Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरातमधील मोरबी येथे हनुमानजींच्या 108 फुट उंच पुतळ्याचे अनावरण करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

गुजरातमधील मोरबी येथे हनुमानजींच्या 108 फुट उंच पुतळ्याचे अनावरण करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण


 

नमस्‍कार!

महामंडलेश्वर कंकेश्वरी देवीजी आणि राम कथेच्या आयोजनाशी संबंधित सर्व माननीय, गुजरातमधील या धार्मिक स्थळी उपस्थित सर्व साधू-संत, महंत, महामंडलेश्वर, एच.सी.नंदा विश्वस्त संस्थेचे सर्व सदस्य, इतर विद्वान आणि श्रद्धाळू भाविक, सज्जन स्त्री-पुरुषांनो, हनुमान जयंतीच्या या पवित्र प्रसंगी तुम्हा सर्वांना, सर्व देशवासियांना अनेकानेक शुभेच्छा. या पावन प्रसंगी, आज मोरबी येथे हनुमानजींच्या या भव्य मूर्तीचे लोकार्पण झाले आहे. हा प्रसंग देशातील आणि संपूर्ण जगातील हनुमान भक्तांसाठी, रामभक्तांसाठी अत्यंत सुखदायक आहे. तुम्हां सर्वांचे खूप खूप अभिनंदन!

 

मित्रांनो,

रामचरितमानस या ग्रंथात असे म्हटले आहे की,- बिनु हरिकृपा मिलहिं नहीं संता, म्हणजे देवाच्या कृपेशिवाय संतांचे दर्शन देखील दुर्लभ असते. गेल्या काही दिवसांमध्ये मला अंबामाता, उमिया माता धाम, अन्नपूर्णा माता धाम या पवित्र स्थळांचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो. आणि आता आजच्या कार्यक्रमात, मोरबी येथे हनुमानजी यांच्याशी संबंधित कार्यात सहभागी होण्याची, संत समागमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

मला असे सांगण्यात आले आहे की, हनुमानजींचीअशा प्रकारची 108 फुटी उंच मूर्ती देशाच्या 4 विविध भागांमध्ये उभारण्यात येणार आहे. गेली अनेक वर्षे सिमला परिसरात उभारलेली हनुमानजींची अशीच एक भव्य  मूर्ती आपण सर्वजण गेली अनेक वर्षे पाहत आलो आहोत. आज मोरबी परिसरात ही दुसरी मूर्ती स्थापन झाली आहे. दक्षिण भारतात रामेश्वर येथे आणि पश्चिम बंगालमध्ये इतर दोन मुर्तींची स्थापना करण्याचे  काम प्रगतीपथावर आहे असे मला सांगण्यात आले आहे.

 

मित्रांनो,

हा केवळ हनुमानजी यांच्या मूर्ती स्थापन करण्याचा संकल्प आहे असे नव्हे तर हा एक भारत, श्रेष्ठ भारतसाकारण्याच्या निश्चयाचा देखील  एक भाग आहे. हनुमानजी त्यांच्या भक्तिभावाने, सेवाभावाने सर्वांना आपलेसे करतात. प्रत्येक जण हनुमानजींकडून प्रेरणा मिळवतो. हनुमान म्हणजे असे सामर्थ्य आणि बळ आहे ज्याने सगळ्या वनवासी समुदायांना आणि वन बंधूंना मान-सन्मानपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला. म्हणूनच हनुमानजी एक भारत, श्रेष्ठ भारतसंकल्पनेचे एक महत्त्वाचे घटक आहेत.

 

बंधू आणि भगिनींनो,

याच प्रकारे देशाच्या विविध भागांमध्ये रामकथेचे आयोजन सतत होत आले आहे. भाषा आणि बोली कोणतीही असो, पण रामकथेतील भावभावना सर्वांना जोडून ठेवतात, ईश्वराच्या भक्तीशी तादात्म्य पावण्यात मदत करतात. भारताच्या श्रद्धेचे, आपल्या अध्यात्माचे, संस्कृतीचे आणि परंपरांचे हेच तर खरे सामर्थ्य आहे. या मूल्यांनी गुलामगिरीच्या कठीण काळात देखील देशाच्या विविध भागांना, विविध वर्गांना एकमेकांशी जोडून ठेवले, स्वातंत्र्य प्राप्तीच्या राष्ट्रीय निर्धारासाठी एकजुटीने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना अधिक बळकट केले. हजारो वर्षांपासून सतत बदलत असलेल्या परिस्थितीमध्ये देखील भारत देश न डगमगता ठाम उभा राहिला आहे याचे श्रेय आपली सभ्यता, आपली संस्कृती यांनी निभावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेला जाते.

 

बंधू आणि भगिनींनो,

आपली श्रद्धा, आपली संस्कृती यांच्यामध्ये  सद्भावाचा, समभावाचा आणि समावेशाचा एक अंतःप्रवाह आहे. आणि म्हणूनच, जेव्हा दुष्ट शक्तींवर चांगल्या शक्तींनी  विजय मिळविण्याची वेळ आली तेव्हा प्रभू रामचंद्रांनी स्वतः  हा विजय मिळविण्यासाठी सक्षम असूनही, स्वतः सर्व कार्य सिद्धीस नेण्यासाठी समर्थ असूनही, त्यांनी या कार्यासाठी सर्वांची मदत घेण्याचा, सर्वांना जोडून ठेवण्याचा, समाजाच्या सर्व घटकांतील लोकांना सहभागी करून घेण्याचा, लहान-मोठ्या सजीवांना सोबत घेऊन त्यांचीही मदत मिळविण्याचा मार्ग स्वीकारला आणि सर्वांच्या सहकार्यातून हे काम पूर्ण केले. आणि हाच तर आमच्या सबका साथ, सबका विकासअर्थात सर्वांच्या सोबतीने सर्वांचा विकास साधण्याच्यासंकल्पनेचा पाया आहे. आणि या संकल्पनेचा उत्तम पुरावा हीच प्रभू रामांची जीवन लीला देखील आहे, आणि त्यांच्या जीवन कथेमध्ये हनुमानजींना फार मोठे स्थान आहे. सर्वांच्या प्रयत्नांच्या याच सद्भावनेतून आपल्याला स्वातंत्र्याच्या अमृतकाळाला उजळून टाकायचे आहे, राष्ट्रहिताच्या निर्धारांना पूर्ण करण्यासाठी  संपूर्ण शक्तीनिशी काम करायचे आहे.

आणि आज, मोरबीमध्ये केशवानंद बापुजी यांच्या तपोभूमीवर आपणा सर्वांच्या दर्शनाची संधी मला मिळाली आहे.  सौराष्ट्र भागात आम्ही दिवसातून 25 वेळा ऐकत असू की, आपल्या सौराष्ट्राची ही भूमी, संतांची भूमी आहे, देवांची भूमी आहे, दात्यांची भूमी आहे. संत, देव आणि दात्यांची ही धरती आमच्या काठीयावाडची, गुजरातची आणि एका अर्थाने आपल्या भारताचीच ओळख देखील आहे. माझ्यासाठी खोखरा हनुमान मंदिर म्हणजे स्वतःच्या घरासारखेच आहे. या क्षेत्राशी माझा मर्म आणि कर्माचा संबंध आहे. या जागेशी एक प्रेरणेचे नाते जोडले आहे. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मोरबी येथे येणे होत असे तेव्हा येथे अनेक कार्यक्रम सुरु असत आणि संध्याकाळ झाल्यावर असे वाटे की,चला हनुमान धाम येथे जाऊन यावे. पूजनीय बापुजींशी 5 – 15 मिनिटे गप्पा माराव्या, त्यांनी दिलेला प्रसाद घेऊन परत यावे. जेव्हा मच्छु धरण दुर्घटना झाली तेव्हा तर हे हनुमान धाम अनेक उपक्रमांचे केंद्र झाले होते. त्यामुळे स्वाभाविकपणे माझे बापुंसोबत अत्यंत घनिष्ठ स्वरूपाचे संबंध जुळत गेले. त्या काळात, चहूबाजूंनी सेवाभावी वृत्तीचे लोक येथे गोळा होत असत, त्या वेळी ही धर्मस्थाने म्हणजे मदत केंद्रे झाली.  मोरबीच्या घराघरांत मदत पोहोचविण्याचे काम येथून होत असे. एक सामान्य स्वयंसेवक या नात्याने मी दीर्घकाळ तुम्हां सर्वांसोबत होतोत्या दुःखद घटनेच्या वेळी तुमच्यासाठी जे कार्य केले जात होते त्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली. आणि त्या काळात पूजनीय बापुजी यांच्याशी माझी जी चर्चा होत असे त्यामध्ये मोरबीला भव्य स्वरूप देण्याची देवाचीच इच्छा होती, आणि त्यासाठी ही आपली परीक्षा होती असे बापू म्हणत असत. आणि आता यानंतरच्या काळात आपण सर्वांनीच न थांबता या कामाच्या पूर्ततेसाठी झटले पाहिजे. बापू अत्यंत कमी संभाषण करत असत परंतु सोप्या भाषेत अध्यात्मिक दृष्टीकोनातून मार्मिकपणे विचार प्रकट करणे हे बापूजींच्या बोलण्याचे वैशिष्ट्य होते. त्या काळानंतर देखील बरेचदा त्यांना भेटण्याची संधी मिळाली. जेव्हा कच्छ मध्ये भूज परिसरात भूकंप झाला त्या वेळी, मोरबीच्या दुर्घटनेपासून शिकलेले धडे कामी आले, अशा आपत्तीच्या वेळी कशा प्रकारे मदतकार्य केले पाहिजे, याचा पूर्वानुभव भूकंपाच्या नंतर त्या परिसरात काम करताना  उपयुक्त ठरला. म्हणूनच मी या पवित्र भूमीचा विशेष ऋणी आहे, कारण जेव्हा मोठे सेवाकार्य करण्याची वेळ आली तेव्हा मोरबीची जनता आजही मला त्याच सेवाभावी वृत्तीने काम करण्याची प्रेरणा देते. भूकंपाच्या नंतरच्या काळात ज्याप्रमाणे कच्छ भागाचे महत्त्व वाढले आहे ते पाहता संकटाचे संधीत रुपांतर करण्याच्या गुजराती माणसाच्या क्षमतेचे दर्शनच मोरबीने घडविले आहे. आजच्या घडीला, चीनी मातीच्या वस्तूंचे उत्पादन असो, टाईल्स तयार करण्याचा उद्योग असो, घड्याळ निर्मिती उद्योग असो, या सर्व बाबतीत, मोरबी, एक मोठे औद्योगिक उत्पादन केंद्र झाले आहे. पूर्वीच्या काळात तर मच्छु धरणाच्या चारी बाजूंना केवळ वीटभट्ट्यांखेरीज इतर काहीही नजरेस पडत नसे. उद्योगांच्या मोठमोठाल्या चिमण्या आणि वीटभट्ट्या…. आज मोरबी  तिची आन, बान आणि शानदाखवत दिमाखाने उभी आहे. मी तर पूर्वीपासून हे म्हणत आलो आहे, एका बाजूला मोरबी, दुसरीकडे राजकोट आणि तिसरीकडे जामनगर. जामनगरचा ब्रासचा उद्योग, राजकोटमधील अभियांत्रिकी उद्योग आणि मोरबीमधील घड्याळाचा म्हणा किंवा चिनीमातीचा उद्योग, या तीन शहरांनी तयार झालेला त्रिकोण पहिला तर असे वाटते कि, आपल्याकडे छोट्या स्वरुपात, जपान देशच अवतरला आहे. आज मला एक गोष्ट लक्षात येते आहे की सौराष्ट्रात आले तर हा त्रिकोण समोर दिसतो आणि त्याच्या मागे असलेला कच्छ देखील यामध्ये सहभागी झाला आहे. ज्या पद्धतीने मोरबीमध्ये पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे आणि हा भाग मुख्यत्वे करून सर्वांशी जोडला गेला आहे त्याचा उपयोग करून घ्यायला हवा.एक प्रकारे मोरबी, जामनगर, राजकोट आणि या बाजूने कच्छ असे रोजगार निर्मिती करणारे, सामर्थ्यवान आणि लहान लहान उद्योगांच्या माध्यमातून चालणारे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयाला आले आहे. पाहता पाहता, मोरबीचे एका मोठ्या शहरात रुपांतर होऊ लागले आहे आणि मोरबीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आणि आज जगातील अनेक देशांमध्ये मोरबीची उत्पादने पोहचत आहेत. ज्यामुळे मोरबीची  वेगळी ओळख निर्माण झाली आहे आणि ही ओळख , या भूमीवर जे संत, महंत, महात्मा यांनी काही ना काही , जेव्हा  सामान्य आयुष्य होते तेव्हाही त्यांनी तप  केले , आपल्याला दिशा दिली आणि त्याचाच हा परिणाम आहे. आणि आपला  गुजरात तर जिथे पहाल तिथे श्रद्धा-आस्था सुरूच असतेदेणगीदार कमी नाहीत , कुठलेही शुभ  काम ,घेऊन जा, तुम्हाला देणगीदारांची लांब रांग पहायला मिळेल.  आणि एक प्रकारे  स्पर्धा निर्माण होते. आणि आज तर  काठियावाड एक प्रकारे यात्राधामचे केंद्र बनले आहे . असे म्हणू शकतो की एकही जिल्हा असा शिल्लक नाही  , जिथे एका महिन्यात हज़ारोंच्या संख्येने बाहेरून लोक आलेले नाहीत.  आणि हिशेब केला तर एक प्रकारे यात्रा म्हणा किंवा पर्यटन , यातून  काठियावाडची एक नवी ताकद उभी राहिली आहे.  आपला समुद्र किनारा देखील आता गजबजू लागला आहे. मला काल ईशान्य प्रदेशच्या बांधवांना भेटायची संधी मिळाली.  उत्तर-पूर्व  राज्याचे बांधव, सिक्किम, त्रिपुरा, मणिपुरच्या लोकांना  भेटायची संधी मिळाली. ते सगळे काही दिवसांपूर्वी  गुजरातमध्ये आले होते. आणि मुलीचे लग्न करण्यासाठी सर्व सामानात  भागीदार बनले, श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहात रुक्मिणीच्या पक्षाकडून सगळे आले होते.  आणि ही  घटना ताकद देते, ज्या भूमीवर भगवान श्रीकृष्णाचा  विवाह झाला होता, त्या  माधवपुरच्या मेळाव्यात संपूर्ण ईशान्य प्रदेश गोळा झाला होता, पूर्व आणि पश्चिमेच्या अद्भुत एकतेचे एक उदाहरण दिले. आणि तिथून जे लोक आले होते, , त्यांच्या हस्तशिल्पांची जी विक्री झाली, त्यातून ईशान्य प्रदेशाच्या उत्पन्नामध्ये एक मोठा स्रोत उपलब्ध करून दिला आहे. आणि आता मला वाटते की हा माधवपुरचा मेळावा जितका गुजरातमध्ये प्रसिद्ध होईल, त्याहून अधिक पूर्व भारतात  प्रसिद्ध होईल. आर्थिक व्यवहार जितके वाढतात , आपल्याकडे कच्छच्या रणात  रणोत्सवचे आयोजन केले आणि आता ज्याला रणोत्सव पाहण्यासाठी जायचे असेल तर मोरबी मार्गे जावे लागते. म्हणजेच मोरबीला जाता-जाता त्याचा लाभ मिळतो, आपल्या  मोरबीच्या महामार्गाच्या आस-पास अनेक हॉटेल्स उभी राहिली आहेत.  कारण कच्छमध्ये लोक जमू लागले तर मोरबीला देखील त्याचा लाभ मिळाला आणि जेव्हा विकास होतो, आणि अशा प्रकारचा मूलभूत विकास होतो, तेव्हा दीर्घकालीन सुखाचे कारण बनते. दीर्घकालीन व्यवस्थेचा एक भाग बनतो. आणि आता आपण गिरनारमध्ये  रोप-वे  बांधला,आज वृद्ध मंडळी देखील , ज्यांनी आयुष्यात स्वप्न पाहिले होते,  , कठीण चढ असल्यामुळे गिरनारला  जाऊ शकले नाहीत , आता रोप-वे बांधला तर सगळे मला म्हणतात,  80-90 वर्षांच्या वृद्धांना देखील त्यांची मुले घेऊन येतात , आणि ते धन्य होतात . परंतु त्याबरोबर श्रद्धा तर आहेपरंतु आवकीचे अनेक स्त्रोत निर्माण होतात.  रोजगार निर्मिती होते आणि भारताची एवढी मोठी ताकद आहे की  आपण काही उधार न घेताही पर्यटनाचा विकास करू शकतो. त्याला खऱ्या अर्थाने  प्रसारित-प्रचारित केले, आणि त्यासाठी पहिली अट आहे  की सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये अशी स्वच्छता असायला हवी, जेणेकरून तिथे भेट दिलेल्या लोकांना स्वच्छता अंगिकारण्याचे  शिक्षण मिळायला हवे. आपल्याला माहीतच आहे, पूर्वी मंदिरात प्रसादामुळे इतका त्रास व्हायचा आणि आता तर मी पाहिले आहेकी प्रसाद देखील मंदिरात पॅक करून दिला जातो. आणि जेव्हा मी म्हटले  प्लास्टिकचा वापर करायचा नाही, तेव्हा मंदिरात आता प्रसाद प्लास्टिकमध्ये दिला जात नाही गुजरातच्या बहुसंख्य मंदिरात प्लास्टिक मधून प्रसाद देत नाहीत. याचा अर्थ असा झाला की आपली मंदिरे  आणि संत-महंत आणि जसा  समाज बदलतो , संजोड बदलत, आणि त्यानुसार  कशी सेवा करायची त्यासाठी सातत्याने काम करत राहतात आणि परिवर्तन आणत राहतात.  आपल्या सर्वांची  ही जबाबदारी आहे की आपण सर्वांनी त्यातून काहीतरी शिकावंआपल्या जीवनात आपल्या आचरणात आणावेआणि आपल्या जीवनात त्याचा सर्वात जास्त लाभ मिळवावा.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा हा काळ आहेअनेक महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे . परंतु त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की 1857  च्या पूर्वी स्वातंत्र्याची जी पार्श्वभूमी तयार केली या आध्यात्मिक चेतनेचे  वातावरण निर्माण केले.  या देशातील संतमहंत ,ऋषिमुनी , भक्त , आचार्य यांनी आणि भक्ति युगाचा प्रारंभ झाला त्या भक्ती युगाने भारताची चेतना  प्रज्वलित केली आणि त्यातून स्वातंत्र्य चळवळीला एक नवी ताकद मिळाली . आपल्याकडे संत शक्ती , सांस्कृतिक वारसा याचे सामर्थ्य आहे ज्यामुळे नेहमी सर्वजन हितायसर्वजन सुखाय सर्वजन कल्याणासाठी समाज जीवनात काही ना काही काम केलं आहे, आणि  यासाठी हनुमानजी यांचे  स्मरण करण्याचा अर्थच आहे सेवाभाव समर्पण भाव.

हनुमानजीनी तर  हेच शिकवले आहेहनुमानजी यांची भक्ति सेवापूर्ति स्वरूपात होती.  हनुमानजी यांची भक्ति समर्पण रूपात होती.  मात्र कर्मकांड वाली भक्ति हनुमानजी यांनी कधी केली नाहीहनुमानजी स्वतःची पर्वा न करता साहस , पराक्रम करून स्वतःची सेवा नव्या उंचीवर घेऊन गेले, आजही जेव्हा स्वातंत्र्याची  75 वर्ष साजरी करत आहोत, तेव्हा आपल्या अंतर्मनात सेवाभाव जितका प्रबळ बनेलजितका परोपकारी बनेल, जितका समाज  जीवन जोडणारा बनेल. हे  राष्ट्र जास्तीत जास्त सशक्त बनेल, आणि आज आता भारत असाच्या असा राहील हे अजिबात चालणार नाही, आणि आपण जागे असू किंवा झोपलेले असू, पुढे मार्गक्रमण केल्याशिवाय सुटका नाही. अशी जगाची स्थिती बनली आहे. आज संपूर्ण जग म्हणत आहे की आत्मनिर्भर व्हावे लागेल. आता जेव्हा संतांमध्ये बसलो आहे, तेव्हा आपल्याला नाही शिकवले, लोकलसाठी व्होकल बना, वोकल फॉर लोकल हे वारंवार म्हणायला हवे की नाही.  आपल्या देशात निर्मित, आपल्या लोकांनी बनवलेली , आपल्या मेहनतीने तयार केलेली वस्तूच घरी वापर, असे जेव्हा  वातावरण बनेल, तुम्ही विचार करा, कितीतरी लोकांना रोजगार मिळेल. बाहेरून आणायला छान वाटते , थोडासा इकडचा तिकडचा फरक असत, मात्र भारतातील लोकांनी बनवलेली, भारताच्या पैशानी बनलेली वस्तू असेल, भारताच्या मेहनतीचा त्याला सुगंध असेल , भारत भूमीचा सुगंध असेल तर त्याचा गौरव आणि त्याचा आनंद वेगळाच असतो. आणि आपल्या संत -महंतांनी ते जिथे जातील, तिथे भारतात निर्मित वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरावा.तेव्हाच भारतात उपजीविकेसाठी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही असे दिवस दिसू लागतील आणि जेव्हा आपण हनुमानजी यांची प्रशंसा करतो कि हनुमानजी यांनी हे केले, ते केले.  मात्र हनुमानजी यांनी  जे सांगितले तीच आपल्या जीवनातील प्रेरणा आहे.  हनुमानजी नेहमी म्हणतात

सो सब तब प्रताप रघुराई, नाथ न कछू मोरि प्रभुताई”, म्हणजे आपले प्रत्येक काम, आपल्या प्रत्येक यशाचे  श्रेय त्यांनी नेहमी  प्रभु राम यांना दिले. ते कधी असे म्हणाले नाही की माझ्यामुळे हे झाले. जे काही झाले आहे ते प्रभू रामामुळे झाले आहे. आजही भारत जिथे पोहचला आहे, यापुढे जो काही संकल्प करायचा आहे  त्याचा एकच मार्ग आहे, आपण सर्व भारतीय नागरिक, ….आणि तीच तर शक्ती आहे. माझ्यासाठी तर 130 कोटी माझे देशवासीय ,हेच रामाचे रूप आहेत.  त्यांच्याच संकल्पातून देश पुढे जात आहे. त्यांच्याच आशीर्वादामुळे देश पुढे जात आहे. हीच भावना घेऊन आपण मार्गक्रमण करत राहू, याच भावनेसह मी पुन्हा एकदा या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांना  अनेक-अनेक शुभेच्छा देतो. हनुमानजी यांच्या  श्री चरणी  प्रणाम करतो.

खूप-खूप धन्‍यवाद!

***

S.Patil/S.Chitnis/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com