पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या (व्हीबीएसवाय) लाभार्थींशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. केंद्र सरकारच्या सर्व महत्त्वाच्या योजनांचे लाभ प्रत्येक लाभार्थीपर्यंत कालबद्ध पद्धतीने पोहोचतील याची खातरजमा करून घेऊन या योजना संपूर्णपणे यशस्वी करण्यासाठी संपूर्ण देशभरात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील भरूच येथील रहिवासी, आयटीआय-प्रमाणित शेतकरी आणि हार्डवेअर अभियांत्रिकी मधील पदविकाधारक अल्पेशभाई चंदूभाई निझामा यांच्यासोबत संवाद साधला आणि कृषी क्षेत्रामध्ये कारकीर्द घडवण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल विचारणा केली. अल्पेशभाई यांनी सांगितले की त्यांनी नोकरी सोडून त्यांच्यापाशी असलेली पिढीजात 40 एकर जमीन कसायचा निर्णय घेतला. आपण राज्य तसेच केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेत असून त्यातून अनुदानित दरात शेतीची अवजारे विकत घेतली, अशी माहिती अल्पेशभाई यांनी पंतप्रधानांना दिली.
ते पुढे म्हणाले की त्यांनी ठिबक सिंचन तंत्रासाठी 3 लाख रुपयांचे अनुदान मिळवले. “तुमच्या वयाचा असताना मला एक लाख रुपये कसे दिसतात हे ठाऊक नव्हते आणि तुम्ही आता अनेक लाखांच्या गोष्टी करत आहात. यालाच बदल म्हणतात,” असे पंतप्रधान म्हणाले.
अल्पेशभाई यांनी अनुदानांचा लाभ घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करत, पंतप्रधानांनी त्यांना सांगितले की त्यांनी त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी तंत्रे आणि आधुनिक अवजारांचा वापर करण्याचा सल्ला द्यावा. अल्पेशभाई यांनी सांगितले की ते ‘आत्मा’ (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था)च्या प्रकल्पांशी 2008 पासून जोडले गेले आहेत आणि त्यामधून त्यांना इतर प्रदेश आणि राज्यांमधील कृषी तंत्रांबद्दल माहिती मिळाली. भरूच येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात आपल्याला ‘आत्मा’ तर्फे ‘सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्कारा’ने गौरवण्यात आले होते, अशी माहिती देखील अल्पेशभाई यांनी यावेळी दिली.
या संवादादरम्यान अल्पेशभाई यांच्या मागे हसऱ्या चेहेऱ्याने वावरत असलेल्या त्यांच्या मुलीला बघून पंतप्रधानांनी तिच्याशी देखील संवाद साधला आणि तिला ‘भारतमाता की जय’ ही घोषणा द्यायला सांगितले. तिच्या मागोमाग संपूर्ण समुदायाने केलेल्या जयघोषाने पंतप्रधानांच्या चेहेऱ्यावर आनंद आणला.
अल्पेशभाई यांच्यासारखे लोक शेतीकडे वळणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायक आहेत, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणाचा शेवट केला. देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापासून बाजारपेठेपर्यंत (बीज से बाजार तक) सर्व ठिकाणी आधुनिक तंत्रे, अभिनव संशोधन आणि नव्या पद्धतीच्या विचारसरणीसह अधिक उत्तम वातावरण पुरवण्याची ग्वाही त्यांनी दिली. “शिक्षित युवकांचा शेती क्षेत्रात प्रवेश या निर्धाराला अधिक बळ देईल,” असे ते म्हणाले. कृषी क्षेत्रात ड्रोन्सचा वापर करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली. पुढील 5 गावांमध्ये येऊ घातलेल्या ‘मोदी की गॅरंटी’ वाल्या गाडीचे भव्य स्वागत करण्यासाठी तयारी करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
***
M.Pange/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Viksit Bharat Sankalp Yatra focuses on saturating government benefits, making sure they reach citizens across India. https://t.co/24KMA2DSac
— Narendra Modi (@narendramodi) December 9, 2023