Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरातमधील थराड , बनासकांठा,  येथे विविध प्रकल्पांच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

गुजरातमधील थराड , बनासकांठा,  येथे विविध प्रकल्पांच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण


नमस्कार,
भारत माता की जय
भारत माता की जय
भारत माता की जय
 
आज सरदार साहेबांची जयंती. मी म्हणेन सरदार पटेल, तुम्ही सर्वांनी दोनदा अमर रहे-अमर रहे म्हणा. बनासकांठाच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज गुजरात शोकसागरात बुडाला आहे. देशवासीयही खूप दु:खी झाले आहेत. मोरबी येथे काल संध्याकाळी भीषण अपघात घडला. आपले अनेक नातेवाईक आणि लहान मुलांनी त्यांचे प्रियजन गमावले आहेत. या दु:खद  प्रसंगी आमच्या संवेदना शोकाकुल कुटुंबासोबत आहेत. भूपेंद्रभाई आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी पूर्ण ताकदीनिशी शक्य ते सर्व मदतकार्य करत आहेत. काल रात्री ते केवड़ियाहून थेट मोरबीला पोहोचले आणि त्यांनी मोरबीमध्ये बचावकार्य हाती घेतले.  मी सुद्धा रात्रभर आणि आज सकाळी त्याच्या संपर्कात राहिलो. तिथेही वेगवेगळे विभाग, मंत्री, अधिकारी यांच्यासमवेत अशा भीषण आपत्तीत लोकांच्या समस्या कशा कमी करता येतील, या कामात सतत मग्न होते. एनडीआरएफची तुकडी काल मोरबीला पोहोचली. लष्कर आणि हवाई दलाचे जवानही बचाव आणि मदतकार्यात सहभागी झाले आहेत. आणि बनासकांठाच्या भूमीतून, आई अंबेच्या भूमीतून, मी गुजरातच्या जनतेला पुन्हा एकदा विश्वास देऊ इच्छितो   आणि आश्वस्त करू इच्छितो की या गंभीर परिस्थितीत सरकारकडून  कोणतीही कसर राहणार नाही.
 
काल मोरबीमध्ये ही भयानक वेदनादायक घटना घडली, मन खूप अस्वस्थ झाले. मी द्विधा मनःस्थितीत होतो की ही सर्व विकासकामे आहेत आणि बनासकांठामध्ये पाण्याचे महत्त्व किती  आहे.  मी येथे कार्यक्रम करावा की नाही असा विचार माझ्या मनामध्ये होता. परंतु माझे तुमच्यावरील प्रेम आणि माझ्यावरील तुमचे प्रेम आणि कर्तव्याला  प्राथमिकता देण्याच्या माझ्या संस्कारांमुळे मन खंबीर करून मी तुम्हा सर्वांमध्ये आलो आहे. बनासकांठा आणि संपूर्ण उत्तर गुजरातकरीता पाणी आणि केवळ एका कार्यक्रमात आठ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प. या प्रकल्पांमुळे बनासकांठासह, पाटण जिल्हा, मेहसाणा यांसह सहा जिल्ह्यांतील एक हजाराहून अधिक गावे आणि दोन लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा मिळणार आहे. आपल्या गुजरातमधील जनता संकटांचा सामना करतच मोठी झाली आहे. दहा वर्षांपैकी सात वर्षं आपण दुष्काळ आणि भीषण भूकंपाचा सामना केला आहे, परंतु गुजरातच्या जनतेच्या कर्तव्यनिष्ठ स्वभावामुळे, त्यांच्याकडे जी काही साधने उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करून त्यांनी नेहमीच अडचणींचा सामना केला आहे. ते कधीही शांत बसले नाहीत. त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि फलप्राप्तीसाठी अथक प्रयत्न केले आणि आपला हा बनासकांठा त्याचा जिवंत साक्षीदार आहे. 20-25 वर्षांपूर्वी या बनासकांठा आणि संपूर्ण पट्ट्यात जी परिस्थिती होती त्याची तुलना केली तर आज येथे झालेला विकास, झालेला बदल स्पष्टपणे दिसून येतो आणि पूर्वीचे दिवसही आपण विसरू शकत नाही. आणि जर आपण एकत्र मेहनत केली तर आपल्याला अचूक आणि दृश्य परिणाम मिळतात हे आपण विसरू शकत नाही.
 एकीकडे कच्छचे वाळवंट, दुसरीकडे येथे फेब्रुवारी महिना संपला की  आपल्याकडे धूळ उडू लागते. पावसाची वाट बघत राहतो आणि उन्हाळा  अगदीच असह्य असतो . वीज, पाणी अशा अनेक समस्या होत्या आणि थोडा पाऊस आला तर एक-दोन महिने निघून जात असत. या उत्तर गुजरातमधील हजारो खेड्यांना जरी पाणी मिळाले तरी ते फ्लोराईडमिश्रित मिळते आणि ते पाणी प्यायल्यावर काय होतं ते तुम्हाला माहीत आहे, आपल्या उत्तर गुजरातमध्ये तुम्हाला सगळ्यांचे दात पिवळे झालेले दिसतात. जन्मत:च त्यांचे दात पिवळे  असावेत ,  असे वाटते. हाडे कमकुवत होतात. तारुण्यात म्हातारपण आल्यासारखं वाटतं. ही समस्या, पाणी आहे तरीही आहे.  या  पाण्याच्या समस्येने शेती करणेही अवघड झाले होते. इथे कुणी जमीन विकायला काढली तर खरेदीदार मिळत नसे असे दिवस होते आणि आपण जमिनीखाली बोअरवेल खोदून पाणी काढायचा प्रयत्न करायचो. विजेची वाट पाहत, मोदींचे पुतळे जाळत,आंदोलन करायचे. आम्ही हे सर्व केले कारण आधीच्या काळात लोकांनी आशा सोडली होती, पण मित्रांनो, जेव्हा तुमचा सेवक बनून, तुमचा सहकारी होऊन, तुमच्या समस्या समजून घेऊन आणि चांगल्या हेतूने पूर्ण निष्ठेने काम केले, तेव्हा आपण सर्वात कठीण ध्येय देखील साध्य करू शकलो. 20 वर्षांपूर्वी तुम्ही सर्वांनी माझी मुख्यमंत्रीपदी निवड केलीत आणि त्यानंतर आम्ही समस्येचे मूळ शोधले आणि आम्ही जलसंधारणावर लक्ष केंद्रित केले. दुसरीकडे, जर  आपण जमिनीतून पाणी काढत राहिलो असतो,आणि बोअरवेलची खोली वाढवत राहिलो असतो, मात्र  मी माझी सर्व शक्ती पाण्यावर केंद्रित केली. पावसाचे पाणी समुद्रात जाऊ नये म्हणून चेक डॅमच्या माध्यमातून तलावाची खोली वाढवली, आपली सुजलाम सुफलाम योजना राबवली. 
 
मला आठवते की, आमची ही सुजलाम सुफलाम योजना सुरू झाली, तेव्हा काँग्रेसचे नेतेही  मला सांगत होते,साहेब, या भूमीत एव्हढे पाणी येईल आणि आम्ही दोन पिकेही घेऊ शकू, आमच्या आयुष्यात असे चांगले दिवस येतील  यावर आमचाही अजिबात  विश्वास नव्हता.  आम्ही ‘वासमो’   योजना बनवली, गावा-गावात पाणी समित्या स्थापन केल्या  आणि त्यातही मी महिलांकडे काम सोपवले आणि या सर्व प्रयत्नांचे फलित म्हणजे बनासकांठा असो की संपूर्ण उत्तर गुजरात किंवा कच्छ, ज्यासाठी आम्ही तळमळत होतो तो  पाण्याचा प्रत्येक थेंब साठवला आणि ठिबक सिंचन योजनेमार्फत प्रत्येक थेंब वापरला, आणि  ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’  हा मंत्र डोळ्यासमोर ठेऊन कृषी, पर्यटन आदी क्षेत्रात चमत्कार घडवला आहे. एकीकडे आमची बनास देवी आणि दुसरीकडे 100 मेगावॅटचा अल्ट्रा मेगा सौर ऊर्जा प्रकल्प . आपण बघताच आहात की दुसरीकडे नळाचं पाणी. ऋषिकेशजी सांगत होते की पिण्याचे पाणी प्रत्येक घरात पाईपद्वारे पोहोचवणे , हाडांचे आजार टाळण्याचे काम आम्ही करू शकलो, आणि या सर्व कामात आम्हाला बनासकांठाने जे योगदान आणि साथ दिली,आज या निमित्ताने बनासकांठाला नतमस्तक होऊन त्यांचे आभार मानावेसे वाटतात.
 
येथे उपस्थित वयाने ज्येष्‍ठ मंडळी आहेत, त्यांना  चांगलेच माहिती असेल की, 17-18 वर्षांपूर्वी मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा इथल्या प्रमुख नेत्यांबरोबर बसून मी पाण्यावर चर्चा करायचो. आणि त्यांना सांगायचो की ही सगळी शेतं तलावासारखी भरतात, हे सगळं थांबवा, त्याऐवजी ठिबक सिंचन योजना राबवा. मग ते माझे म्हणणे ऐकायचे आणि विचार करायचे की शेतीतील याला काय कळणार. या चहा विक्रेत्याला शेतीबद्दल काय समजणार असे ते म्हणायचे. परंतु मी त्याचा पाठपुरावा केला आणि माझ्यासाठी ही समाधानाची गोष्ट आहे की वडीलधाऱ्यांनी माझ्या सूचना अंमलात आणल्या आणि आज बनासकांठने ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचनाच्या बाबतीत संपूर्ण देशात नाव कमावले आहे आणि हे काम करून संपूर्ण देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

 सत्याचा मार्ग किती भव्य  आहे याचे हे उदाहरण आहे. आपल्या  या प्रयत्नांना जगातील अनेक संस्थांनी पुरस्कृत केले आहे आणि आज पहा हे क्षेत्र विकासाची नवी गाथा लिहित आहे. आज बनासकांठामधील चार लाख हेक्टर जमिनीवर ठिबक सिंचन योजनेचे काम सुरू आहे आणि त्यामुळे पाण्याची पातळी आणखी खाली जाण्यापासून आपण वाचलो आहोत आणि आपण आपले  जीवन वाचवले, असे नाही, भविष्यात जी मुले जन्माला येतील, त्यांचेही जीवन  वाचवण्याचे पुण्य कार्य केले आहे.आणि म्हणूनच बनासकांठा असो, पाटण असो की मेहसाणा, त्या सर्वांसमोर  मला सहज नतमस्तक व्हावे असे वाटते. आणि तुम्ही सर्वांनी ही सगळी कामे करून, त्यावेळी जे राजस्थानचे मुख्यमंत्री  होते आणि आताही जे राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत, आणि  काही वेळापूर्वी तुमच्या इथे येऊन निवेदन करत होते ,त्यांनी मला लेखी पत्र देऊन या सुजलाम सुफलामला विरोध केला होता, तेव्हा मी त्यांना सांगितले की, बनासकांठाच्या पाण्याच्या समस्येने माझे बांधव त्रस्त आहेत. माझ्या विरोधात तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा, मी सुजलाम सुफलाम ही योजना आणणारच , आणि मी केले.सुजलाम सुफलाम योजने अंतर्गत   19-20 वर्षात शेकडो किलोमीटरचे  पुनर्भरण कालवे  बांधण्यात आले आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वर आली आणि पाण्याचीही बचत करायची होती, त्यामुळे जलवाहिनीचा  वापर करण्यात आला. तलाव भरण्यासाठी जलवाहिनीद्वारे  पाणी वाहून नेण्यात येत असे. आता दोन जलवाहिन्या अशा  बनणार आहेत की, त्यांच्या  मदतीने 1000 हून अधिक गावातील तलाव भरले जातील.आपले  मुक्तेश्वर धरण, कड़मावा तलाव हे दोन्ही  जलवाहिनीने  जोडून पूर्ण पाणी दिले जाईल माझ्या बंधुनो. जिथे जास्त उंचीवरचे  क्षेत्र आहेत तिथे पाण्याची गरज आहे, म्हणून आम्ही मोठे विद्युत पंप लावून पाणी उपसा करू आणि नंतर तिथे सगळ्यांना  पाणी  वितरित करू, माझ्या बंधुनो.यामुळे आपल्या कांग्रिज, देवधर तालुका , त्यांच्या समस्याही आम्ही सोडवू आणि त्यांना अडचणीतून बाहेर काढू.  आपले वाऊ, सुमिश्री गाव आणि तालुका हे  सर्व उंचावर आहे, कालव्याचे जाळे तिथे पोहोचणे अवघड आहे. आता सुई गावाची  समस्याही दूर होणार असून  माता नर्मदेच्या मुख्य कालव्याचे आणि  वितरण कालव्याचे जाळेही तयार होणार असल्याने सुई गाव तालुक्यासह  डझनभर गावे जलयुक्त होणार आहेत.आपल्या कथरा, दंतेवाडा जलवाहिनी , पाटण   आणि बनासकांठा या सहा तालुक्यांनाही खूप फायदा होईल, माझ्या बंधुंनो.
येत्या काळात मुक्तेश्वर धरण आणि कड़मावा तलावात माता  नर्मदेचे पाणी येणार आहे. त्यामुळे बनासकांठा, वडगाम, खेरालू, पाटण  , सिद्धपूर, मेहसाणा या सर्व भागातील पाण्याची समस्या कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. आपण गुजरातमधील लोक  पाण्याचे महत्त्व काय आहे ते जाणतो. आपल्या गुजरात आणि राजस्थानच्या लोकांना माहीत आहे. इथे जर कोणी पाणी पाजले  तर तेही पुण्य मानले जाते. जर एखाद्याने पाणपोई तयार केली  तर त्याला संपूर्ण गाव सेवाभावी समजते. जर कोणी गावाच्या वेशीवर झाडाखाली मडके  ठेवले असेल आणि कोणीतरी दररोज मडके भरत असेल तर गावकरी अभिमानाने सांगतात की, हे सेवाभावी आहेत कारण ते पाणपोई चालवतात. आपण रुद्रधाम बद्दल ऐकले आहे आणि जेव्हा पाण्याचा मुद्दा  येतो तेव्हा त्याची  त्याची नेहमीच चर्चा होते. दूर कुठे जाण्याची गरज नाही, आमच्या लाखा वंजारा यांना कोण विसरेल आणि त्यामुळेच आज जिथे जिथे पाण्याची कामे झाली आहेत तिथे ना लाखा वंजारा यांचा चेहरा कोणी पाहिला आहे आणि ना गावाची माहिती आहे. लाखा वंजारा यांचे फक्त नाव ऐकले आहे, तरीही एक  छोटी पाण्याची विहीर बांधली आहे,पण शेकडो वर्षांनंतरही लोक लाखा वंजारा यांना विसरायला तयार नाहीत.जो कोणी पाणी देतो, त्या व्यक्तीच्या भावनेला  पुण्य दृष्टीने पाहिले जाते आणि मला असे वाटते की, आज जर हा लाखा वंजारा निवडणुकीत उभा राहिला तर जगातील कोणतीही शक्ती त्यांचा पराभव करू शकणार नाही.पाण्याची ही शक्ती आहे, जो पाणी आणतो तो अमृत आणतो. जो अमृत आणतो तो संपूर्ण समाजाला अजिंक्य बनवतो. आणि पाण्याचा , जलशक्तीचा आशीर्वाद  कामाला येतो.

 
बंधु आणि भगिनींनो,

आज पाण्यामुळे शेतीपासून पशुपालनापर्यंत सर्वच क्षेत्रात संधी वाढल्या आहेत. फळे भाजीपाला त्यातून अन्नप्रक्रिया याचा  मोठ्या प्रमाणात सर्वत्र प्रसार होत आहे. काही वेळापूर्वी मी तुमच्या बनास डेअरीत आलो होतो, तेथे बटाट्यावर प्रक्रिया करण्याचे मोठे काम सुरू झाले आहे. आता भारत सरकारही अन्न प्रक्रियेसाठी खूप मदत करत आहे.आम्ही सखी मंडळ, शेतकरी उद्योग संघटना आणि जे या मूल्यवर्धनात येतात अन्नप्रक्रियेमध्ये येतात, आम्ही त्यांना मदत करतो.शीतगृह बांधणे असो किंवा अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारणे असो, भारत सरकार छोट्या-छोट्या संस्थांना मदत करून माझ्या शेतकऱ्यांचे सामर्थ्य वाढवण्याचे   काम करत आहे.आज ज्या प्रकारे दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून लहान पशुपालकाचा  वाटा वाढत आहे, त्याच पद्धतीने फळे आणि भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे सामर्थ्य  वाढवण्यासाठी आम्ही मदत करत आहोत.डाळिंब, तुम्हाला त्याच्या रसाचे  कारखाने दिसतात आणि त्यातही शेतकऱ्यांचा वाटा आहे.सखी मंडळी काम करतात तेव्हा त्यांनाही लाभ मिळतो. फळे, भाजीपाला, लोणची ,मुरांबे  , चटण्या असे अनेक पदार्थ घराघरात तयार होऊ लागले  आणि लेबल लावून बाजारात विकले जात आहेत. उद्योग म्हणून विकसित व्हावे, म्हणून गावोगावच्या भगिनींच्या मंडळांना उपलब्ध कर्जाची मर्यादा सरकारने दुप्पट केली आहे.माझ्या या भगिनी काम करतील आणि त्यांच्या हातात पैसा आला तर त्या दुप्पट काम करतील.इतकेच  नाही तर आपल्या आदिवासी भागात, आदिवासी क्षेत्रात  वन धन केंद्रे सुरु केली  आहेत, ज्याचे उत्पादन जंगलात होते आणि त्यातून  पैसे आणि भगिनींना रोजगार देऊन वनोपज मिळते, त्यांना उत्तम भाव मिळाला पाहिजे, मग तो आयुर्वेदाच्या दुकानात असो  किंवा बाजारात,त्याचा फायदा व्हावा असे काम केले आहे.

अनेक शेतकरी बांधवांनी मला त्यांच्या फायद्यांबद्दल लिहिले आहे.मला आठवते की,  पीएम सन्मान शेतकरी निधी आणि आपल्या उत्तर गुजरातमध्ये शेतकरी म्हणजे दोन बिघा किंवा अडीच बिघा जमीन असा असतो. म्हणजेच छोटे शेतकरी आहेत आणि त्यांनी बँकेकडून कर्जही घेतलेले नाही, त्यांना पीएम सन्मान शेतकरी निधीतून  वर्षातून तीनदा 2-2 हजार मिळतात, त्यामुळे त्यांना शेतीच्या कामाला खूप गती मिळते.या कामात एका रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला नाही आणि या कामात दिल्लीतून बटण दाबले की तुमच्या खात्यात पैसे येतात.आता आम्ही एक मोठे काम हातात घेतले आहे तेही आमच्या शेतकरी बांधवांसाठी. खतांचा  फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे या  दिशेने आम्ही महत्त्वाचे काम केले आहे आता युरिया किंवा इतर खतांच्या  वेगवेगळ्या नावांमुळे  आणि चढ्या भावामुळे अनेकवेळा शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत होता आणि ते सर्व दूर झाले असून आता एकाच  नावाने खते मिळणार आहेत. आणि त्याचे नाव भारत  ठेवले आहे .
 
‘भारत’ या नावाने खत, म्हणजे सर्व अप्रामाणिकपणा आणि फसवणूक बंद. सरकार परदेशातून जो युरिया आयात करते , त्यामध्‍ये  एक पोते युरियाची किंमत 2 हजार रुपयाहून जास्त असते. कोरोना आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर खताचे जे पोते बाहेरून दोन हजार रुपयांना  मागवले जाते , ते शेतकऱ्यांना महाग पडू नये, यासाठी केवळ  260 रुपयांमध्ये उपलब्ध केले जात आहे. सरकार दोन हजाराचे  यूरियाचे  पोते 260 मध्ये देत आहोत, जेणे करून माझ्या शेतकऱ्यांची पिके  पिवळी पडून नयेत, याची आम्हाला काळजी असते. आज बनास डेअरीचा विस्तार केवळ गुजरातमध्ये नाही, तर उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, आन्ध्रप्रदेश आणि झारखंड पर्यंत झाला आहे, हे बघून मला आनंद वाटत आहे. आज बनास दुग्धालय  चाऱ्याची व्यवस्थाही करते. दुधा व्यतिरिक्त दुग्धजन्य पदार्थांची बाजारपेठही निर्माण केली आहे. आमचे  सरकार डेअरी क्षेत्र मजबूत करण्यासाठी, पशुपालनाला बळकटी देण्यासाठी काम करत आहे. पशुंचा सन्मान व्हावा, त्यांचा जीवन भर सांभाळ व्हावा, यासाठी देखील आम्हाला सतत त्यांची काळजी वाटते. पण आता केवळ पशुंच्या दुधापासून उत्पन्न मिळावं असं नाही, तर त्यांच्या शेणापासूनही कमाई व्हावी, तुम्हाला दुभत्या जनावरांना सोडून देणं भाग पडू नये, यासाठी भारत सरकारने आता गोवर्धन योजनेवर काम करायला सुरुवात केली आहे. यासाठी आमच्या राज्यपाल महोदयांनी एक ज्योत प्रज्ज्वलित केली आहे आणि आमच्या इथले शेतकरी बंधू सेंद्रीय शेतीकडे वळले आहेत. युरिया आणि रसायन विरहित शेतीमुळे आमचे पशु धन आणि त्याचे शेणही उपयोगी पडू लागले आहे. आमच्याकडे बनासकांठा  इथे  तर शेणामधून, कचऱ्यापासून बायो गॅस, बायो सीएनजी उत्पादनासारख्या अनेक मोठ्या योजनांवर काम केले गेले आहे आणि आता यावर गाड्याही चालतात आणि वीज निर्मितीही होते. यामधून  परदेशी चलनाची बचत व्हावी, या दृष्टीने हजारो प्लांट सुरु होत आहेत. आमची डेअरी, आमच्याकडचे शेण, त्यामधून निर्माण झालेला बायो गॅस, या सर्व गोष्टींचा उपयोग आर्थिक विकास आणि सामान्य जनतेच्या भल्यासाठी केला जात आहे. एवढेच नाही, या शेतकऱ्यांना सेंद्रिय खत मिळायला हवे, कारण रसायनांचा वापर करून धरती मातेची हानी करण्याची आता शेतकऱ्याचीही इच्छा नाही. हा माझा शेतकरी सुद्धा धरती मातेची काळजी घेऊ लागला आहे. तो विचार करतो की उत्पन्न जरी कमी मिळाले, तरी मला माझ्या धरती मातेला हे रसायन द्यायचे नाही, त्यासाठी सात्विक खत मिळणे  गरजेचे  आहे, यासाठीच गोवर्धनच्या माध्यमातून, शेणखत कारखान्यांच्या माध्यमातून त्यांना सेंद्रिय खत मिळावे  आणि त्यांच्या जमिनीचा कस कायम राहावा, या दिशेने प्रयत्न केले जात आहेत.

बंधुनो आणि भगिनींनो,

दशकांपासून दुर्दशेत राहिलेले  हे आपले  कृषी क्षेत्र आज देशाचे सुरक्षेचे  कवच बनत आहे. आता हेच बघा ना, तुमच्या बरोबर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मला डीसा इथे एक कार्यक्रम करण्याची संधी मिळाली होती. डीसा इथे वायुसेनेचे एक खूप मोठे  केंद्र बनत आहे. त्याची पायाभरणी झाली आहे, त्यामध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे आणि हे संपूर्ण क्षेत्र सुरक्षेचे मोठे  केंद्र बनणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नवीन रोजगार निर्माण होणार आहे. तुम्ही बघा, नडाबेटमध्ये सीमा दर्शनाचे  काम केले आहे. आता सीमेवरच्या गावाचा विकास कसा होतो, हे पहावे, असे  संपूर्ण भारताला वाटत असेल. तर त्याचे  उदाहरण बघायचे  असेल, तर ते नडाबेटमध्ये येऊन पाहू शकतात. आम्ही दुर्गम भागातल्या गावांमध्ये एनसीसी, सीमावर्ती भागातल्या गावांमध्ये व्हायब्रंट विलेज योजना पोहोचवली आहे. सीमावर्ती भागातल्या गावांसाठी भारत सरकार अर्थसंकल्पात विशेष तरतूद करत आहे.
 
बंधुंनो आणि भगिनींनो, डबल इंजिन सरकार सीमावर्ती भागातल्या या सर्व गावांच्या विकासाकडे विशेष लक्ष देत आहे, आणि यासाठी अर्थसंकल्पात आम्ही व्हायब्रंट विलेजची घोषणा केली आहे, आणि या योजनेच्या माध्यमातून गावांना जोडण्यात आलं आहे. बनासकांठाच्या जवळजवळ सर्वच भागाला या कार्यक्रमांचा लाभ मिळणार आहे. मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे, तुम्हाला सर्वांना माहीत असेल, की काही दिवसांपूर्वी मी भूज इथं आलो होतो. भूज इथल्या भूकंपात मृत्युमुखी पडणार्‍यांच्या स्मृती प्रित्यर्थ कच्छच्या भुजिया डुंगरी इथे  स्मृती वन बनवले  आहे. संपूर्ण गुजरातमधले 13 हजार जण मृत्युमुखी पडले होते. त्यामध्ये बनासकांठा आणि पाटण  इथले लोकही होते. त्यांची नावं त्या ठिकाणी कोरण्यात आली आहेत. त्या सर्वांच्या नावाने तिथे एक झाड लावण्यात आलं आहे आणि जगभरातले लोक त्या स्मारकाला भेट देतील. बनासकांठा आणि पाटण  जिल्ह्याच्या लोकांना माझी विनंती आहे की ज्यांनी आपल्या कुटुंबियांना गमावलं आहे, त्यांना त्या ठिकाणी एकदा घेऊन जा. बनास डेअरी हे काम चांगल्या प्रकारे करू शकते, आणि तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करा, जेणे करून त्यांना या गोष्टीचा आनंद वाटेल, की सरकार त्यांना विसरलं नाही. 20 वर्षानंतरही त्यांची आठवण ठेवून काम करत आहे. अशी अनेक कामं देशाचा सन्मान वाढवत आहेत, सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी डबल इंजिन सरकार काम करत आहे.
सबका साथ सबका विकास, सबका विश्वास सबका प्रयास ही आमची एकच घोषणा आहे. गरीब असो, पीडित असो, दलित असो, वंचित असो किंवा आदिवासी असो, सर्वांच्या विकासासाठी आम्हाला काम करायचे  आहे. गुजरात सुरुवातीपासूनच हा एक मंत्र घेऊन पुढे जात आहे. भारताच्या विकासासाठी गुजरातचा विकास. भारताला विकसित करण्यासाठी गुजरालाही विकसित करावंच लागेल. विकसित राज्य बनून आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल. हे काम आम्ही करत आहोत. तुम्ही बघितले  असेल की काल बडोदा इथे  आम्ही विमान उत्पादनाची सुरुवात केली. एक काळ होता जेव्हा सायकलही बनत नव्हती. आज विमानं बनत आहेत, ही गोष्ट आनंदाची आहे की नाही, अभिमान वाटतो की नाही. तुमच्या मुलांचे भले  होईल, असे वाटते  की नाही, आणि यासाठी विकासाचा हा प्रवास थांबू देऊ नका. आणि काही लोकांना मात्र अशी समस्या असते. मी सर्व वर्तमानपत्र तर नाही बघीतली, पण आज दोन पाहिली, त्यामध्ये काँग्रेसची जाहिरात आहे, आता तुम्ही विचार करा, आज सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती आहे आणि वर्तमानपत्रात काँग्रेसची जाहिरात आहे, आणि सरदार पटेल यांचा उल्लेखही केला नाही. हे तुमचे सरदार साहेब, जे नेहरू साहेबांच्या सरकारमध्ये गृह मंत्री होते, भारताचे एवढे मोठे नेते होते, काँग्रेसचे  एवढे मोठे नेते होते, त्यांच्या जयंतीला तुम्ही गुजरातमध्ये जाहिरात देता, त्यामध्ये सरदार साहेबांचे एकही छाया चित्र नाही, नावही नाही, वर म्हणतात की आम्ही सर्वांना जोडू. पहिल्यांदा एका सरदार साहेबांना तर जोडा, एवढा अपमान. काँग्रेसला सरदार वल्लभ भाई पटेल यांच्याविषयी  काय समस्या आहे. गुजरात सरदार साहेबांचा अपमान कधीच सहन करणार नाही मित्रांनो, पण त्यांना त्याची काहीच पर्वा नाही. केवढा द्वेष भरला असेल, की ते असे काम करत आहेत.

बंधुनो आणि भगिनीनो,

आपल्याला गुजरातला पुढे घेऊन जायचे आहे, सरदार साहेबांनी दाखवलेला मार्ग आणि त्यांच्या आशीर्वादाने त्याला पुढे न्यायचे  आहे. गुजरात पूर्ण जोमाने पुढे जावा, आणि माझ्या भावी  पिढ्याही मजबूत व्हाव्यात, असा काळ घडवायचा आहे, आणि त्यासाठी आपण काम करायचं आहे. मा‍झ्या बरोबर बोला-

भारत माता की जय
भारत माता की जय
भारत माता की जय
खूप खूप धन्यवाद! 

               
*****

 

Suvarna B /Sushama K/ Sonal Chavan /R Agashe/ Rajashree/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai