पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातमधल्या नवसारी जिल्ह्यात दांडी येथे उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकाचे लोकार्पण झाले. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महात्मा गांधी आणि त्यांच्या 80 सत्याग्रहींच्या पुतळ्यांचे अनावरण देखील झाले. 1930 साली महात्मा गांधींनी ब्रिटीश सरकारविरोधात केलेल्या ऐतिहासिक दांडी यात्रेची स्मृती म्हणून हे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकासाठी लागणारी वीज सौर ऊर्जेतून वापरली जाणार आहे.
यावेळी बोलतांना हे स्मारक साकारण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. या स्मारकामुळे देशासाठी बलिदान देणाऱ्या नागरिकांचे स्मरण आपल्याला कायम होत राहील असे ते म्हणाले. महात्मा गांधी यांचा स्वदेशीचा आग्रह, स्वच्छाग्रह आणि सत्याग्रह या तीन मूल्यांचे या स्मारकातून स्मरण होईल असे ते म्हणाले.
महात्मा गांधींचा वारसा पुढे नेण्यासाठी सरकारने खादीशी संबंधित दोन हजार संस्थांचे आधुनिकीकरण केले आहे. ज्यातून लाखो कारागीर आणि विणकरांना लाभ मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. खादी हे महिला सक्षमीकरणाचे प्रतिक आहे असे त्यांनी सांगितले. हातमागाने देशातली गरीबी दूर करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे असे सांगत 7 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी हातमाग दिन म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली.
महात्मा गांधी यांनी आयुष्यात स्वच्छतेला अत्यंत महत्व दिले होते. त्यांच्या प्रेरणेमुळेच स्वच्छ भारत अभियान यशस्वी होत आहे असे ते म्हणाले.
गावांमध्ये मूलभूत सेवा सुविधा आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून स्वयंपाकाच्या गॅसपासून वीज, आरोग्य सुविधा ते वित्तीय सेवा ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी काम सुरु आहे. ‘ग्रामोदयातून भारतोदय’ ही संकल्पना साकारण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar