Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरातमधील गांधीनगर रेल्वे स्थानक संकुलाच्या पुनर्विकासाच्या भूमीपुजन समारंभात पंतप्रधानांचे संबोधन

गुजरातमधील गांधीनगर रेल्वे स्थानक संकुलाच्या पुनर्विकासाच्या भूमीपुजन समारंभात पंतप्रधानांचे संबोधन

गुजरातमधील गांधीनगर रेल्वे स्थानक संकुलाच्या पुनर्विकासाच्या भूमीपुजन समारंभात पंतप्रधानांचे संबोधन

गुजरातमधील गांधीनगर रेल्वे स्थानक संकुलाच्या पुनर्विकासाच्या भूमीपुजन समारंभात पंतप्रधानांचे संबोधन


प्रिय बंधू आणि भगिनींनो,

आपल्या देशात रेल्वे ही सर्वसामान्यांशी जोडली गेलेली व्यवस्था आहे. अतिगरीब कुटुंबांनासुद्धा रेल्वे आधार वाटत आली आहे. मात्र दुर्भाग्याची बाब अशी की गेल्या 30 वर्षांत या रेल्वेला तिच्या नशीबावर सोडून देण्यात आले आहे. या काळात दिल्लीत अनेक पक्षांचे सरकार सत्तेत होते. या सरकारांमध्ये जे सदस्य पक्ष होते, ते रेल्वे मंत्रालय मिळणार असले तरच मंत्रिपरिषदेत सहभागी होत किंवा सरकारला समर्थन देत. म्हणजेच एक प्रकारचे प्रलोभन म्हणून रेल्वे मंत्रालयाचा वापर केला जात असे. कटू असले तरी हे सत्य आहे. त्याचा परिणाम असा झाला की, कोणत्याही राजकीय पक्षातील कोणत्याही व्यक्तीकडे रेल्वे मंत्रालय गेले तरी त्याने रेल्वेची फारशी पर्वा केली नाही. आणखी काय काय झाले असेल, ते मी सांगायची आवश्यकता नाही.

या सरकारने रेल्वेला प्राधान्य दिले आहे. रेल्वेचा विस्तार व्हावा, रेल्वेचा विकास व्हावा, रेल्वे आधुनिक व्हावी आणि रेल्वे सर्वसामान्यांच्या आयुष्यात एका दर्जेदार बदलासह सहायक ठरावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गेल्या अडीच वर्षात आपण रेल्वेचे कार्य पाहिले असले तर आधीच्या तुलनेत रेल्वेसाठीची तरतूद दुप्पट करण्यात आली आहे, हे आपल्या लक्षात आले असेलच. ही किरकोळ बाब नाही. सर्वात गरीब नागरिकही रेल्वेचा लाभ घेतो, त्यामुळे रेल्वेसाठी इतकी मोठी रक्कम खर्च करण्याचे ठरविले. पूर्वी दुपदरीकरणाचे काम वर्षात काही किलोमिटर अंतरापर्यंत होत असे, ते काम आता दुप्पट, तिप्पट वेगाने होते आहे.

पूर्वी रेल्वेमध्ये गेज बदलाचे काम अर्थात मीटर गेजचे ब्रॉड गेज आणि नॅरो गेजचे ब्रॉड गेजमध्ये परिवर्तन करण्याचे काम अंतिम टप्प्यात केले जात असे, आता त्याला प्राधान्य दिले जात आहे. पूर्वीच्या तुलनेत आता हे काम अधिक यशस्वी होते आहे. रेल्वे डिझेलच्या इंधनावर चालावी की कोळशावर चालावी.. पर्यावरणाचाही प्रश्न आहेच. डिझेलवर रेल्वे चालणार असेल तर जगभरातून, परदेशातून डिझेलची आयात करावी लागते. पर्यावरणाचे रक्षणही व्हावे, परकीय चलनही गमावू नये यासाठी डिझेलच्या वापराऐवजी रेल्वेचे लवकरात लवकर विद्युतीकरण झाले पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणात, अतिशय वेगाने आज रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण केले जाते आहे, रेल्वेसाठी इलेक्ट्रीक इंजिन बनवायचे काम सुरू आहे. स्वतंत्र भारतातील सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणुक रेल्वे क्षेत्रात झाली आहे. दोन मोठ्या लोको अभियांत्रिकी उत्पादनाच्या कामांसाठी ही गुंतवणुक झाली आहे, जी भविष्यात फार उपयुक्त ठरणार आहे. भविष्यात त्याद्वारे संपूर्ण रेल्वेची गती बदलणारी इंजिने निर्माण केली जाणार आहेत.

या सर्व गोष्टींबरोबरच स्वच्छतेपासून प्रसाधनगृहांपर्यंतच्या सुविधांवर आम्ही भर देतो आहोत. जैव प्रसाधनगृहे वापरात आणली जात आहेत. स्थानकांवरही रेल्वेच्या रूळांवर घाण साठलेली दिसते, हे आपणा सर्वांना माहिती आहे. फार वेगाने हे काम मार्गी लावले जाते आहे. खूप मोठा खर्च आहे, मात्र त्याचे तात्कालिक नाही तर दीर्घकालीन चांगले परिणाम होणार आहेत.

आरोग्याच्या दृष्टीनेही बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नांवर भर दिला जात आहे. रेल्वेचा वेग कसा वाढेल? नाही तर पूर्वी रेल्वे चालत राही, चालत राही. काही जण बसले आहेत, उतरत आहेत, धावून रेल्वेत चढत आहेत… हे सर्व बदलणे शक्य आहे. विशेष पथदर्शी पद्धतीने यावर काम सुरू आहे. रेल्वेचा सध्याचा वेग वाढविण्यासाठी विद्यमान यंत्रणेत कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत, यावर काम सुरू आहे. तंत्रज्ञानात बदल केला जातो आहे, जगभरातील लोकांना तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जोडले जात आहे. कारण सुरक्षा ही काळजी करण्याचा बाब आहे, तसेच ते एक मोठे आव्हानही आहे.

जगात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इतकी प्रगती झाली आहे की रेल्वेला सुरक्षित करणे शक्य झाले आहे. खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो आहे, रेल्वेचा डबा सुरक्षित कसा करता येईल, त्याची व्यवस्था केली जाते आहे. मालवाहतुकीच्या दृष्टीनेही रेल्वेमार्ग महत्वाचा आहे. जगातील 70 टक्के मालवाहतूक रेल्वेद्वारे केली जाते तर 30 टक्के मालवाहतूक रस्त्यांवरून केली जाते. आपला असा एकमेव देश आहे जेथे 15 ते 20 टक्के मालवाहतूक रेल्वेमार्फत होते आणि 70 ते 80 टक्के मालवाहतूक रस्त्यावरून होते. जेव्हा रस्त्यावरून मालवाहतूक होते, तेव्हा सर्व काही महाग होते. गुजरातमध्ये तयार होणारे मीठ जम्मू काश्मीरला पाठवायचे असेल आणि ते रस्त्याने पाठवायचे असेल तर ते इतके महाग होईल की, कोणालाही खरेदी करता येणार नाही. म्हणूनच रेल्वेद्वारे जेवढी जास्त मालवाहतूक होईल, तितक्याच वस्तू गरीबांना स्वस्तात उपलब्ध होऊ शकतील. म्हणूनच सध्या मालवाहतुक वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मी सत्तेवर येताच रेल्वेच्या लोकांना काम दिले होते. 16 टनाच्या कंटेनरमधून जेमतेम 2 ते 3 टन मीठ येते. का बरे? 16 टनाचा कंटेनर 6 टनाचा होतो का? जर तो 6 टनाचा असला तर त्यात 12 टन मीठ भरले जाईल आणि मग ते जेथे जाईल तेथे ते मोफत मिळू लागेल. मीठ तयार करणाऱ्यांचे मीठही लवकर पोहोचू शकेल. मीठ वाहून नेण्यासाठी लागणारे कंटेनर कमी वजनाचे असावेत, यासाठी रेल्वेने रचना केली आहे. म्हणजेच एक-एक बाब सुक्ष्मपणे बदलण्यासाठी रेल्वे प्रयत्नशील आहे.

रेल्वेत वेगाने बदल घडून येतील, असा विश्वास मला वाटतो. सर्वसामान्य मानवी सुविधा वाढतिलच, दुर्गम भागातही रेल्वे पोहोचेल, भारतातील बंदरांशी रेल्वे जोडली जाईल, भारतातील खाणींशी रेल्वे जोडली जाईल, भारतातील ग्राहकांशी रेल्वे जोडली जाईल आणि त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्याही जोडली जाईल. जेवढी रेल्वे स्थानके आहेत, ती शहरात मध्यवर्ती भागात आहेत. जमीनी महागल्या आहेत, पण आकाश मोकळे आहे. मग अशा वेळी खाली रेल्वे जात असेल तर वर 10 मजली, 25 मजली बांधकाम करता येईल. तेथे मॉल असेल, चित्रपटगृह असेल, हॉटेल असेल, बाजार असेल. जागेचा दुप्पट वापर होईल, रेल्वेचे उत्पन्न वाढेल, गुंतवणुक करू इच्छिणारे गुंतवणुक करायला येतील. गुजरातमध्ये आम्ही एक यशस्वी प्रयोग केला, खाजगी-सार्वजनिक भागिदारीतून बस स्थानके विकसित केली. आज बस स्थानकांवर जाणाऱ्या अतिगरीब माणसालाही श्रीमंतांना विमानतळावर मिळणाऱ्या सर्व सोयी मिळतात. गुजरातने हे करून दाखवले आहे.

येत्या काही दिवसात भारतातील हजारो रेल्वे स्थानके अशा प्रकारे विकसित होऊ शकतील. ज्या दिवशी या महात्मा मंदिराची पायाभरणी झाली होती, ते गुजरातचे सुवर्ण महोत्सवी वर्ष होते, 1 मे, 2010 चा दिवस होता. याच ठिकाणी बोलतांना मी म्हटले होते की आज ज्या कामाची पायाभरणी झाली आहे, त्याच महात्मा मंदिरात एक दिवस जगातील दिग्गज बसून विश्व शांतीची चर्चा करत असतील. हे आपणा सर्वांना नक्कीच आठवत असेल.

महात्मा गांधींच्या नावाशी जोडले गेलेले हे महात्मा मंदिर. हे महात्मा मंदिर आम्ही अतिशय वेगाने निर्माण केले. हे महात्मा मंदिर इतके सुसज्ज आहे की येथे जगभरातील दिग्गज येऊन राहतात. या रेल्वे स्थानकावर जे हॉटेल तयार होते आहे, तेथे येणारे लोक निश्चितच महात्मा मंदिराच्या परिषद केंद्राचा वापर करतील. येथेच उतरतील, बैठका घेतील, त्या ठिकाणी हेलीपॅड मैदानावर प्रदर्शन आयोजित करतील. म्हणजेच हा संपूर्ण भाग, रेल्वे, महात्मा मंदिर, हेलीपॅड ही सर्व ठिकाणे संपूर्ण भारतातील औद्योगिक घडामोडींचे एक विशाल केंद्र होऊ शकतील, असे मला वाटते. म्हणूनच रेल्वे स्थानकांवरच्या पायाभूत सुविधांचा विकास होतो आहे. रेल्वे तर सुरूच होती, जमीनही होती, या दोन्हींची परस्परांशी सांगड घालून वापर करणे गरजेचे होते. त्यामुळे आता हे महात्मा मंदिर वर्षातील 365 पैकी 300 दिवस व्यस्त राहिल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. जागतिक स्तरावरील काही कार्यक्रमांचे येथे आयोजन होण्याचीही शक्यता आहे आणि त्याचबरोबर रेल्वेच्या विकासाच्या दृष्टीनेही ते सहायक ठरणारे आहे.

भारतातील हा पहिला प्रकल्प गांधीनगर येथे सुरू होतो आहे. येत्या काही दिवसात भारतात इतरही काही ठिकाणी हा प्रकल्प मार्गी लागेल. आमच्या सुरेश प्रभूंनी रेल्वे स्थानकांवर Wi-Fi ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डिजीटल भारताचे जे स्वप्न आहे, ते पूर्ण करण्याच्या दिशेने काम सुरू आहे. काही लोकांना असे वाटते की हे भारतातील गरीब लोक आहेत, त्यांना काय समजणार आहे? आपल्याला आश्चर्य वाटेल पण भारतात रेल्वे प्रवासासाठी 60 ते 70 टक्के लोक ऑनलाईन तिकीट खरेदी करतात. 60 ते 70 टक्के. ही भारताची ताकत आहे.

सर्वसामान्य माणूस जो रेल्वेने प्रवास करतो तो आजही रेल्वे प्रवासासाठी तिकीटाचे आरक्षण ऑनलाईन करतो. Wi-Fi बाबतचा अनुभव असा की भारतातील आणि जगातीलही सर्वाधिक लोकांनी केलेल्या विश्लेषणानुसार भारतातील रेल्वे स्थानकांवर Wi-Fi ची जी क्षमता आहे, ती जगातील इतर सर्व स्थानकांच्या तुलनेत बहुतेक सर्वात जास्त आहे. भारतात आलेल्या गुगलच्या लोकांमध्येही हीच चर्चा रंगली होती. रेल्वे स्थानकांवर Wi-Fi ची सुविधा प्राप्त झाल्यामुळे ऑनलाईन अभ्यास करू इच्छिणारे अनेक विद्यार्थी लवकरात लवकर रेल्वे स्थानकांवर पोहोचू इच्छितात, अनेक गोष्टी डाऊनलोड करून त्यांचा शिक्षणासाठी वापर करतात. आपला संगणक, लॅपटॉप घेऊन आले की Wi-Fi चा मोफत वापर करता येतो. एखादी सुविधा कशा प्रकारचे बदल घडवून आणू शकते, याचे उदाहरण भारतीय रेल्वेने अडीच वर्षात घालून दिले.

अशाच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज गुजरातमध्ये संपूर्ण देशासाठी उपयुक्त ठरेल असा एक नवा प्रकल्प सुरू होतो आहे जो येत्या काही दिवसात भारतातील इतरही काही शहरांमध्ये सुरू होईल आणि रेल्वेला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल. रेल्वे ही सर्वसामान्यांना उपयुक्त ठरतील अशा सुविधांचे एक माध्यम होईल. रेल्वे देशाला गती देते आणि प्रगतीपथावरही नेते. आज गुजरातच्या लोकांना, गांधीनगरच्या नागरिकांना या संमेलनाच्या पूर्वसंध्येला ही भेट देताना मला अभिमान आणि समाधान वाटते आहे. मनापासून आभार .