Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गरीब कल्याण रोजगार अभियानाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण


मित्रांनो,

या औपचारिक उद्‌घाटनापूर्वी खगेरिया येथे मी आपल्या बंधू- भगिनींसोबत बोलत होतो.  आज गावातील तुम्हा सर्वांसोबत बोलल्यानंतर काहीसा दिलासा मिळाला आहे. काही प्रमाणात समाधान देखील झाले आहे. ज्यावेळी कोरोना महामारीचे संकट तीव्र व्हायला सुरुवात झाली होती तेव्हा तुम्ही सर्व, केंद्र सरकार असो वा राज्य सरकार, दोघेही चिंताग्रस्त होते. या काळात जे कोणी जेथे होते त्यांना मदत पोहोचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. आम्ही आमच्या श्रमिक बंधू-भगिनींना परत आणण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेन देखील चालवल्या.

खरोखरच आज तुमच्याशी बोलल्यानंतर तुमच्यातील उर्जेमध्ये जो तजेला होता आणि एक सन्मानाची भावना होती, एक विश्वास होता, हे सर्व काही मला जाणवत आहे. कोरोनाचे इतके मोठे संकट, संपूर्ण जग ज्यामुळे हादरून गेले, शरण गेले, पण तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात. भारताच्या गावांनी तर कोरोनाचा ज्या प्रकारे सामना केला, त्यातून शहरांना देखील एक धडा मिळाला आहे.

जरा विचार करा, 6 लाखांपेक्षा जास्त गावे असलेला आपला देश आहे, ज्यामध्ये भारताची दोन तृतीयांशपेक्षा जास्त लोकसंख्या, जवळ जवळ 80-85 कोटी लोक गावांत राहात आहेत. त्या ग्रामीण भारतात कोरोनाच्या संक्रमणाला तुम्ही अतिशय प्रभावी पद्धतीने थोपवले आहे आणि ही जी आमची गावातील लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या युरोपमधील सर्व देशांना एकत्र केले, तर त्यांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त होईल. ही लोकसंख्या संपूर्ण अमेरिकेच्या लोकसंख्येचा विचार केला, रशियाच्या लोकसंख्येचा विचार केला, त्यात ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येची देखील भर घातली तरी देखील त्यापेक्षा किती तरी जास्त आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येने कोरोनाचा इतक्या धाडसाने सामना करणे, इतक्या यशस्वी पद्धतीने तोंड देणे ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान वाटला पाहिजे. या यशाच्या मागे आमच्या ग्रामीण भारताच्या जागरुकतेचे मोलाचे पाठबळ आहे. पंचायत स्तरावर आमची लोकशाही व्यवस्था, आमच्या आरोग्य सुविधा, आमची तपासणी केंद्रे- वेलनेस सेंटर, आमचे स्वच्छता अभियान या सर्वांची महत्त्वाची भूमिका आहे.

पण यात देखील तळागाळातील स्तरावर काम करणारे आमचे सहकारी, सरपंच, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, जीविका भगिनी या सर्वांनी उत्तम काम केले आहे. हे सर्व जण कौतुकाला पात्र आहेत, प्रशंसेला पात्र आहेत.

मित्रांनो,

 जर हीच घटना एखाद्या पाश्चिमात्य देशात घडली असती तर जगात आंतरराष्ट्रीय पातळीवर या यशाची किती चर्चा झाली असती, किती तरी प्रशंसा झाली असती. पण आपल्याला माहीत आहेच की काही लोकांना आपल्या गोष्टी सांगायला देखील संकोच वाटतो. काही लोकांना वाटते की भारताच्या ग्रामीण जीवनाची इतकी प्रशंसा झाली तर जगाला उत्तर काय देणार? तुम्ही या प्रशंसेला पात्र आहात, या पराक्रमासाठी तुम्ही पात्र आहात, इतका मोठा जीवन- मरणाचा संघर्ष जिथे होतो, अशा विषाणूपासून तुमच्या गावांचा बचाव केल्याबद्दल तुम्ही प्रशंसेसाठी पात्र आहात. पण जगात अशा प्रकारचे देखील काही स्वभाव आहेत. आपल्या देशात काही लोक असे आहेत की जे तुमची पाठ कधीच थोपटणार नाहीत. कोणी पाठ थोपटावी किंवा थोपटू नये, पण मी मात्र तुमचा जयजयकार करतच राहीन. मी तुमच्या या पराक्रमाची माहिती जगात मोठा गाजा-वाजा करत सांगतच राहीन. तुम्ही लोकांनी आपल्या हजारो लाखो लोकांना कोरोनापासून वाचवण्याचे पुण्य केले आहे.

आज या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वीच, भारतातील ग्रामीण जनतेने जे काम केले आहे, प्रत्येक गावाने जे काम केले आहे, प्रत्येक राज्याने जे काम केले आहे, मी अशा गावांना, गावातील जनतेला सांभाळणाऱ्यांना आदराने प्रणाम करतो.

देशातील गरीब, मजूर, श्रमिकांच्या या शक्तीला माझे प्रणाम, माझ्या देशातील गावांना प्रणाम, शत- शत प्रणाम, तसे तर मला सांगण्यात आले आहे की पाटण्यात कोरोनाची चाचणी करण्यासाठी आधुनिक तपासणी यंत्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. या यंत्राद्वारे एकाच दिवसात सुमारे 1500 चाचण्या करणे शक्य होणार आहे. या चाचणी यंत्रासाठी बिहारच्या लोकांचे अभिनंदन.

या कार्यक्रमात सहभागी झालेले माझे केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी, वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री महोदय,आदरणीय नीतीश कुमार, अशोक गेहलोत महोदय, शिवराज महोदय, आदित्यनाथ महोदय, उपस्थित खासदार आणि आमदार महोदय, सर्व अधिकारी वर्ग, पंचायतीचे प्रतिनिधी आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील शेकडो गावातून जोडले गेलेले माझे कष्टकरी कामगार सहकारी, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा माझा नमस्कार 

आजचा दिवस अतिशय ऐतिहासिक आहे. आज गरिबांच्या कल्याणासाठी, त्यांच्या रोजगारासाठी एक खूप मोठे अभियान सुरू होत आहे. हे अभियान आमच्या श्रमिक बंधू-भगिनींना समर्पित आहे, आमचे गावात राहणारे तरुण, भगिनी, कन्या यांच्यासाठी आहे. यातील बहुतेक श्रमिक लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरी परतलेले कामगार आहेत. आपले कष्ट आणि कसब यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी काही तरी करण्याची त्यांची इच्छा आहे

माझ्या श्रमिक सहकाऱ्यांनो, देशाला तुमच्या भावनांची जाणीव आहे आणि तुमच्या गरजांची देखील. आज खगेरियापासून सुरू होत असलेले गरीब कल्याण रोजगार अभियान हीच भावना, हीच गरज, पूर्ण करण्याचे एक खूप मोठे साधन आहे.

बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, ओदिशा, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 6 राज्यातील 116 जिल्ह्यांमध्ये हे अभियान पूर्ण क्षमतेनिशी अतिशय जोमाने चालवण्यात येणार आहे. मजुरांना आणि कामगारांना त्यांच्या घराच्या जवळपासच काम दिले जावे, असा आमचा प्रयत्न आहे. आतापर्यंत तुम्ही तुमचे कसब आणि कष्टांनी शहरांची प्रगती करत होता, आता आपल्या गावांना, आपल्या भागांना प्रगतीच्या मार्गावर न्या. आणि मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की मला या कार्यक्रमाची प्रेरणा काही श्रमिक सहकाऱ्यांकडूनच मिळाली.

मित्रांनो, मी प्रसारमाध्यमांमध्ये एक बातमी पाहिली होती. ही बातमी उत्तर प्रदेशातील उन्नावची होती. त्या ठिकाणी एका सरकारी शाळेला विलगीकरण केंद्र बनवण्यात आले होते. शहरातून जे कामगार परत आले होते त्यांना या शाळेत ठेवण्यात आले होते. या केंद्रात हैदराबादहून आलेल्या अनेक कामगारांना ठेवण्यात आले होते. हे कामगार रंगकाम आणि पीओपी या कामांमध्ये पारंगत होते. त्यांना आपल्या गावासाठी काही तरी करायचे होते. त्यांनी विचार केला असेही काही काम न करता बसून राहायचे आहे, दोन वेळचे जेवण जेवत राहायचे आहे. त्यापेक्षा आपल्याला ज्या गोष्टीचे ज्ञान आहे, आपल्याकडे जे कसब आहे त्याचा वापर करून बघूया आणि बघा, सरकारी शाळेत राहात असताना या कामगारांनी आपल्या कौशल्याच्या मदतीने या शाळेचा कायापालट करून टाकला.

माझ्या श्रमिक बंधू भगिनींनो ज्यावेळी मला या कामाची माहिती मिळाली, त्यांच्या देशभक्तीने, त्यांच्या कौशल्याने माझ्या मनाला प्रेरणा दिली. त्यातूनच मला ही कल्पना सुचली की हे लोक काही तरी करू शकतात आणि त्यातूनच या योजनेचा जन्म झाला आहे. तुम्ही विचार करा, किती प्रकारची गुणवत्ता या काळात आपापल्या गावात परत आली आहे. देशाच्या प्रत्येक शहराला गती आणि प्रगती देणारे कष्ट आणि कौशल्य जेव्हा खगेरिया सारख्या ग्रामीण भागात  वापरले जाईल त्यामुळे बिहारच्या विकासाला किती प्रमाणात गती मिळेल!

मित्रांनो,

गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत तुमच्या गावाच्या विकासासाठी, तुम्हाला रोजगार मिळवून देण्यासाठी 50 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या पैशाने गावात रोजगारासाठी, विकासकामांसाठी सुमारे 25 कार्यक्षेत्रे निर्धारित करण्यात आली आहेत. ही 25 कामे किंवा प्रकल्प असे आहेत जे गावांच्या मूलभूत सुविधांशी संबधित आहेत. जे गावातील जनतेचे जीवनमान अधिक चांगले  बनवण्याशी संबंधित आहेत. ही कामे तुमच्या गावात राहूनच, तुमच्या कुटुंबासोबत राहूनच करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

आता जसे, खगेरियाच्या तेलिहार गावात आजपासून अंगणवाडी भवन, सामुदायिक शौचालय, ग्रामीण बाजार आणि विहीर बनवण्याच्या कामाची सुरुवात केली जात आहे. अशाच प्रकारच्या गरजा प्रत्येक गावाच्या आहेत. या गरजांची पूर्तता आता गरीब कल्याण रोजगार अभियानाच्या माध्यमातून केली जाणार आहे. या अंतर्गत वेगवेगवळ्या गावांमध्ये कुठे गरिबांसाठी पक्की घरे तयार करण्यात येतील, कुठे वृक्षारोपण देखील होईल, कुठे गुरांना ठेवण्यासाठी शेड बनवली जाईल, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामसभांच्या सहकार्याने जलजीवन मिशन पुढे नेण्याचे काम करण्यात येईल. त्याशिवाय या भागात गरजेच्या असलेल्या रस्त्यांची निर्मिती करण्यावर भर देण्यात येईल आणि हो जिथे पंचायतीची इमारत नाही त्या ठिकाणी पंचायतीची इमारत देखील उभारण्यात येईल.

मित्रांनो,

ही कामे अशी आहेत की जी गावात झालीच पाहिजेत. पण याबरोबरच या अभियानांतर्गत आधुनिक सुविधांनी देखील गावांना जोडण्यात येईल. याचे उदाहरण म्हणजे शहरांप्रमाणेच गावामध्येही प्रत्येक घरात स्वस्त आणि जलद  गती असलेली इंटरनेटची सुविधा असली पाहिजे. ही सुविधा गरजेची यासाठी आहे कारण आपल्या गावातील मुलांना देखील चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळाले पाहिजे. गावाच्या या गरजेला देखील गरीब कल्याण रोजगार अभियानात समाविष्ट करण्यात आले आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असे होत आहे जेव्हा शहरांपेक्षा गावांमध्ये इंटरनेटचा वापर जास्त होत आहे. गावांमध्येही इंटरनेटचा वेग वाढेल, ऑप्टिकल फायबर केबल पोहोचेल, याची सोय करणारी कामे देखील करण्यात येतील.

मित्रांनो, ही सर्व कामे करणार कोण? गावात राहणारे लोकच ही कामे करतील. माझे जे श्रमिक सहकारी सोबत आहेत, म्हणजेच तुम्ही लोकच करणार आहात. मग ते मजूर असोत, गवंडी असोत, लहान सहान वस्तू विकणारे दुकानदार असोत, ड्रायव्हर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक प्रत्येक प्रकारच्या कामगारांना रोजगार मिळेल. आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांना देखील बचतगटांच्या माध्यमातून सहभागी करण्यात येईल. जेणेकरून त्या आपल्या कुटुंबासाठी अतिरिक्त साधने जमा करू शकतील.

मित्रांनो, केवळ इतकेच नाही, तुम्हा सर्व कष्टकऱ्यांचे, तुम्हा सर्वांच्या कौशल्याची चाचपणी करण्याची सुरुवात करण्यात आली आहे. म्हणजेच गावातच तुमच्या कौशल्याची निश्चिती करण्यात येईल. जेणेकरून तुमच्या कौशल्याला अनुरूप काम तुम्हाला मिळू शकेल. तुम्हाला जे काम येत आहे, त्या कामाची ज्याला गरज आहे तो तुमच्याकडे स्वतःहून  येईल.

मित्रांनो,

कोरोना महामारीच्या या काळात तुम्हाला गावात राहत असताना कोणाकडून कर्ज घ्यायला लागू नये, कोणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गरिबांच्या स्वाभिमानाची आम्हाला जाणीव आहे. तुम्ही श्रमेव जयते, श्रमांची पूजा करणारे लोक आहात. तुम्हाला काम पाहिजे, रोजगार पाहिजे. सरकारने तुमच्या याच भावनेला सर्वोच्च मानत ही योजना तयार केली आहे.  ही योजना अतिशय कमी कालावधीत लागू करण्यात आली आहे. यापूर्वी तुमच्या आणि देशाच्या कोट्यवधी गरीब जनतेच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सरकारने लॉकडाऊनच्या प्रारंभीच तातडीची पावले उचलली होती.

आत्मनिर्भर भारत अभियानाची सुरुवातच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेने झाली होती. मला अगदी आठवण आहे की ज्या वेळी आम्ही गरिबांसाठी योजना आणली त्यावेळी चहू बाजूंनी आरडा ओरडा सुरू झाला, उद्योगांचे काय होणार , व्यापाराचे काय होणार, एमएसएमईचे काय होणार, सर्वात आधी हे करा. बऱ्याच लोकांनी माझ्यावर टीकेची झोड उठवली. पण मला हे माहीत होते की या संकटाच्या काळात सर्वात आधी गरिबांना हात देणे हीच माझी प्राधान्यक्रमाची बाब आहे.

या योजनेवर काही आठवड्यांच्या आतच सुमारे  पावणे दोन लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले. तीन महिन्यात 80 कोटी गरिबांच्या ताटात रेशन- डाळी पोहोचवण्याचे काम झाले आहे. रेशन देण्याबरोबरच त्यांना स्वयंपाकाच्या गॅसचे सिलेंडर देखील मोफत देण्यात आले आहेत. याच प्रकारे 20 कोटी गरीब माता-भगिनींच्या जनधन खात्यांमध्ये 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे थेट जमा करण्यात आले आहेत. गरीब ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी आणि दिव्यांग बांधवांसाठी 1000 रुपयांची मदत थेट त्यांच्या खात्यात पाठवण्यात आली आहे. 

जरा विचार करा,

जर घरोघरी जाऊन तुमची जनधन खाती उघडली नसती, मोबाईल क्रमांकाशी ही खाती आणि आधार कार्डाशी जोडली नसती तर हे होऊ शकले असते का? पूर्वीचा काळ आठवा. वरून पैसे तर पाठवले जात होते, तुमच्या नावानेच पाठवले जात होते. पण तुमच्यापर्यंत ते पोहोचतच नव्हते. आता हे सर्व बदलत आहे, तुम्हाला सरकारी दुकानात धान्याची काही अडचण येऊ नये म्हणून एक देश एक रेशन कार्ड योजना देखील सुरू करण्यात आली. म्हणजेच आमचे गरीब बंधू भगिनी कोणत्याही राज्यात कोणत्याही शहरात रेशन खरेदी करू शकतात.

मित्रांनो,

आत्मनिर्भर भारतासाठी आत्मनिर्भर शेतकरी देखील तितकाच गरजेचा आहे. पण इतक्या वर्षांपासून आपल्या देशात शेती आणि शेतकऱ्याला विनाकारण नियमांच्या आणि कायद्यांच्या बंधनात ठेवण्यात आले होते. आता हे सर्व शेतकरी बांधव माझ्या समोर बसले आहेत तुम्हाला स्वतःलाच किती वर्षे ही अगतिकता जाणवली असेल.

शेतकरी आपल्या शेतमालाची विक्री कुठे करू शकतो, आपल्या मालाची साठवणूक करू शकतो की नाही, हे देखील ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याला देण्यात आला नव्हता. अशा प्रकारचा भेदभाव करणाऱ्या कायद्यांना आम्ही दोन आठवड्यांपूर्वीच रद्दबातल केले. आता तुम्ही तुमचा शेतमाल कुठे विकायचा हे सरकार ठरवणार नाही, अधिकारी ठरवणार नाही तर शेतकरी स्वतः ते ठरवेल.

आता शेतकरी आपल्या राज्याबाहेर देखील आपला शेतमाल विकू शकतो आणि कोणत्याही बाजारात विकू शकतो. आता तुम्ही तुमच्या पिकांना चांगला भाव देणाऱ्या व्यापाऱ्यांशी, कंपन्यांशी थेट संपर्क साधू शकता, त्यांना थेट आपला माल विकू शकता. पूर्वी जो कायदा शेतमालाच्या साठवणुकीवर निर्बंध घालत होता, त्या कायद्यात देखील आता बदल करण्यात आला आहे.

मित्रांनो,

आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना आपल्या मालाची साठवणूक करण्यासाठी शीतगृहाची सोय असावी, शेतकरी थेट बाजाराशी जोडले जावेत यासाठी देखील एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे. ज्यावेळी शेतकरी बाजाराशी जोडला जाईल, त्यावेळी त्याला आपल्या पिकांना जास्त भाव मिळण्याचे मार्ग देखील खुले होतील.

तुम्ही आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत आणखी एका निर्णयाबद्दल ऐकले असेल. तुमच्या गावांच्या जवळ, पाडे आणि लहान गावांमध्ये स्थानिक सामग्रीच्या मदतीने लहान लहान उत्पादने तयार व्हावीत, पॅकिंग वाल्या वस्तू तयार व्हाव्यात यासाठी उद्योग समूह स्थापन केले जाणार आहेत. याचा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

आता उदाहरणच घ्यायचे झाले तर खगेरियामध्ये मक्याचे पीक किती उत्तम प्रकारे घेतले जाते. पण जर शेतकरी मक्याची उत्पादने बनवणाऱ्या कंपन्यांशी थेट संपर्क साधू लागला, खगेरियाची मक्याची स्थानिक उत्पादने तयार होऊ लागली तर त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. याच प्रकारे बिहारमध्ये मखना आहे , लीची आहे, केळी आहेत, यूपीमध्ये आवळे आहेत, आंबे आहेत, मिरची आहे, मध्य प्रदेशात डाळी आहेत, ओदिशात- झारखंडमध्ये वनउत्पादने आहेत, प्रत्येक जिल्ह्यात अशी स्थानिक उत्पादने आहेत, ज्यांच्याशी संबंधित उद्योग जवळच उभारण्याच्या योजना आहेत.

मित्रांनो,

गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या प्रयत्नांचा एकच उद्देश आहे. आपले गाव, आपला गरीब स्वतःच्या ताकदीवर उभा राहावा, सक्षम व्हावा. आपल्या कोणत्याही गरिबाला, मजुराला, शेतकऱ्याला कोणाच्याही आधाराची गरज राहणार नाही. शेवटी आपण ते लोक आहोत जे कोणाच्या आधाराने नव्हे तर कष्टांच्या सन्मानाने जगत आहोत.

गरीब कल्याण रोज़गार अभियानाच्या माध्यमातून तुमच्या या स्वाभिमानाचे रक्षण देखील होईल, आणि तुमच्या कष्टांनी तुमच्या गावाचा विकास देखील होईल. आज तुमचा हा सेवक आणि संपूर्ण देश याच विचाराने हाच संकल्प घेऊन तुमचा मान आणि सन्मानासाठी काम करत आहे.

तुम्ही कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडा, पण माझी एक सूचनाही आहे की तुम्ही योग्य ती खबरदारी देखील घ्या. मास्क लावा, किंवा चेहऱ्याला झाकण्यासाठी गमछा किंवा इतर कोणत्या कापडाचा वापर करा, स्वच्छतेचे आणि दो गज म्हणजे सुमारे सहा फूट अंतर राखण्याच्या नियमाचे पालन करायला विसरू नका. तुम्ही सावधगिरी बाळगाल तर तुमचा गाव, तुमचे घर या विषाणूच्या संक्रमणापासून सुरक्षित राहील, हे आपले जीवन आणि आपल्या चरितार्थासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

तुम्ही सर्व निरोगी राहा, प्रगती करा आणि तुमच्या सोबत देशालाही पुढे न्या. याच शुभेच्छांसोबत मी तुम्हा सर्व सहकाऱ्याचे आभार मानतो,

खूप खूप धन्यवाद!!

मी सर्व आदरणीय मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे, विशेषतः बिहार सरकारचा आभारी आहे, या अतिशय महत्त्वाच्या कामाचे नियोजन करण्यासाठी आणि ते पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही दिलेले सहकार्य आणि पाठबळ याबद्दल मी तुमचे आभार मानतो, तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार

 

G.Chippalkatti/S.Patil/P.Malandkar