Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरातमधील नवसारी येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

गुजरातमधील नवसारी येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर


 

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेलजी, नवसारीचे खासदार आणि केंद्र सरकारमधील माझे सहकारी, केंद्रीय मंत्री भाई सीआर पाटील, व्यासपीठावर उपस्थित पंचायत सदस्य आणि लखपती दीदी, इतर लोकप्रतिनिधी आणि येथे मोठ्या संख्येने आलेल्या सर्वांना, विशेषतः माझ्या माता, भगिनी आणि मुली, तुम्हा सर्वांना नमस्कार!

काही दिवसांपूर्वी  महाकुंभमेळ्यात गंगा मातेचा आशीर्वाद मिळाला. आणि आज, मला मातृशक्तीच्या या महान कुंभमेळ्यात आशीर्वाद मिळाला आहे.  महाकुंभमेळ्यात  गंगा मातेचा आशीर्वाद मिळाला आणि आजच्या या मातृशक्तीच्या महाकुंभात  सर्व माता – भगिनींचा आशीर्वाद मिळाला.  आजचा हा महिला दिन, गुजरातची माझी मातृभूमी आणि इतक्या मोठ्या संख्येने  आपणा सर्व माता, भगिनी आणि मुलींची उपस्थिती, या खास दिवशी तुमचे प्रेम, आपुलकी आणि आशीर्वादाबद्दल मी मस्तक झुकवून मातृशक्तीला वंदन करतो.  गुजरातच्या या भूमीवरून मी सर्व देशवासीयांना, देशातील सर्व माता आणि भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो.  आज येथे गुजरात सफल आणि गुजरात मैत्री या दोन योजनांचा शुभारंभ देखील झाला.  अनेक योजनांचे पैसे देखील  महिलांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केले गेले आहेत. याबद्दलही मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

आजचा दिवस महिलांना समर्पित आहे, आपल्या सर्वांसाठी महिलांकडून प्रेरणा घेण्याचा दिवस आहे, महिलांकडून काहीतरी शिकण्याचा दिवस आहे आणि या पवित्र दिवशी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो.  आज या दिवशी मी अभिमानाने म्हणू शकतो की मी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.  जेव्हा मी  म्हणतो की मी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे, तेव्हा मला माहीत आहे की बऱ्याच लोकांचे कान टवकारले जातील, संपूर्ण ट्रोल सेना आज मैदानात उतरेल, पण तरीही मी पुन्हा सांगेन की मी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.  माझ्या आयुष्यात करोडो माता, भगिनी आणि मुलींचे आशीर्वाद आहेत आणि हे आशीर्वाद सतत वाढत आहेत.  आणि म्हणूनच मी म्हणतो, मी जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे.  आई, बहिणी आणि मुलींचे हे आशीर्वाद माझी सर्वात मोठी प्रेरणा, माझी सर्वात मोठी शक्ती, माझी सर्वात मोठी संपत्ती, माझे संरक्षक कवच आहेत.

मित्रांनो,

आपल्या शास्त्रांमध्ये स्त्रीला नारायणी म्हटले आहे.  महिलांचा आदर करणे ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली पायरी असते.  म्हणूनच विकसित भारताच्या निर्मितीसाठी, भारताच्या जलद विकासासाठी आज भारताने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या मार्गावर चालण्यास सुरुवात केली आहे.  आमचे सरकार महिलांच्या जीवनातील प्रतिष्ठा आणि सुविधा या दोन्ही गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य देते.  आम्ही कोट्यवधी महिलांसाठी शौचालये बांधून त्यांची प्रतिष्ठा वाढवली आणि उत्तर प्रदेशातील काशी येथील माझ्या बहिणी तर आता शौचालय हा शब्द वापरत नाहीत, त्या म्हणतात की मोदीजींनी प्रतिष्ठाघर बांधले आहे.

आम्ही कोट्यवधी महिलांची बँक खाती उघडून त्यांना बँकिंग व्यवस्थेशी जोडले. आम्ही त्यांना उज्ज्वला सिलेंडर देऊन धुरासारख्या समस्यांपासून वाचवले.  पूर्वी नोकरी करणाऱ्या महिलांना प्रसूतीकाळात फक्त १२ आठवड्यांची रजा मिळत असे.  सरकारने ही मुदत २६ आठवड्यांपर्यंत वाढवली.  आपल्या मुस्लिम भगिनी तिहेरी तलाकविरुद्ध कायदा करण्याची मागणी वर्षानुवर्षे करत होत्या.  तिहेरी तलाकविरुद्ध कठोर कायदा करून आमच्या सरकारने लाखो मुस्लिम बहिणींचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले आहे.  जेव्हा काश्मीरमध्ये कलम 370 लागू होते, तेव्हा तेथील भगिनी आणि मुलींना अनेक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले होते.  जर तिने राज्याबाहेरील एखाद्याशी लग्न केले तर तिला वडिलोपार्जित मालमत्तेचा वारसा मिळण्याचा अधिकार गमवावा लागत असे.

कलम 370 रद्द झाल्यानंतर‌ जम्मू आणि काश्मीरमधील महिलांनाही भारतातील मुली आणि भगिनींना मिळणारे सर्व अधिकार मिळाले आहेत.  भारताचा भाग असूनही काश्मीरमध्ये माझ्या माता, भगिनी आणि मुलींना त्यापासून वंचित ठेवण्यात आले होते आणि संविधानाचा ढोल वाजवणारे डोळे मिटून बसले होते.  महिलांवरील अन्याय हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय नव्हता.  संविधानाचा कसा आदर केला जातो, ते मोदींनी कलम 370  रद्द करून देशाच्या चरणी समर्पित केले.

मित्रांनो,

आज, सामाजिक पातळीवर, सरकारी पातळीवर तसेच मोठ्या संस्थांमध्ये महिलांसाठी अधिकाधिक संधी निर्माण होत आहेत.  राजकारण असो वा क्रीडा, न्यायव्यवस्था असो वा पोलिस, देशाच्या प्रत्येक भागात, प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक मितीमध्ये महिलांची पताका फडकत आहे.  2014 पासून देशातील महत्त्वाच्या पदांवरील महिलांचा सहभाग झपाट्याने वाढला आहे.  2014 नंतरच केंद्र सरकारमध्ये सर्वाधिक महिला मंत्र्यांची नियुक्ती झाली.  संसदेतही महिलांच्या उपस्थितीत मोठी वाढ झाली.

2019 मध्ये पहिल्यांदाच 78 महिला खासदार आपल्या संसदेत निवडून आल्या.  18 व्या लोकसभेत म्हणजेच यावेळीही 74 महिला खासदार लोकसभेचा हिस्सा आहेत.  आपल्या न्यायालयांमध्ये, न्यायव्यवस्थेत महिलांचा सहभागही त्याच प्रमाणात वाढला आहे.  जिल्हा न्यायालयांमध्ये महिलांची उपस्थिती 35 टक्क्यांहून अधिक झाली आहे.  अनेक राज्यांमध्ये, दिवाणी न्यायाधीश म्हणून होणाऱ्या नवीन भरतींपैकी 50 टक्के किंवा त्याहून अधिक आमच्या मुली आहेत.

आज भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था आहे.  यापैकी जवळजवळ अर्ध्या स्टार्टअप्समध्ये कोणती न् कोणती  महिला संचालकांच्या भूमिकेत आहे.  भारत अवकाश आणि अवकाश विज्ञानात अनंत उंची गाठत आहे.  तिथेही बहुतेक प्रमुख मोहिमांचे नेतृत्व महिला शास्त्रज्ञांच्या पथकांद्वारे केले जाते.  आज आपल्या भारतात जगातील सर्वाधिक महिला वैमानिक आहेत हे पाहून आपल्या सर्वांना अभिमान वाटतो.  नवसारीतील या कार्यक्रमात आपल्याला महिला सक्षमीकरणाची ताकद दिसून येते.  या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी महिलांनी सांभाळली आहे.

एवढ्या मोठ्या आयोजनाच्या चोख बंदोबस्तासाठी जे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात आहेत , त्या सर्वच्या सर्व महिला आहेत. शिपाई, निरीक्षक , उपनिरीक्षक , पोलीस उप अधीक्षक पासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत इथली सुरक्षा व्यवस्था महिलाच सांभाळत आहेत. हे महिला शक्तीच्या सामर्थ्याचे उदाहरण आहे. आताच काही काळापूर्वी, मी इथे बचत गटाशी संबंधित तुमच्यापैकी  काही भगिनींशी बोलत होतो. माझ्या भगिनींचे ते शब्द , तुम्हा सर्वांचा हा उत्साह, हा आत्मविश्वास दाखवत आहे भारताच्या महिला शक्तीचे सामर्थ्य काय आहे  ! ते दाखवत आहे की भारताच्या महिला शक्तीने कशा प्रकारे देशाच्या प्रगतीची सूत्रे हाती घेतली आहेत. जेव्हा मी तुम्हा सर्वांना भेटतो तेव्हा माझा हा विश्वास आणखी दृढ होतो की विकसित भारताचा संकल्प आता नक्कीच पूर्ण होईल. आणि या संकल्प सिद्धीमध्ये आपली महिला शक्ती सर्वात मोठी भूमिका बजावेल.

माता आणि भगिनींनो,

आपले गुजरात तर महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे उत्तम उदाहरण आहे. गुजरातने देशाला सहकाराचे यशस्वी मॉडेल दिले. बचतगटांशी संबंधित तुम्हा सर्व भगिनींना माहीत आहे की, गुजरातचे सहकार मॉडेल इथल्या महिलांच्या श्रम आणि सामर्थ्यातूनच विकसित झाले आहे. अमूलची चर्चा तर आज जगभरात होत आहे. गुजरातच्या गावा -गावातील लाखो महिलांनी दूध उत्पादनात एक क्रांती घडवून आणली. गुजरातच्या भगिनींनी केवळ स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही नवी ताकद दिली. गुजराती महिलांनीच लिज्जत पापडाची सुरुवात केली. आज  लिज्जत पापड हा शेकडो कोटी रुपयांचा एक ब्रँड बनला आहे.

माता आणि भगिनींनो,

मला आठवतंय, मी जेव्हा मुख्यमंत्री म्हणून तुमच्या सेवेत होतो, तेव्हा आमच्या सरकारने भगिनी-मुलींचे हित लक्षात घेऊन चिरंजीवी योजना, बेटी बचाओ अभियान, ममता दिवस, कन्या केलवणी रथयात्रा, कुंवरबाई नु मामेरू, सात फेरा सामूहिक विवाह योजना, अभयम हेल्पलाईन  यासारख्या अनेक योजना राबवल्या होत्या. जेव्हा धोरणे  योग्य असतात, तेव्हा महिलांचे सामर्थ्य कसे वाढते हे गुजरातने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. जसे मी आता दूध सहकाराबद्दल बोललो! दुग्धव्यवसायाशी संबंधित याच  महिलांच्या लोकांच्या खात्यात गुजरातने याची  सुरुवात केली. पूर्वी असे नव्हते, रोख पैसे दिले जायचे किंवा दूधवाला पैसे येऊन घेऊन जायचा. आम्ही तेव्हाच ठरवले होते की डेअरीतून दुधाचे पैसे भगिनींच्या खात्यातच जमा होतील, त्याला कोणी हात लावू शकणार नाही, आणि ते पैसे थेट भगिनींच्या खात्यात हस्तांतरित करायला सुरुवात केली. आज त्याच पद्धतीने विविध योजनांचे पैसे देशातील कोट्यवधी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पोहोचत आहेत.  थेट लाभ हस्तांतरण -डीबीटीमुळे हजारो कोटी रुपयांचे घोटाळे बंद झाले, गरीबांना मदत मिळत आहे.

मित्रांनो,

गुजरातमध्येच भूज भूकंपानंतर जेव्हा घरे पुन्हा बांधण्यात आली, तेव्हा आमच्या सरकारने ती घरेही महिलांच्या नावे केली होती. म्हणजेच जेव्हापासून आम्ही ही परंपरा सुरु केली की सरकारने बांधलेली घरे आता भगिनींच्या नावावरच  उपलब्ध होतील, आज संपूर्ण देशात जी पंतप्रधान आवास योजना  सुरू आहे, त्या सर्व गोष्टी देशभरात लागू झाल्या आहेत. एवढेच नाही, मुले जेव्हा शाळेत प्रवेश घेतात तेव्हा त्यांच्या पुढे  वडिलांचे नाव असायचे, मी ठरवले नाही, आईचेही नाव असायला हवे.  2014 पासून आतापर्यंत सुमारे 3 कोटी महिला घरमालक बनल्या  आहेत.

मित्रांनो,

आज जगभरात  जल जीवन मिशनची मोठी चर्चा आहे. आज जलजीवन मिशनच्या माध्यमातून देशातील गावा-गावांमध्ये पाणी पोहोचत आहे. गेल्या 5 वर्षांत लाखो गावांमधील 15.5 कोटी घरांना पाईपद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या मिशनच्या यशासाठी आम्ही गुजरातमध्ये महिलांच्या पाणी समित्या सुरू केल्या. आता देशभरात त्याची अंमलबजावणी केली जात आहे.  पाणी समित्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. महिला पाणी समित्यांचे हे मॉडेलही गुजरातनेच  दिले आहे. आज हे मॉडेल संपूर्ण देशातील पाणी समस्या सोडवत आहे.

मित्रांनो,

जेव्हा आपण पाण्याच्या समस्येवर उपाय शोधण्याबाबत बोलतो तेव्हा पाण्याची बचत करणे, म्हणजेच जल संरक्षण हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. आज देशभरात एक अभियान राबवले जात आहे- कॅच द रेन ! पाण्याचा थेंब न थेंब साचवणे. कॅच द रेन म्हणजे जिथे पावसाचे पाणी  पडेल ते वाया जाऊ द्यायचे नाही.  गावाच्या हद्दीतले पाणी गावातच  आणि घराचं पाणी घरातच , त्या पाण्याचं संरक्षण करणे ! आणि मला आनंद आहे की आज हे अभियान आमचे नवसारीचे खासदार सी.आर.पाटील जी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात पुढे जात आहे. आणि मला सांगण्यात आले आहे की नवसारीच्या तुम्ही सर्व  भगिनींनीही या दिशेने खूप चांगले काम केले आहे. पावसाचे पाणी वाचवण्यासाठी नवसारीत तलाव, चेक डॅम, बोअरवेल पुनर्भरण, कम्युनिटी सोक पिट यांसारखी 5 हजारांहून अधिक बांधकामे  पूर्ण झाली आहेत. एखाद्या जिल्ह्यात ही खूप मोठी गोष्ट आहे. आताही नवसारीत जलसंधारणाशी संबंधित शेकडो कामे सुरू आहेत. आता सीआर मला सांगत होते की, गेल्या दोन-तीन दिवसांमध्येच आणखी 1100 कामे झाली आहेत. आजही एकाच दिवसात एक हजार पाझर खड्डे बांधण्याचे काम केले जात आहे.  नवसारी जिल्हा रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये म्हणजेच जलसंधारणामध्ये गुजरातमधील  अग्रगण्य जिल्ह्यांपैकी एक आहे. या यशाबद्दल मी : नवसारीच्या माता, भगिनी आणि मुलींचे विशेष अभिनंदन करतो.

आज मी बघत होतो, एकाच जिल्ह्यातील लाखो मातांचा हा महाकुंभ मेळावा आणि मी बघत होतो की जेव्हा मुलगा घरी येतो तेव्हा आईचा चेहेरा कसा फुलून येतो. असेच सर्वांचे चेहरे आज फुलले आहेत. आणि हा तर असा मुलगा आहे ज्याला तुम्ही तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बनवले आहे; तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानेच हे शक्य झाले आहे आणि म्हणूनच मुलगा घरी येतो आणि आईचा चेहेरा खुलतो तसेच आज प्रत्येक आईच्या चेहेऱ्यावरील हे समाधान, हा आनंद आणि हा आशीर्वादाचा भाव माझ्या जीवनाला धन्य करत आहे.

मित्रांनो,

गुजरातच्या महिलांचे सामर्थ्य, गुजरातचे उदाहरण कोणत्याही एका क्षेत्रापर्यंत मर्यादित नाही. येथे पंचायतीच्या निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तुम्ही जेव्हा प्रधान सेवक म्हणून मला दिल्लीला पाठवले तेव्हा त्याच अनुभवाला, त्याच कटिबद्धतेला मी देशभरात घेऊन गेलो. जेव्हा देशाला नवे संसद भवन मिळाले तेव्हा आम्ही सर्वात पहिले विधेयक स्त्री शक्तीसाठी मंजूर केले. संसदेची ही जी नवी इमारत उभारली, त्यात पहिले काम आम्ही भगिनींसाठी केले आणि यातूनच माता-भगिनींप्रती मोदींची समर्पण भावना दिसून येते. नारी शक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित सर्वात अभिमानाची बाब काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? सर्वसाधारण पार्श्वभूमी असलेल्या एका आदिवासी कुटुंबातील सदस्य असलेल्या आपल्या राष्ट्रपतींनी या विधेयकावर मंजुरीची मोहोर उमटवली आहे. तो दिवसही आता दूर नाही जेव्हा तुमच्यापैकी कोणीतरी खासदार किंवा आमदार होऊन अशाच एखाद्या मंचावर बसलेले असेल.

मित्रांनो,

गांधीजी म्हणायचे-देशाचा आत्मा ग्रामीण भारतात रुजलेला आहे. आज मी यात आणखी एक ओळ जोडतो…. ग्रामीण भारताचा आत्मा, ग्रामीण स्त्रियांच्या सशक्तीकरणात रुजलेला आहे. म्हणूनच आमच्या सरकारने महिलांच्या अधिकारांना आणि महिलांसाठी नव्या संधी निर्माण करण्याला मोठे प्राधान्य दिले आहे. आज भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. देशाच्या या आर्थिक प्रगतीचा पाया तुमच्यासारख्याच कोट्यवधी महिलांनी रचला आहे. यामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था आणि महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची भूमिका फार मोठी आहे. देशातील 10 कोटीहून अधिक महिला आज 90 लाखांपेक्षा जास्त स्वयंसहाय्यता बचत गट चालवत आहेत. यातील 3 लाखांहून अधिक बचत गट एकट्या गुजरात राज्यात कार्यरत आहेत. आम्ही देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी या कोट्यवधी महिलांचे उत्पन्न वाढवण्याचा निर्धार केला आहे. आम्ही या भगिनींना लखपती दीदी बनवत आहोत. सुमारे दीड कोटी महिला अशा आहेत ज्या लखपती दीदी झाल्या आहेत. येत्या 5 वर्षांत एकूण 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित करून आम्ही वाटचाल करत आहोत. आणि ज्या वेगाने आपल्या भगिनी काम करत आहेत ते बघता असे वाटते की कदाचित आम्हांला इतका देखील वेळ वाट पहावी लागणार नाही, ठरवलेल्या वेळेआधीच हे उद्दिष्ट पूर्ण होईल.

माता-भगिनींनो,

जेव्हा आपली एक भगिनी लखपती दीदी होते तेव्हा संपूर्ण कुटुंबाचे भाग्य बदलून जाते.महिला स्वतःच्या कामांमध्ये गावातील इतर महिलांना देखील सोबत घेत असतात. आणि माझा तर असा ठाम विश्वास आहे की जे काम माता-भगिनी हातात घेतात ना, त्या कामाची देखील किंमत वाढते.घरातून सुरु केलेले काम हळूहळू एका आर्थिक चळवळीचे रूप घेते. स्वयंसहाय्यता गटांचे हेच सामर्थ्य वाढवण्यासाठी गेल्या 10 वर्षांमध्ये आमच्या सरकारने यासाठीची तरतूद 5 पट वाढवली आहे. या स्वयं सहाय्यता बचत गटांना 20 लाख रुपयांपर्यंतचे विनाहमी कर्ज देण्यात येत आहे. विचार करा, 20 लाख रुपये आणि ते देखील कोणत्याही हमीची अट न ठेवता, विना हमी दिले जातात. बचत गटातील महिलांना नवनवी कौशल्ये आणि तंत्रज्ञानाशी ओळख करून घेण्याचे मार्ग देखील उपलब्ध करून दिले जात आहेत.

मित्रांनो,

आज देशातील स्त्रीशक्ती प्रत्येक भीतीवर विजय मिळवून, प्रत्येक शंकेला मागे टाकून पुढे जात आहे.आम्ही जेव्हा ड्रोन दीदी योजना सुरु केली तेव्हा अनेक लोकांनी भीती व्यक्त केली होती. ड्रोन सारखे आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्रामीण भागातील स्त्रिया यांच्यात योग्य ताळमेळ बसू शकेल का अशी शंका त्यांना वाटत होती. त्यांना वाटत होते, छे,छे, या महिला हे कसे करू शकतील. मात्र मला माझ्या बहिणी, मुलींमधील प्रतिभा आणि निष्ठा यावर संपूर्ण विश्वास होता. आज नमो ड्रोन दीदी अभियानामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत, कृषी क्षेत्रात नवी क्रांती होत आहे आणि या क्रांतीचे नेतृत्व करणाऱ्या भगिनींना लाखो रुपयांचे उत्त्पन्न मिळू लागले आहे, संपूर्ण गावात त्यांना मान मिळू लागला आहे. घर, परिवार, नातेवाईक, गाव आता मोठ्या अभिमानाने पायलट दिदीकडे पाहत आहेत, ड्रोन दीदीकडे बघत आहेत. याच पद्धतीने बँक सखी आणि विमा सखी यांसारख्या योजनांनी गावातील महिलांना नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामीण भगिनींच्या सक्षमीकरणासाठी कृषी सखी आणि पशु सखी सारखी अभियाने सुरु करण्यात आली आहेत. लाखो भगिनी या अभियानांमध्ये सहभागी झाल्या आहेत, त्यांचे उत्पन्न देखील वाढत आहे. 

भगिनींनो-सुकन्यांनो,

सरकारच्या अशा सर्व प्रयत्नांचा अधिकाधिक लाभ गुजरातच्या महिलांना मिळावा यासाठी गुजरात सरकारने आणखी 10 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मी भूपेंद्र भाई यांना आणि गुजरात सरकारला शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा मला पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करण्याची संधी मिळाली होती तेव्हा माझ्या पहिल्या भाषणात मी एक चिंता व्यक्त केली होती. मी म्हटले होते की मुलगी जर संध्याकाळी घरी उशिरा आली तर आई आणि वडील दोघेही तिला प्रश्न विचारून भंडावून सोडतात, कुठे गेली होतीस? इतक्या उशिरा का आलीस? कुठे होतीस? असे शंभर प्रश्न विचारतात. तर मी असा प्रश्न विचारला होता की, जर मुली बाहेरून उशिरा आल्या तर तुम्ही तिला शंभर प्रश्न विचारता, पण जेव्हा मुलगा उशिरा घरी येतो तेव्हा त्यालाही कधीतरी विचारा ना, की, बाबा कुठे गेला होतास तू? कोणाकडे होतास? काय करत होतास

महिलांविरुद्ध होणारे गुन्हे रोखण्यासाठी, एका चांगल्या समाजाच्या जडणघडणीसाठी  हे खूप गरजेचे आहे. गेल्या दशकभरात आम्ही महिला सुरक्षितेला खूप मोठे प्राधान्य दिले. त्यांच्याविरुद्ध होणारे गुन्हे रोखण्यासाठी नियम-कायदे आम्ही आणखी कठोर केले आहेत. महिलांविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांची तातडीने सुनावणी व्हावी, दोषींना तातडीने शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयांची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत अशा प्रकारची सुमारे 800 न्यायालयांना, देशभरात मंजूरी दिली गेली आहे आणि त्यापैकी बहुतांश कार्यरत झाली आहेत. याअंतर्गत बलात्कार आणि पॉक्सोशी संबंधित सुमारे 3 लाख प्रकरणे तातडीने निकालात काढली आहेत. बहिणी आणि लहान मुलांशी संबंधित अशी तीन लाख प्रकरणे निकालात काढली आहेत. हे आमचे सरकार आहे, ज्याने बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात बलात्काऱ्यांना, आम्ही आल्यावर कायदा बदलला आणि अशा पापी व्यक्तीला फाशीच्या फंद्यावरच लटकवले पाहिजे, फाशीची शिक्षा, हा कायदा आम्ही बदलला. आमच्या सरकारने 24×7, चोवीस तास, 365 दिवस महिला हेल्पलाइनला सक्षम केले, महिलांसाठी वन स्टॉप सेंटर सुरू केले. देशभरात अशी 800 च्या आसपास केंद्र सुरू झाली आहेत. यामाध्यमातूनही 10 लाखांपेक्षा जास्त महिलांना मदत मिळाली आहे.

सहकाऱ्यांनो,

आता जी भारतीय न्याय संहिता देशात लागू झाली आहे, इंग्रजांच्या काळ्या कायद्याला आम्ही काढून टाकले, देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर, हे पुण्य कार्य करण्याचे सौभाग्य आपण सर्वांनी मला दिले आणि काय बदल केला? त्यातील महिला सुरक्षेशी संबंधित तरतुदींना आणखी मजबूत केले आहे. भारतीय न्याय संहितेत महिला आणि लहान मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांवर एक स्वतंत्र प्रकरण जोडले गेले आहे. आपल्या सर्वांची, पीडित बहिणींची, समाजाची ही तक्रार होती, की गुन्हा घडल्यावर मुलींना तारखेवर तारीख, तारखेवर तारीख, हाच घटनाक्रम चालू असतो, न्यायाची खूप काळ वाट पाहावी लागते. भारतीय न्याय संहितेत याचाही विचार केला आहे. बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यांत 60 दिवसांच्या आत आरोप निश्चिती व्हावी, 45 दिवसांच्या आत निकाल दिला जावा, ही व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वी पीडितांना पोलिस ठाण्यात येऊन FIR करावी लागत होती, पोलिस ठाण्याला जावे लागत होते. आता नव्या कायद्यांत, कुठूनही e-FIR दाखल करता येते. यामुळे पोलिसांनाही तातडीने कारवाई करणे सुलभ होते.. जीरो FIR च्या तरतुदीअंतर्गत कोणतीही महिला, स्वतःवर अत्याचार झाला असल्यास कोणत्याही पोलिस ठाण्यात FIR दाखल करू शकते. आणखी एक तरतूद केली आहे, आता पोलीस बलात्कार पिडितांचे जबाब ऑडिओ-व्हिडिओद्वारेही नोंदवू शकतात. यालाही कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. पूर्वी वैद्यकीय अहवाल यायलाहीखूप वेळ लागत होता. आता डॉक्टरांकडून वैद्यकीय अहवाल पुढे पाठवसाठीही 7 दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे. याची पीडित महिलांना खूप मदत होते आहे.

सहकाऱ्यांनो,

या जितक्या काही नवीन तरतुदी, भारतीय न्याय संहितेत करण्यात आल्या आहेत, त्यांचे परिणामही दिसू लागले आहेत. सुरत जिल्ह्याचेच एक उदाहरण आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, तिथे एक मुलीसोबत सामुहिक बलात्काराची दुर्दैवी घटना घडली, घटना गंभीर होती. भारतीय न्याय संहितेनंतर या प्रकरणात फक्त 15 दिवसांच्या आत आरोप निश्चिती झाली आणि काही आठवड्यांपूर्वी दोषींना जन्मठेेपेची शिक्षाही झाली. 15 च दिवसांत पोलिसांनी आपले काम पूर्ण केले, न्याय प्रक्रिया झाली आणि अल्प कालावधीतच जन्मठेपेची शिक्षा झाली. भारतीय न्याय संहिता लागू झाल्यानंतर, देशभरात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या सुनावणी प्रक्रियेला खूप गती मिळाली आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये एका न्यायालयाने अल्पवयीन मुलीसोबत बलात्काराच्या प्रकरणात 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ही उत्तर प्रदेशातील भारतीय न्याय संहितेअंतर्गत सुनावली गेलेली पहिली शिक्षा आहे, या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत शिक्षा सुनावली गेली. कोलकात्याच्या एका न्यायालयाने सात महिन्यांच्या मुलीसोबत बलात्काराच्या प्रकरणात दोषी व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा गुन्हा घडल्यानंतर 80 दिवसांच्या आत सुनावली गेली आहे. देशाच्या विविध राज्यांमधील ही उदाहरणे, यातून स्पष्टपणे दिसून येते की, भारतीय न्याय संहितेने, आमच्या सरकारने जे इतर निर्णय घेतले आहेत, त्यांमुळे कशा रितीने महिलांच्या सुरक्षिततेच वाढ झाली आहे आणि महिलांना तातडीने न्याय मिळेल याची सुनिश्चिती केली आहे.

मातांनो – भगिनींनो,

सरकारचा प्रमुख म्हणून, आपला सेवक म्हणून, तुम्हा सर्वांना हा विश्वास देतो की आपल्या स्वप्नांच्या मार्गात कोणतीही अडथळा येऊ देणार नाही. एक मुलगा ज्या भावनेने आईची सेवा करतो, त्याच भावनेने मी भारत माता आणि माझ्या या माता – भगिनींची सेवा करत आहे. मलाही ठाम विश्वास आहे, आपल्या सर्वांचे ही मेहनत, ही सचोटी, हे आशीर्वाद, या सगळ्यामुळे 2047 पर्यंत, जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष होतील, 2047 मध्ये, विकसित भारताचे आपले जे ध्येय आहे, हे ध्येय पूर्णत्वाला जाईलच. याच भावनेसह, तुम्हा सर्वांना, देशातील प्रत्येक माता-भगिनी-मुलीला एकदा पुन्हा महिला दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा देतो, खूप अभिनंदन करतो. माझ्यासोबत बोला, दोन्ही हात वर करून बोला-

भारत माता की– जय.

आज महिलांचा आवाज जोरदार असायला हवा,

भारत माता की – जय.

भारत माता की – जय.

भारत माता की – जय.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

वंदे मातरम.

आज आपण सगळेच वंदे मातरम म्हणत आहोत, तर भारत मातेसोबतच देशातील कोट्यवधी मातांसाठीही – वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. खूप-खूप धन्यवाद.

खुलासा : काही ठिकाणी पंतप्रधानांच्या भाषणाचा काही भाग गुजराती भाषेतही आहे, त्याचाही इथे अनुवाद केला आहे.

***

JPS/NMathure/S.Kane/S.Chitnis/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com