Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद 2024 च्या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद 2024 च्या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण


नवी दिल्ली , 10 जानेवारी 2024

मोझांबिकचे राष्ट्राध्यक्ष फिलिपे न्युसी, तिमोर-लेस्टेचे राष्ट्राध्यक्ष रामोस-होर्टा, झेक रिपब्लिकचे पंतप्रधान पेत्र फिआला, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, देश-परदेशातून आलेले सर्व विशेष पाहुणे, इतर माननीय, सभ्य स्त्री पुरुषहो,

तुम्हां सर्वांना 2024 या नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नजीकच्या भूतकाळातच भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आता भारत पुढील 25 वर्षांच्या उद्दिष्टांवर काम करत आहे. जेव्हा भारत स्वातंत्र्यप्राप्तीची शतकपूर्ती साजरी करेल तोपर्यंत भारताला विकसित रूप देण्याचे उद्दिष्ट आपण निश्चित केले आहे. आणि म्हणूनच, 25 वर्षांचा हा कार्यकाळ, भारतासाठी अमृतकाळ आहे. ही नवी स्वप्ने, नवे संकल्प आणि नित्य-नव्या यशस्वी कार्यांचा काळ आहे. याच अमृतकाळात ही पहिली व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद होत आहे. आणि म्हणूनच या परिषदेचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे. या परिषदेला उपस्थित राहिलेले 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी, भारताच्या या विकास यात्रेचे महत्त्वाचे सहयोगी आहेत. मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो, तुमचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती, माझे बंधू शेख मोहम्मद बिन झायेद यांचे या कार्यक्रमात सहभागी होणे ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. व्हायब्रंट गुजरातमध्ये, या परिषदेत त्यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती भारत आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) यांच्यातील दिवसेंदिवस सशक्त होत जाणाऱ्या आत्मीय संबंधांचे प्रतीक आहेत. काही वेळापूर्वी आपण त्यांचे विचार ऐकले. भारतावर असलेला त्यांचा विश्वास, त्यांनी दिलेला सहयोग खूपच उत्साहपूर्ण आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे – व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेने आर्थिक विकास आणि गुंतवणुकीशी संबंधित माहिती आणि अनुभव सामायिक करण्यासाठीच्या मंचाचे रूप घेतले आहे. या परिषदेत देखील भारत आणि युएई यांनी फूड पार्क्सच्या विकासासाठी, नवीकरणीय उर्जेच्या क्षेत्रातील सहयोग वाढवण्यासाठी, नवोन्मेषी आरोग्यसेवा क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी अनेक महत्त्वाचे करार केले. युएईच्या कंपन्यांतर्फे भारतातील बंदरविषयक पायाभूत सुविधा क्षेत्रात अनेक अब्ज डॉलर्सच्या नव्या गुंतवणुकीबाबत एकमत झाले आहे. तसेच, युएईच्या सॉव्हरीन वेल्थ फंड तर्फे गिफ्ट सिटीमध्ये परिचालनाला सुरुवात होईल. ट्रान्सवर्ल्ड कंपनी आपल्या देशात विमाने तसेच जहाजे भाडेपट्टीने घेण्याचा उपक्रम सुरु करणार आहे. भारत आणि युएई यांनी ज्या पद्धतीने आपल्या नातेसंबंधांना एक नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे त्याचे मोठे श्रेय माझे बंधू, शेख मोहम्मद बिन झायेद यांना जाते.

मित्रांनो,

मोझांबिकचे राष्ट्राध्यक्ष न्युसी यांच्याशी कालही माझी विस्तृत चर्चा झाली. त्यांच्याकरिता तर गुजरातला येणे म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा देणे आहे. राष्ट्राध्यक्ष न्युसी हे आयआयएम अहमदाबाद या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत.भारताच्या जी-20 अध्यक्षतेच्या काळात आफ्रिकन महासंघाला समूहाचे स्थायी सदस्यत्व मिळणे ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. राष्ट्राध्यक्ष न्युसी यांच्या भारत भेटीमुळे आपल्या संबंधांना शक्ती तर मिळालीच आहे पण त्याचसोबत भारत आणि आफ्रिका यांच्या दरम्यानचे संबंध अधिक घनिष्ट झाले आहेत.

मित्रांनो,

झेक प्रजासत्ताकाचे पंतप्रधान पेत्र फिआला यांची या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरची ही पहिलीच भारतभेट आहे, तसे ते यापूर्वी देखील भारतात आलेले आहेत. बऱ्याच काळापासून झेक व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेशी जोडलेला आहे. भारत आणि झेक या देशांदरम्यान तंत्रज्ञान, वाहन उद्योग, उत्पादन यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य सतत वाढत आहे. पेत्र फिआला महोदय, मला विश्वास आहे की तुमच्या या भारतभेटीने दोन्ही देशांतील संबंध आणखी मजबूत होतील. आपल्याकडे असे म्हणतात की अतिथी देवो भव: आणि पंतप्रधान म्हणून तर तुमची ही पहिलीच भारत भेट आहे. तुम्ही येथून जाताना फार सुंदर आठवणी घेऊन जाल अशी मला आशा वाटते.

मित्रांनो,

नोबेल लॉरीएट आणि तिमोर-लेस्टेचे राष्ट्रपती रामोस-होर्टा यांचे देखील मी भारतात स्वागत करतो. रामोस-होर्टा महोदयांचे गांधीनगरला येणे आणखीनच वैशिष्ट्यपूर्ण आहे. महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या सिद्धांताला तुम्ही तुमच्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाशी जोडले आहे. आसियान आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात तिमोर-लेस्टेशी आमचा सहयोग अत्यंत महत्त्वाचा आहे.

मित्रांनो,

काही काळापूर्वीच व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेच्या आयोजनाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या 20 वर्षांमध्ये या परिषदेने अनेक नव्या संकल्पनांना मंच उपलब्ध करून दिला आहे. या परिषदेने गुंतवणूक आणि परताव्यांसाठी नवे मार्ग तयार केले आहेत. आणि आता व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेची यावर्षीची संकल्पना आहे गेटवे टू द फ्युचर….21व्या  शतकातील विश्वाचे भविष्य आपल्या एकत्रित प्रयत्नांनीच उज्ज्वल होईल. भारताने जी-20 अध्यक्षतेच्या काळात देखील विश्वाच्या भविष्यासाठी एक नकाशा आखून दिला आहे. यावर्षीच्या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेने देखील या संकल्पनेला पुढे नेले आहे. भारत ‘आय-टू-यु-टू’ आणि इतर बहुपक्षीय संघटनांच्या समवेतची भागीदारी आणखी मजबूत करत आहे. ‘एक विश्व, एक कुटुंब, एक भविष्य’ हा सिद्धांत जगाच्या कल्याणासाठी अनिवार्यपणे आवश्यक आहे.

मित्रांनो,

आज, वेगाने बदलत असलेल्या जागतिक व्यवस्थेमध्ये भारत, ‘जगन्मित्रा’ची भूमिका स्वीकारून पुढे जात आहे. आज भारताने जगाला हा विश्वास दिला आहे की आपण सामायिक लक्ष्य साध्य करू शकतो, आपली उद्दिष्टे साध्य करू शकतो. जगाच्या कल्याणाप्रती भारताची कटिबद्धता, भारताची निष्ठा, भारताचे प्रयत्न, आणि भारताचे परिश्रम आजच्या जगाला आणखी सुरक्षित आणि समृद्ध करत आहेत. स्थैर्यासाठीचा महत्त्वाचा स्तंभ म्हणून, विश्वासार्ह मित्र म्हणून, लोक-केंद्री विकासावर विश्वास ठेवणारा भागीदार म्हणून,जागतिक हितावर विश्वास असणारा आवाज म्हणून, जगाच्या दक्षिणेकडील देशांचा आवाज म्हणून, जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाची प्रेरक शक्ती म्हणून, उपायांचा शोध घेण्यासाठीचे तंत्रज्ञान केंद्र म्हणून, प्रतिभावंत युवकांचे पॉवरहाऊस म्हणून आणि परिणाम साध्य करणारी लोकशाही म्हणून, संपूर्ण जग आज भारताकडे आशेने पाहत आहे.

मित्रांनो,

भारताच्या 1.4 अब्ज लोकांचे प्राधान्यक्रम आणि आकांक्षा, मानव-केंद्री विकासावर असलेला त्यांचा विश्वास, समावेशकता आणि समानता याविषयी आपली कटिबद्धता, विश्व समृद्धी आणि जगाच्या विकासासाठीचा मोठा आधार आहे.

आज भारत, जगातील पाचव्या क्रमांकांची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. 10 वर्षांपूर्वी, भारत या क्रमवारीत 11 व्या स्थानी होता. आज जगातल्या प्रत्येक प्रमुख मानांकन संस्थेने अंदाज वर्तवला आहे, की भारत पुढच्या काही वर्षात, जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनेल. जगातील जे लोक याचे विश्लेषण करत आहेत, त्यांनी करत राहावे. मात्र, मी हमी घेतो की हे नक्की होईल. अशा काळात, जेव्हा जग अनेक प्रकारच्या अनिश्चिततांचा सामना करत आहे, अशा वेळी, भारत, जगासाठी एक आशेचा नवा किरण म्हणून उदयाला आला आहे. भारताचा प्राधान्यक्रम अगदी स्पष्ट आहे. आज भारताचे प्राधान्य आहे –टिकणारे उद्योग, पायाभूत सुविधा आणि उत्पादनक्षेत्र. आज भारताचे प्राधान्य आहे- नव्या युगातील कौशल्ये, भविष्यातील तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि नवोन्मेष. आज भारताचे प्राधान्य आहे, हरित हायड्रोजन, अक्षय ऊर्जा, सेमी कंडक्टर्स यांची पूर्ण व्यवस्था उभी करणे. आणि याची झलक आपण व्हायब्रंट गुजरात जागतिक व्यापार शो मधेही बघता येईल. माझा आपल्याला आग्रह आहे, की हा ट्रेड शो आपण जरूर बघावा, गुजरातमधल्या शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देखील त्याला नक्की भेट द्यावी. काल मी या व्यापार प्रदर्शनात न्यूसी आणि रामोस-होर्टा यांच्यासोबत बराच वेळ घालवला. या व्यापार प्रदर्शनात, कंपन्यांनी जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या उत्पादनांचे दिग्दर्शन केले आहे. ई-मोबिलिटी, स्टार्ट-अप्स, नील अर्थव्यवस्था, हरित ऊर्जा आणि स्मार्ट पायाभूत सुविधा या क्षेत्रांवर प्रदर्शनात भर देण्यात आला आहे. आणि ही सर्व क्षेत्रे गुंतवणुकीच्या सतत नवीन संधी निर्माण करत आहेत.

मित्रांनो,

आपल्या सर्वांना, जागतिक परिस्थितीची स्पष्ट कल्पना आहे. अशा परिस्थितीत, आज जर भारताच्या अर्थव्यस्थेमध्ये आपल्याला लवचिकता दिसत आहे, तर आज भारताच्या विकासात इतकी गती दिसते आहे, तर त्यामागे महत्वाचे कारण आहे. ते कारण म्हणजे, गेल्या 10 वर्षात, संरचनात्मक सुधारणांवर आम्ही दिलेला भर ! या सुधारणांनी भारताच्या अर्थव्यवस्थेची क्षमता, कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता वाढवण्याचे महत्वाचे काम केले आहे. पुनर्भांडवलीकरण आणि नादारी आणि दिवाळखोरी कायदा, यांनी भारताच्या बँकिंग व्यवस्थेला जगातील सर्वात मजबूत अशा बँकिंग व्यवस्थेपैकी एक बनवले आहे.

उद्योग पूरक वातावरणावर भर देत आम्ही 40 हजार पेक्षा अधिक अनुपालने रद्द केली आहेत. वस्तू आणि सेवा कर लागू करत भारतात कराचे अनावश्यक जाळे संपवण्यात आले आहे. भारतात आम्ही जागतिक पुरवठा साखळी च्या वैविध्यीकरणासाठी अधिक पोषक वातावरण बनवले आहे. अलीकडेच आम्ही तीन मुक्त व्यापार करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत, जेणेकरुन जागतिक व्यावसायिकांसाठी भारत एक आकर्षक स्थळ ठरेल. यांपैकी एक मुक्त व्यापार करार तर यू ए ई सोबतच झाला आहे. आम्ही अनेक क्षेत्रे ऑटोमॅटिक मार्गाने थेट परदेशी गुंतवणुकीसाठी खुली केली आहे. आज भारत पायाभूत सुविधांवर विक्रमी गुंतवणूक करत आहे. गेल्या 10 वर्षात भारताचा भांडवली निर्देशांक पाच पट अधिक झाला आहे.

मित्रांनो,

भारत आज हरित ऊर्जा आणि पर्यायी ऊर्जा स्रोत यावर देखील अभूतपूर्व वेगाने काम करत आहे. भारताची अक्षय ऊर्जा क्षमता 3 पट वाढली आहे आणि सौर ऊर्जा क्षमतेत 20 पट वाढ झाली आहे. डिजिटल इंडिया मोहिमेने आयुष्य आणि व्यवसाय दोन्हीमध्ये परिवर्तन घडवून आणले आहे. 10 वर्षांत स्वस्त फोन, स्वस्त डाटा यामुळे डिजिटल समवेशनात नवी क्रांति आली आहे. प्रत्येक गाव ऑप्टिकल फायबरने जोडण्याची मोहीम, 5G चा वेगाने विस्तार सर्वसामान्य भारतीयांचे आयुष्य बदलत आहे. आज आम्ही जगातील तिसरी मोठी स्टार्टअप व्यवस्था आहोत. 10 वर्षांपूर्वी भारतात साधारणपणे 100 स्टार्टअप होते. आज भारतात 1 लाख 15 हजार नोंदणीकृत स्टार्टअप आहेत. भारताच्या एकूण निर्यातीत देखील विक्रमी वाढ झाली आहे.

मित्रांनो,

भारतात हे जे परिवर्तन होत आहे, यामुळे भारतीय लोकांची आयुष्यातील सुलभता देखील वाढत आहे, त्यांचे सक्षमीकरण होत आहे. आमच्या सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात 13 कोटींपेक्षा जास्त लोक दरिद्र रेषेच्या बाहेर आले आहेत. भारतात माध्यम वर्गाचे सरासरी उत्पन्न सातत्याने वाढत आहे. भारतात महिला कार्यशक्तिच्या सहभागात विक्रमी वाढ झाली आहे. भारताच्या भविष्यासाठी हे खूप चांगले संकेत आहेत. आणि म्हणूनच, मी आपणा सर्वांना आवाहन करेन की भारताच्या या विकास यात्रेत सहभागी व्हा, आमच्या सोबत चला.

मित्रांनो,

लॉजिस्टिक संबंधी वाहतुकीत सुलभता यावी यासाठी देखील भारतात आधुनिक धोरणांवर काम होत आहे. 10 वर्षांपूर्वी भारतात 74 विमानतळ होते. आज भारतात 149 विमानतळ आहेत. भारताच्या राष्ट्रीय महामार्गांचे जाळे गेल्या 10 वर्षांत जवळजवळ दुप्पट झाले आहे. 10 वर्षांत आमचे मेट्रोचे जाळे 3 पटींपेक्षा जास्त वाढले आहे. गुजरात असो, महाराष्ट्र असो अथवा आमची पूर्व किनारपट्टी असो, हे आज समर्पित मालवाहू मार्गिकेने जोडले जात आहेत. भारतात आज अनेक राष्ट्रीय जलमार्गांवर एकाचवेळी काम सुरू आहे. भारतीय बंदरांवर माल उतरविणे आणि चढविणे याचा वेळ खूपच स्पर्धात्मक झाला आहे. G20 दरम्यान ज्या भारत – मध्य आशिया – पूर्व युरोप आर्थिक मार्गीकेची घोषणा झाली आहे, ती देखील तुम्हा सर्व गुंतवणूकदारांसाठी व्यवसायाची एक फार मोठी संधी आहे.  

मित्रांनो,

भारताच्या कानाकोपऱ्यात तुमच्यासाठी नव्या संधी आहेत. व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद यासाठी प्रवेशद्वाराप्रमाणे आहे – भविष्याचे प्रवेशद्वार आणि आपण केवळ भारतातच गुंतवणूक करत नाही, तर तरुण निर्माते आणि वापरकर्ते यांच्या नव्या पिढीला आकार देत आहात. भारताच्या आकांक्षानी सळसळणाऱ्या नव्या पिढीशी आपल्या भागीदारीचे अपेक्षित परिणाम यातून दिसू शकतात, ज्याचा आपण विचारही केला नसेल. आणि याच विश्वासासोबत, पुन्हा एकदा आपणा सर्वांचे व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मनापासून आभार मानतो. आणि मी आपल्याला आश्वस्त करतो आपल्या समोर ‘हा मोदीचा संकल्प’ आहे. आपली स्वप्न जितकी मोठी असतील माझा संकल्प देखील तितकाच मोठा असेल. चला, स्वप्न बघण्याच्या अनेक संधी आहेत, आणि संकल्प पूर्ण करण्याचे सामर्थ्य देखील आहे.

अनेक – अनेक धन्यवाद!

S.Tupe/S.Chitnis/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai