Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गांधीनगर इथे महिला सक्षमीकरण विषयक जी-20 मंत्रिस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून दिलेला संदेश

गांधीनगर इथे महिला सक्षमीकरण विषयक जी-20 मंत्रिस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून दिलेला संदेश


मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, नमस्कार!

मी आपल्या सर्वांचे गांधीनगरमध्ये स्वागत करतो. या शहराचे नाव महात्मा गांधी यांच्या नावावर ठेवले गेले आहे आणि आज त्याचा स्थापना दिवस देखील आहे. मला अत्यंत आनंद आहे की आपल्याला अहमदाबादमध्ये गांधी आश्रमाचा दौरा करण्याची संधी मिळाली आहे. आज संपूर्ण जग, हवामान बदल, जागतिक तापमानवाढ अशा समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना शोधण्याच्या प्रासंगिकतेविषयी चर्चा करत आहे. गांधी आश्रमात आपण गांधीजी यांच्या जीवनशैलीतील साधेपणा आणि स्थैर्य, आत्मनिर्भरता आणि समानता अशा सर्व बाबतीतल्या त्यांच्या द्रष्टया विचारांचे साक्षीदार बनणार आहेत. मला विश्वास आहे, की आपल्याला हे प्रेरणादायक ठरेल. दांडी कुटीर संग्रहालयात देखील आपल्याला असाच अनुभव मिळेल. ही संधी आपण आजिबात सोडता कामा नये. इथे एका गोष्टीचा उल्लेख करणे औचित्यपूर्ण ठरेल की, गांधीजींचा प्रसिद्ध चरखा, गंगाबेन नावाच्या एका महिलेकडे गावात मिळाला होता. आपल्याला माहितीच आहे, की त्यानंतर गांधीजी नेहमीच खादीचेच वस्त्र वापरत असत. ही खादी आत्मनिर्भरता आणि स्थैर्य यांचे प्रतीक बनली होती. 

मित्रांनो,

जेव्हा महिला समृद्ध होतात, तेव्हा जग समृद्ध होते. त्यांचे आर्थिक सक्षमीकरण विकासाला बळ देणारे असते. त्यांच्याकडे शिक्षण पोचले की त्यातून जागतिक प्रगतीला प्रेरणा मिळते. महिलांना सक्षम बनवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा दृष्टिकोन हा आहे. भारत या दिशेने पावले टाकत आहे.

मित्रांनो,

भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू स्वतःदेखील, देशासाठी एक आदर्श, प्रेरणास्थान आहेत. त्या एका सर्वसामान्य आदिवासी पार्श्वभूमीतून येतात, मात्र आता त्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे नेतृत्व करत आहेत. आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या संरक्षण दलाच्या प्रमुख म्हणून आपले योगदान देत आहेत. लोकशाहीच्या या जननी मध्ये ‘मतदानाचा अधिकार’ भारतीय संविधानाद्वारे सुरुवातीपासूनच महिलांसह सर्व नागरिकांना समान रूपाने प्रदान करण्यात आला होता. निवडणुका लढण्याचा अधिकार देखील, सर्वांना समान आधारावर देण्यात आला आहे. निवडून आलेल्या महिला प्रतिनिधी, आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक परिवर्तनातल्या प्रमुख प्रतिनिधी झाल्या आहेत. भारतात ग्रामीण स्थानिक संस्थांमधे 1.4 दशलक्ष लोकसंख्येसह 46 टक्के निवडून आलेल्या प्रतिनिधी आहेत. स्वयं सहाय्यता समूह- बचत गटातली महिलांच्या संघटना देखील परिवर्तनासाठी प्रबळ शक्ती ठरले आहेत. महामारीच्या काळात, या स्वयं सहाय्यता गटाच्या महिला आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी आमच्या समुदायांसाठी आधारस्तंभ ठरल्या होत्या. त्यांनी मास्क आणि सॅनिटायझरचे उत्पादन केले आणि त्यासोबतच संक्रमणापासून बचाव करण्यासाठी जनजागृती केली. भारतात 80 टक्क्यांपेक्षा अधिक परिचारिका आणि दाई देखील महिलाच आहेत. कोविड महामारीच्या काळात या महिला कोविड योद्ध्यांच्या संरक्षण फळीत आघाडीवर होत्या आणि त्यांच्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. 

मित्रांनो,

भारतात, महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला आमच्या सरकारने कायमच प्राधान्य दिले आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत, सुमारे 70 टक्के कर्ज महिलांना देण्यात आले आहे. ही योजना, दहा लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी  सुक्ष्म उद्योगातील कंपन्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्टँड अप इंडिया अंतर्गत, 80 टक्के लाभार्थी महिला आहेत, ज्या ग्रीन फील्ड प्रकल्पांसाठी बँक कर्ज मिळवत आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत, ग्रामीण महिलांना स्वयंपाकाच्या गॅसच्या सुमारे 100 दशलक्ष जोडण्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अन्न शिजवण्यासाठी स्वच्छ इंधनाची व्यवस्था, पर्यावरणाला मदत करणारी आणि महिलांच्या आरोग्यात सुधारणा करणारी आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधे 2014 नंतर तंत्रज्ञान विषयक शिक्षणात, महिलांची संख्या दुप्पट झाली आहे.

एवढेच नाही, भारतात एसटीईएम म्हणजेच, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित विषयांच्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे 43 टक्के विद्यार्थिनी आहेत. भारतात सुमारे एक चतुर्थांश अंतराळ विज्ञानात महिला आहेत. चांद्रयान, गगनयान आणि मिशन मंगळ अशा आपल्या प्रमुख कार्यक्रमांच्या यशस्वितेमागे महिला वैज्ञानिकांची प्रतिभा आणि कठोर परिश्रमांचाही वाटा आहे. आज, भारतात उच्च शिक्षणात पुरुषांच्या तुलनेत, महिलांची संख्या अधिक आहे.

आज, भारतात उच्च शिक्षणात, पुरुषांच्या तुलनेत, महिला अधिक संख्येने प्रवेश घेत आहेत. हवाई वाहतूक क्षेत्रात, भारतात महिला वैमानिकांची टक्केवारी सर्वोच्च असलेल्या देशांपैकी आपण एक आहोत. त्यासोबत, भारतीय हवाई दलात आता महिला वैमानिक लढाऊ विमाने देखील उडवत आहेत. आमच्या सर्व सशस्त्र दलांमध्ये महिला अधिकारी कार्यान्वयनात आणि लढाऊ आघाड्यांमध्ये  तैनात आहेत.

मित्रांनो,

भारत आणि ग्‍लोबल साउथ मध्ये महिला, ग्रामीण शेतकरी कुटुंबाचा कणा असतात आणि छोटे व्यापारी तसेच दुकानदार म्हणूनही महत्वाची भूमिका पार पाडतात. निसर्गाशी असलेले त्यांचे घनिष्ट संबंध असतात, त्यामुळे महिला हवामान बदलाच्या संकटावर नवनवीन उपाययोजना शोधू शकतात. मला आठवते, की अठराव्या शतकात महिलांनी कसे भारतातील पहिल्या हवामान बदलाविरोधातल्या चळवळीचे नेतृत्व केले होते. अमृता देवी यांच्या नेतृत्वाखाली, राजस्थानच्या बिश्णोई समुदायाने ‘चिपको चळवळी’ची सुरुवात केली होती. अनिर्बंध लॉगिंगवर प्रतिबंध घालण्यासाठी झाडांना मिठया मारण्याचे अभिनव आंदोलन त्यावेळी करण्यात आले होते. त्यांनी इतर अनेक ग्रामस्थांसोबत, निसर्ग संरक्षणासाठी त्यावेळी आपल्या आयुष्याचे बलिदान दिले होते. भारतात महिला, “मिशन लाईफ” -पर्यावरण स्नेही जीवनशैलीच्या सदिच्छादूत देखील आहेत. पारंपरिक ज्ञानाच्या आधारावर, एखाद्या वस्तूचा पुनर्वापर,पुनर्प्रकिया आणि इतर उपाययोजना ही करतात. विविध उपक्रम राबवत, महिला सक्रियपणे सौर पॅनल आणि दिवे बनवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. “सोलर मामा” ग्लोबल साऊथ आमच्या सहकारी देशांसोबतचा यशस्वी उपक्रम ठरला आहे.

मित्रांनो,

महिला उद्योजकांचे जागतिक अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्वाचे योगदान आहे. भारतात महिला उद्योजकांची भूमिका नवी नाही. कित्येक दशकांपूर्वी, 1959 साली मुंबईत सात गुजराती महिला एक ऐतिहासिक सहकारी चळवळ- श्री महिला गृह उद्योग- स्थापन करण्यासाठी एकत्र आली. तेव्हापासून, या चळवळीने लाखों महिला आणि त्यांच्या कुटुंबांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवला आहे. त्यांचे सर्वात प्रसिद्ध उत्पादन, लिज्जत पापड, कदाचित गुजरातमधल्या आपल्या मेनूमध्ये असेल. आपल्या सहकारी चळवळीची आणखी एक यशस्वी गाथा दुग्धव्यवसायात आपल्या आढळते. ही सहकारी चळवळ देखील महिला चालवतात. एकट्या गुजरात राज्यात डेयरी क्षेत्रात 3.6 दशलक्ष महिला कार्यरत आहेत आणि संपूर्ण भारतात देखील अशा अनेक प्रेरक कथा आपल्याला आढळतील.

भारतातील सुमारे 15 टक्के युनिकॉर्न स्टार्ट-अपमध्ये किमान एक महिला संस्थापक आहे. या महिलांच्या नेतृत्वाखालील युनिकॉर्नचे एकत्रित मूल्य 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. आमचे उद्दिष्ट एक समान खेळाचे क्षेत्र तयार करणे हे असले पाहिजे जेथे महिला यश मिळविणार्‍या आदर्श ठरतील.

बाजार, जागतिक मूल्यसाखळी आणि परवडणाऱ्या वित्तपुरवठ्यात त्यांना येणारे अडथळे दूर करण्यासाठी आपण काम केले पाहिजे. त्याच वेळी घराची काळजी आणि घरगुती कामांचे ओझे कमी करण्यासाठी देखील उपाययोजना केल्या जातील, हे आपण सुनिश्चित केले पाहिजे.

मान्यवर,

महिला उद्योजकता, नेतृत्व आणि शिक्षणावर आपण दिलेला भर वाखाणण्याजोगा आहे. महिलांसाठी डिजिटल आणि आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी तुम्ही एक ‘टेक-इक्विटी प्लॅटफॉर्म’ सुरू करत आहात याचा मला आनंद आहे आणि भारताच्या अध्यक्षतेखाली ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर नवीन कार्यगटाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे.

गांधीनगरमधील तुमचे हे अथक प्रयत्न, जगभरातील महिलांच्या मनात प्रचंड आशा आणि आत्मविश्वास निर्माण करतील. मी तुम्हाला फलदायी आणि यशस्वी बैठकीसाठी शुभेच्छा देतो.

धन्यवाद।

आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.

 

***

S.Thakur/R.Aghor/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai