Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरातच्या कच्छ मधील गुरुद्वारा लखपत साहिब येथे गुरुपूरब सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण

गुजरातच्या  कच्छ मधील गुरुद्वारा लखपत साहिब येथे गुरुपूरब सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण


नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2021

 

वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतेह !!!

गुरुपूरब या पवित्र कार्यक्रमात आपल्याबरोबर सहभागी झालेले गुजरातचे मुख्यमंत्री  भूपेन्द्र भाई पटेल जी, गुजरात विधानसभेच्या अध्यक्ष  नीमा आचार्य जी, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे  अध्यक्ष  इकबाल सिंह जी,खासदार  विनोद भाई चावड़ा जी, लखपत गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  राजूभाई,  जगतार सिंह गिल जी, तिथे उपस्थित अन्य सर्व मान्यवर , सर्व लोकप्रतिनिधि गण, सर्व  श्रद्धाळू मित्रांनो  ! तुम्हा सर्वांना गुरुपूरबच्या हार्दिक शुभेच्छा .

आज या पवित्र दिवशी मला  लखपत साहिब यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली हे माझे सौभाग्य आहे. या कृपेबद्दल  गुरु नानक देव जी आणि सर्व गुरूंच्या चरणी मी वंदन करतो.

मित्रांनो ,

गुरुद्वारा लखपत साहिब, काळाच्या प्रत्येक क्षणाचे साक्षीदार राहिले आहेत. आज जेव्हा मी या  पवित्र स्थानाशी जोडला जात आहे तेव्हा मला आठवतंय की भूतकाळात लखपत साहिब  कोणकोणत्या झंझावातांना सामोरे गेले आहेत. एके काळी हे ठिकाण इतर देशांमध्ये जाण्यासाठी , व्यापारासाठी  एक प्रमुख केंद्र होते. म्हणूनच तर  गुरु नानक देव जी यांचा याठिकाणी  पदस्पर्श झाला. चौथ्या उदासी दरम्यान  गुरु नानक देव जी काही दिवस इथे वास्तव्याला होते. मात्र काळाच्या ओघात हे  शहर उजाड , निर्जन झाले. समुद्र या शहराला सोडून गेला. सिंधू नदीने देखील आपला प्रवाह बदलला. 1998 च्या चक्रीवादळात या ठिकाणाचे गुरुद्वारा लखपत साहिबचे खूप नुकसान झाले. आणि  2001 चा भूकंप कोण विसरेल ? त्यात  गुरुद्वारा साहिबच्या  200 वर्षे जुन्या इमारतीचे मोठे नुकसान झाले होते. मात्र तरीही , आज आपले गुरुद्वारा लखपत साहिब तशाच गौरवाने उभे आहे.

माझ्या तर अनेक  अनमोल आठवणी या  गुरुद्वाराशी जोडलेल्या आहेत.   2001 च्या भूकंपानंतर मला गुरुकृपेने या  पवित्र स्थानाची  सेवा करण्याचे सौभाग्य लाभले होते. मला आठवतंय, तेव्हा देशाच्या विविध भागांमधून आलेल्या शिल्पकार , कारागिरांनी या स्थानाचा बहुमूल्य  गौरव कायम राखला. प्राचीन लेखन शैलीद्वारे  इथल्या भिंतीवर  गुरूवाणी कोरण्यात आली. या प्रकल्पाला तेव्हा  यूनेस्कोने गौरवले देखील होते.

गुजरातमधून इथे  दिल्लीला आल्यानंतर देखील मला नेहमीच आपल्या गुरूंची सेवा करण्याची संधी मिळत आली आहे.  2016-17, गुरू गोविन्द सिंह जी यांच्या प्रकाश उत्सवाच्या 350 व्या वर्षाचे  पुण्य वर्ष होते. आपण देशात-परदेशात श्रद्धेने हा दिवस साजरा केला. 2019 मध्ये गुरू नानकदेव जी यांच्या प्रकाश पर्वला 550 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त  भारत सरकार उत्साहाने त्याच्या आयोजनात सहभागी झाले.  गुरु नानकदेवजी यांचा  संदेश जगभरात  नव्या उर्जेसह पोहचावा यासाठी प्रत्येक पातळीवर प्रयत्न केले गेले. अनेक दशके ज्या  करतारपुर साहिब मार्गिकेची  प्रतीक्षा होती , 2019 मध्ये आमच्या सरकारनेच त्याचे बांधकाम पूर्ण केले.  आणि आता 2021 मध्ये आपण  गुरू तेग बहादुर जी यांच्या प्रकाश उत्सवाची  400 वर्षे साजरी करत आहोत.

तुम्ही नक्की पाहिले असेल,आता अलिकडेच आपण अफगाणिस्तानमधून   गुरु ग्रंथ साहिबच्या प्रती सन्मानाने भारतात आणण्यात यशस्वी झालो.  गुरु कृपेचा यापेक्षा मोठा अनुभव कुणासाठी काय असू शकतो ? आता काही महिन्यांपूर्वी, जेव्हा मी  अमेरिकेला गेलो होतो,  तेव्हा तिथे अमेरिकेने भारताला  150 पेक्षा जास्त,  जो  भारताची ऐतिहासिक ठेवा होता, जो कुणीतरी चोरून नेला होता , त्या  150 हून अधिक  ऐतिहासिक वस्तू परत आणण्यात आपल्याला यश आले.  यापैकी एक पेशकब्ज म्हणजे  छोटी तलवार देखील आहे, ज्यावर  फारसी भाषेत गुरु हरगोबिंद सिंह जी यांचे नाव लिहिले आहे. म्हणजेच हे परत आणण्याचे  सौभाग्य देखील आमच्याच सरकारला लाभले आहे.

मला आठवतंय , जामनगर इथे , दोन वर्षांपूर्वी जे 700 खाटांचे आधुनिक रुग्णालय बांधण्यात आले आहे , ते देखील गुरू गोविंद सिंह जी यांच्या नावे आहे.  आणि आताच आपले  मुख्‍यमंत्री भूपेन्‍द्र भाई त्याचे विस्तृत वर्णन देखील करत होते.  गुजरातसाठी ही नेहमीच गौरवाची बाब राहिली आहे की   खालसा पंथाच्या स्थापनेत महत्वपूर्ण  भूमिका पार  पाडणाऱ्या पंज प्यारोंपैकी  चौथे गुरसिख, भाई मोकहम सिंह जी गुजरातचेच होते.   देवभूमि द्वारका इथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरुद्वारा  बेट द्वारका भाई मोहकम सिंघ ची स्थापना करण्यात आली आहे. मला सांगण्यात आले आहे की  गुजरात सरकार, लखपत साहिब गुरुद्वारा आणि  गुरुद्वारा बेट द्वारकाच्या विकासकामांच्या   वाढीमध्ये  पूर्ण सहकार्य करत आहे ,  आर्थिक सहकार्य देखील करत आहे.

मित्रांनो ,

गुरु नानक देव जी यांनी म्हटले आहे ,

गुर परसादि रतनु हरि लाभै,

मिटे अगिआन होई उजिआरा॥

म्हणजेच , गुरूच्या प्रसादामुळेच हरि-लाभ होतो , म्हणजे ईश्वराची  प्राप्ति होते आणि अहमचा नाश होऊन प्रकाश पसरतो. आपल्या शीख गुरूंनी  भारतीय समाजाला नेहमीच  प्रकाशमय करण्याचे काम केले आहे . तुम्ही कल्पना करा, जेव्हा आपल्या देशात गुरु नानक देव जी यांनी अवतार घेतला होता , तमाम विडंबना आणि रूढी परंपरा यांचा सामना करताना समाजाची त्याकाळी काय  स्थिति होती ? बाहेरून होणारे हल्ले आणि अत्याचार त्यावेळी भारताचे मनोबल तोडत होते.  जो भारत जगाला भौतिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन करत होता तो स्वतः संकटात होता. जेव्हा आपण ही परिस्थिती पाहतो, तेव्हा आपण विचार करतो की त्या काळात जर  गुरुनानक देव जी यांनी आपला  प्रकाश पसरवला नसता तर ? गुरु नानक देव जी आणि त्यांच्या नंतर निरनिराळ्या गुरूंनी भारताची   चेतना तर  प्रज्वलित राखलीच , भारतालाही  सुरक्षित ठेवण्याचा मार्ग बनवला. तुम्ही पहा, जेव्हा देश जात-पात आणि मत-मतांतराच्या आघाडीवर कमकुवत पडत होता,  तेव्हा  गुरु नानक देव जी यांनी म्हटले होते –

”जाणहु जोति न पूछहु जाती, आगे जात न हे”।

म्हणजे, सर्वांमध्ये  भगवानाचा प्रकाश पहा, तो ओळखा. कुणाचीही जात विचारू नका. जातीमुळे कुणाचीही ओळख निर्माण होत नाही. आयुष्यानंतरच्या प्रवासात कुणाचीही कुठलीही जात नसते. त्याचप्रमाणे गुरु अर्जुनदेव जी यांनी देशातील सर्व संतांचे सुविचार एकत्र गुंफले आणि संपूर्ण देशाला  एकतेच्या सूत्राने जोडले. गुरु हरकिशन जी यांनी आस्थेला भारताच्या ओळखीशी जोडले. दिल्लीतील  गुरुद्वारा बंगला साहिब येथे त्यांनी  दुःखी लोकांचे  रोग-निवारण करून मानवतेचा जो मार्ग दाखवला होता, तो आजही प्रत्येक शीख आणि भारतीय बांधवांसाठी प्रेरणा आहे. कोरोनाच्या कठीण काळात आपल्या  गुरुद्वारानी ज्याप्रकारे सेवेची जबाबदारी उचलली , ती गुरु साहिब यांची  कृपा आणि त्यांच्या आदर्शांचेच  प्रतीक आहे.

म्हणजेच, एक प्रकारे प्रत्येक गुरूंनी आपापल्या काळात देशाच्या गरजांनुसार  नेतृत्व दिले, आपल्या पिढयांना  मार्ग दाखवला.

मित्रांनो ,

आपल्या गुरूंचे योगदान केवळ  समाज आणि  आध्यात्मापर्यंतच सीमित नाही , तर आपले राष्ट्र, राष्ट्राचे  चिंतन, राष्ट्राची  आस्था आणि  अखंडता आज सुरक्षित आहे , तिच्या मुळाशी शीख गुरूंची महान तपस्या आहे. गुरु नानकदेव जी यांच्या काळापासूनच आपण पाहूया , जेव्हा  विदेशी आक्रमणकर्ते  तलवारीच्या धाकावर भारताची  सत्ता आणि संपत्ती  ताब्यात घेण्याचे प्रयत्न करत होते, तेव्हा  गुरु नानकदेव जी म्हणाले होते –

पाप की जंझ लै काबलहु धाइआ, जोरी मंगै दानु वे लालो।

म्हणजे , पाप आणि जुलुमाची तलवार घेऊन बाबर काबुलमधून आला आहे आणि  जबरदस्तीने भारताच्या सत्तेचे कन्यादान मागत आहे.

गुरू नानक देव जी यांना ही दृष्टी होती, स्पष्टता होती,

त्यांनी असे म्हटले होते, खुरासान खसमाना कीआ हिंदुसतान डराइआ ॥

म्हणजे खुरासान वर ताबा मिळवल्यानंतर बाबर हिंदुस्तानाला भीती दाखवत आहे.  यापुढे ते हेही म्हणाले- एती मार पई करलाणे तैं की दरदु न आइआ।

म्हणजे त्या वेळी इतके अत्याचार होत होते, लोकांमध्ये इतका आक्रोश होता. म्हणूनच गुरुनानक देव जी यांच्यानंतर आलेल्या शीख गुरुनी, देश आणि धर्मासाठी प्राणाची बाजी लावायला मागे-पुढे पाहिले नाही. देश सध्या गुरु तेगबहादुर जी यांचा  400 वा प्रकाश उत्सव साजरा करत आहे.  त्यांचे संपूर्ण जीवन  ‘राष्ट्र सर्वप्रथम’  या संकल्पाचे उदाहरण आहे. गुरु तेग बहादुर जी मानवतेप्रती आपल्या विचारावर ठाम राहिले त्यातून आपल्याला भारताच्या आत्म्याचे दर्शन घडते. ज्याप्रमाणे देशाने त्यांना ‘हिन्द की चादर’ ही उपाधी दिली,त्यातून आपल्याला शीख परंपरेविषयी भारतवासियांच्या आत्मीयतेचे दर्शन घडते.

औरंगजेबा विरोधात गुरु तेग बहादूर यांचा पराक्रम आणि त्यांचे बलिदान आपल्याला शिकवण देते की दहशत आणि धार्मिक कट्टरतेविरोधात देश कसा लढतो.

याच प्रमाणे, दहावे गुरु, गुरुगोबिन्द सिंह साहिब यांचे जीवनही पदोपदी तप आणि बलिदान यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. राष्ट्रासाठी, राष्ट्राच्या मूळ विचारधारेसाठी दशम गुरुंनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. त्यांचे दोन पुत्र   जोराबर सिंह आणि  फतेह सिंह यांना, जुलमाने भिंतीत जिवंत गाडण्यात आले. मात्र गुरु गोबिन्द सिंह जी यांनी  देशाची आन-बान आणि  शान कायम राखली.  चारही  साहिबजादा यांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून आपण आजही  शहीदी सप्ताह पाळतो आणि तो आताही सुरु आहे.

मित्रहो,

दशम गुरु यांच्या नंतरही त्याग आणि बलिदान यांचे सत्र थांबले नाही. बीर बाबा बन्दा सिंह बहादुर यांनी आपल्या काळातल्या सर्वात बलवान राजवटीला  सळो की पळो करून सोडले होते. शीख मिसलांनी नादिरशाह आणि अहमदशाह अब्दालीचे आक्रमण रोखण्यासाठी हजारोच्या संख्येने  बलिदान दिले. महाराज रणजीत सिंह यांनी पंजाब पासून  बनारसपर्यंत ज्या प्रकारे देशाचे सामर्थ्य आणि वारसा कायम राखला त्याला आजही इतिहासात स्थान आहे.इंग्रजांच्या काळात आपल्या शीख बंधू-भगिनींनी ज्या शौर्याने स्वातंत्र्यासाठी लढा दिला, आपला स्वातंत्र्य लढा, जालियनवाला बाग इथली ती भूमी, आजही त्या बलिदानाची साक्ष देत आहे.   ही अशी परंपरा आहे ज्यामध्ये शतकांपूर्वी आपल्या गुरुंनी  चैतन्य फुलवले आणि आजही ते तितकेच जागृत आहे.

मित्रहो,

हा काळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा काळ आहे. आज देश आपल्या स्वातंत्र्य लढ्यातून, आपल्या भूत काळातून प्रेरणा घेत असताना आपल्या गुरूंचे आदर्शही आपल्यासाठी अधिकच महत्वाचे ठरतात. आज देश जो प्रयत्न करत आहे, जो संकल्प घेत आहे, त्यामध्ये तीच स्वप्ने आहेत जी पूर्ण होण्याची देशाची शतकांपासूनची इच्छा आहे. ज्याप्रमाणे गुरु नानक देव जी यांनी आपल्याला मानवतेची शिकवण दिली, त्याच मार्गावरून वाटचाल करत आज देश ‘सबका साथ, सबका विकास, आणि  सबका विश्वास’ हा मंत्र घेऊन आगेकूच करत आहे.  या मंत्रा बरोबरच देश  आज  ‘सबका प्रयास’ हे आपले  सामर्थ्य म्हणून निर्माण करत आहे. काश्मीर ते  कन्याकुमारी पर्यंत,  कच्छ पासून  कोहिमा पर्यंत संपूर्ण  देश एकजुटीने स्वप्ने पाहत आहे. त्यांची पूर्तता होण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करत आहे. आज देशाचा मंत्र आहे- ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’

आज देशाचे उद्दिष्ट आहे – नव्या सामर्थ्यवान भारताचा नव्याने उदय.

आज देशाचे धोरण आहे – प्रत्येक गरीबाची सेवा, प्रत्येक वंचिताला प्राधान्य.आपण पहा,कोरोनाच्या इतक्या खडतर काळातही कोणताही गरीब उपाशी राहू नये असा  देशाचे प्रयत्न होता. आज देशाच्या प्रत्येक प्रयत्नाचा,प्रत्येक योजनेचा देशाच्या प्रत्येक भागाला समान लाभ मिळत आहे. या प्रयत्नांचे फलित भारताला मजबूत बनवेल, गुरु नानकदेव यांच्या शिकवणीचे  सार्थक करेल.म्हणूनच आपण सर्वांची जबाबदारी आहे, की अशा महत्वाच्या काळात,  कोणी आपल्या स्वप्नांना, देशाच्या एकजुटीला धक्का पोहोचवू नये.आपल्या गुरुंनी  ज्या स्वप्नासाठी आयुष्य वेचले,त्यांच्या पूर्ततेसाठी आपण सर्वांनी एकजुटीने वाटचाल करूया, आपल्यामधली एकजूट आवश्यक आहे. आपले गुरु ज्या धोक्यांबाबत देशाला सतर्क करत होते ते आजही तसेच कायम आहेत.म्हणूनच आपल्याला सतर्कही राहायचे आहे आणि देशाचे संरक्षणही करायचे आहे. गुरु नानकदेव जी यांच्या आशीर्वादाने आपण हे संकल्प नक्कीच पूर्ण करू आणि देशाला नव्या शिखरावर नेऊ याचा मला विश्वास आहे. लखपत साहिब यांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना मी एक विनंती करू इच्छितो, सध्या कच्छमध्ये  रण-उत्सव सुरु आहे. आपण सर्वांनी वेळ काढून रण-उत्सवाला आवर्जून भेट द्या.

મુંજા કચ્છી ભા ભેણ કીં અયો ? હેવર ત સી કચ્છમે દિલ્હી, પંજાબ જેડો પોંધો હુધો ન ? ખાસો ખાસો સી મે આંજો અને આજે કુંટુંબજો ખ્યાલ રખજા ભલે પણ કચ્છ અને કચ્છી માડુ મુંજે ધિલ મેં વસેતા તડે આઉ કેડા પણ વાં- જેડા પણ વેના કચ્છકે જાધ કરે વગર રહીં નતો સગાજે પણ ઈ ત આજોં પ્રેમ આય ખાસો ખાસો જડે પણ આંઉ કચ્છમેં અચીધોસ આ મણી કે મેલધોસ આ મેડી કે મુંજા જેજા જેજા રામ રામ….ધ્યાન રખીજા.

मित्रहो,रण-उत्सव दरम्यान गेल्या एक-दीड महिन्यात एक लाखाहून जास्त पर्यटक कच्छ मधली मनोहर दृश्ये,मोकळे आकाश यांचा आनंद घेण्यासाठी इथे दाखल झाले आहेत. जेव्हा इच्छाशक्ती असते,लोकांच्या प्रयत्नांची जोड असते तेव्हा भूमीचा कायापालट कसा होऊ शकतो याची प्रचीती कच्छ मधल्या माझ्या कष्टाळू जनतेने दिली आहे. एक काळ असा होता, जेव्हा कच्छ मधले लोक चरितार्थासाठी इतरत्र जात असत, आज जगभरातले लोक कच्छ कडे आकर्षित होत आहेत. मागच्या काही काळात युनेस्कोने धौलावीराला जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केले आहे.यामुळे इथे पर्यटनाला अधिक चालना मिळेल. गुजरात सरकारने आता तिथे एक भव्य टेंट सिटी निर्माण केली आहे. यामुळे पर्यटकांना अधिक सुविधा प्राप्त होतील. आता धोरड़ो इथून थेट , रणमध्ये धौलावीरा इथे जाण्यासाठी नवा रस्ता बांधण्यासाठी वेगाने काम सुरु आहे. येत्या काळात भुज आणि  पश्चिम कच्छ मधून  खड़ीर आणि धौलावीरा विस्तार यामुळे येण्या-जाण्याची सोय होणार आहे. कच्छ मधल्या  लोकांना याचा लाभ होईल, उद्योजकांना होईल आणि पर्यटकांनाही होईल. खावड़ा इथे नविकरणीय उर्जा पार्कची वेगाने निर्मिती होत आहे. यापूर्वी कच्छ आणि भुज  इथून धौलावीराला जाण्यासाठी, भचाऊ-रापर  मार्गे जावे लागत असे. आता थेट खावड़ा  इथून धौलावीराला जाता येईल.पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी  नारायण सरोवर, कोटेश्वर,  हाजी पीर, धोरड़ो टेंट सिटी,

आणि धौलावीरा, हे नवे मार्ग झाल्याने या सर्व ठिकाणी ये-जा सुलभ होईल.

मित्रहो,

आपणा सर्वांसाठी आदरणीय असलेले अटल जी यांची आज जयंतीही आहे. कच्छ विषयी त्यांना विशेष स्नेह वाटत असे. भुकंपानंतर इथे झालेल्या विकास कार्यात अटलजी यांच्या  सरकारने गुजरातला सर्वतोपरी सहकार्य केले.आज कच्छ ज्या प्रगतीच्या ज्या मार्गावर आहे ते पाहून अटलजी जिथे असतील तिथे त्यांना समाधान होईल, आनंद होईल. आपल्या सर्व मान्यवरांचे, आदरणीय असलेल्या सर्वांचे आशीर्वाद कच्छ वर असेच सदैव राहतील याचा मला विश्वास आहे. आपणा सर्वाना पुन्हा एकदा गुरुपूरबच्या हार्दिक शुभेच्छा, खूप-खूप शुभेच्छा !

खूप-खूप धन्यवाद !

* * *

Jaydevi PS/S.Patil/S.Kane/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com