Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गंगटोक येथे शाश्वत शेती आणि शेतकरी कल्याण विषयक राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधानांचे भाषण


आज आम्ही सुरुवातीला सिक्कीमचे माजी राज्यपाल श्री. रामाराव यांना श्रद्धांजली वाहिली. रामाराव यांचा आणि माझा जुना परिचय होता. सहकारी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. सहज विनोद करणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग होता. आंध्र प्रदेश विधान परिषदेला दीर्घकाळ त्यांचे मार्गदर्शन लाभले. काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती. काल मकरसंक्रांतीनंतर त्यांनी आमचा निरोप घेतला. ते सिक्कममध्ये पाच वर्षे राहिले आणि त्यांनी सिक्कीमला आपलेसे केले. मी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.

श्री. पवनजी आता माझे कौतुक करीत होते, तेव्हा मला प्रश्न पडला होता की, हे काय सुरु आहे? माझे नाव कानावर पडेपर्यंत, हे सर्व इतर कोणाबद्दल सांगितले जात आहे, असेच मला वाटत होते. अचानक माझे नाव ऐकले आणि मी चकीत झालो. माझे इतके कौतुक का होत आहे, हे मला नंतर समजले. आपण पाहिले असेल की, एखाद्या समारंभाला बोलावले जाते, तेव्हा तेथील यजमान विनाकरण आपल्याला आमंत्रण देत नाहीत. त्यांच्या काही अपेक्षा असतात. मात्र पवनजी जे काही बोलले, त्यात त्यांनी राज्याला रुपये द्या, अमूक इतके पैसे द्या, असे एकदाही म्हटले नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. इथल्या जमातींना काय हवे आहे, शेतकऱ्यांना काय हवे आहे, ते त्यांनी सांगितले. येथील समुदायांना कोणते हक्क हवे आहेत, हे त्यांनी सांगितले. हे राज्य प्रगती करते आहे, त्यामागे पवनजींचे हे विचार आहेत. नाहीतर, आपण विचार करु शकतो, ती सारी संकटे येथे उपस्थित आहेत. असंख्य नैसर्गिक अडचणी आहेत. सिक्कीमच्या नागरिकांना किंवा सिक्कीमच्या शासनकर्त्यांना तक्रारी करायच्या असतील, रडगाणी गायची असतील, तर हजारो गोष्टी आहेत. पण हे सुखिस्तान आहे, येथे रडगाणी गायली जात नाही.

पहाडी मन आहे, हिमालयाएवढी उंची आहे आणि येथील नागरिकांना काही करुन दाखवायचे आहे. पवनजींनी ज्या बाबींचा उल्लेख केला, भारत सरकार त्याकडे गांभिर्याने लक्ष देईल, त्याबाबत काय करता येईल, याचा विचार करेल. मी आज या सरकारचा पाहुणा आहे, पवनजींचा पाहुणा आहे, हे निमित्तमात्र आहे. मात्र प्रत्यक्षात मी आज सिक्कीमच्या लाखो शेतकऱ्यांचा पाहुणा आहे. आणि आज मी या ठिकाणी एकटा आलेलो नाही. मी देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांच्या आशा घेऊन येथे आलो आहे. या ठिकाणी पवनजींनी मला सांगितले की, सिक्कीमला सेंद्रीय राज्य म्हणून घोषित करायचे आहे. त्यासाठी तुम्ही या. मी त्यांना म्हणालो की, मी एकटा येणार आणि घोषणा करणार, त्याने किती फरक पडेल? मी त्यांना सांगितले की, मी भारतातील सर्व कृषी मंत्र्यांना बोलावेन. देशाच्या सर्व कृषी सचिवांना आमंत्रित करेन. जेथे इतका मोठा कृषी यज्ञ करण्यात आला आहे, ऋषी तुल्य शेतकऱ्यांची ही पवित्र भूमी आहे. दोन दिवस या चिंतन भवनात एक वैचारिक मंथन झाले आहे. देशाच्या कृषी विश्वात कशा प्रकारे बदल घडवून आणता येतील, याबाबत सखोल चर्चा झाली आहे. या ठिकाणी पाच सादरीकरणे करण्यात आली. आपल्याला आठवत असेल की, यापूर्वीची परंपरा काय होती? येथे कृषी मंत्र्यांची बैठक पहिल्यांदाच झाली नाही. ती दर वर्षी होते. मात्र विज्ञान भवनात येणे, आपले मत सादर करणे आणि निघून जाणे, हाच क्रम सुरु होता. यावेळी असे पहिल्यांदा झाले असावे की, दोन दिवस चाललेल्या बैठकीला कृषी मंत्री आणि कृषी सचिव एकत्र आले. बसून त्यांनी चर्चा केली, गट चर्चा केली आणि ठराविक विषयांवर चर्चा केली. चर्चेनंतर त्यांनी काही कृतीशील तोडगे काढले, सूचना काढल्या.

काळ बदलतो आहे. अनेक गोष्टी आहेत. काही लघु मुदती आहेत, काही दीर्घ मुदती आहेत. काही कायदा यंत्रणेशी जोडलेल्या आहेत. काही आर्थिक स्रोतांच्या बाबी आहेत. काही नव्या दृष्टीकोनाशी संबंधित आहे. अर्थात एक प्रकारे बदलत्या काळात कृषी जीवनाकडे कशा प्रकारे पाहता येईल? देशातील गाव, देशातील शेतकरी, देशातील शेती, देशातील कृषी उत्पन्न. या सर्व बाबी एकेकट्या, स्वतंत्रपणे, तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहून देशाचे कधीही कल्याण होणार नाही. या सर्व बाबींना एकत्रित, समग्रपणे पाहिले पाहिजे आणि समग्रतेच्या या दृष्टीनेच हे विचार मंथन झाले आहे आणि त्यातून अनेक महत्त्वपूर्ण सल्ले प्राप्त झाले आहेत. आगामी काळात राज्य सरकारांच्या कृषीविषयक दिशादर्शक योजना आणि भारत सरकारच्या कृषी विषयक दृष्टीकोनात, ते प्रतिबिंबित होतील, असा विश्वास मला वाटतो. ज्या राज्यांचे प्रतिनिधी येथे उपस्थित आहेत, त्यांच्या प्रयत्नांनी, त्यांच्या संबंधित राज्यांच्या आगामी अर्थसंकल्पातही या बाबी प्रतिबिंबित होतील. ज्या मुद्यांबाबत येथे चर्चा झाली, त्याच धर्तीवर राज्यांमधे लहान लहान गटसभा आयोजित करा, चर्चासत्रे आयोजित करा, संबंधित लोकांना एकत्र बोलवा. येथे जी सादरीकरणे झाली, त्यातील साऱ्या तरतूदी प्रत्येक राज्यात लागू करणे कदाचित शक्य होणार नाही. अशा स्थितीत ते राज्य काय करु शकेल? 50 तरतुदींचा उल्लेख असेल, तर त्यापैकी 20 लागू करणे शक्य होऊ शकेल. कदाचित 10 वर्षांनी किंवा कदाचित त्यानंतरच्या 10 वर्षांत किंवा एका वर्षभरातच पण काही कार्यक्रम राबवले जावे, योजना तयार केल्या जाव्यात आणि सिक्कीमच्या घोषणेच्या रुपात त्या लक्षात राहाव्यात. कृषी क्षेत्रात निराशेची अनेक कारणे आहेत.

अनुभव इतके जास्त आहेत, की त्यात विश्वास निर्माण करणे हे आव्हान आहे आणि ते आव्हान स्वीकारावेच लागेल. सिक्कीम एक उदाहरण आहे. उदाहरण अशा अर्थाने की जेव्हा 2003 साली येथे सेंद्रीय शेतीचा विचार मांडला गेला असेल, तेव्हा त्याला विरोध झाला नसेल का? शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या नसतील का? जेव्हा 10 शेतकरी सेंद्रीय शेतीच्या पक्षात गेले असतील. आणि सुरुवातीला काही तोटाही झाला असेल. शेजारचा शेतकरी भरपूर खताचा वापर करुन त्याच्या दुप्पट पीक घेऊन त्याला दाखवित असेल की, बघ तू मरत आहेत आणि मी मात्र मजेत जगतोय. प्रत्येक शेतकऱ्याची मनस्थिती द्वीधा झाली असेल. ज्यांनी तीन प्रयोग केले असतील, त्यांच्या मनात विचार आला असेल की, अरे आता पुढच्या वेळी हा प्रयोग नको. मुख्यमंत्री तोंडाने सांगतात खरे, पण त्यांना कुठे शेती करायची आहे? शेती तर आम्हाला करायची आहे. निराशेचे असे अनेक क्षण आले असतील, असंख्य वेळा शंका मनात उमटल्या असतील, हा मार्ग सोडून जुना मार्ग चोखाळण्याची इच्छा झाली असेल, आर्थिक संकटे झेलावी लागली असतील. मात्र तरीही, सिक्कीमच्या अशा लाखो शेतकऱ्यांना मी सलाम करतो की, त्यांनी आपला मार्ग सोडला नाही, इच्छा कायम राखली. जो मार्ग सोडत नाही, तो निश्चितच आयुष्यात बरेच काही प्राप्त करु शकतो. आणि आज संपूर्ण जग सिक्कीमसाठी टाळ्यांचा गजर करीत आहे.

हा दीर्घ तपस्येचा परिणाम आहे. एक पूर्ण दशक, न थांबता, न थकता ही गोष्ट मान्य करणे, त्यासाठी अविरत प्रयत्न करणे ही छोटी गोष्ट नाही आता आपल्या घरातही, कुटुंबातही या दोन गोष्टी करायच्या लक्षात घ्या. सर्वसाधारणत: दोन बाबी निश्चिय करा की प्रत्येक दिवशी संध्याकाळी कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून भोजन करायचे. नाही पाळता येणार हा निश्चिय. 10 वर्षे सलग हा निश्चिय पूर्ण करणे शक्य होणार नाही. काही वेळा अडथळे येत राहतील. मात्र हे सिक्कीमचे शेतकरी आहेत, ज्यांनी करुन दाखविले. कदाचित एक कारण हे असेल की जिथे आम्ही आधुनिकतेच्या गर्तेत अडकलो आहोत, तेथे आपण सेंद्रिय वातावरणातून प्रेरणा प्राप्त करीत आहात. हे वातावरण आता सिक्कीमपुरते मर्यादित नाही, हे सेंद्रिय वातावरण संपूर्ण देशभरात पसरणार आहे. संपूर्ण आरोग्याची काळजी. हा विचार आता देशभरातील प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजू लागला आहे.

नुकतेच फ्रान्समध्ये जागतिक तापमानातील वाढीबाबत काळजी व्यक्त करण्यासाठी जगभरातील सारे देश एकत्र आले होते, पर्यावरणाची काळजी करीत होते. हिमशिखरे वितळत आहेत, त्यांची काळजी करत होते. संपूर्ण पर्यावरणात बदल होत आहेत, बिघाड होत आहेत. नासधूस होत आहे, ही काळजी करण्याची बाब आहे. अनेक विषयांवर चर्चा झाल्या. यात एक परिच्छेद फारच महत्त्वपूर्ण आहे आणि तो परिच्छेद आहे बँक टू बेसिक अर्थात मूलभूत बाबींकडे वळा. जगातील सर्व देशांनी एकत्रितपणे सांगितले की आम्हाला आमची जीवनशैली बदलावी लागेल. आधी हे मान्य केले जात नव्हते. आधी माणसाला असे वाटत होते की निसर्गाला लुटण्याचा हक्क आम्हाला आहे. हे सारे काही आमच्यासाठीच आहे. पहिल्यांदा सीओपी -21 मध्ये जगाने एकमुखाने सांगितले की निसर्गासोबत प्रेमपूर्ण संबंध असले पाहिजेत. निसर्गासोबत जगायला शिकावे लागेल. सिक्कीमने आपल्या उदाहरणातून याचा आदर्श घालून दिला आहे. विकास आणि पर्यावरण यातील विरोधी भूमिकांबाबत वारंवार चर्चा केल्‍या जातात. ‍विकास झाला तर पर्यावरण नष्ट होईल, अशी शंका व्यक्त केली जाते. आज सिक्कीम जगासाठी एक आदर्श आहे की जिथे पर्यावरणाचे संपूर्ण रक्षण होते आणि विकासाची नवी शिखरे गाठली जातात.

मला चांगले आठवते आहे, पवनजींनी गंगटोकमध्ये मालरोड आहे ना, आपला मेनरोड गांधी मार्ग, तेथे त्यांनी वाहनांना मनाई केली होती. फार मोठे वादळ निर्माण झाले होते. बहुतेक अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मात्र पवनजी ठाम राहिले आणि लोकांना मान्य करावेच लागले. आज तो गांधी रोड संपूर्ण गंगटोकची शोभा वाढवित आहे. आता लोकांना त्याचा गर्व वाटू लागला आहे. सध्या स्वच्छता अभियान सुरू आहे. मी गंगटोकचे, सिक्कीमचे आणि मुख्यमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन करतो. आता सध्या रेटींग सुरू आहे आणि भारत सरकार हल्ली या गोष्टीचा पाठपुरावा करीत आहे. देशात ज्या शहरांचा समावेश पहिल्या दहा क्रमांकात आहे, त्यात देशातील मोठमोठ्या शहरांचा समावेश आहे. बंगळुरू आहे, दिल्ली, जयपूर आहे, उदयपूर आहे, ही सर्व मोठमोठी शहरे आहेत. या सर्व मोठ्या शहराच्या बरोबरीने गंगटोकने दहावे स्थान प्राप्त केले ही बाब नाही. हिमालयीन राज्यांमध्ये, पर्वतीय क्षेत्रातील राज्यांमध्ये गंगटोकने पहिले स्थान पटकावले आहे. या कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, या कामांसाठी मी येथील जनतेचेही अभिनंदन करतो. कारण त्यांनी स्वच्छता आपल्या स्वभावात बाणवली आहे.

मी ऐकले आहे की विसाव्या शतकात येथे कोणी पंतप्रधान आले होते, ज्यांनी येथे रात्री मुक्काम केला होता. 21 व्या शतकात मी आलो आहे आणि रात्री मुक्काम करणार आहे आमच्या देशाच्या कृषी विभागाच्या विकासासाठी सेंद्रीय शेती हे एक आकर्षक निर्माण झाले आहे. येथील शेतकरीही प्रयोग करण्यास सज्ज आहेत. परंतु लहानसहान प्रयोग यापूर्वीही होत असतील, अशी किरकोळ प्रयोगांमुळे परिवर्तनाची भावना नेमकी पोहोचत नाही. राज्यांमधून जे प्रतिनिधी आले आहेत, त्यांना मी विनंती करतो की आजघडीला जगात सेंद्रीय उत्पादनांना मोठी मागणी आहे. बाजारपेठ उपलब्ध आहे आणि अशा प्रकारे शून्य शुल्क कृषीकडे जाण्याचे जे अभियान आहे, त्यास या बाबी अनुकूल आहेत. आपण धोरणात्मकदृष्टया विचार करून राज्यातला एखादा जिल्हा निश्चित करूया. एखादा जिल्हा संपूर्णपणे सेंद्रीय करून घेऊ या. जिल्हा सेंद्रीय करण्याची क्षमता नसेल तर गट करू, तालुका करू, ज्यात 100, 125, 150 गावे असतील, असे क्षेत्र अथवा अशा प्रकारचा विभाग निश्चित करू आणि तो पूर्णपणे सेंद्रीय पध्दतीने विकसित करू. हा कार्यक्रम दीर्घकाळ चालत राहतो, कारण यात केवळ एक वर्ष खत किंवा किटकनाशकांचा वापर न करणे पुरेसे नसते यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे लागते, त्यांना आवश्यक असणाऱ्या बाबींचा पुरवठा करावा लागतो. विपणनासाठी व्यवस्था पाहावी लागते. एका विभागात अथवा एका जिल्ह्यात हा प्रयोग यशस्वी झाला तर इतर ठिकाणी तो आपोआप सुरू होईल. हा शेतकऱ्यांचा स्वभाव आहे. केवळ भाषणे देणे पुरेसे नाही. कितीही मोठ्या कृषी विद्यापीठांमधील वैज्ञानिकांनी येऊन भाषणे दिली तरी त्यांना फारसा फरक पडत नाही. मात्र त्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिले तर त्यांना कोणत्याही भाषणाची आवश्यकता नाही, डोळ्यांनी पाहिल्यानंतर ते स्वत: प्रयोग करायला पुढाकार घेतात. पाहणे म्हणजे विश्वास ठेवणे, हा शेतकऱ्यांचा स्वभाव आहे. त्याने एकदा प्रत्यक्ष पाहिले की त्याला सारे काही सविस्तर समजेल. त्याचा विश्वास बसला की तो पुढे चालू लागतो, त्याला कोणी रोखू शकत नाही.

मला असे वाटते की राज्यातून आमचे जे सहकारी आले आहेत, त्यांनी काही धोरण निश्चित करावे. आपल्याला कोणत्या दिशेला जायचे आहे, हे ठरवावे. दुसरी गोष्ट अशी की आपण पीक विमा योजनेचे फार कौतुक केले. मात्र, एक गोष्ट मान्य केली पाहिजे. अनेक वर्षे ही पीक विमा योजना चर्चिली जात आहे. शेतकरीसुध्दा या चर्चेबाबत चिंतीत आहेत. मात्र 20 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी या योजनेत अद्याप सहभागी नाहीत. ही स्थिती आपल्याला बदलायची आहे आणि आपण ठरवू शकतो की आम्ही हे प्रमाण किमान 50 टक्क्यांपर्यंत घेऊन जाऊ. आमच्या राज्यात जेवढे शेतकरी आहेत, त्यापैकी किमान निम्मे शेतकरी या योजनेत सहभागी होतील, यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यामुळे देशाच्या तिजोरीवरचा खर्च वाढेल मात्र तो खर्च वाढला तरी शेतकऱ्यांसाठी आज नवी प्रधानमंत्री पीक योजना आम्ही आणली आहे, ती शेतकऱ्यांना एक प्रकारे विश्वास देत आहे. अनेक नव्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या रोजच्या अनेक अडचणी होत्या. ज्या खिजगणतीतही नव्हत्या. विमा कंपनीने शेतकऱ्यांचे हित लक्षात घ्यावे, त्यासाठी काय गरजेचे आहे त्याचा विचार करावा, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. मला आशा वाटते की पीक विम्याच्या कामाचा यात समावेश झाला पाहिजे. मी स्वच्छता आणि शेती यांचा परस्परसंबंध जोडू इच्छितो. कचऱ्यापासून संपत्तीपर्यंत अर्थात waste to wealth आमच्याकडे जो जैविक कचरा आहे, त्यापासून खते बनवता येतील. व्यापक स्वरुपातही खते बनविता येतील आणि ती आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येतील. त्यांचे ब्रँडींग करता येईल. मला असेही वाटते की सिक्कीम ज्या सेंद्रीय उत्पादनांची निर्मिती करतो, त्यांचेही एखाद्या विशिष्ट नावाने ब्रॅण्डींग केले जावे. आज त्यांना तीन फुलांचे नामकरण करायचे होते. त्यांनी मला दोन फुलांचे नामकरण करायला सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की ते एका फुलाचे नाव ठेवतील. मी जी दोन नावे ठेवली, त्यापैकी पहिले आहे ‘सरदार’. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ हे नावे ठेवले तर दुसरे नाव आहे दिनदयाल. दिनदयाल उपाध्यायजी यांचे हे शताब्दी वर्ष आहे, त्यांच्या स्मरणार्थ दिनदयाल हे नाव दिले. मुख्यमंत्र्यांनी मात्र वेगळेच नाव दिले. मी सिक्कीम सरकारचा आभारी आहे की त्यांनी माझा एवढा सन्मान केला. मात्र, मला फुलासारखे नाजूक होऊ देऊ नका. आतापर्यंत काट्यांसोबत जगत आलो आहे. काट्यांसोबतच आयुष्य व्यतीत करायचे आहे. मात्र जिथे गरज असेल तिथे फुलाच्या कोमलतेसह दु:खी, दरिद्री लोकांचे अश्रू पुसण्याच्या कामी हे आयुष्य सार्थकी लागावे, यासारखे सौभाग्य नाही.

कृषी क्षेत्रात आम्हाला शेतकऱ्यांच्या परिवर्तनासाठी काही बाबी विचारात घ्याव्या लागतील. एक गोष्ट योग्य आहे की उत्पादनानंतरची व्यवस्था वैज्ञानिकांनी पाहिली तर ते शेतकऱ्यांसाठी फायद्याचेच ठरेल. ते आपल्याकडे वाया जाणाऱ्या गोष्टी रोखू शकतील. शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि बाजारपेठेबाबत येथे फार चर्चा झाली आहे. बँकेमार्फत वित्त पुरवठ्याबाबत फार चर्चा झाली आहे, तंत्रज्ञानाबाबतही दीर्घ चर्चा झाली आहे. या सर्व महत्त्वपूर्ण बाबी आहेत आणि त्याबाबत यापुढेही चर्चा करायची आहे. मात्र, आपल्याला शेतकऱ्यालाही अनेक बाबींशी जोडावे लागते. आता मृदा स्वास्थ्य कार्ड आहे. मृदा स्वास्थ्य कार्डमध्ये अमूक-अमूक अडचणी आहेत. हे बघा मृदा स्वास्थ्य कार्ड एकप्रकारे जनआंदोलन स्वरुपात परिवर्तीत झाले पाहिजे. आजपासून 30 वर्षांपूर्वी कोणताही डॉक्टर आपल्याला रक्त तपासणी करायला सांगत होता का? नाही. मूत्र चाचणी करायला सांगत होता का? नाही. आज तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जा. तो आधी सांगेल की बाबा हा रिपोर्ट घेऊन ये. आता या डॉक्टरकडे त्या चाचणीसाठी प्रयोगशाळा नाही. गावात दुसराच कोणी आहे, जो या चाचण्याकरता येईल, अशी प्रयोगशाळा चालवतो. तुम्ही चाचण्या करायला जाता, रिपोर्ट घेऊन येता आणि मग डॉक्टर ठरवतात की आजारपण नेमके काय आहे. मृदा स्वास्थ्यासाठी अशा प्रकारच्या प्रयोगशाळांचे जाळे का उभारले जाऊ नये? देशातील युवकांनी मृदा स्वास्थ्य प्रयोगशाळा उद्योगात का उतरू नये, उद्योजक का होऊ नये आणि हे असे तंत्रज्ञान नाही की जे कोणाला हाताळता येणार नाही. भारत सरकारचा ‘कौशल्य विकास’ हा जो उपक्रम आहे, त्यात आम्ही मृदा स्वास्थ्यासाठी कौशल्य विकसित व्हावे, मृदा स्वास्थ्याचे परीक्षक करणारे लोक समोर यावेत आणि गावागावात अशा लहान लहान प्रयोगशाळा तयार व्हाव्यात. मी असेही सांगितले की, आमच्या ज्या शाळा, महाविद्यालये आहेत, ज्या शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा आहेत. विज्ञानाचा प्रवास असेल, तर प्रयोगशाळा असतील. मार्च महिन्यापासून जून महिन्यापर्यंत आपल्याकडे शाळा बहुतेक बंद असतात. सुट्टया सुरू असतात. काही भागात असे होत नाही, जेथे हवामान वेगळे असते, तेथे वेगळ्या दिवसांमध्ये सुट्टया असतात. मात्र, भारतात अधिकाधिक शाळा मार्च ते जून-जुलै महिन्यादरम्यान बंदच असतात. मग अशा वेळी शाळा बंद असताना आपण शाळेच्या प्रयोगशाळेचा वापर करून तिथे मृदा परिक्षण प्रयोगशाळा चालवू शकतो. त्‍या शाळेलाही कमाईचा मार्ग प्राप्त होईल. इयत्ता दहावी, बारावीचे विद्यार्थी असतील, महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, तर सुट्टीत त्यांनाही कमाई करता येईल आणि शेतकऱ्यांनाही समजू शकेल की मातीचा नमून अमूक ठिकाणी नेऊन द्यायचा आहे आणि मला तीन दिवसात त्याचा अहवाल मिळणार आहे. अशा प्रकारे आपल्याला हे मॉडेल विकसित करावे लागेल. आज सरकार यासाठी प्रयत्नशील आहे आणि यावर्षीचे जे उद्दिष्ट होते. त्यातील, बरेचसे काम झाले आहे. मात्र हे एवढ्यावर थांबता कामा नये, कारण दर दोन वर्षानंतर जमिनीत बदल होतात, गुणदोष बदल घडून येतात त्यामुळे दर दोन वर्षांनी मृदा चाचणी करणे अनिवार्य आहे. कदाचित पाच दशांश टक्के इतका बदल होत असेल, पण तो होतो, निश्चितपणे होतो हे असे मोठे काम करायचे तर त्यासाठी नवे उद्योजक हवेत. मी नुकताच स्टार्ट अप मोहिमेसाठी तरुणांना भेटलो होतो. त्यापूर्वीही मी काही स्टार्ट अप वाल्यांशी चर्चा केली होती. एका छोट्या बैठकीत त्यांना भेटलो होतो. मी त्यांना विचारले की आपल्यापैकी कोणी शेतकरी बांधव मोबाईल फोन का तयार करत नाही? आजकाल अशी यंत्रे उपलब्ध आहेत की ज्यांमुळे आपण घरात रक्त तपासणी करू शकता. यंत्रावर तपासणीचे रक्त विशिष्ट ठिकाणी ठेवले की त्यावर लगेच अहवाल प्राप्त होतो. मग असे मोबाईल फोन का तयार होऊ नयेत की त्याच्या स्क्रीनवर माती ठेवली की लगेच त्याचा अहवाल प्राप्त होईल. असे होणे शक्य आहे. तंत्रज्ञान वेगाने बदलते आहे. स्टार्ट अपवाले हे करू शकतात. शेतकरी मोबाईल फोन का तयार केला जाऊ नये की ज्यात शेतकऱ्याच्या उपयोगाचे सर्व सॉफ्टवेअर उपलब्ध व्हावेत. आज आम्ही ज्या पध्दतीने मोबाईल फोनचा वापर करतो, त्याची खरोखर आवश्यकता आहे का? विनाकारण वेळेचा अपव्यय होतो. बघाव्या अथवा बघू नये अशा बाबी पहिल्या आणि दाखवल्या जातात. शेतकऱ्याला हवामान अहवाल बघायचा आहे. त्याला बाजारभाव जाणून घ्यायचा आहे, त्यांना पीकांमधील वैविध्य पाहायचे आहे, खंताबाबत ज्ञान मिळवायचे आहे, कोणती गोष्ट कुठे उपलब्ध आहे, कुठे विकली जाते हे शेतकऱ्यांना समजले पाहिजे. समस्या असेल तर कोठे विचारावे, का विचारावे, हे पाहिजे- ते पाहिजे, मला मान्य आहे की आज स्टार्ट अपच्या विश्वात आमचे युवा आले आहेत. त्यांनी या दिशेने विचार केला पाहिजे की माझ्या देशातल्या गरीबातल्या गरीब शेतकऱ्यालाही हातातील मोबाईलच्या माध्यमातून समस्या दूर करता येईल हा विश्वास वाटला पाहिजे. तंत्रज्ञानाची जी चर्चा या ठिकाणी आली, त्या तंत्रज्ञानाचा वापर शक्य आहे. मी ज्या योजनांबद्दल बोललो आहे, त्यात कठीण असे काहीच नाही. आज विज्ञान ज्या गतीने प्रगती करत आहे, हे सर्व शक्य आहे आणि यासाठी मोठी बाजारपेठही उपलब्ध आहे.

संपूर्ण जगात शेतकऱ्यांची मोबाईलसाठीची जी बाजारपेठ असेल, तेवढी बाजारपेठ एकट्या भारतात उपलब्ध होईल. तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला सारे काही शक्य करायचे आहे. लोकांना परस्परांशी जोडूनही आपण हे करू शकतो. नुकतीच मी काही कंपन्यांमधल्या लोकांशी चर्चा केली. मी त्यांना म्हटले की आमच्याकडे फळशेती करणारे असंख्य शेतकरी आहेत. फळाचे आयुर्मान जास्त नसते. डोंगराळ भागात किंवा शेतांमध्ये, खूप दूरवरून विशेषत: पहाडी भागात फळांचे जास्त उत्पादन घेतले जाते. मात्र, बाजारपेठपर्यंत पोहोचता पोहोचता त्यापैकी 20 टक्के, 30 टक्के फळे खराब होऊन जातात. आज पेप्सी पिणे ही फॅशन मानली जाते. कोका कोला पिणे ही फॅशन मानली जाते. अब्जावधी रुपये मूल्यांची ही कार्बनयुक्त पेय विकली जात आहेत. मी त्या कंपन्यांना बोलावले. त्यांना म्हणालो, तुम्ही इतक्या गोष्‍टी करत असता तर आणखी एक प्रयोग करा ना. जास्त नाही केवळ 5 टक्के फळांचा रस त्यात मिसळा ना. हे कार्बनयुक्त पेय विकणारे लोक 5 टक्के फळांचा नैसर्गिक रस त्या पेयात मिसळू लागले तर भारतातील कोणत्याही शेतकऱ्याने पिकवलेले एकही फळ वाया जाणार नाही. लगेच बाजारपेठ मिळेल. आपल्याकडे इतकी वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत. येथून बाजारापर्यंत जाईस्तोवर किती फुले चांगली राहू शकतील? सिक्कीममध्ये काही फुले अशी आहेत की ज्यांचे आयुर्मान खूप जास्त आहे. मी आज फुलांचे प्रदर्शन पाहिले, प्रदर्शनातल्या काही फुलांची किंमत 3 हजार रुपयांपर्यंत होती. 3-3 हजार रुपये किंमत असणाऱ्या या फुलांचे सुगंधही विविध प्रकारचे आहेत. आज जगात सुगंधाची बाजारपेठही खूप मोठी आहे. त्यांनाही सेंद्रीय वस्तू हव्या आहेत. सेंद्रीय वस्तू हव्या असतील तर कच्च्या मालात फुले हवीत आणि फुले बाजारात पोहोचवावी असतील तर त्‍यासाठी जलद व्यवस्था हवी. त्यासाठी सिक्कीममध्ये विमानतळ असणे गरजेचे आहे. काही लोकांना वाटते की सिक्कीममध्ये विमानतळ वाढले तर पर्यटन वाढेल. सिक्कीममध्ये विमानतळ झाले तर पर्यटनात निश्चित वाढ होईल, मात्र सर्वात मोठा फायदा होईल नाशवंत मालाचा. नाशवंत माल येथून जागतिक बाजारात जलद गतीने नेता येईल. रोज येथून विमानांमध्ये भरून फुले पाठवता येतील. आपण कल्पना करू शकता की सिक्कीम सुखिस्तान आहे. हे सुखिस्तान कोठून कोठे पोहोचू शकेल. संपूर्ण देश, सुखीस्तान होऊ शकेल आणि त्यासाठी आम्हाला बदल घडवून आणावे लागतील. पायाभूत सुविधा वाढवाव्या लागतील आणि शेतकऱ्यांच्या बाजारपेठेच्या ज्या गरजा आहेत त्या लक्षात घेऊन या सुविधा वाढवाव्या लागतील. अटलबिहारी वाजपेयीजींनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना दिली ती केवळ गावात गाड्या याव्यात यासाठी नाही तर गावातील उत्पादने त्वरित बाजारात पोहोचावीत हे सुध्दा या रस्त्यांचे काम आहे आणि आम्ही तिच योजना पुढे घेऊन चाललो आहोत. दूरदूर कानाकोपऱ्यांत ही व्यवस्था पोहोचावी, या दिशेने काम सुरू आहे. एकीकडे विमानतळ तयार करण्याची कल्पना आहे तर दुसरीकडे गावातील रस्ते बांधण्याचाही विचार आहे. बाजारहाट ई बोर्डवर आणण्याचीही कल्पना आहे. आपल्या बाजाराचे ई-नेटवर्क का असू नये? ई-बाजारपेठेची व्यवस्था होईल, त्याला योग्य व्यासपीठ मिळेल आणि जे युवक शेतकरी हल्ली मैदानात उतरले आहेत, त्यांच्यासाठी ते उपकारक ठरेल. आनंदाची बाब अशी की आपल्या देशाची युवा पीढी आता पुन्हा एकदा कृषी क्षेत्रात स्वारस्य दाखवू लागली आहे. मध्ये 20 वर्षांचा काळ असा गेला की अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले होते. आता अनेक बाबी परतताना दिसत आहेत तर अशा विन्मुख शेतकऱ्यांनाही आम्ही परत आणू शकू. आम्ही शेतकऱ्यांना काही बाबतीत मार्गदर्शन करू शकतो. शेतीचे तीन भागांमध्ये प्रामुख्याने विभाजन करता येईल. पहिला विभाग नियमित शेती करणारा अर्थात पारंपरिक पध्दतीने शेती करणारा आहे. दुसरा विभाग वृक्षांची शेती करणार आहे. आज घडीला आमचा देश खूप मोठ्या प्रमाणावर लाकूड आयात करतो. फर्निचर आणि इतर लाकडी वस्तू बनविण्यासाठी इतके जास्त लाकूड आयात केले जाते. जर आमच्या देशातील शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर, जेथे त्यांच्या जमिनीची सीमा असेल, तेथे झाडे लावतो आणि 20 वर्षांनंतर त्यांचा मोठा वृक्ष होतो, तो कापण्याचा आणि विकण्याचा अधिकार दिला जाऊ शकेल. त्याच्या घरात मुलीचा जन्म झाला आणि त्याने दोन मोठे वृक्ष होणारी झाडे लावली तर मुलीच्या लग्नाच्या वयापर्यंत ती झाडेही मोठी होतील आणि वृक्ष झालेली ती झाडे विकून त्यातून मुलींच्या लग्नाचा खर्चही त्यातून निघू शकेल. आम्ही शेतकऱ्यांना झाडांची शेती करण्यासाठी का बरे प्रेरित करू नये? तिसरा विभाग आहे पशुधनाधारीत उद्योग. एकूण शेतकऱ्यांपैकी एक तृतीयांश शेतकऱ्यांनी या उद्योगांकडे वळावे मग ते मत्स्यपालन असो किंवा कुक्कुटपालन असो. या उद्योगामधून नियमित उत्पन्न देणारी उप-उत्पादने प्राप्त होऊ शकतात. अशा प्रकारे एक तृतीयांश पध्दतीने शेतकऱ्याने कामावर लक्ष केंद्रीत केले आणि एखाद्या वर्षी पिकांचे नुकसान झाले तर पशुधनाधारीत उद्योगांवर शेतकऱ्यांची गुजराण होऊ शकेल. कधीतरी वृक्ष शेतीतून उत्पन्न मिळू शकेल. असे केल्यास आमच्या शेतकऱ्यांवर कधीही निराश व्हायची वेळ येणार नाही. आता या दोन गोष्टी करता येण्यासारख्या समोर आल्या, ज्याबाबत विचार केला जाऊ शकतो आणि काही शेतकऱ्यांनी प्रयोगही केला आहे.

एक तर आपण काय करतो की आपण दोन शेतांमध्ये विभाजन करतो. कोणत्या ना कोणत्या कारणाने संबंधित शेतकरी सुध्दा अशा प्रकारे एक मीटर शेतीची जमीन खराब करतो. वाया घालवतो. आणि जवळजवळ प्रत्येक शेतकरी असे करतो, त्यामुळे दर दोन शेतांच्यामधली एक ते दो मीटर शेतजमीन वाया जात आहे. आपल्या देशात लोकांची अशी मानसिकता का तयार झाली असावी. ते समजत नाही. केवळ शक्यतांचा विचार करून की हा घुसखोरी करेल किंवा तो घुसखोरी करेल असाच विचार करून आम्ही मध्यस्थी करून शेतकऱ्यांना ही जी वाया जाणारी जमीन आहे, हे वाया जाणारे क्षेत्र आहे, ते सुपीक करण्यासाठी प्रेरित करायचे आहे. दुसरे असे की अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या सीमेवर सौर पॅनल लावून वीजेचे कारखानेच सुरू केले आहेत आणि काही राज्यांमधील शेतकरी अशा प्रकारे वीजेची निर्मिती करीत आहेत आणि त्यांच्या विक्रीचीही व्यवस्था केली जात आहे. हे असे प्रयोग आहेत की ज्याद्वारे शेतकरी आपल्या शेतात वीजनिर्मिती करेल, त्यावर पंपही चालवेल आणि जास्त वीज निर्मिती झाल्यास सरकार ती खरेदी करू शकेल शेतकरी आपल्या शेताच्या कडेला वीजनिर्मितीचे एकक लावू शकेल. शेताला कुपन मिळेल आणि शेतकऱ्याला वीज मिळू शकेल. वर्षभर बारा महिने वीज मिळत राहील. अशा अनेक गोष्टी शेतकऱ्याला विचारात घेऊन अमलात आणायचा प्रयत्न आपण केला पाहिजे.

शेतकऱ्याचे आपण अशा प्रकारे मूल्यवर्धन करून गावाला केंद्रस्थान बनवू शकू. एक घटना माझ्या चांगली लक्षात राहिली आहे. तेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. शेतकऱ्याला एक समस्या कायम सतावते. ती अशी की पीक कमी आले तर त्याला उपाशी राहावे लागते. दोन्ही प्रकारे शेतकरी अडचणीत येतो. आमच्या गुजरातमध्ये एक भाग आहे, जिथे केवळ मिरचीचे उत्पन्न घेतले जायचे. हिरवी मिरची. आता संपूर्ण गावाची मिरची विकायची होती. फार-फार तर तीन लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. आता केवळ तीन लाख रुपयात संपूर्ण गावाची गुजराण वर्षभर कशी होणार. गावात काही शिकले, सवरले, सुशिक्षित लोक होते, ते म्हणाले की यावेळी आम्ही मिरची विकणार नाही. हिरवी मिरची विकणार नाही. त्यांनी काय केले तर ही हिरवी मिरची वाळू दिली. तिची लाल मिरचीही होऊ दिली. मिरची लाल झाल्यानंतर त्यांनी त्या मिरचीची पूड तयार केली. हा मसाला, पूड त्यांनी प्लॅस्टीक पिशव्यांमध्ये पॅक केली आणि लाल तिखट अर्थात लाल मिरचीची पूड विकायला सुरुवात केली. जे गाव केवळ वर्षाला 3 लाख रुपये कमावणार होते, त्या गावाने तब्बल 18 लाख रुपये कमावले. हे आहे मूल्यवर्धन. आपण ग्रामीण स्तरावर केवळ मूल्यवर्धनावरच भर देऊ शकतो. राज्यांमध्ये अशा प्रकारचे लहान लहान विकेंद्रीकरण प्रयोग स्वारस्य दाखवून केले पाहिजे. त्यांच्या ब्रॅडींगकडे लक्ष दिले पाहिजे. अमूक एक भाग असेल तर तो राई वर काम करीत आहे, त्यांचा हा ब्रॅण्ड आहे. याच नावाने तो विकला जाईल आणि त्याला बाजारपेठही मिळेल. या व्यवस्था जोडल्या गेल्या पाहिजेत. या व्यवस्था आपण जोडू शकलो तर अनेक बदल घडवून आणू शकू.

कृषी क्षेत्रात अनेक प्रगतीशील शेतकरी आहेत. कृषी विद्यापीठे जे काम करतात, त्याहून अद्भूत कार्य या प्रगतीशील शेतकऱ्यांनी केले असेल. आपण आपल्या प्रत्येक राज्यात अशा प्रगतीशील शेतकऱ्याचा डिजिटल ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करू शकतो. राज्यातील जे प्रगतीशील शेतकरी आहेत त्यांच्या प्रयोगांचे तपशील त्या ठिकाणी उपलब्ध असू शकतील. देशातला कोणताही शेतकरी अथवा कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी, हे तपशील पाहू शकेल आमची कृषी विद्यापीठे या कामी नेतृत्व स्वीकारू शकतील. कृषी विद्यापीठे आपला जो वातावरणीय विभाग आहे, या वातावरणीय विभागामध्ये अंमलात आलेल्या प्रगतीशील गोष्टी, त्यांचे अनुभव, प्रयोग अशा बाबींची नोंद ठेवता येईल. लक्षात घ्या की अशा पध्दतीने आपण वेगाने क्रांती घडवून आणू शकतो. मला असे वाटते की सिक्कीमने सुध्दा अशा प्रकारचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करावा, सेंद्रीय प्रगती काय झाली, कशी झाली, हे शेतकरी सांगू शकेल. संपूर्ण देशभरातील शेतकरी हे पाहण्यासाठी येथे येऊ शकतील.

मी आज फुलांचे जे प्रदर्शन पाहिले त्यात व्हर्टीकल गार्डनची संकल्पना पाहायला मिळाली. आता व्हर्टीकल गार्डन काय आहे ते आम्हाला पुस्तकात दूरचित्रवाणीवर पाहावे लागते. मी पवनजींचे अभिनंदन करतो की त्यांनी येथे व्हर्टीकल गार्डन उभारले आहे. मला सांगावेसे वाटते की व्हर्टीकल गार्डन काय असते, त्याला कसे सजवता येईल आणि कमीत कमी जागेत कशा प्रकारे विकसित करता येईल, हे आपण सगळ्यांनी पाहिले पाहिजे. आपण अशा बाबींचा प्रचार करू शकलो, तर लोक उत्साहाने त्या करायला तयार होतील. त्याचमुळे आज सिक्कीमसाठी तर फार मोठा उत्सव आहे. येथील शेतकऱ्यांनी 12-13 वर्षांच्या अविरत प्रयत्नांचे हे फलित आहे. हे सर्व शेतकरी अभिनंदनप्राप्त आहेत. देशभरातील कृषी विभागांचे अधिकारी आणि मंत्री येथे उपस्थित आहेत. भारत सरकारचेही सर्व अधिकारी हजर आहेत. एका नव्या उत्साहाने, नवा विचार मनात रुजवून नवे संकल्प करत आपण येथून रवाना होऊ आणि सिक्कीमच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये जो पवन वाहतो आहे, तो सर्वत्र पसरावा. आमच्या शेतांमध्ये हा पवन पोहोचावा, त्यासाठी आपण प्रयत्न करूया.

मी सिक्कीम सरकारचे आभार मानतो की त्यांनी भारत सरकारचा इतका मोठा कार्यक्रम येथे आयोजित केला. सिक्कीममध्ये दोन दिवस वास्तव्य करण्याची संधी मला लाभली. हे माझे सौभाग्य आहे. आपण सर्वांनी मला जे प्रेम दिले, आदर दिला, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी आपले आभारी आहे. मनापासून धन्यवाद!

येथे एक कविता उद्घृत करायची इच्छा होत आहे. ही कविता तशी जुनी आहे पण बघा, की आपल्या देशात जैविक संबंधांबाबत कसा विचार केला जातो. हिंदी भाषिक कवी आहेत घाघ, त्यांनी फार मजेदार रचना केली आहे. ते म्हणतात

‘खाद पडे तो खेत नही तो कूडा रेत
गोबर राखी पाती सडे, फिर खेती में दाना पडे,
सन के डंठल खेत छितावै, तिनते लाभ चौगुना पावे,
गोबर मैला नीम की खली या से खेती दूनी फली
वही किसानो में है पूरा, जो छोडे हड्डी के चूरा…

मला मान्य आहे की कवी घाघ यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केलेले विचार आपण सिक्कीमच्या रहिवाशांनी आचरणात आणले आहेत आणि त्यासाठीच मी सिक्कीमचे पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो. आणि या अशा समारंभाचे आयोजन केल्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करतो. देशभरातून आलेल्या मान्यवरांना माझी विनंती आहे की येथून चांगल्या गोष्टी घेऊन जा आपल्या राज्यात या बाबीला प्राधान्य द्या.

आपल्या राज्यासाठी वेळापत्रक तयार करा आणि त्यानुसार आचरण करून शेतकऱ्यांच्या हिताचे भारताचे स्वप्न साकार करा. मन:पूर्वक आभार!!!

M. Pange / I. Jhala / M. Desai