्या सरकारने घरं बनवली, तशी घरं नाही, आम्ही उपकार करतो, असं नाही, तुम्ही आत्मनिर्भर बनावं, सामर्थ्यवान बनावं, त्यासाठी आम्ही काम करतो. अनेक नवीन उपाय घेऊन आम्ही काम करतो. अशा अनेक गोष्टी घेऊन आम्ही जेव्हा मार्गक्रमण करतो, आणि आज जेव्हा राजकोटला आलो आहे, तेव्हा समाज जीवन सशक्त बनवण्याचा आमचा सततचा प्रयत्न, स्वतंत्र भारताचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न, राजकोटचा हा लाइट हाउस प्रकल्प त्यासाठीचा एक प्रयत्न आहे, बंधुंनो.
***
Jaydevi PS/S.Thakur/S.Chavan/R.Aghashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Great to be in the vibrant city of Rajkot! Addressing a programme at launch of various projects. https://t.co/QuTNcm8XWZ
— Narendra Modi (@narendramodi) October 19, 2022